Friday 6 October 2017

ओव्या३६ ते५० अर्जुनविषादयोग सार्थ ज्ञानेश्वरी


🌼माधुर्यी मधुरता । शृंगारी सुरेखता ।रूढपण उचितां । दिसे भले ॥३६॥
✏  या (ग्रंथात) मधुरतेलाही गोडी प्राप्त झाली. शोभिवंत वस्तूंना अधिक सुरेखता आली.
योग्य वस्तूंना आलेला रुढपणाचा ही सुंदर प्रत्यय आला.
🌼एथ कळाविदपण कळा । पुण्यासी प्रतापु आगळा ।म्हणऊनि जन्मेजयाचे अवलीळा । दोष हरले ।३७|
✏येथे कलेला कुशलता, पुण्याला अधिक बळ प्राप्त झाले. म्हणूनच जनमेजयाचे दोष (भारत श्रवण केल्याने ) सहज नाहीसे झाले.
🌼आणि पाहता नावेक । रंगी सुरंगतेची आगळीक ।गुणां सगुणतेचे बिक । बहुवस एथ ॥३८॥
✏ क्षणभर विचार केला असता, असे दिसते की या रंगामध्ये आणखी विविध रंगांचा सहभाग किंवा सद्गुणांना आणखी चांगल्या गुणांची साथ अधिकतेने या ग्रंथात आढळते.
🌼भानुचेनि तेजें धवळले । जैसे त्रैलोक्य दिसे उजळले ।तैसे व्यासमती कळवलें । मिरवे विश्व ॥३९॥
✏ सूर्याच्या प्रकाशाने उजळलेले त्रैलोक्य तेजोमय दिसते. त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने व्यापिलेले सगळे विश्व शोभिवंत दिसते.
🌼कां सुक्षेत्रीं बीज घातले । ते आपुलेयापरी विस्तारले ।तैसे भारतीं सुरवाडले । अर्थजात ॥४०॥
✏चांगल्या कसदार जमिनीत पेरलेले बी आपल्या अंगच्या जोमाने उगवते त्याप्रमाणे चार पुरुषार्थ प्रफुल्लित झाले.
🌼ना तरी नगरांतरी वसिजे । तरी नागराचि होइजे ।तैसे व्यासोक्तितेजे । धवळित सकळ ॥४१॥
✏ शहरात किंवा नगरात वस्ती करुन राहिलेला मनुष्य सुसंस्कृत होतो. त्याप्रमाणे व्यासवाणीच्या तेजात (न्हाऊन निघाल्याने) सर्व विश्व ज्ञानमय झाले आहे.
🌼कीं प्रथमवयसाकाळीं । लावण्याची नव्हाळी ।प्रकटे जैसी आगळी । अंगनाअंगी ॥४२॥
✏ तारुण्यात प्रवेश करण्याच्या सुरवातीस नवतरुणीच्या अवयवामध्ये लावण्याचा भर अधिक उठावदार दिसतो.
🌼ना तरी उद्यानी माधवी घडे । तेथ वनशोभेचि खाणी उघडे ।आदिलापासोनि अपाडे । जियापरी ॥४३॥
✏ उद्यानात वसंत शोभा आली असता सर्व तरुवेलींवर पूर्वीपेक्षा अधिकच वनवैभव दिसू लागते.
🌼नाना घनीभूत सुवर्ण । जैसे न्याहाळितां साधारण ।मग अळंकारी बरवेपण । निवाडु दावी ॥४४॥
✏ लगडीच्या स्वरुपातील सोने साधारण दिसते. परंतु त्याचे अलंकार बनविल्यावर ते अधिक भूषविते.
🌼तैसे व्यासोक्ती अळंकारिले । आवडे ते बरवेपण पातले ।ते जाणोनि काय आश्रयिले । इतिहासी ॥४५॥
✏ त्याचप्रमाणे व्यासाच्या वाणीने अलंकृत झालेले सौंदर्य अधिक शोभायमान झाले. हे पाहून इतिहासाने त्याचा आश्रय केला.
🌼नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं । सानीव धरुनी आंगी ।पुराणे आख्यानरूपे जगीं । भारता आली ॥४६॥
✏ जगात सन्मान कीर्ती प्राप्त व्हावी म्हणून जणू काही पुराणे नम्रता धरून छोट्या छोट्या आख्यानाच्या रुपाने महाभारतात येऊन प्रसिद्ध झाली.
🌼म्हणऊनि महाभारतीं जे नाही । ते नोहेचि लोकी तिहीं ।येणे कारणे म्हणिपे पाहीं।व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥ ४७॥
✏ म्हणून महाभारतात जे नाही ते तिन्ही लोकात सापडणार नाही, यासाठी हे त्रिभुवन व्यासांचे उष्टे आहे. (व्यासानंतर झालेल्या कथा कल्पना या व्यासांपासूनच घेतल्या आहेत.) 
🌼ऐसी सुरस जगीं कथा । जे जन्मभूमि परमार्था ।मुनि सांगे नृपनाथा । जनमेजया ॥४८॥
✏ अशी ही जगातील अतिशय रसाळ कथा ब्रह्मज्ञानाचे उगमस्थान आहे. ती वैशंपायन मुनींनी श्रेष्ठ राजा जनमेजयास सांगितली.
🌼जे अद्वितीय उत्तम।पवित्रैक निरुपम ।परम मंगलधाम । अवधारिजो ॥४९॥
✏ ही कथा अद्वितीय, उत्कृष्ट, अत्यंत पवित्र, अनुपम, परमकल्याणाचे आश्रयस्थान असल्याने ती समजून घ्या.
🌼आता भारतीं कमळपरागु । गीताख्यु प्रसंगु ।जो संवादिला श्रीरंगु । अर्जुनेसी ॥५०॥
✏ आता भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला संवादरुपाने उपदेश दिला. तो गीता नावाचा विषय भारतरुपी कमळातील जणू पुष्प पराग आहे.

Thursday 5 October 2017

अर्जून विषादयोग ओव्या 26 ते 35 सार्थ ज्ञानेश्वरी

 ओव्या
💡॥॥
  🔔🔔
⛳🌺⛳🌺⛳🌺⛳🌺⛳
🌸का तीर्थे जिये त्रिभुवनी । तिये घडती समुद्रावगाहनी ।ना तरी अमृतरसास्वादनीं । रस सकळ ॥२६॥
✏  जगामध्ये जेवढी म्हणून तीर्थक्षेत्रे आहेत. त्या सर्वांची तीर्थस्नाने केवळ एकट्या समुद्रस्नानाने घडतात. किंवा फक्त अमृत सेवन केले असता, सर्व रसांची गोडी त्यामध्ये अंतर्भूत असते.
🌸तैसा पुढतपुढती तोची । मियां अभिवंदिला श्रीगुरूचि ।जे अभिलषित मनोरुची । पुरविता तो ॥२७॥
✏ त्याप्रमाणे एकट्या श्रीगुरुंच्या वंदनात सर्वांना वंदन घडते. म्हणून मी सद्गुरुंना वारंवार वंदन करतो. कारण ते मनात आलेले मनोरथ पूर्ण करतात.
🌸आता अवधारा कथा गहन । जे सकळां कौतुका जन्मस्थान ।की अभिनव उद्यान । विवेकतरूचे ॥२८॥
✏ आता ही कथा लक्षपूर्वक ऐका! जी कलेच्या नवलाईच्या आविर्भावाचे उगमस्थान, किंवा विचाररुपी तरुंचे नवे विशाल अपूर्व उद्यान आहे.
🌸ना तरी सर्व सुखांची आदि । जे प्रमेयमहानिधी ।नाना नवरससुधाब्धि । परिपूर्ण हे ॥२९॥
✏ म्हणून सर्वसुखाचे आश्रयस्थान आहे. अनेक तत्वार्थांचा मोठा साठा किंवा शृंगारादि नऊ रसांनी तुडुंब भरलेला सागरच आहे.
🌸की परमधाम प्रकट । सर्व विद्यांचे मूळपीठ ।शास्त्रजाता वसिष्ठ । अशेषांचे ॥३०॥
✏  सर्वांना उघडपणे दिसणारा सर्वोत्तम ज्ञानप्रकाश, किंवा सर्व विद्यांचे मूलस्थान किंवा सर्व शास्त्र समूहांचे आश्रयस्थान आहे.
🌸ना तरी सकळ धर्मांचे माहेर । सज्जनांचे जिव्हार । लावण्यरत्नभांडार । शारदियेचे ॥ ३१॥
✏ सर्वधर्मांचे माहेर सज्जनांचा जिव्हाळा आहे. किंवा सरस्वतीच्या लावण्यमय रत्नांचा खजिना, अशी आहे.
🌸नाना कथारूपे भारती । प्रकटली असे त्रिजगती ।आविष्करोनी महामती । व्यासाचिये ॥ ३२॥
✏ व्यासांच्या विशाल बुद्धीमध्ये प्रकट होऊन वाग्देवता या आख्यानाच्या रुपाने जगतात अवतरली आहे.
🌸म्हणोनी हा काव्यां रावो । ग्रंथ गुरुवतीचा ठावो ।एथुनि रसां आला आवो । रसाळपणाचा ॥ ३३॥
✏ त्यामुळे हा महाकाव्याचा राजा आहे. ग्रंथाच्या थोरपणाची सीमा आहे. येथूनच रसांना रसाळपणाची प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
🌸तेवींचि आइका आणिक एक । एथुनि शब्दश्री स्वच्छास्त्रिक ।आणि महाबोधि कोवळीक । दुणावली ॥ ३४॥
✏ तसेच आणखी एक ऐका ! या महाभारत ग्रंथामुळे शब्दाच्या संपत्तीला शुद्ध शास्त्रीयता प्राप्त झाली. ब्रह्म ज्ञानाचे निरुपण सुंदर समर्पक शब्दात करता येऊ लागले. उपदेशामध्ये कोमलता आली.
🌸एथ चातुर्य शहाणे झाले । प्रमेय रुचीस आले ।आणि सौभाग्य पोखले । सुखाचे एथ ॥ ३५॥
✏ येथे चातुर्य सुद्धा शहाणे झाले. प्रेमाला अधिकच मधुरता प्राप्त झाली. सुख भाग्यवान ठरले.

Wednesday 4 October 2017

अर्जुनविषादयोग ओव्या 11 ते 25 सार्थ ज्ञानेश्वरी

🌺तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु ।वेदांतु तो महारसु । मोदकु मिरवे ॥११
✏ तेव्हा तर्क(अनुमान)हाच कोणी फरस(कुर्‍हाड)निती(आचारधर्म,कमीकर्मविचार)हाचकोणी फरक करणारा किंवा चांगले आणि वाईट यातील फरक दाखवणारा.)अंकुश आणि वेदांत हा अत्यंत मधुर असलेला मोदक म्हणुन शोभतो.
🌺एके हाति दंतु । जो स्वभावता खंडितु ।तो बौद्धमत संकेतु | वार्तिकांचा ॥१२॥
✏  एका हातामध्ये जो मुळातच खंडीत झालेला असा दात आहे.ते बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादिलेले,स्वभावतःच खंडीत असलेले बौद्धमत यांचे निदर्शक आहे.
🌺मग सहजे सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु ।धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु । अभयहस्तु ॥१३॥
✏ मग(व्याससुमावरील वृत्तिच्या व्याख्यानातीलबौद्धमताचे खंडन)झाल्यावर चांगला(वेदानुकुल)तर्क करणारे तत्वज्ञान सहजपणे(सुप्रतिष्टिपित होते)तो सत्कारवादगणपतीचे इच्छित फल प्राप्त करुन देणारा.अभय हस्त होय धर्माची स्थापना (करणारे जे शास्ञ)तो धर्म जिज्ञासु लोकांसाठी सतत वर देणारा हस्त होय.
🌺देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु ।जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ॥१४॥
✏ जेथे समाधिसुखाचा परमानंद विशुद्ध स्वरुपात अनुभवास येतो.असे सारासार विवेकाने भरलेले विशुद्ध ज्ञान तीच सरळ लांब सोंड होय.
🌺तरी संवादु तोचि दशनु । जो समताशुभ्रवर्णु । देवो उन्मेषसुक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ॥१५॥
✏  _या संबंधात(युक्तिवादांचा,साधनांचा किंवा सृष्टीतील तत्वांचा)परस्परातील सुसंवाद हाच (गणेशमुर्तिचा)
निःपक्षपणारुपी  शुभ्र वर्ण असलेला दात होय अंतस्फुर्त ज्ञानरुप सुक्ष्मदृष्टी असलेला विघ्नाचा नियामक असा हा देव आहे._
🌺मज अवगमलिया दोनी । मीमांसा श्रवणस्थानी ।बोधमदामृत मुनी ।अली सेविती ॥१६॥
✏ पुर्व मीमांसा उत्तर मीमांसा गणेशमुर्तिच्या दोन्ही कानांच्या ठिकानी वाटतात.त्यातील ज्ञान मदरुप अमृत मुनीरुपी भ्रमर त्याचे सेवन करतात.
🌺प्रमेयप्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ ।सरिसे एकवटत । इभ मस्तकावरी ॥१७॥
✏ श्रुतीस्मृति यांच्यामध्ये प्रतिपादिलेली तत्वे हिच.(गणेशमुर्तिच्या)अंगावरील सतेज पोवळी असुन व्दैत आणि अद्वैत मते हीच त्या गजाननाच्या मस्तकावर तुल्य बळाने एकञ राहिली आहेत.
🌺उपरि दशोपनिषदे । जिये उदारे ज्ञानमकरंदे । तिये कुसुमे मुगुटी सुगंधे । शोभती भली ॥१८॥
✏ आत्मज्ञानरुपी मध देण्यास ज्याच्या पुष्परसाची ख्याती आहे. अशी ईश्यावास्यादी दहा उपनिषदे गंडस्थळावरील मुकुटावर शोधुन दिसतात.
🌺अकार चरणयुगुल । उकार उदर विशाल । मकार महामंडल । मस्तकाकारे ॥१९॥
✏ ॐ या अक्षरावर गणेशमुर्तिची कल्पना केली असता अकार हे दोन पाय ,उकार विशाल उदराच्या स्थानी स्थानी आणि मकार हे मस्तकाच्या आकारासारखे वर्तुळ दिसते.
🌺हे तिन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळले । ते मियां गुरूकृपा नमिले । आदिबीज ॥२०॥
✏ हे तिन्ही एकञ आले.त्यांनी सर्व वाड्ढमय विस्तार व्यापुन टाकला.सर्व सृष्टिच्या आद्द कारण (गणरायाला) मी वाकुन नमस्कार करतो
(ओवी 1ते20 गणपती देवतेचे  ज्ञानेश्वरी  लेखनाच्या  आरंभी  स्तवन केले आहे. )
🌺आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थकला कामिनी । ते शारदा विश्वमोहिनी । नमिली मियां ॥२१॥
✏  आता नविनच अपुर्व असे वाड्ढमय निर्मितेचे विलास करणारी उच्च कैाशल्ययुक्त वाचा वैभव प्रकटवनारी अशी जी सरस्वती तिला मी वंदन करतो.
(विद्येची देवता सरस्वती देवीचे स्तवन)
(यापुढे  सद्गुरुंचे स्तवन आहे. माऊली  आपले सद्गुरु  थोरले बंधू  निवृत्तीनाथ यांना वंदन करून  लेखनाचा आरंभ  करतात.)
🌺मज हृदयी सद्गुरू । तेणे तारिलो हा संसारपूरु । म्हणऊनि विशेष अत्यादरू । विवेकावरी ॥२२॥
✏  ज्यांनी मला या संसारपुरातुन तारिले.ज्या सद्गुरुनीं माझ्या अंतकरणात वास केला आहे.म्हणुन माझु बुद्धि विशेष करुन विवेकावर प्रेम करते.
🌺जैसे डोळ्यां अंजन भेटे । मग दृष्टीसी फांटा फुटे । मग वास पाहे तेथ प्रकटे । महानिधी ॥२३॥
✏  ज्याप्रमाने डोळ्यात अंजन घातल्यानंतर दृष्टिला विशेष सामर्थ्य प्राप्त होते.मग भुमीगत द्रव्याचा ठेवा सहजपणे दिसु लागतो.
🌺कां चिंतामणी जालया हाती।सदा विजयवृत्ति मनोरथी । तैसा मी पूर्णकाम श्री निवृत्ती । ज्ञानदेवो म्हणे ॥२४॥
✏  चिंतामनी स्वाधिन झाल्यावर सर्व मनोकामना सिद्धिला जातात त्याचप्रमाने सद्गुरु निवृत्तीनाथांमुळे माझ्या सर्व मनोकामना विजयी झाल्या आहेत.असे ज्ञानदेव सांगतात.
🌺म्हणोनि जाणतेनो गुरू भजिजे।तेणे कृतकार्य होईजे। जैसे मूळसिंचने सहजे|शाखापल्लव संतोषती ॥२५॥
✏  याकरिता शहान्या माणसांनी गुरुला शरण जावे. त्यांची सेवा करावी. ज्याप्रमाने एखाद्या झाडाला मुळाशी पाणी घातले असता. फांदी व पाने यांना आपोआप टवटवी येते. म्हणजेच कार्य तडीस(सिद्धिस)पोहचते.
⛳⛳⛳⛳💗⛳⛳⛳⛳⛳
॥जय जय रामकृष्ण हरि॥

Tuesday 3 October 2017

अर्जुनविषादयोग ओव्या 1 ते 10 सार्थ ज्ञानेश्वरी

ॐनमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या।जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥१॥
✏ ॐ ची माहिती (प्रतिपादन)केवळ वेदच करु शकतील. अशा आद्दतत्वाला नमस्कार असो .जो कोनी स्वःताच स्वःताला पुर्णपणे बरोबर जाणु शकतो.अशा आत्मरुप चित्तत्वाचा जयजयकार असो..
🌸देवा तूंचि गणेशु । सकलमति प्रकाशु ।म्हणे निवृत्ति दासु । अवधारिजो जी ॥२॥
✏  निवृत्तीनाथाचे सेवक ज्ञानदेव म्हणतात कि देवा,सर्वाच्यां बुद्धिला ज्ञानाचा प्रकाश असा तुंच गणेश आहेस.असे निश्चित समजावे.
🌸हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष ।तेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥३
✏  ज्याचे आकाराने वर्णरुप शरिर चांगले सुशोभित दिसते.असे हे वेद वाग्मय(पुर्ण शब्द ब्रम्ह)म्हणजे गणेशाची उत्तम सजविलेली मुर्ती आहे.
🌸स्मृति तेचि अवयव । देखा अंगिकभाव तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ॥४॥
✏ मन्वादिस्मृती हेच (गणेशमुर्तिचे)अवयव ,रसविष्कारांची पद्धत हीच जणु अवयवाच्या द्वारे प्रदर्शित होणारी भाव इच्छा अर्थाचे सौष्ठव हेच (गणेश मुर्तितिल)सौदर्याचे तेज आहे.
🌸अष्टादश पुराणे । तीचि मणिभूषणे ।पदपद्धती खेवणे । प्रमेयरत्नांची ॥५॥
✏ मुर्तितिल अठरापुराणे हेच खरे रत्नजडीत अलंकार तत्वार्थ हिच रत्ने,शब्दाची छंदोबद्ध रचना व त्याचे भिन्न भिन्न प्रकार हिच त्या रत्नाची कोंदणे होत.
🌸पदबंध नागर । तेचि रंगाथिले अंबर ।जेथ साहित्यवाणे |सपूर उजाळाचे ॥६
✏ _संपुर्ण प्रकारे विविध काव्यरचना उत्तम अशी अभिरुची हेच रंगवलेले वस्ञ.ज्यातील शब्द रचनेतील अलंकार शास्ञ हे त्या वस्ञाचे तलम
तजेलदार,भरगच्च पोत आहे._
🌸देखा काव्यनाटका । जे निर्धारिता सकौतुका ।त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनी ॥७॥
✏ असे पहा की,काव्य नाटकाच्या विषयी विचार केला तर ती गणपतीच्या पायातील लहान लहान घंटा असुन त्यातील अर्थरुप आवाजाने त्या रुणझुणत आहेत.
🌸नाना प्रमेयांचि परी । निपुणपणे पाहता कुसरी ।दिसती उचित पदे माझारी । रत्नें भली ॥८॥
✏ सर्व एकच पण विविध पद्धतिने प्रतिपादन केलेले तत्व म्हणजे कुशलतेने त्यात वापरलेली उचित शब्दे हीच बहुमुल्य रत्ने,आहेत.असे जाणकार दृष्टिला आढळते.
🌸तेथ व्यासादिकांच्या मति । तेचि मेखळा मिरवती ।चोखाळपणे झळकती ।पल्लवसडका ॥९॥
✏ _याठिकानी व्यास आणि आदि कविच्या प्रज्ञा तेजस्विपणे
झळकतात.त्याच गणेशाच्या कमरेभोवती बांधलेल्या पदरांचे अग्रभाग असुन बिधांस्तपणे मिरवत आहेत._
🌼देखा षड्दर्शने म्हणिपती ।तेचि भुजांची आकृती ॥ म्हणऊनि विसंवादे धरिती ।आयुधे हाती ॥१०॥
✏ असे पहा की ,सहा दर्शने म्हटली जातात(त्यांनीच(गणेशमुर्तिच्या)सहा हाताचा आकार घेतला आहे म्हणुनच त्या परस्पराशी एकसारखे नाहीत. अशी आयुधें धारण केलेली आहेत.
⛳⛳⛳⛳💗⛳⛳⛳⛳
॥जय जय रामकृष्ण हरि॥

Sunday 25 June 2017

क्षणांचे सोने

जमिनीला पाठ टेकताच ज्याला गाढ झोप लागते तो या जगातला सर्वांत सुखी माणूस. झोपताना त्याच्या मनावर कालच्या अपयशाचं मळभ किंवा उद्याच्या अपेक्षांचं ओझं नसतं. झोप हा त्याचा वर्तमान असतो आणि त्याचा तो पुरेपूर आनंद मिळवित असतो.

असा शांतपणे झोपणारा माणूस सकाळी लवकर उठतो, आयुष्यातील नव्या दिवसाच्या आगमनानं आनंदी होतो आणि त्या बक्षिसाबद्दल जीवनाप्रती कृतज्ञता व्यक्त करत नव्या उमेदीनं कामाला लागतो.

असा माणूस शेअर्सच्या चढ-उतारांमुळं भयभीत होत नाही, सोन्याच्या भावातील चढ-उतारांमुळं विचलित होत नाही. घरांच्या वाढत्या किंमतीमुळं अस्वस्थ होत नाही.

भावनांच्या घातक चढ-उतारावर टीआरपीचं गणित असणाऱ्या दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवरील उथळ कार्यक्रमांनी तो भावविवश होत नाही.

त्याच्या घरात ब्लडप्रेशरच्या गोळ्या नसतात, पोट साफ करण्याची चूर्णं नसतात. अंगारे-धुपारे, मंत्र-तंत्र असल्या कर्मकांडात त्याला रस नसतो. तो इमाने इतबारे आपला नोकरीधंदा करतो. बायको-मुलांना नीट सांभाळतो. घरात लक्ष देतो. पाहुण्या-रावळ्यांची देखभाल करतो. बायकोला हवं नको पाहतो. मुलांच्या शाळा-कॉलेजात जाऊन येतो. त्यांची ऍडमिशन-परीक्षा-निकाल साऱ्याचं वेळापत्रक त्याला तोंडपाठ असतं.

त्याला एक मुलगी असली तरी तो खुष असतो. दोन मुली असल्या तरी खुष असतो. एक मुलगा, एक मुलगी असली तरी तो तेवढ्याच आनंदाने जगत असतो.

त्याला राज्यातील, देशातील, जगातील राजकारण, अर्थकारण, समाजकारणाची माहिती असते. पाणीकपात कधी आहे, मेगाब्लॉक कधी आहे, मोठी भरती कधी आहे, भाज्यांचे-डाळीचे भाव काय आहेत हे माहीत असते. या गोष्टींचा तो बभ्रा करीत नाही की त्यांना तो आपल्या व्यक्तिमत्त्वावर स्वार होऊ देत नाही. त्यांना तो समंजसपणे सामोरा जातो...

तो लोकांच्या अडीअडचणीला धावून जातो. लोकांच्या सुखदु:खाशी तो अकृत्रिमपणे समरस होतो.

त्यानं अतिशय नियोजनपूर्वक पै-पैसा साठवून स्वत:चं छोटंसं घर मिळवलेलं असतं. किंवा तेवढ्याच आनंदानं तो पागडीच्या किंवा भाड्याच्या घरात राहात असतो. तो कधी दुसऱ्याच्या सुखाशी आपली तुलना करत नाही, दुसऱ्याच्या यशानं कुढत बसत नाही. नशापाणी करण्याची त्याला गरज वाटत नाही; कारण या लहान-मोठ्या गोष्टीत आनंद घेत तो दिवसभर इतका बिझी असतो की जमिनीला पाठ टेकताच त्याला आपोआप झोप येते.

परिसाच्या शोधात प्रत्येक दगडावर आपल्या हातातलं लोखंड ठोकत फिरणाऱ्यांपैकी तो नसतो; कारण येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे सोने कसे करायचे हे त्याला ठाऊक असते..!

~ पु. ल. देशपांडे

Saturday 24 June 2017

भूतकाळातली वांगी

प्रवचनात वांग्याच्या भाजीची एक छान गोष्ट सांगितली.

धनश्री लेले |


एका बुजुर्ग प्रवचनकार ताईंनी त्यांच्या एका प्रवचनात वांग्याच्या भाजीची एक छान गोष्ट सांगितली. त्या कोणाकडे तरी जेवायला गेल्या होत्या तेव्हा वांग्याची भाजी केली होती, ती भाजी काही तितकीशी जमली नव्हती. त्याला काही विशेष चव ढव नव्हती.. आता ती तितकीशी जमली नव्हती हा विषय खरं तर तिथेच सोडून द्यायला हवा होता पण तसं झालं नाही.. काही दिवसांनी त्या आणखी कोणाकडे तरी गेल्या, त्यांनीही वांग्याची भाजीच केली होती.. त्यांची भाजी मात्र चांगली झाली होती, ती भाजी खाताना पुन्हा न जमलेली ती भाजी त्यांना आठवली, काही दिवसांनी मंडईत कृष्णाकाठची ताजी वांगी पाहिल्यावर पुन्हा ती न जमलेली भाजी त्यांना आठवली.. या प्रसंगाचा शेवट करताना त्या म्हणाल्या, ‘‘जी गोष्ट चांगली झाली नाही ती स्मरणात राहिली. त्या पूर्वी चांगल्या चवीची वांग्याची भाजी खाल्ली नव्हती का कधी? खाल्ली होती. पण ती लक्षात राहिली नाही.. बिघडलेली मात्र लक्षात राहिली.. आपलं मन असंच असतं.. जे लक्षात ठेवायला हवं ते ठेवत नाही आणि नको ते धरून बसतं.’’

स्वत:ला नातसून आलेली आज्जे सासूबाई, तिच्या सासूबाई तिला पुरणपोळ्या नीट जमल्या नाहीत म्हणून जेवताना पानावर कसं टाकून बोलल्या हे आजही डोळ्याला पदर लावून सांगत असते, पण याच सासूबाईंनी तिच्या बाळंतपणात तिची सेवा केली हे मात्र विस्मृतीकोशात गेलेलं असतं. मानवी स्वभाव.. नको ते आठवत राहतं.

आमच्या घरी रोज श्लोक पाठ करून आजोबांना म्हणून दाखवण्याची शिस्त होती. कंटाळा यायचा कधी कधी, मग मी नाही पाठ करायचे. आजोबा रागवायचे, कधी कधी अबोला धरायचे. मग मी एका दिवसात आठ श्लोक पाठ करून दाखवायचे. त्याचं कौतुक असायचं, पण त्या दिवशी पाठ केले नाहीत हे ते विसरायचे नाहीत. मग आई नेहमीचं तिचं ठेवणीतलं वाक्य म्हणायची, ‘बूंद से गई वो हौद से नही आती’ तो बूंद एकदा मनातून पडला की तोच लक्षात राहतो. नंतर कितीही मोठा हौद बांधला तरी.. काय म्हणायचं या मानवी स्वभावाला?

पाच वर्षांपूर्वी एखादा प्रसंग घडलेला असतो.. त्यातल्या व्यक्तींशी आपलं बोलणं, संभाषण बंद झालेलं असतं. जेव्हा जेव्हा ती व्यक्ती दिसते तेव्हा तेव्हा आपल्याला तोच प्रसंग आठवत राहतो.. कटू आठवण, अढी अधिकच घट्ट होत जाते.. पाच वर्षांनीही आपण सगळे तेच आणि तसेच आहोत असं मानूनच आपण वागत असतो.. या पाच वर्षांत माणसं बदललेली असू शकतात, हा विचार करण्याएवढे उदार आपण नसतो. त्या व्यक्तीने पुन्हा चांगल्या हेतूने नात्याचा हात पुढे केला तरी आपण धरून ठेवलेली ती कटू आठवण आपल्याला प्रतिसादाचा हात पुढे करू देत नाही. म्हणून कटू आठवण जिथल्या तिथे सोडून देणं हाच उत्तम उपाय. ती कुरवाळत ठेवू नये. आपलं सुदैव की आपण खूप जुनी, भळभळणारी जखम वागवत फिरणारा अश्वत्थामा नाही.. जखम अंगावर, मनावर ताजी ठेवण्याचं दु:ख काय असतं ते त्यालाच माहीत. त्याला तो शाप आहे पण आपल्याला तर अशी सक्ती नाही, मग अश्वत्थाम्याचं दु:ख विनाकारण मागून का घ्यायचं?

मेमरी चिपवरून भूतकाळाच्या आठवणी हळूहळू पुसून टाकून चिपमध्ये नव्या आठवणींना जागा करून द्यायला हवी.. मनाला त्रास देणाऱ्या आठवणी तर जाणीवपूर्वक पुसून टाकायला हव्यात. त्यातून फक्त धडा घेऊन, कोणाहीबद्दल मनात गाठ न ठेवता पुढे पाऊल टाकायला हवं आणि एखाद्या वळणावर भेटली पुन्हा तीच कटू आठवण तर ‘तुझ्या कटुत्वामध्येही  गोडवाच मी शोधणार आहे..’ असं तिलाच ठणकावून सांगावं. स्मृतिकोशात काय ठेवायचं हे ज्याला समजलं तो खरा विवेकी! भूतकाळाला वर्तमानाची जागा अडवू देऊ  नये..



‘कुंग फू पांडा’ या चित्रपटात मास्टर उग्वे नावाचं एक कासव आहे. ते तीनशे वर्षांचं आहे. त्याच्या तोंडी एक सुंदर वाक्य आहे, ‘यस्टर्डे इज हिस्टरी, टुमारो इज मिस्टरी. टूडे इज अ गिफ्ट फ्रॉम द लॉर्ड, हेन्स इट इज कॉल्ड द प्रेझेंट.’ गम्मत म्हणजे तीनशे वर्षांचं असलं तरी ते ‘आमच्या वेळेला असं होतं’ असं न म्हणता ‘वर्तमान हीच अमूल्य भेट आहे’ असं सांगतं. रात्री झोपताना आपण टोचणारे अलंकार जसे काढून ठेवतो तशाच टोचणाऱ्या आठवणीही मनातून काढून ठेवाव्यात.. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त अलंकार घालावेत.. सकाळी तन मोकळं, मन मोकळं आणि नवीन वांग्याच्या भाजीची चव चाखायला जीभ ही मोकळी. जशी पुराणातली वानगी.. तशी ही भूतकाळातली वांगी..

धनश्री लेले

dhanashreelele01@gmail.com

Friday 16 June 2017

पिंक रिबन

मी छानसं काही वाचलेल आणि आवडलेलं -जरुर वाचा...
तुम्हाला माझ्याकडून आलेली ही पिंक रिबन.... 🎀

            🎀 पिंक रिबन 🎀

न्यूयॉर्क शहरातल्या एका शिक्षिकेने वर्षाच्या शेवटी तिच्या वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या शर्टावर पिंक रिबनचा बो लावला. त्या रिबनवर लिहिले होते Who you are, makes a difference. तुझ्या असण्यामुळे (माझे ) आयुष्य बदलले आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याला संदेश वाचून खूप आनंद झाला.

''वा, माझ्यामुळे टीचरच्या आयुष्यात फरक पडला आहे.'' पण नुसते एवढेच करून ती शिक्षिका थांबली नाही. तिने प्रत्येक विद्यार्थ्याला अजून तीन रिबन दिल्या व सांगितले, ''तुमच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना धन्यवाद द्या व त्यांच्या कपड्यावर ही पिंक रिबन लावा.''

एका विद्यार्थ्याने शेजारच्या घरात राहणार्‍या एका तरुणाच्या शर्टावर ''थँक यू, तुझ्यामुळे माझे आयुष्य बदलले आहे म्हणून मी तुला ही पिंक रिबन लावतो'' असे म्हणत रिबन लावली. तो शेजारी एका ऑफिसमध्ये ज्युनियर कर्मचारी होता. त्याने त्या विद्यार्थ्याला अभ्यासात मदत केल्यामुळे विद्यार्थ्याला परीक्षेत अव्वल नंबर मिळाला होता.

विद्यार्थ्याने उरलेल्या दोन रिबन त्याला दाखवत विचारले, ''आम्ही शाळेसाठी एक प्रोजेक्ट करतो आहोत. तुझ्या आयुष्यात ज्या माणसामुळे चांगला बदल झाला आहे त्यांना ही रिबन लावशील का?''

कर्मचारी लगेच तयार झाला. दुसर्‍या दिवशी त्याने आपल्या बॉसपाशी जाऊन ''थँक यू You made a difference in my life " असे म्हणत पिंक रिबनचा बो लावला. बॉस अत्यंत हुशार होता, कंपनी त्याच्यामुळे चालली होती; पण तो खडूस म्हणूनही प्रसिद्ध होता. तरीही कर्मचार्‍याने बो लावल्यावर बॉसच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तो म्हणाला, ''माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात बदल झालाय? तुझ्यासाठी मी इतका महत्त्वाचा आहे हे मला माहीतच नव्हते. थॅक्यू.''

कर्मचार्‍याने त्याला विचारले, ''ही कल्पना माझी नाही. हे एका शाळेतले प्रोजेक्ट आहे. आयुष्यात बदल करणार्‍या लोकांना धन्यवाद देऊन त्यांना हा पिंक रिबनचा बो लावायचा. तुम्हाला आवडेल असे करायला?'' बॉस एकदम म्हणाला, ''हो नक्की आवडेल. आहे तुझ्याकडे अजून एखादा बो?'' कर्मचार्‍याने आपल्याकडचा उरलेला बो बॉसला दिला.

बॉस घरी गेला. त्याने आपल्या मुलाला बोलावले . मुलाच्या शर्टावर पिंक रिबनचा बो लावत तो म्हणाला, ''मी कामामुळे उशिरा घरी येतो, घरी आल्यावर माझी चिडचिड होते, मी तुझ्याशी प्रेमाने बोलतही नाही, मी आजवर तुला कधी हे सांगितले नाही, पण तू जसा आहेस तसाच रहा. तुझे असणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. Who you are, makes a difference in my life "
 
मुलगा ढसाढसा रडायला लागला. तो म्हणाला, ''डॅड , मला वाटायचे की तुला मी अजिबात आवडत नाही. मी तुला कधीच खूश करू शकणार नाही म्हणून आज रात्री मी आत्महत्या करणार होतो.

ही बघ, मी तुला व आईला चिठ्ठी लिहून ठेवली होती. पण ही रिबन लावलीस आणि माझं आयुष्य बदलवलेस डॅड.

''बॉसने चिठ्ठी वाचली. त्याने आपल्या मुलाला घट्ट पोटाशी धरले. दोघेही एकमेकांच्या मिठीत आनंदाचे अश्रू ढाळत होते. त्या एका रिबनमुळे मुलाला बाबा व आयुष्य दोन्ही मिळाले होते आणि बापालाही मुलगा मिळाला होता.

आई मुलांविषयीचे प्रेम सहज व्यक्त करू शकते.
मुलेही आईशी मोकळेपणाने बोलू शकतात.
आईला ते जन्मजात कसब असते. कारण स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकाळची माता असते.

पण पुरुष हा क्षणाचा पिता असतो, पण म्हणून त्यांचे महत्त्व मुलाच्या आयुष्यात कमी नसते. उलट अनेक मुले वडिलांच्या नजरेतही आपण कोणीतरी असावे यासाठी आयुष्यभर झटतात,

पण काही वडिलांना त्याबद्दल काहीच वाटत नसते. मुलांकडे पूर्णत: दुर्लक्ष करत हे पुरुष कामात मग्न रहातात.

म्हणतात की, Any man can be a Father but it takes someone special to be a Dad.

कोणीही पुरुष बाप सहज बनू शकतो, पण बाबा होणे काहींनाच जमते.

चांगला पालक होणे ही प्रवृत्ती आहे. असिधारा व्रत आहे. त्यासाठी शिक्षण, जात, धर्म यांपैकी कशाचीही जरूर नसते. फक्त इच्छा असावी लागते...

सदर पोस्ट आवडल्यास ही पिंक रिबन इतरांनाही पाठवा कदाचित त्यांच्यामुळे तुमचं आयुष्य बदलले असेल....

 "जेवणात जर कोणी विष कालवले तर त्यावर उपचार आहे, परंतु मनामध्ये जर कोणी विष भरवले तर त्यावर कोणताच उपचार नाही ."

🍂🍃🍃🍂
" पिंक रिबन " 🎀

अप्रतिम आयुष्य बिघडवायला वेळ लागत नाही पण घडवायला आत्मविश्वास लागतो मन मोठं असावं लागतं.

Wednesday 14 June 2017

वय...

पैलतीर दिसतोय तरी
प्रेम काही संपत नाही...

अजून तरी 'वय झाले'
असे काही वाटत नाही!


मुलं झाली, फुलं झाली,
पशु, पक्षी, पाने झाली...
माणसं आपली झाली,
परकी झाली, तरी
प्रेम काही सरत नाही...

अजून तरी 'वय झाले'
असे काही वाटत नाही!


कुरळ्या बटांवर,
गालावरच्या खळ्यांवर,
मलमली तारुण्यावर...
प्रेम करणं काही केल्या
सुटत नाही...

अजून तरी 'वय झाले'
असे काही वाटत नाही!


रातराणीच्या गंधावर,
दरवळणाऱ्या मोगऱ्यावर,
गुलाबाच्या कळीवर,
मनमोहक त्या चाफ्यावर...
बेधुंद होऊन बरसणं
काही थांबत नाही...

अजून तरी 'वय झाले'
असे काही वाटत नाही!


कथा कादंबऱ्यात रमणं,
कवितेवर मरणं,
हातात हात घालून
चांदण्यात फिरणं,
तिच्याशिवाय रुचत नाही...

अजून तरी 'वय झाले'
असे काही वाटत नाही!


मोगरा केसात माळताना
तिच्यात गुंतणं काही
टळत नाही...
कोरडं कोरडं जगणं
मनाला काही पटत नाही...

अजून तरी 'वय झाले'
असे काही वाटत नाही!


बरसणाऱ्या सरीत
उफाळणारं प्रेम आवरत नाही...
तुझ्यामाझ्या मनातलं
प्रेम काही मिटत नाही...

अजून तरी 'वय झाले'
असे काही वाटत नाही!


तुझ्या शिवाय राहणे
थोडे म्हणून जमत नाही...
गंधाबरोबर फुलांचं,
डोळ्यांबरोबर अश्रूंचं
नातं काही तुटत नाही...

अजून तरी 'वय झाले'
असे काही वाटत नाही!


कितीही लुटले प्रेम तरी
प्रेम काही आटत नाही...

अजून तरी 'वय झाले'
असे काही वाटत नाही!

अजून तरी 'वय झाले'
असे काही वाटत नाही!!!

Tuesday 13 June 2017

वाळवंटात

एका सुंदर इंग्रजी पोस्टचा मराठी स्वैर अनुवाद पोस्ट करतोय....बोधप्रद वाटलं....पहा आवडते का !

तो वाळवंटात हरवला होता. त्याच्या जवळच पाणी संपलं त्यालाही दोन दिवस झाले होते. आता पाणी नाही मिळालं तर आपलं मरण निश्चित आहे हे त्याला दिसत होतं, जाणवत होतं. हताश होऊन तो सभोवताली दूर दूर पर्यंत जेवढी नजर जाईल तिथपर्यंत डोळे ताणून ताणून पहात होता. त्याची नजर अर्थातच पाणी शोधत होती. 
तेवढ्यात त्याला काही अंतरावर एक झोपडं दिसलं. तो थबकला. हा भास तर नाही? नाहीतर मृगजळ असेल. पण काही असो, तिकडे जाऊया, काही असेल तर मिळेल असा विचार करत पाय ओढत स्वतःच थकलेलं शरीर घेऊन तो निघाला. काही वेळातच त्याच्या लक्षात आले की तो भास नव्हता, झोपडी खरोखरच होती. पण ती रिकामी होती, कोणीच नव्हतं तिथे आणि ती तशी बऱ्याच दिवसांपासून, कदाचित वर्षांपासून असावी असं वाटत होतं.
पाणी मिळेल या आशेने तो आत शिरला. आणि समोरच दृष्य पाहून तो थबकलाच. माणूस मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अशी त्याची स्थिती झाली.
तिथे एक हातपंप होता आणि त्याचा पाईप जमिनीत शिरला होता. त्याच्या लक्षात आलं जमिनीखाली पाणी आहे. हा पाईप तिथेच गेलाय. त्याच्या अंगात एकदम उत्साह संचारला. पुढे सरकत त्याने हातपंप जोराजोरात वरखाली करायला सुरवात केली. पण काहीच झालं नाही. पाणी आलंच नाही. नुसतात पंपाचा आवाज येत राहिला. अखेर हताश होऊन तो मटकन खाली बसला. आता आपलं मरण त्याला जास्त प्रकर्षाने जाणवले.
तेवढ्यात त्याचं लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या बाटलीकडेे गेलं. परत एक अत्यानंदाची लहर उठली. बाटली पाण्याने भरलेली होती आणि वाफ होऊन जाऊ नये म्हणून व्यवस्थित सिल केलेली होती. चटकन तो पुढे सरकला.  त्याने पाणी पिण्यासाठी बाटली उघडली तेवढ्यात बाटलीवर लावलेल्या एका कागदाकडे त्याचे लक्ष गेले.
त्यावर लिहिले होते "हे पाणी पंप सुरू करण्यासाठी  वापरा आणि तुमचं काम झाल्यावर ही बाटली परत भरून ठेवायला विसरू नका."
तो चक्रावलाच. त्याच्या मनात द्वंद्व सुरू झालं. काय करावं? या सुचनेकडे दुर्लक्ष करून सरळ पाणी पिऊन मोकळं व्हावं? की सुचनेप्रमाणे करावं? 
समजा, सूचनेप्रमाणे पंपात पाणी ओतलं आणि पंप खराब असेल तर?, पंपाचा पाईप तुटला असेल तर?, खालचं पाणी आटून गेलं असेल तर? पाणी वायाच जाईल... सगळा खेळ खल्लास...
पण सुचना बरोबर असतील तर?... तर भरपूर पाणी...
पाणी पंपात ओतण्याचा धोका पत्करावा की नाही यावर त्याच मत ठरेना.
शेवटी मनाचा निर्धार करत थरथरत्या हातांनी त्याने ते पाणी पंपात ओतले. डोळे मिटून देवाचा धावा केला आणि पंप वरखाली करायला सुरवात केली. हळूहळू पाण्याचा आवाज सुरू झाला आणि काही क्षणातच पाणी यायला सुरवात झाली. भरपूर पाणी येतं होतं. त्याला काय करू नी काय नको असं झालं. ढसाढसा पाणी प्यायला तो. स्वतः जवळच्या बाटल्या पण काठोकाठ भरल्या त्याने. तो खुप खुश झाला होता.
शांत आणि पाण्याने तृप्त झाल्यावर त्याचे लक्ष आणखी एका कागदाकडे गेले. तो त्या परिसराचा नकाशा होता. त्यावरून सहज लक्षात येत होतं की तो मानवी वस्तीपासून अजून खुप दूर होता. पण आता निदान त्याला त्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा तरी समजली होती.
त्याने निघायची तयारी केली. सुचनेप्रमाणे ती बाटली भरून सिलबंद करून ठेवली.
आणि त्या बाटलीवरच्या कागदावर एक ओळ स्वतः लिहीली. "विश्वास ठेवून हे पाणी पंपात ओता, पाणी येतच" आणि तो पुढे निघाला.
----
ही गोष्ट आहे देण्याचं महत्व सांगणारी. काही मिळवण्यासाठी काही द्यावं लागतं हे अधोरेखित करणारी. काही दिल्यानंतर मिळतं ते भरपूर असतं, आनंददायी असतं.
त्याही पेक्षा जास्त प्रकर्षाने ही गोष्ट विश्वासाबद्दल सांगते.  विश्वासाने केलेले दान खुप आनंद देते.
आपल्या कृतीमुळे फायदा होईल याची खात्री नसतानाही त्याने विश्वास दाखवला.
काय होईल माहिती नसताना त्याने विश्वासाने अज्ञातात उडी मारली.
या गोष्टीतले पाणी म्हणजे आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी.
त्यांच्याकरता वेळ द्या आणि त्याच्या बदल्यात कितीतरी जास्त पटीने आनंदाची झोळी भरून घ्या.

Monday 12 June 2017

गोपीचंदन

रुख्मिणी कृष्णाला विचारते ,"आम्ही तुमची येवढी सेवा करतो पण तरीही गोपींना तुम्ही विसरत नाही.असे का ? "
कृष्ण काहीही ऊत्तर देत नाही.
एकदा कृष्णाच्या छातीत जळजळ होत असते. कृष्ण अस्वस्थ असतात.
सगळे उपचार करुनही बरे वाटत नाही.वैद्यही हात टेकतात.
रुक्मिणी कृष्णाला शरण जाते. "आता तुम्हीच उपचार सांगा. आम्ही ताबडतोब अंमलात आणु."
 
श्रीकृष्ण म्हणतात "जो माझा खरा भक्त आहे त्याच्या पायाची धूळ छातीवर लावा.मला बरं वाटेल"
महालातील आपल्या पायाची धूळ द्यायला सर्व जण नाही म्हणतात. रुख्मिणी म्हणते "मी खरी भक्त आहे.पण प्रत्यक्ष पती परमेश्वराला माझ्या पायाची धूळ ? माझी योग्यताच नाही, सात जन्म मी नरकात जाईन."
हळूहळू वार्ता द्वारकेत पोहचते.इकडे वेदना तर वाढतच आहेत. सर्वजण रुख्मिणीसारखाच विचार करतात. आणि चरण रज राजवाड्यावर पोहचत नाही.
दवंडी पिटणा-यांना गावं वाटून देतात. सर्वदूर दवंडी पिटणारे जातात. एकजण
गोकुळात जातो.
दवंडी पिटताच सर्व गोपी विचारतात काय करायला लागेल ते सांगा !
एका घमेल्यात बारीक रेती आणलेली असते.त्यात ऊभे रहायचेआणि सारी माती तुडवायची. आम्ही ही माती घेऊन प्रभुंच्या वक्षस्थळी लावू.
माती तुडवणारा प्रभुंचा खरा  भक्त असला पाहिजे.यानेच दाह मिटेल.
गोपी विचारतात म रुख्मिणी मातेने  नाही केले ?
दवंडीवाला सांगतो. "प्रत्यक्ष परमेश्वराला माझ्या पायाची धूळ लावून मी पापी होईन. सात जन्म नरकात रहावे लागेल". अस त्या म्हणाल्या.
सर्व गोपी तात्काळ म्हणाल्या  "जर  श्रीकृष्णाला बर वाटणार आसेल तर आम्ही सात जन्मच काय शंभर जन्मही नरकात राहू.
द्या ती पाटी इकडे." आणि प्रत्येक गोपी ती माती तुडवते.
पुढे ही माती प्रभुंच्या छातीवर लावली जाते आणि त्यांचा दाह शमतो.

मित्रांनो हेच ते "गोपीचंदन" याने दाह कमी होतो.
गोष्ट आवडली असेल तर नक्की पुढे पाठवा.

Sunday 11 June 2017

"स्वयंसेवक है" - अनिल माधव दवेंची एक आठवण.

दोन हजार सहा सालची गोष्ट आहे. माझा एका उद्योगसमूहाच्या बायोडिझेल प्रकल्पाशी संबंध आला. अखाद्यतेलावर प्रक्रिया करून बायोडिझेलची निर्मिती असे प्रकल्पाचे स्वरूप होते. साहजिकच असे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर करंज तेलासारख्या अखाद्य तेलांची खरेदी करू शकतात. यातूनच एक योजना सुचली होती की वनवासींना पडीक वनजमिनीवर जर करंज लागवड करायला मदत केली तर एका एकरात एका कुटुंबाला २४००० रुपये एवढे शाश्वत उत्पन्न मिळू शकेल.

सुरुवातीला पाच हजार एकर जमीन व पाच हजार वनवासी परिवार असा एक पथदर्शी प्रकल्प राबवता येईल अशी कल्पना होती. कुठल्यातरी राज्य सरकारच्या मदतीनेच हे होणे शक्य होते. मला श्री. अनिल दवेंची आठवण झाली. दर वर्षी थिंकर्स मीट मध्ये त्यांची भेट होत असे, रात्र रात्र चर्चा रंगत आणि त्यातूनच त्यांच्या अभ्यासू आणि प्रभावी व्यक्तीमत्वाची माझ्यावर चांगलीच छाप पडली होती. ते तेंव्हा मध्यप्रदेश भाजपचे संघटनमंत्री होते आणि शिवराजजी नुकतेच मुख्यमंत्री झाले होते.

अनिलजींना फोन केला, कामाचे स्वरूप सांगितले, "भोपाळला ये" मग बोलू म्हणाले. सरकारदरबारी कुठलेही काम घेऊन जाण्याची माझी पहिलीच वेळ होती त्यामुळे थोडा साशंक होतोच. पण भोपाळला पोहोचलो.

अनिलजी स्वतः घ्यायला आले होते. आपल्या मिटिंगला थोडा वेळ आहे तोपर्यंत एक दोन भेटी करून घेऊ म्हणत आम्ही भोपाळमध्ये तीन चार ठिकाणी गेलो. त्यांच्या कामाचा आवाका व झपाटा बघून मी थक्कच झालो. नर्मदा संवर्धनापासून ते कुठेतरी बंद पडलेला मोठा कारखाना कामगारांच्या मालकीने पुन्हा सुरू करण्यापर्यंत असंख्य विषय ते हाताळत होते.

अखेर दुपारी मुख्यमंत्र्यांकडे पोहोचलो. मुख्यमंत्र्यांचे सचिव वगैरे होतेच. मी थोडक्यात प्रकल्प सादर केला. प्रकल्प समजावून घेण्याच्या दृष्टीने काही प्रश्नोत्तरे झाल्यावर सचिवांनी एकदम उलट्तपासणीच्या थाटात प्रश्नांही फैर झाडली.
सचिव: ही पाच हजार एकर जमीन तुम्हाला द्यायची आहे का ?
मी: नाही, वनवासींना.
सचिव: रोपांसाठी तुम्हाला अनुदान द्यायचे का ?
मी: नाही, वनवासी कुटुंबाला.
सचिव : पण मग रोपे तुमच्याकडून घ्यायची का ?
मी: नाही, त्यांनी स्वतःच तयार करायची, मोफत मार्गदर्शन पुरवू.
सचिव : मग बिया तुमच्याकडून घ्यायच्या का ?
मी: नाही, बाजारातून.
सचिव: त्यांचे उत्पादन तुम्ही आता म्हटलेल्या किमतीलाच तुम्हाला विकावे लागणर ?
मी: नाही, हा हमीभाव आहे, बाजारभाव जास्त असेल तर त्या भावाने.
सचिव: पण तुम्हालाच विकावे लागणार?
मी: नाही, आम्ही घेण्याची हमी देत आहोत. पण ते हवे तर विकू कोणालाही शकतात.

सचिव : (शेवटी ते मनातले अखेर बोललेच) तो आपका इसमे फायदा क्या है ? व्हाय आर यू डुईंग धिस ?
मी काही बोलण्याआधीच अनिलजींनी मला हात करून थांबवले, आणि सचिवांना म्हणाले, "स्वयंसेवक है"
पुढच्या क्षणी मुख्यमंत्री सचिवांना म्हणाले, "कैसे करना है देखिये" आणि विषयच संपला.

एखादा माणूस संघ स्वयंसेवक असेल तर तो समाजासाठी स्वतःच्या फायद्याविनाही काही करायचे असेल तर करणारच त्यात काही विशेष नाही हे इतक्या सहज अधिकाराने अनिलजींनी त्या सरकारी कामांना सरावलेल्या सनदी अधिकार्‍याला ऐकवले की त्या विश्वासानेच मी अंतर्मुख झालो.

काम झाल्यावर अनिलजी म्हणाले,"गोविंदजी, चला, आमच्या कार्यालयातले पोहे खिलवतो, एकदम खास असतात". वाटेतही फोनवरच अनेक महत्वाची कामे त्यांनी लीलया मार्गी लावली. सकाळचा बंद पदलेल्या फॅक्टरीचा प्रश्नही सुटण्याच्या दिशेने जातांना दिसत होता.

कार्यालयात पोहोचलो. "माझ्या खोलीत बसू" म्हणाले, मला वाटले की त्यांना वेगळे ऑफिस असेल. आत जाउन बघतो तर काय ? एका चुटकीसरशी पाच हजार एकर जमीन मंजूर करू शकणारा हा मनुष्य त्या छोट्या कार्यालयातल्याच १२ बाय १२ च्या एका खोलीत , एक छोटा पलंग, टेबल खुर्ची, पुस्तकाची तीन कपाटे एवढ्या संपत्तीसह रहात होता. वीसहून जास्त वर्षे राजकारणात काढल्यावर एका राज्याच्या कारभाराच्या किल्ल्या हाती असतांनाही !!!

पण मला आश्चर्य मात्र वाटले नाही, कारण मलाही हे माहित होतेच की "अनिल माधव दवे... स्वयंसेवक है "

लायसन्स संपले म्हणून रेडिओ न ऐकणार्‍या दीनदयाळजींसारख्या नेत्याबद्दल आपण ऐकलेले असते. त्याच निष्टा आणि सचोटीने "स्वयंसेवक है" ही ओळख, हा परस्परांबद्दलचा विश्वास आणि या स्वत्वाची जाणीव ठेवून राजकारणासह विविध क्षेत्रात नेतृत्व करणारे हजारो स्वयंसेवक संघाने घडवले आहेत एवढेच या निमित्ताने पुन्हा आठवले.

महाविद्यालयीन जीवनात अनिलजी संघाच्या संपर्कात आले, आणि पुढे चाळीस वर्षे त्यांंनी प्रचारक म्हणून आपले जीवन संघकार्यालाच वाहून घेतले. विभाग प्रचारक म्हणून कार्यरत असतांनाच त्यांच्याकडे भाजपचे काम आले. २००९ मध्ये ते खासदार झाले तर २०१६ मध्ये केंद्रिय पर्यावरण मंत्री झाले. पण "स्वयंसेवक है" या निष्ठेनेच ते काल शेवटच्या श्वासापर्यंत अविरत काम करत राहिले. त्यांच्याबद्दल तुम्हाला गुगलून देखील फार सापडणार नाही. कारण ना त्यांना स्वतःचे वैयक्तिक जीवन होते ना त्यांनी उभ्या केलेल्या कामाला त्यांनी कधी स्वतःच्या नावाचे लेबल लावले. पंतप्रधान मोदींपसून ते सरसंघचालक मोहनजींपर्यंत त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी व्यक्त केलेली भावना हीच त्यांच्या कामाची पावती आहे. अनिल माधव दवेंना विनम्र श्रद्धांजली.

- गोविंद सोवळे

Saturday 10 June 2017

सूर आणि सुरा !

सुरांची नशा चांगली की सुरेची ?
तात्विक दृष्टीने पाहिलं तर दोन्ही सारख्याच !
सूर काय किंवा सुरा काय ;
दोघांनाही माणसाला नादी लावायचा नाद आहे !

दोघांमुळे माणूस अखेर मुक्त होतो !
सुरा वासामुळे ओळखू येते तर , सूर सहवासामुळे ओळखू येतो !

पोटातून ओठाबाहेर पडणारी हवा म्हणजे सूर ,  तर....
ओठातून पोटाकडे जाताना अग्नीरूप धारण करून आत शिरणारं पाणी म्हणजे सुरा !

सूर म्हणजे ध्वन्यार्क तर सुरा म्हणजे मद्यार्क !

अर्थात दोन्ही जसजसे चढत जातात तसतसा आनंदही वाढत जातो !
शेवटी तर ब्रह्मानंदी टाळी लागते !
मात्र दोघांमधे एक फरक आहे ;
सुरेची नशा जास्त झाली की माणसाचा पशू होतो आणि
सुरांची नशा जास्त झाली की , माणसाचा फक्त परमेश्वर होतो , फक्त परमेश्वर होतो !

.........पुरुषोत्तम दारव्हेकर.

Friday 9 June 2017

सिंधी माणसाची गोष्ट

मी लहानपणी एका सिंधी माणसाची गोष्ट ऐकली होती. ती गोष्ट अशी होती.

एका गावात एक सिंधी माणूस रस्त्यावर मीठ विकायला बसायचा. तो ज्या किंमतीत मीठ विकत घ्यायचा त्याच किंमतीत विकायचा. त्यामूळे त्याच्याकडचा मिठाचा दर सर्वात स्वस्त असायचा. हा सिंधी माणूस जेथे मीठ विकायला बसायचा त्याच्या जवळच एका मारवाडी माणसाचे किराणा मालाचे दुकान होते. हळू हळू त्या मारवाडी माणसाच्या लक्षात येऊ लागले की त्याचे मीठाचे गिर्हााईक कमी कमी होत चालले आहे. तो सिंधी माणूस जर खरेदीच्या किंमतीतच मीठ विकत असेल तर त्याला फायदा काय मिळतो असे त्याला वाटायचे. शेवटी त्या मारवाडी दुकानदाराने त्या सिंधी माणसाला गाठलेच!

‘या धंद्यात तुम्हाला फायदा काय मिळतो?’ त्या मारवाडी दुकानदाराने त्या सिंधी माणसाला विचारले.

त्या सिंधी माणसाने मीठाचे रिकामे पोते दाखवले आणि म्हणाला, ‘हे पोते विकून जे पैसे मिळतात तोच माझा प्रॉफीट!’ सिंधी माणसाने उत्तर दिले.

‘असा किती प्रॉफिट मिळतो?’ त्या मारवाड्याने विचारले.

‘मी रोज 100 रुपयांचे मीठ आणतो आणि 100 रुपयांनाच विकतो. मीठाबरोबर हे पोते मिळते ते विकून मला रोज 2 रुपये मिळतात. हाच माझा प्रॉफीट!’ त्या सिंधी माणसाने उत्तर दिले. त्याचे हे उत्तर ऐकून तो मारवाडी माणूस त्या सिंध्याची कुचेष्टा करत निघून गेला.

पुढे काही वर्षांनी त्याच सिंधी माणसाने ते मारवाड्याचे दुकान विकत घेतले.

ही गोष्ट मी गंमत म्हणून ऐकली होती. या गोष्टीचा जो शेवटचा भाग आहे, म्हणजे तो सिंधी माणूस त्या मारवाडी माणसाचे दुकान विकत घेतो, ही गोष्ट मला अशक्यप्राय किंवा एखादी परीकथा वाटायची. रस्त्याच्या कडेला बसून विकत घेतलेल्या किंमतीत मीठाची विक्री करणारा सिंधी माणूस त्या मारवाड्याचे दुकान कसे काय विकत घेऊ शकेल? मारवाड्याचे दुकान विकत घ्यायचे म्हणजे त्याला भरपूर पैसे लागणार. हे पैसे त्या सिंध्याकडे कुठून येणार? म्हणून मला ही गोष्ट बनावट वाटायची.

पण आता मला या गोष्टीच्या सत्यतेबद्दल खात्री वाटू लागली आहे.

तो सिंधी माणुस रोज 100 रुपयांचे मीठ विकत आणून तेवढ्यालाच विकायचा. मीठाचे जे पोते मिळायचे ते विकून त्याला 2 रुपये मिळायचे. याचा अर्थ त्याला 100 रुपये भांडवलावर रोज 2 रुपये नफा मिळायचा. याचा अर्थ त्याला रोज 2 टक्के नफा मिळत होता. त्याने जर महिन्यातले 25 दिवस मीठ विकले असे समजले तर त्याला 100 रुपये भांडवलावर दर महिन्याला 50 रुपये म्हणजे 50 टक्के नफा मिळत होता. (2रुपये रोजचा नफा X 25 दिवस). या हिशोबाने त्याला एका वर्षात 100 रुपये भांडवलावर 600 रुपये म्हणजेच 600 टक्के (मूळ भांडवलाच्या 6 पट) नफा मिळत हेता. या काळात त्याने ‘त्याच्याकडे सर्वता स्वस्त मीठ मिळते’ अशी इमेज निर्माण केली. पुढे त्याने मीठाची किंमत थोडी वाढवली. तो 100 रुपयांचे मीठ 105 रुपयांना विकू लागला. पोत्याची किंमत धरून त्याचा ‘डेली प्रॉफीट’ 7 रुपये म्हणजे 7 टक्के झाला. पुढे त्याने किंमत अजून वाढवली आणि ‘डेली प्रॉफीट’ 10 टक्यांवर नेऊन ठेवला. या हिशोबाने त्याला 100 रुपये भांडवलावर महिन्याला 250 रुपये म्हणजे वर्षाला 3000 रुपये म्हणजे 3000 टक्के प्रॉफीट मीळू लागला. मग त्याने भांडवलात हळू हळू वाढ करायला सुरवात केली. 1000 रुपये भांडवलावर तो महिन्याला 2500 रुपये म्हणजेच वर्षाला 30000 रुपये, 10000 रुपये भांडवलावर महिन्याला 25000 तर वर्षाला 3 लाख , तर 1 लाख रुपये भांडवलावर महिन्याला 2.5 लाख तर वर्षाला 30 लाख रुपये प्रॉफीट कमावू लागला. झालेला प्रॉफीट हा धंद्यातच गुंतवायचा असे सिंधी लोकांचे धोरण असते. त्या मूळे त्याला त्या मारवाडी माणसाचे दुकान विकत घणे सहज शक्य झाले.

एका सिंधी माणसाला धंद्याचे जे गणित कळले ते आपल्याकडच्या सुशिक्षीत, उच्चशिक्षीत आणि स्वतःला विद्वान समजणार्याि मंडळीना अजून कसे समजत नाही याचे मला आश्चर्य वाटते. अजुनही आपण बँकेमध्ये मिळणार्याज 8 टक्के ते 10 टक्के व्याजावर खुष असतो.

मला सिंधी समाजाविषयी अतीव आदर आहे. कोणा एकेकाळी सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रदेशातली ही समृद्ध व्यापारी जमात. कोण्या एकेकाळी कराचीवर यांचे राज्य होते. स्वातंत्र्यपूर्व काळात कराचीला मुंबईपेक्षाही जास्त महत्व होते. भारताची फाळणी झाली नसती तर कदाचीत कराची ही भारताची आर्थिक राजधानी झाले असते. फाळणींमध्ये सर्वात मोठा फटका बसला तो या सिंधी जमातीला! त्यांना कोट्यावधी रुपयांची संपत्ती टाकून किंवा कवडीमोलाच्या भावाने विकून ‘निर्वासीत’ म्हणून भारतात यावे लागले. भारत सरकारने उभारलेल्या सिंधी छावण्यांमधून ‘निर्वासीत’ म्हणून अत्यंत कनीष्ठ पद्धतीचे जीवन जगावे लागले. अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. मुंबईजवळची उल्हासनगर आणि पुण्याजवळची पिंपरी या दोन छावण्या तर प्रसिद्धच आहेत. पण असे असुनही या लोकांनी कधी हार मानली नाही की हातात भिकेचा कटोरा घेतला नाही. श्रीमती आशा भोसले सांगतात की त्या पूर्वी जेव्हा लोकलमधून प्रवास करायच्या ( आशाताईंनी मुंबईच्या लोकलमधून भरपूर प्रवास केला आहे, अर्थातच गरिबीमूळे!) तेव्हा त्यांना अनेक सिंधी मुले लोकलच्या डब्यामध्ये लिमलेटच्या गोळ्या किंवा बिस्कीटे विकताना दिसायची. आता यातील बरीच मुले मुंबईतील प्रतिष्ठीत व्यापारी झाली आहेत.

शिक्षणाने माणूस शहाणा होतो असे म्हणतात. पण शिक्षणाने माणूस ‘कमी शहाणा’ होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपला मराठी समाज!.(यांमध्ये मी सुद्धा आलो.) आज मराठी समाजाची अवस्था ‘पढत मूर्ख’ अशी झाली आहे. खर्या) ज्ञानापेक्षा डिग्री, डिप्लोमाची कागदाची सर्टिफिकेट्स आणि परिक्षामध्ये मिळणारे मार्क्स आणि ग्रेडस यांना महत्व आलेले आहे. शिक्षणाने ‘व्हॅल्यु ऍडिशन’ न होता ‘व्हॅल्यु डिव्हॅल्युएशन’ होऊ लागले आहे. ज्या शिक्षणाचा पुढे काही फारसा उपयोग होत नसतो असे शिक्षण घेण्याकडे प्रचंड पैसा आणि आयुष्याची उमेदीची वर्षे वाया घालवण्याची सवय आपल्याला लागली आहे. याचा अर्थ कोणी शिक्षण घेऊ नये असा होत नाही. शिक्षणाला महत्व हे आहेच पण त्याची मर्यादा आता ओळखायला हवी. अर्थात हे माझे वैय्यक्तीक मत आहे. अनेक जण माझ्या मताशी सहमत होणार नाहीत याची मला पुर्ण कल्पना आहे. तसेच माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही.

रस्त्यावर बसून मीठ विकणार्या  सिंधी माणसाला जी ‘व्यावहारीक अक्कल’ आहे त्याच्या निम्मी जरी व्यावहारीक अक्कल आपल्या लोकांना आली तरी खूप झाले असे मी म्हणेन.

अर्थात अशी व्यावहारीक अक्कल आणायची की नाही हे ज्याचे त्याने ठरवायचे.

तुम्हाला काय वाटते?

Thursday 8 June 2017

मोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा - संदीप वासलेकर

मी ३० वर्षांपूर्वी ऑक्‍सफर्डमधून पदवी घेऊन परतलो, तेव्हा भूतानमध्ये शिक्षकाची नोकरी करण्यासाठी वर्तमानपत्रातली जाहिरात पाहून अर्ज केला होता. मला ती नोकरी मिळाली नाही. नंतर आयुष्याला वेगळं वळण मिळालं व ती महत्त्वाकांक्षा अपुरी राहिली. पण मला भूतानमधली ती शिक्षकाची नोकरी न मिळाल्याची हुरहूर एकसारखी वाटते. कधी कधी अजूनही शिक्षक व्हावंसं वाटतं मला.

एकदा नॉर्वेतील एक विद्यार्थिनी माझ्या शेजारी बसली होती. आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थकारण, साहित्य या विषयांचं तिचं आकलन पाहून मी प्रभावित झालो. ती नॉर्वेची नागरिक होती व लुंडमध्ये शिक्षण घेत होती. तिला विचारलंः ‘‘इथं पदवी मिळाल्यावर पुढं काय करायची इच्छा आहे?’’

ती म्हणालीः ‘‘माझी महत्त्वाकांक्षा खूप मोठी आहे; पण ती मला साध्य करता येईल की नाही, हे मला माहीत नाही.’’

मी विचारलंः ‘‘तुला यूनो, नॉर्वेचं पराराष्ट्र मंत्रालय, नॉर्वेतल्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय कंपन्या इथं मोठ्या जबाबदारीवर काम करण्याची इच्छा आहे का?’’

ती म्हणालीः ‘‘बिलकूल नाही. माझी महत्त्वाकांक्षा खूप मोठी आहे. ती खूप प्रयत्न करूनही साध्य नाही झाली, तर मग परराष्ट्र मंत्रालय, यूनो, वगैरे इतर बाबींचा विचार करता येईल.’’

मी पुन्हा विचारलंः ‘‘तुझी एवढी मोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा आहे तरी काय, हे मला सांगू शकशील का?’’

ती म्हणालीः "मला नॉर्वेतल्या एका ग्रामीण शाळेत शिक्षिका होण्याची महत्त्वाकांक्षा आहे; पण आमच्याकडं शिक्षिकेची नोकरी अतिशय प्रतिष्ठित समजली जाते. ती मिळवण्यासाठी सर्वांत हुशार विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रयत्न करतात. त्यामुळं प्रवेश मिळणं सोपं नाही.’’

ती विद्यार्थिनी अपवादात्मक नव्हती. युरोपमध्ये ऑक्‍सफर्ड, केंब्रिज, सोबोर्न, लुंड, उपसाला, हाइडलबर्ग या विद्यापीठांतल्या अनेक युवक व युवती शिक्षक अथवा अध्यापक होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगतात.

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग, अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन, राजकीय तज्ज्ञ जोसेफ नाथ असे विविध क्षेत्रांतले तज्ज्ञ अध्यापनाचं काम आवर्जून करतात.

आपल्या देशातले अनेक उद्योगपती, राजकीय नेते, खेळाडू, कलाकार यांचं आपण कौतुक करतो; पण त्या सगळ्यांच्या जडणघडणीमागं त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांचा हातभार होता, याची जाणीव आपल्याला राहत नाही.

भारताच्या सर्वोच्च नेत्यांपैकी डॉ. राधाकृष्णन, वेंकटरामन व डॉ. अब्दुल कलाम या तीन राष्ट्रपतींनी उच्च पदावर आल्यावरही शिक्षकांचं महत्त्व सांगण्याचा खूप प्रयत्न केला.

‘शिक्षक होणं ही खूप मोठी महत्त्वाकांक्षा असू शकते,’ असं त्यांपैकी कुणालाही वाटलं नाही, याची मला खंतही वाटते.

भारतात समाजसेवा म्हणून शिक्षण क्षेत्रात कार्य करू इच्छिणारे अनेक युवक आहेत; परंतु ‘शिक्षक होणं’ या बाबीकडं महत्त्वाकांक्षा म्हणून पाहणारे युवक मला भेटले नाहीत.

आपल्याकडं शिक्षकांची स्थिती खूप विदारक आहे. सरकारी शाळांतल्या शिक्षकांचा वापर सर्रासपणे जनगणना, निवडणुका व इतर कारकुनी कामांसाठी केला जातो. एवढंच नव्हे तर, काही गावांत सरपंच हे शिक्षकांना घरची अथवा शेताची कामं करण्यास भाग पाडतात. म्हणजे शिक्षण सोडून आपण शिक्षकांना एक प्रकारे गुलाम केलं आहे.

आपलं सर्वांत मोठं उत्तरदायित्व आपल्या शिक्षकांकडं प्रामुख्यानं आहे, असं कुणाला वाटतं का? समाजात जास्तीत जास्त मान, प्रतिष्ठा व आदर असलेली व्यक्ती ही शिक्षकच असली पाहिजे, याविषयी आपल्या मनात तीळभरही शंका असायला नको. 

 ‘जिथं शिक्षक होतो भ्रष्ट, तो समाज होतो नष्ट,’ हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.

उद्याचा भारत आजच्या विद्यार्थ्यांमधून बनणार आहे. त्यासाठी भारतातल्या सर्व ६ लाख खेड्यांतल्या व सर्व शहरांतल्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना सक्षम करणारे उच्च दर्जाचे शिक्षक देशभर हवे आहेत.

नॉर्वेतली ती विद्यार्थिनी ‘शिक्षक होणं’ ही मोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा समजते. कारण नॉर्वे हा अतिशय प्रगत देश आहे. शिक्षक होणं हे जगातल्या प्रगत देशांत प्रतिष्ठेचं समजलं जातं. ज्या देशात सर्वांत बुद्धिमान युवक हे शिक्षक होणं, ही केवळ समाजसेवा समजतात किंवा शिक्षणाकडं एक महत्त्वाचं करिअर म्हणून पाहत नाहीत, ते देश मागासलेले असतात.

Wednesday 7 June 2017

‘इट्स चेतन भगत्स आर्टिकल फॉर इंडियन विमेन...’

'नेल्सन मिडीया रिसर्च या जगद्विख्यात कंपनीच्या जागतिक सर्वेक्षणानुसार भारतीय महिला सर्वाधिक तणावपूर्ण आयुष्य जगतात.. त्यातल्या ८७ टक्के महिला पूर्णवेळ तणावाखाली  सासरच्या वा इतर कुठल्या तणावाखाली असतात’...

 अमेरिकेतसुध्दा महिलांचं तणावाखाली असण्याचं प्रमाण ५३ टक्के इतकंच आहे’...
                   
       
‘आय वाँट टू गिव्ह इंडियन विमेन फाईव्ह सजेशन्स टू रेड्यूस देअर स्ट्रेस लेव्हल’...

1) ‘तुम्ही अबला आहात असं समजू नका., ते विशेषण तुम्हाला त्रास देणाऱ्या
‘सासू’ वा 'सुने'साठी राखून ठेवा.. तुम्ही जशा आहात तसंच स्वत:ला जपा..
इतरांना वाटतं म्हणून तसं बनण्याचा प्रयत्न करू नका.. तुम्ही इतरांना आवडत नसाल तर हा त्यांचा प्रॉब्लेम आहे’
  
2) ‘जर तुम्ही चांगलं काम करत असूनही तुमचा बॉस दखल घेत नसेल तर त्याला तसं जाणवून द्या.. तरीही त्याचा अ‍‍ॅटिट्यूड बदलला नाही तर जॉब बदला.. हुशार, मेहनती माणसांना बाहेर खूप मागणी आहे’
    
3) ‘उच्च शिक्षण घ्या, कौशल्य, तंत्रज्ञान आपलंसं करा.. ते तुम्हांला आर्थिक पाठबळ देईल.

त्यामुळे जर तुमच्या नवऱ्याला तुम्ही ‘योग्य पत्नी, सुन , आई किंवा नणंद वाटत नसाल तर ठणकावून सांगा, दुसरी शोध!’
         
4)‘कायम घर आणि आॅफिस या दुहेरी जबाबदारीच्या तणावाखाली राहू नका., मला माहिताय, हे अशक्य आहे. त्यासाठीची युक्ती अशी आहे की, प्रत्येक फ्रंटवर ‘ए-प्लस’ मिळवण्यासाठी धावायचं नाही..

तुम्ही परीक्षा देत नाहीयात हे लक्षात ठेवा आणि सर्वोत्तम ठरण्याचा अट्टाहास सोडून द्या. .

तुम्ही जेवायला चारच्या ऐवजी दोन पदार्थ बनवलेत तरीही इट्स ओके! कुणाचंही पोट भरायला ते पुरेसे आहेत..

प्रमोशनसाठी अहोरात्र काम करायची काहीच गरज नाहीय.,

कुणालाही मरताना आपलं ‘जॉब डेसिग्नेशन’ आठवत नसतं किंवा कुणी ते सोबतही घेऊन जात नाही. तेव्हा त्याच्यासाठी ‘धावायचं’ थांबा.’
            
5) ‘पाचवं, सगळ्यात महत्वाचं, दुसऱ्या स्त्रियांशी स्पर्धा करणं सोडून द्या..

दुसरी कुणीतरी तुमच्यापेक्षा अधिक सुगरण असू शकते,
तिसरी कुणी तुमच्या इतक्याच वेळेत तुमच्यापेक्षा जास्त वजन कमी करू शकते,
तुमची शेजारीण नवऱ्याला सहा डब्ब्यांचा टिफीनही देऊ शकते... तुम्ही करू नका...

‘डू युवर बेस्ट’ पण ते चांगलं आहे या रिपोर्टकार्डसाठी इतरांकडे अपेक्षेने पाहू नका...

प्रत्येकवेळी ‘टॉप आॅफ द क्लास’ असण्याचा अट्टाहास चुकीचा आहे. जगात ‘आयडीयल वुमन’ किंवा ‘सुपरमॉम’ अस्तित्वात नाही...

जर तुम्ही हे टायटल मिळवण्यासाठी झगडत असाल तर तुमच्यासाठी एकच गिफ्ट आहे..., स्ट्रेस !’
      
‘सो चिल! रिलॅक्स!

तुम्ही सुंदर आहात हे स्वत:ला सांगा आणि

शांत, सुंदर आयुष्य जगा..

प्रत्येकाला खुश करण्यासाठी तुम्ही जगात आलेल्या नाहीयात...

तुमच्याकडे ‘उदात्त’ असं आहे ते जगाला देण्यासाठी आणि त्यातून आनंद मिळवण्यासाठी तुमचा जन्म झालाय...

आनंदी रहाणं हा तुमचा हक्क आहे...

पुढच्या सर्वेक्षणात आपला नंबर सर्वाधिक आनंदी महिलांच्या यादीत असायला हवा...!!! 🙂

      🌹👧🏻👩🏻👱🏻‍♀👵🏻👰🏻🌹

Tuesday 6 June 2017

बाहुबली

परवा एका whatsup group वर असाच एक message आला. ‘एका नवर्याचे मनोगत- लग्नाआधी नाजूक, सुंदर असलेली बाहुली लग्नानंतर बाहुबली केव्हा होते कळतच नाही’. आणि त्यापाठोपाठ अनेकांना फुटलेलं हसू आणि वाटलेली गम्मत.
विचार केला आणि लक्षात आलं, खरंय अगदी... लग्नात अगदी शेलाटी बांध्याची, नाजुकशी वाटणारी  गोड नवरी किती लवकर रूप पालटते. लवकर म्हणजे अगदी ५-१० वर्षातच संपूर्ण कायापालट होतो तिचा. काही जणी वजनाने दुप्पट होतात, तर काही अचानक मोठ्या, वयस्क वाटायला लागतात.  ‘एकदा लग्न झालं की दोन वर्षात अश्याच होतात (म्हणजे बाहुबली होतात) सगळ्या मुली’ हे वाक्य तर अगदी ऐकिवातलंचं. नवर्याच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण सोपं जातं तिला पण मग बाहुली राहणं का जमत नसेल? खरं तर कोणत्याच मुलीला बाहुबली होण्याची हौस नसते. पण लग्नंतर तिच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या, बाळंतपण,आईपण, कामाचा भार आणि अनेक इतर छोट्या मोठ्या गोष्टीत तिचा आवश्यक असणारा सहभाग यातून स्वतःसाठी वेळ काढणं  जमतच नाही तिला, मग ती नोकरी करणारी असो किंवा नसो. तिलाही वाटतं, पूर्वीसारखंच चार चौघीत आपण उठून दिसावं. दुकानात लावलेल्या mannequin वरचा  ड्रेस आपल्यालाही तसाच शोभून दिसावा. साडी  छान दिसण्यासाठी नेसावी, skirt, jeans काहीही मोकळेपणाने घालता यावं आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे नवर्याने आपलं कौतुक करावं.
स्नेहा नावाची माझी एक मैत्रीण आहे. ती तिच्या नवर्याच्या तब्ब्येतीची, खाण्यापिण्याची (डाएट ची) अगदी व्यवस्थित काळजी घेते. नवरा सकाळी उठून मोर्निंग वॉकला जातो तेव्हा ही कमी तेलातली भाजी, पोळी कोशिंबीर, salad असा सगळा डबा तयार करते. दुपारी/मधल्या वेळेत  खाण्यासाठी म्हणून एखादं फळ, सुका मेवा,ताक असं देखील न चुकता पॅक केलेलं असत आणि दररोज असा नेटका डबा घेऊन नवरा कामाला जातो. मुलांच्याही बाबतीत तेच. नेटका आणि संपूर्ण डबा. संध्याकाळी त्यांना ground ला नेणं, dance क्लास किंवा अजून काही असेल तर तिथे नियमाने नेणं-आणणं हे सगळंच ती करते. रात्रीच उरलेलं अन्न ती नवर्याच्या, मुलाबाळांच्या तोंडी लागू देत नाही पण ते टाकवतही नाही म्हणून तिच्या स्वतःच्या वाट्याला breakfastच्या रुपात येतं. अगदी रोज नाही तरी जेव्हा अन्न उरतं तेव्हा नक्कीच. ‘आज सकाळी वॉकला जाणं जमत नाहीये, तर संध्याकाळी जाईल‘ असं म्हणत अनेक आठवडे निघून जातात पण तिच्या नुकत्याच सोडलेल्या व्यायामाच्या संकल्पाला मुहूर्त लागत नाही. नवर्याचा पूर्ण support आहे तिला.. तो नेहमीच सांगतो तिला, शिळं खात जाऊ नकोस, व्यायाम करत जा, वॉकला जात जा. वजन कमी कर. तिने वेळोवेळी beauty parlor ला जावं असंही त्याला वाटत असतं पण तीच कंटाळा करते असं त्याचं ठाम मत  आहे.
अश्या अनेक स्नेहा आपल्या ओळखीच्या असतात आणि त्यांचे support करणारे नवरे सुध्दा. पण ज्या , dedication नी ती नवऱ्याच्या आणि मुलांच्या तब्येतीची काळजी घेते, त्याच dedication  ने नवराही तिच्यासाठी efforts घेतो का, तिची काळजी घेतो का हे विचारात घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मुलींना स्वतःकडे लक्ष देणं जमत नाही ह्याचं खरं कारण म्हणजे नवर्याकडून मिळणारा support हा शाब्दिक असतो. म्हणजे त्यांना खरोखर बायकोने maintained राहावं असं वाटत असलं  तरी त्यासाठी घरातल्या छोट्या मोठ्या कृतीत/कामात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची त्यांची तयारी नसते. वीकेंडला ‘आज काहीतरी वेगळ कर breakfast आणि जेवणात’, ‘वीकेंड breakfast वैशालीला आहे माझा मित्रांसोबत’, असं सांगण्याऐवजी ‘मी करत जाईन वीकेंडला breakfast, तू वॉकला जात जा’ असं सांगणारा नवरा म्हणजे खरा supportive. बायको रोज ऑफिसमधून घरी आल्यावर (कितीही थकलेली असली तरीही )काहीही कुरकुर न करता स्वयंपाक करते हे फ़क़्त appreciate करून remote घेऊन TV समोर न बसता तिला थोडी मदत करणारा, अगदी स्वयंपाकात मदत नाही करता आली तरी, आपलं जेवण आपण वाढून घेणारा, मुलांची जेवणं आटोपणारा आणि अभ्यास घेणारा, दुसर्या दिवसाची दोघांच्या ऑफिसच्या आणि मुलांच्या शाळेच्या डब्याची तयारी करणारा नवरा म्हणजे खरा supportive.
बायको जॉब करणारी नसेल तर हिच गोष्ट आणखीनच कठीण होऊन बसते कारण, ‘दिवसभर बायकोला काही काम नसतं, त्यामुळे तिला वेळही मिळतो, आरामही होतो आणि स्वतःची अशी SPACE सुद्धा मिळते’ असं समजणारा एक मोठा वर्ग आहे. पण खरोखर तसं असतं का हे प्रत्यक्ष ते आयुष्य जगल्याशिवाय लक्षात येत नाही. अगदी सहज, सोपी वाटणारी आणि अनेकदा लक्षातही न येणारी अनेक कामं त्या वेळात तिला करायची असतात, त्यातही मुलांना वेळ देण्याचं सर्वात मोठं आणि महत्वाच काम ती करत असते. कधी मैत्रिणींना भेटायचं असेल किंवा कुठे बाहेर जायचं असेल तरी, नवऱ्याचं आणि मुलांचं जेवण तयार केल्याशिवाय तिला बाहेर पडता येत नाही ही वस्तुस्थिती आहे.  याउलट मित्रांना भेटायचं ठरलं की बायकोला ‘आज मी जेवायला नाहीये घरी’ एवढं सांगून नवरा मोकळा होतो. शिवाय वेळेचंबंधन नसतंच.
वीकेंडला जसा तुम्हाला बदल हवा असतो तसाच तुमच्या बायकोलाही, ती जॉब करणारी नसली तरीही. आणि हे समजून घेऊन तिला स्वतःसाठी वेळ देता यावा म्हणून आपल्या कामात, वेळेत ADJUSTMENT करणारा नवरा म्हणजे खरा SUPPORTIVE.  असा नवरा असेल तर खरोखर लग्नाआधी बाहुली असणारी बायको ही लग्नानंतरही बाहुलीच राहू शकते यात शंकाच नाही. म्हणून                 पुरुषांनी खरोखरच विचार करायला हवा... लग्नानंतर आपल्या घरी आलेल्या बाहुलीला बाहुबली बनवण्यात आपला तर हातभार नाही ना?
----

Monday 5 June 2017

पुरुषांचे माहेरपण लेखिका - प्रज्ञा रामतीर्थकर

माझी मोठी नणंद एक महिना आमच्या घरी म्हणजे तिच्या माहेरी राहून गेली...या एका महिन्यात, तिने बरेच  पदार्थ करून आम्हाला खाऊ घातले... रोज काहीतरी नवीन "खानदेशी" पदार्थ बनवून(माझ्यासाठी नवीन प्रकार) ताई आपल्या भावांना खुश करायची...माझा नवरा आणि दीर, दोघेपण "खानदेशी" खवैय्ये असल्याने त्याना ताई आल्यापासून इतके छान छान जेवण मिळू लागले की विचारू नका...कळणाची भाकर, मिरचीचा ठेचा, वांग्याचे भरीत, बट्ट्या, फुणके, सांजोऱ्या ,पुरणपोळी, आमरस-शेवया असे खानदेशी जेवणाचे बेत रोज चालू होते...दोघांची तब्येत एकदम सुधारली. ताई रोज जुन्या आठवणी सांगून, वेळोवेळी भावांना डोक्याला तेल चोपडून, त्यांची आस्थेने विचारपूस करून, त्याना एक महिना का होईना,  एका जुन्या पण हव्या हव्या वाटणार्‍या लहानपणात घेऊन गेली.   

"पुरुषांचे माहेरपण" ...वाचायला थोडे विचित्र वाटतेच. कारण आपण माहेरपण फक्त बायकांचे करतो, पुरुषांचे नाही...बायका आपली मायेची माणसे सोडून सासरी राहायला जातात, म्हणून त्यांना वर्षातून एकदा तरी माहेरपण हवे असते.माहेरपण हे बायकांचे मायेच्या माणसांना भेटण्याचे, विश्रांतीचे आणि कोड-कौतुक पुरवणारे एक हक्काचे स्थान असते. म्हणूनच बायकांचा आणि माहेरपणाचा यांचा जितका घनिष्ठ संबंध आहे तितका तो पुरूष आणि माहेर यांचा नसावा. 

पण सद्य परिस्थिती पाहता पुरूष पण आपले माहेर सोडून दुसरीकडे राहायला लागले आहेत. कारणे तशी बरीच आहेत...बरेच पुरूष नोकरी-धंद्यासाठी आपले घर आणि गाव सोडतात...नव्या गावात अथवा शहरात आपले घर नव्याने बसवतात...नवे गाव, नवी माणसे, नवे घर...सगळेच नवे अगदी सासरी आल्याप्रमाणेच... सोबत आपली माणसे म्हणजे आई-वडील, भावंडे वगैरे, नव्या ठिकाणी येतील असे नाही...मग हे पुरूष एकटेच संसार थाटतात, जमेल तसा स्वयंपाक करून खातात अगर खाणावळ लावतात...आणि लग्न झाल्यावर जर बायको वेगळ्या संस्कृतीची असेल तर मग पुन्हा सासुरवास सुरू. म्हणजे खाणे-पिणे वेगळ्या पद्धतीचे, सण-वार वेगळे असणार...थोडक्यात काय तर बर्‍याच पुरुषांना आज आपले माहेर सोडून दुसरीकडे राहावे लागते आणि असे पुरूष पण माहेरपणासाठी आसुसले असतात.

पण माहेर म्हणजे नक्की काय असावे? कोणी म्हणेल आई-वडील असावेत, भाऊ-बहीण असावेत...लहानपण जिथे आणि ज्यांच्या बरोबर गेले ते सगळे...हे असे असेल तर दुधात साखर...पण प्रत्येकाला हे असे माहेर मिळत नाही...मायेची माणसे काळाच्या पडद्याआड जातात...नवी माणसे त्या जागेत राहायला येतात...मग माहेर पूर्वीसारखे वाटत नाही...आणि हे बदल अपरिहार्य आहेत. आपल्या मागच्या पिढीला आहे का माहेर आता?

अजुन थोडा खोल विचार केला तर असे वाटते की माहेर म्हणजे मायेचे माणूस मग ते कोणीही असो...आई,वडील, भाऊ, बहीण असे कोणीही नातेवाईक नसले तरी ज्या व्यक्‍तिजवळ तुम्ही व्यक्त होऊ शकता अशी कोणीही, जी तुम्हाला आणि तुमच्या भावनांना समजून घेते अशी व्यक्ती...अशा मायेच्या माणसाजवळ आपण एक-दोन दिवस राहून मन मोकळे केले तर किती बरे वाटेल? भले तुम्ही गाव बदलेले तरी चालेल पण मायेचे माणूस तुम्हाला कोठेही येऊन भेटू शकते किंवा तुम्ही त्याच्याकडे जाऊ शकता. बरोबर ना?

पूर्वीच्या काळी आपण एकमेकांच्या गावी राहायला जायचो...अगदी आनंदाने महिनाभर राहून एकमेकांची सुख दुःखे वाटून घायचो...ती आनंदाची शिदोरी वर्षभर पुरायची...आता आपण पर्यटनाच्या नावाखाली हॉटेल मधून राहतो, पण "ती" आनंदाची शिदोरी काही कोणी बांधून देत नाही. आज आपणा सर्वांना माहेरपणाची गरज आहे...अगदी आपल्या आई-वडिलांना देखील माहेरपण हवे असते...हे सगळे करणे आपल्या हातात आहे...स्त्री-पुरूष, लहान-मोठे असे भेद न मानता,  एकदा बघा आपल्या मायेच्या माणसांना चारदिवस घरी बोलावून...वय, मानपान वगैरे विसरून त्यांचे माहेरपण करून बघा...आवडीचे पदार्थ खाऊ घाला, पोटभर गप्पा मारा, मने मोकळी करा...सुख-समाधान कुठे हरवले ते सापडेल...आणि बरोबरीने तुमचे पण माहेरपण अनुभवायला मिळेल.

माहेरपण ही एक आनंदाची शिदोरी आहे...मायेच्या माणसाबरोबर चार दिवस एकत्र राहून ती आपण बांधू शकतो आणि वर्षभर पुरवु शकतो.

प्रज्ञा रामतीर्थकर
२० मे  २०१७

Sunday 4 June 2017

पु ल देशपांडे :

चहाचा कप घेऊन तुम्ही खिडकीत बसलेले असता ...

अवती भोवती पाहता पाहता हळूच चहाचा घुटका घेताना तुमच्या लक्षात येते..

अरेच्या !

साखरच घालायला विसरलो कि काय....

पुन्हा जाऊन साखर घालायचा कंटाळा आलेले तुम्ही कसाबसा तो कडू चहा संपवता आणि नजरेस पडते ती, कपाच्या तळाशी बसलेली न विरघळलेली साखर....

आयुष्य असच असतं...
सुखाचे क्षण तुमच्या अवती भोवतीच असतात,
त्यांच्याकडे जरा डोळसपणे बघायला शिकले पाहिजे....

एखाद्याशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे....

समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे....

मान-अपमान मैत्रीत काहीच नसतं....

आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहीजे.

जगाच्या या रंगमंचावर असे वावरा, की तुमची भुमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत.

जगातील सर्वात महाग पाणी कोणते, तर अश्रू ... कारण त्यात एक टक्का पाणी आणि ९९ टक्के भावना असतात.

हसा आणि हसवत रहा…!! 😊

Saturday 3 June 2017

प्रत्येक स्त्रीने शिकावं असं काही.....आता

खूप झालं, बास झालं
थकले आता म्हणायला शीक
केलं तेव्हढं पुरे झालं
आता थोडं थांबायला शीक

नाती गोती कुटुंब कबिला
बाजूला जरा ठेवायला शीक
इतरांसाठी आयुष्य वेचलं
स्वतःसाठी जगायला शीक

विसरून रोजची कामं खुशाल
उशिरापर्यंत लोळायला शीक
संसाराचं ओझं आपलं
थोडं share करायला शीक

कसं होईल, काय होईल
चिंता सर्व टाकायला शीक
माझ्याविना घर हे चालेल
असा विश्वास ठेवायला शीक

जॉब, घर, मुलं आणि बिलं
यांची कसरत विसरायला शीक
Superwoman व्हायचं सोडून
दमानं जरा जगायला शीक

घड्याळाची endless टिकटिक
दुर्लक्षित तू करायला शीक
उठल्यापासून झोपेपर्यंतच्या
कामाचे हिशोब विसरायला शीक

आपल्या उरावर घेतलेली कामं
आतातरी टाकायला शीक
गेलं उडत काम म्हणून
निवांत पुस्तक वाचायला शीक

पाय पसरून, पेपर धरून
चहाचे घोट घ्यायला शीक
Calorie count विसरून जरा
आयतं food मागवायला शीक

याचं जेवण त्याचा डबा
कपडे याचे नि औषध काढा
घर पसारा भाजी पाला
सगळं सगळं सोडायला शीक

कोणासाठी न थांबता
Steering हाती धरायला शीक
नियम सारे मोडून कधी
सुसाट गाडी पळवायला शीक

सगळ्यांसाठी सगळं केलं
कामचुकारपणा करायला शीक
अर्ध अधिक आयुष्य सरलं
आतातरी बाई जगायला शीक
आतातरी बाई जगायला शीक

Friday 2 June 2017

एक प्रेमाची गोष्ट

एका  जंगलात एक फुलपाखरू व एक भुंगा राहत होते.

ते दोघे मिळून या फुलावरून त्या फूलावर आनंदाने बागड़त  असत.

एक दिवस अचानक दोघेही भयानक भांडू लागले.

फुलपाखरू म्हणाले मी तुझ्या पेक्षा जास्त फुलावंर प्रेम करतो.

भुंगा म्हणाला मीच फूलावंर जास्त प्रेम करतो.

या विषयावरून वाद वाढत गेला संध्याकाळ झाली.

वाद संपता संपत  नव्हता.

तेव्हा फुलपाखरू म्हणाले की जो कोणी सकाळी लवकर उठून या समोरच्या फूलावर येऊन बसेल तो फूलावंर जास्त प्रेम करतो  असे सर्वांना मान्य करावे लागेल.

भुंग्याला हि युक्ती  पटली
दोघेही  आपल्या   आपल्या  घरी जाऊन झोपले.

सकाळ सकाळी फुलपाखरू लवकर  उठून फुलावर जाऊन बसले.

अजून  भुंगा आला नव्हता,
आपन जिंकलो या आनंदात  फुलपाखरू वेडेपिसे झाले.
ते  आतुरतेने भुंग्याची वाट बघत बसले.

सूर्योदय झाला पन भुंगा आला नव्हता.

सूर्याची सोनेरी किरणे पडली
फुलाला जाग आली.

 त्याने  आपल्या पाकळ्या  उमलवण्यास सुरूवात केली.

 फुल सम्पूर्ण उमलले तेव्हा फुलपाखराला त्यात भुंगा मरून पडलेला दिसला.

भुंगा फुलावरील प्रेम दाखविण्यासाठी रात्रीच जाऊन फूलावर बसला होता.

राञी फुलाने पाकळ्या मिटून घेतल्या भुंगा त्यात अडकून पडला.

बांबूच्या लाकडाला फोडणारा भुंगा नाजूक पाकळ्या तोडू शकला नाही
स्वतः जगण्यासाठी त्याने आपल्या प्रेमाचे तुकडे  केले नाही.


मरणाला हसत  हसत मिठी मारली
फुलपाखराला खुप वाईट वाटले 
हट्टापायी त्याने एक सुंदर मिञ गमावून बसला होता--

प्रेम करा पण मनापासून  करा., आणि तुमच्यावर जी व्यक्ती प्रेम करते तिला कधीच गमावू नका कारण आपल्यावर निस्वार्थपणे प्रेम करणारी व्यक्ती भेटायला खरच भाग्य लागतं!

Thursday 1 June 2017

अाशिर्वाद

एका पित्याने अापल्या मुलीचे खूप चांगल्या प्रकारे संगोपन केलं. खूप चांगल्या प्रकारे तिचे शिक्षण केलं जेणेकरून मुलीच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होईल.
काही काळानंतर ती मुलगी एक यशस्वी व्यक्ती बनली आणि एका मल्टी नैशनल कंपनीचा सी.ई.ओ. झाली .उच्च पद ,भरपूर वेतन, सगळ्या सुख सुविधा तिला कंपनीकडून प्रदान झाल्या होत्या.
एके दिवशी असाच तिचा विवाह एका चांगल्या मुलाशी झाला तिला मुलंही झाली. तिचा आता आपला सुखी परिवार बनला.
वडील म्हातारे होत चालले होते. एक दिवस वडीलांना आपल्या मुलीला भेटायची इच्छा झाली आणि ते मुलीला भेटायला तिच्या ऑफिस मध्ये गेले. त्यांनी बघितलं की मुलगी एका मोठ्या व शानदार ऑफिसची अधिकारी बनलीय. तिच्या ऑफिसात हजारो कर्मचारी तिच्या अधीन राहून काम करत आहेत.
हे सगळं बघून वडीलांची छाती अभिमानानं फुलली !
ते म्हातारे वडील मुलीच्या कॅबिन मध्ये गेले व तिच्या खांद्यावर हात ठेवून उभे राहीले. आणि प्रेमानं त्यांनी आपल्या मुलीला विचारलं की,
"या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे "?
मुलगी स्मित हास्य करत आत्मविश्वासाने म्हणाली.
"माझ्याशिवाय कोण असू शकत बाबा ?"
वडीलांना तिच्याकडून ह्या उत्तराची अपेक्षा नव्हती.
त्यांना विश्वास होता की त्यांची मुलगी गर्वाने म्हणेल की,
" बाबा, ह्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तुम्हीच आहात ज्यांनी मला एवढ्या योग्यतेच बनवलं!"
या विचाराने त्यांचे डोळे भरून आले. ते कॅबिनचा दरवाजा ढकलून बाहेर निघायला लागले. पण न राहून त्यांनी परत एकदा वळून मुलीला विचारलं की, परत सांग "या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे "?
मुलगी ह्या वेळेस म्हणाला की,
"बाबा, तुम्हीच आहात ह्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती!"
वडील हे ऐकून आश्चर्यचकित झाले व ते म्हणाले,
"अग,आताच तर तू स्वतःला जगातला सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती म्हणत होतीस आणि आता तू मला शक्तिशाली व्यक्ती म्हणून सांगते  आहेस " ?
मुलगी हसत त्यांना आपल्या समोर बसवत बोलली ,
"बाबा, त्यावेळी तुमचा हात माझ्या खांद्यावर होता.
ज्या मुलीच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडीलांचा हात असेल तर ती मुलगी जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीच असेल ना ? हो की नाही बाबा " !
वडीलांचे डोळे परत भरून आले. त्यांनी आपल्या मुलीला घट्ट छातीशी धरून करकचून मिठी मारली."
खरंच आहे की, ज्याच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडीलांचा हात असेल तर ती व्यक्ती जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असतो.

आपल्या प्रगती व उन्नतिने जेव्हा जग जळत असते.
तेव्हा फक्त "आई-वडीलच"आपल्या प्रगतीवर खुश असतात

ताकद पुस्तकाची

  फेसबुकवर एका मित्राने प्रश्न विचारला होता, असं फक्त एक पुस्तक सांगा ज्या पुस्तकामुळे तुमचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.

तो प्रश्न वाचला आणि माझं मन दहा वर्षं मागे धावलं.


मी गरोदर होते तेव्हाची गोष्ट. तिळी मुलं पोटात आहेत हे कळल्यामुळे आधीच धाकधूक होत होती.
पहिले तीन महिने तर इस्पितळाच्या वाऱ्या करण्यातच निघून गेले होते.

 पाचव्या महिन्यात नुकतंच सगळं थोडं स्थिरस्थावर झालं होतं. सुटकेचा निःश्वास सोडतो न सोडतो तोच एका दुपारी अचानक पोटात खूप दुखायला लागलं.

डॉक्टरना फोन केला तर ते म्हणाले की लेबर पेन्स असू शकतात. ताबडतोब इस्पितळात भरती व्हा.

तसेच अंगावरच्या कपड्यानिशी इस्पितळात गेलो. तपासणी करून डॉक्टर गंभीर चेहेऱ्याने म्हणाले प्री-टर्म लेबर पेन्स आहेत. पुढच्या चोवीस तासात कधीही बाळंतपण होऊ शकतं!

 लगोलग पोटातल्या बाळांच्या फुफ्फुसांची वाढ होण्याकरता Steroids ची इंजेक्शन्स देण्यात आली आणि वेदना कमी करण्यासाठी मला एक औषध ड्रीपवर लावलं.

 ते औषध शिरेतून शरीरात जाताना तापता लाव्हा नसानसांत ओतल्यासारखं सर्वांग जळजळत होतं.
ते औषध एक Muscle Relaxant होतं. गर्भाशय हा एक मोठा स्नायू आहे, त्याच्या वेदना कमी करण्यासाठी दिलेलं. पण ते शरीरातले सगळेच स्नायू शिथिल पाडतं, अगदी हृदयाचे देखील. त्यामुळे सतत Heart Monitor वर राहावं लागायचं.

 लघवीसाठी केथेटर. जेवण म्हणजे सलाईन आणि गळ्यापासून खाली जवळ जवळ Paralysis झाल्यासारखीच स्थिती. सगळ्या जाणीवा शाबूत पण काहीही करता यायचं नाही स्वतःहून.


अश्या परिस्थितीत असताना तिथल्या डॉक्टरनी तिथल्या कायद्याप्रमाणे दिलेली एकूण परिस्थितीची आकडेवारीसकट माहिती. 'येत्या चोवीस तासात बाळं जन्माला आली तर त्यांची जिवंत राहण्याची शक्यता इतके टक्के, मतीमंद निपजण्याची इतके टक्के, रेटीनल आंधळेपणाची इतके टक्के, मेंदूला गंभीर इजा होण्याची इतके टक्के'.

हादरूनच गेलो होतो मी आणि नवरा दोघेही. आम्ही दोघंच इस्पितळात. मला तो आणि त्याला मी.


आई-बाबांना व्हिसा नाकारलेला. सासूबाई परत भारतात जाऊन आठवडा पण झाला नव्हता, त्यामुळे त्याही इतक्या लवकर परत येण्याची शक्यता नाही.

 अश्या वेळी धीर देणारं, पाठीवरून हात फिरवणारं एखादं वडिलधारं आपलं माणूस जवळ नाहीये ही जाणीव किती भयानक असते ते सांगून समजणार नाही.
त्यात औषधामुळे सुरु झालेल्या जबरदस्त हेल्यूसीनेशन्स!
बाहेर जर काही खुट्ट आवाज झाला की छातीत धडधडायला लागायचं.
टीव्ही बघायला लागले तर टीव्हीवरची बातम्या सांगणारी बाई आता बाहेर येऊन माझा गळा दाबणार अशी अनावर भीती वाटायची.

नवरा दोन क्षण जरी खोलीबाहेर पडला तरी सैरभैर व्हायचे मी. दहा-दहा मिलीग्रामच्या झोपेच्या गोळ्या घेऊनही जेमतेम तास-दोन तास झोप लागायची. बाळं इतक्या लवकर जन्माला आली तर त्यांचं काय होणार ही जीवघेणी भीती प्रत्येक क्षण सतावणारी. विचार करून करून अक्षरशः वेडी झाले होते मी.


नवरा सतत बरोबर होता. आई-बाबा, मोठे दोघे भाऊ, इतर नातेवाईक, मैत्रिणी सगळे फोनवरून धीर द्यायचे, पण काही सुचत नव्हतं. जगण्याची उर्मीच संपलेली होती. एखाद्या विकल क्षणी वाटून जायचं, सगळं संपवून टाकावं एकदाचं खूप झोपेच्या गोळ्या एकदम घेऊन. मोठ्या निकराने तो विचार मागे ढकलायचे पण चांगले विचार यायचेच नाहीत मनात. सारखी मनाला ग्रासून बसलेली भीती. केसाळ, कुरूप, हिंस्त्र!

अशाच एका काळ्याकुट्ट क्षणी नवऱ्याने हातात पुस्तक ठेवलं. रणजीत देसाई यांचं श्रीमान योगी. घरून त्याने ते मुद्दाम आणलं होतं. 'वाच', तो म्हणाला.

 मला तर पुस्तकाचं पानही उलटवता येत नव्हतं स्वतःहून. पण नवऱ्याने डॉक्टरला सांगून एका स्टेन्डवर ते पुस्तक ठेवलं आणि मी वाचायला लागले. आधी श्रीमान योगीची पारायणं केली होती पण त्या दिवसांत मला जिजाऊ जशी भेटली तशी ती आधी कधीच कळली नव्हती.

 मी वाचत गेले, पानं नवरा उलटायचा किंवा नर्स.
त्या पुस्तकात एक प्रसंग असा आहे, शिवाजी महाराज पुरंदरच्या तहानंतर मिर्झाराजा जयसिंगच्या तंबूत पंचहजारी मनसबदारी स्वीकारायला जातात आणि अपमानाने विद्ध होऊन परत राजगडावर येतात. ते कुणाशीच बोलू इच्छित नाहीत.
 शेवटी जिजाऊ स्वतः त्यांच्या महालात जातात, महाराजांना समजवायला. महाराज एकदम निराशपणे बोलत असतात. त्यांना समजावण्याचा प्रयत्न करूनही ते ऐकत नाहीत तेव्हा जिजाऊ एकदम संतापाने फुत्कारतात.

 आता नेमके शब्द आठवत नाहीत पण त्यांच्या संवादाचा साधारण आशय असा होता 'अपमानाच्या, कुणी वाली नसण्याच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका राजे. परमुलखात, परक्याघरी, नवऱ्याने टाकलेल्या अवस्थेत मी तुम्हाला जन्म दिला. सासर-माहेरचा कुठलाच आधार नसताना. तुमच्या चिमण्या बोटाला धरून पुण्यात आले. ओसाड गावची जहागीरदारीण मी, नवरा हातातून सुटला, मोठा मुलगा कायमचा गमावला तरी तुम्हाला कुठल्या बळावर मोठं केलं आम्ही?'

तो उतारा वाचला आणि अंगाला एकदम झिणझिण्याच आल्या! टेक्सास मधल्या इस्पितळातल्या त्या खिडकी नसलेल्या, तुरुंगासारख्या खोलीत, अंगात पाच-सहा नळ्या खुपसलेल्या अवस्थेत मी तो उतारा कमीत कमी पंचवीस वेळा तरी वाचून काढला असेल.

 एकदम स्वतःची लाज वाटली. वाटलं, त्या माउलीने इतकं सगळं सोसून जगाला शिवाजी दिला आणि मी माझ्या पोटातल्या, माझ्या रक्तामांसाच्या गोजिरवाण्या बाळांसाठी एवढंही सहन करू शकत नव्हते?


पुस्तकातल्या जिजाउंचा एकेक करारी शब्द एखाद्या आसूडासारखा माझ्या देहा-मनावर फुटत होता, मला धिक्कारत होता, फटकारत होता आणि त्याच वेळी आईच्या डोळस मायेने मला परत उभं राहण्यासाठी गोंजारतही होता.

 कडयाच्या टोकावर उभी होते मी तेव्हा. सभोवताली सगळा अंधारच होता. कुठूनही कसलाही आशेचा किरण दिसत नव्हता. तीन जीवांची जबाबदारी डोक्यावर होती. त्यांचं पुढे काय होईल ही जीवघेणी भीती प्रत्येक क्षणी मनाला ग्रासून होती. त्या विलक्षण नाजुक मनःस्थितीत असताना श्रीमान योगीमधल्या त्या एका उताऱ्याने मला परत जगण्याची जिद्द दिली.

 परिस्थितीशी लढण्याची ताकद दिली. खऱ्या अर्थाने माझा स्वतःकडे, माझ्या परिस्थितीकडे, माझ्या देहांत वाढत असलेल्या त्या तीन जीवांकडे बघायचा दृष्टीकोन पार बदलून गेला.


डॉक्टरांचे सर्व निष्कर्ष धाब्यावर बसवत मी पुढे जवळ जवळ नऊ आठवडे त्या इस्पितळात काढले. त्याच शरपंजरी अवस्थेत. त्या दिवसांत मी श्रीमान योगी कमीतकमी पाचवेळा तरी वाचून काढलं असेल.

मुलं जन्माला आली ती सातवा महिना संपल्यावरच. त्या नऊ आठवड्यांमध्ये त्यांना खऱ्या अर्थाने नवीन जीवन लाभलं होतं.

कदाचित गरोदर असताना श्रीमान योगी इतक्या वेळेला वाचल्यामुळे असेल, पण माझ्या मुलांना शिवाजी महाराजांच्या गोष्टींचं, त्यांच्या एकूणच चरित्राचं, त्यांचे किल्ले पाहण्याचं अनावर आकर्षण आहे!

योग्य वेळी हातात पडलेलं एखादं पुस्तक, एखाद्या प्रतिभावान लेखकाच्या लेखणीतून उतरलेले शब्द, एखाद्या डोंगराएवढ्या मोठ्या व्यक्तीचं चरित्र खरंच, आपलं आयुष्य पूर्ण बदलून टाकू शकतं!



-शेफाली वैद्य यांच्या वाॅल वरुन साभार.

Wednesday 31 May 2017

महाभारतातील दोन पात्रामधील अतिशय सुरेख संवाद:

कर्ण कृष्णाला विचारतो - " माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले,
कारण मी अनौरस संतती होतो.
यात माझी काय चूक होती?

मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं,
कारण मी क्षत्रिय नाही मानला जात होतो.

परशुरामांनी मला विद्या दिली, पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईल.
कारण मी क्षत्रिय होतो.

एक गाय चुकून माझ्या बाणांनी मारली गेली, आणि
गायवाल्यानी माझी चूक नसताना मला शाप दिला.

द्रौपदीच्या स्वयंवरात मला  अपमान सहन करावा लागला.

कुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचवण्यासाठीच सांगितले.

मला जे काही मिळाले ते दुर्योधनाचे उपकार म्हणून मिळाले.
तर मी त्याची बाजू घेतली यात माझे काय चुकले?"

कृष्णाने उत्तर दिले:
"कर्णा, माझा जन्म कारागृहात झाला.

जन्माच्या अगोदरपासूनच मृत्यू माझी प्रतीक्षा करीत होती.

रात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे करावे लागले.

तुम्ही तलवारी, रथघोडे, धनुष्यबाणांच्या आवाजात लहानाचे मोठे झालात.

मला गौशाला, शेणमाती मिळाली आणि मी चालायला पण लागलो नव्हतो तेव्हापासून माझा जीव घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले.

ना कोणती सेना, ना शिक्षण.

मीच त्यांच्या वाईटाचा कारण आहे, असे लोकांकडून मला ऐकायला मिळायचे.

तुमचे गुरु तुमच्या पराक्रमाचे कौतुक करायचे, तेव्हा मला साधे शिक्षण पण मिळाले नाही.

संदीपनी मुनींच्या गुरुकुलात प्रवेश झाला तेव्हा मी 16 वर्षाचा होतो.

तुम्ही तुमच्या पसंदीच्या मुलीशी लग्न केले.

माझं जिच्यावर प्रेम होते ती मला मिळाली नाही, तर ज्यांची मी राक्षसांच्या तावडीतून सुटका केली त्या माझ्या पदरी पडल्या.

मला माझ्या सर्व समाजबांधवांना जरासंधाच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी यमुना काठापासून नेऊन समुद्राच्या काठी (द्वारका) वसवावे लागले.
मला पळपुटा (रणछोडदास) म्हणतात.

जर दुर्योधन जिंकला तर तुला भरपूर श्रेय मिळेल.
धर्मराज जिंकला तर मला काय मिळेल, फक्त युद्ध आणि नुकसानीचा दोष.

एक गोष्ट लक्षात घे कर्णा...
प्रत्येकाला आयुष्यात कष्ट आहेत

आयुष्य कोणासाठीही सोपे नाही

दुर्योधनाच्या आयुष्यात बऱ्याचशा अप्रिय घटना घडल्या आहेत आणि तसेच युधिष्ठिराच्या पण.

परंतु काय योग्य (धर्म) आहे हे तुझ्या अंतरात्माला पण कळते...

कितीही वेळा आपल्या बरोबर अयोग्य गोष्टी झाल्या,
किती वेळा आपल्याला अपमान सहन करावा लागला,
कितीही वेळा आपल्याला आपल्या वाटेचे नाकारले गेले,

 तरीही
त्यावेळी आपण कसा प्रतिसाद देतो याला महत्व आहे.

तक्रारी थांबव कर्णा!

आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनामुळे तुला अधर्म करण्याचा अधिकार मिळत नाही.

Sunday 28 May 2017

पु ल देशपांडे लिखित एक सर्वोत्कृष्ट प्रार्थना अणि शुभेच्छा !

हे परमेश्वरा...
मला माझ्या वाढत्या वयाची
जाणीव दे. बडबडण्याची माझी
सवय कमी कर
आणि प्रत्येक प्रसंगी मी
बोललच पाहिजे ही माझ्यातली
अनिवार्य इच्छा कमी कर.

दुसर्‍यांना सरळ करण्याची
जबाबदारी फक्त माझीच व
त्यांच्या खाजगी प्रश्नांची
दखल घेउन ते मीच
सोडवले पाहिजेत अशी
प्रामाणिक समजूत माझी
होऊ देऊ नकोस.

टाळता येणारा फाफटपसारा
व जरुर नसलेल्या तपशिलाचा
 पाल्हाळ न लावता
शक्य तितक्या लवकर मूळ
मुद्यावर येण्याची माझ्यात
सवय कर.

इतरांची दुःख व वेदना
शांतपणे ऐकण्यास मला
 मदत करच पण त्यावेळी
माझ तोंड शिवल्यासारखे
बंद राहु दे. अशा प्रसंगी
माझ्याच निराशा, वैफल्यांचे
रडगाणे ऐकवण्याची माझी
सवय कमी कर.

केंव्हा तरी माझीही चूक
होउ शकते, कधीतरी माझाही
घोटाळा होऊ शकतो,
 गैरसमजुत होऊ शकते
ह्याची जाणीव माझ्यात ठेव.

परमेश्वरा,
अगदी शेवटपर्यंत माझ्यात
प्रेमाचा ओलावा, गोडवा,
लाघवीपणा राहू दे.
मी संतमहात्मा नाही
हे मला माहीत आहेच,
पण एक बिलंदर बेरकी
खडूस माणूस म्हणून मी
मरू नये अशी माझी
 प्रामाणिक इच्छा आहे.

विचारवंत होण्यास माझी
ना नाही पण मला लहरी
करू नकोस. दुसर्‍याला
मदत करण्याची इच्छा
आणि बुद्धी जरूर मला
दे पण गरजवंतांवर
हुकूमत गाजवण्याची
 इच्छा मला देऊ नकोस.

शहाणपणाचा महान ठेवा
फक्त माझ्याकडेच आहे
अशी माझी पक्की खात्री
असूनसुद्धा, परमेश्वरा,
ज्यांच्याकडे खरा सल्ला
 मागता येइल असे
मोजके का होईना
 पण चार मित्र दे.

एवढीच माझी प्रार्थना...

    - पु.ल.देशपांडे

Saturday 27 May 2017

देवळांचे अर्थकारण - भावना आणि तर्क

भावना आणि तर्क हे कधी एकत्र असत नाहीत. किंबहुना ह्या दोन गोष्टी नेहमी एकमेकांपासून लांबच असतात.

मनुष्यप्राणी हा भावनाप्रधान आहे आणि त्याच्या मेंदूतला केमिकल लोच्या तर्क हा भावने इतक्या लवकर स्वीकारत नाही.

भावना ह्या सोप्या असतात, मेंदूला सहज ग्राह्य असतात

आणि त्या भावना जर चांगल्या शब्दांत गुडाळलेल्या असतील तर आपण फारसा विचार न करता त्या लगेच घेतो.

म्हणूनच व्हॉट्सॅपवर व्हायरल झालेले संदेश हे भावनेला हात घालणारे असतात आणि अनेकदा तर्कहीन असतात.

हिंदूंचे सण जवळ आले की भावनांनी ओथंबलेले संदेश व्हायरल होतात.

होळी, दिवाळी हे कॉमन.

आता त्या पाठोपाठ गणपती हा सण भावनेने ओथंबलेल्या संदेशांच्या पंगतीला आला आहे.

महाराष्ट्रातील सकल प्रदूषणाचा कर्ता एकटा गणपती बाप्पा आहे, हे आपण मनावर ठासून घेत आहोतच.

आता त्यापाठोपाठ एक गाव एक गणपती, गणपतीला फुलं मिठाई नको, लालबागचा राजाच नवसाला पावतो का?

खरं तर कोणताच गणपती नवसाला पावत नाही वगैरे वगैरे संदेश यायला लागले आहेत.

गणपतीच्या अनुषंघाने एका मेसेजमध्ये भारतातील देवळांच्या आणि देवांच्या कमाईवर सवाल उठवला आहे.


तर प्रश्न चांगला आहे, लोकशाहीत अश्या प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळायलाच हवं.

प्रश्नकर्त्यांचा अधिकारच आहे तो. ह्यालाच लागून आलेला उपप्रश्न म्हणजे

देवळांना पैसे द्यावेच का?

तो पैसा भारतातील गोर गरीब जनतेला, अडल्या नडल्यांना देता येऊ शकत नाही का?

अनेक संसार त्यात सावरले जाऊ शकतात वगैरे वगैरे !


उद्देश चांगला आहे, असा आलेला मेसेजही भावनेच्या पाकात घोळवून काढलेला असल्यामुळे आकर्षक आहे.

पण म्हंटलं ना कि भावना आणि लॉजिक्स हि एकमेकांसोबत कधी जात नाहीत. इथेही तेच झालंय.

ज्या चांगल्या भावनेने आपण गणपतीच्या देणगीचा प्रश्न उचललाय त्याच चांगल्या भावनेने

भारतातल्या आपल्या सर्वांच्या आवडत्या तीन गोष्टींच्या आर्थिक व्यापाकडे बघुयात !

ह्यातली आपल्या सर्वांची पहिली आवडती गोष्ट म्हणजे ' चित्रपट ',

दुसरा नवीन लागलेला छंद म्हणजे ' आय पी एल '

आणि तिसरी जिव्हाळ्याची पूर्वापार चालत आलेली गोष्ट म्हणजे

' मद्य अथवा दारू '...

फिल्म फ्रॅटर्निटी वगैरे म्हणतात त्या चित्रपट सृष्टीने २०१५ साली १४०० करोडपेक्षा जास्त धंदा केला होता.

ह्यावर्षी सप्टेंबर पर्यंत १४०० करोडच्या आसपास धंदा केला आहे.

एकट्या 'सुलतान' चित्रपटाची कमाई ३५० कोटी रुपये आहे.

ह्या सर्वात साऊथ इंडियाचा एकही पिक्चर नाही,

'कबाली' हा ब्लॉकबस्टर नाही किंवा 'सैराट' सारख्या इतर प्रादेशिक चित्रपटांची गणना नाही.

शिवाय हा अधिकृत हिशोब आहे, अनधिकृत किती असेल त्याची कल्पना नाही.

ह्याआधीच्या वर्षांच्या कमाईचा हिशोब ह्यात नाहिये.

आपला दुसरा आवडता नवीन छंद म्हणजे 'आय पी एल'.

आयपीएलचा ह्यावर्षीचा टर्नओव्हर १२०० कोटी रुपयांच्या आजूबाजूला आहे.

सोनी मॅक्स चॅनलला ह्यावर्षी फक्त जाहिरातींमधून अपेक्षित असलेला रेव्हेन्यू होता १२०० कोटी रुपये.

शिवाय बी सी सी आयने प्रक्षेपणाचा केलेल्या कराराची किंमत आहे ८२०० कोटी रुपये.

ह्याही सर्व अधिकृतरित्या जाहीर झालेल्या फिगर्स, अनधिकृत काही असेल तर त्याची कल्पना नाही.

भारतातील तिसरा आवडता छंद म्हणजे 'दारू'.

'द हिंदू' च्या आकड्यानुसार भारतात दर वर्षी २० बिलियन लिटर दारू विकली जाते

आणि फक्त दारूचा वर्षभरातला व्यवहार होतो १ लाख कोटी रुपयांहून अधिक.

गणपतीचा किंवा देवळांचा आर्थिक व्यवहार कॅम्पेअर करण्यासाठी मी ह्या तीनच गोष्टी वापरल्या आहेत.

आणि ह्या वापरल्या आहेत कारण देवळातली किंवा गणपतीची देणगी जशी सर्वसामान्यांच्या खिशातून जाते त्याचप्रामाणे

हे सर्व आकडे आपणच आपल्या खिशातून कन्ट्रीब्युत केलेले असतात.

चित्रपट, आयपीएल आणि दारू ह्यासोबत कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स किंवा मोबाईल्स, फूड चेन्स, सोनं, चांदी ह्या सर्वांची माहिती यात धरली जाऊ शकते.

पण तेवढं खोलात जायची गरज नाही. कारण तुलनेसाठी ह्या तीनच गोष्टी पुरेश्या आहेत.

त्यातून हा सर्व रॉ डेटा आहे. अजून खोलात शिरलो तर अजूनही बरेच मोठे आकडे हाती येतील.

गंमतीचा भाग असा की ह्या सर्व गोष्टी आपण आता गरज ह्या सदरात टाकल्या आहेत.

पण त्याचवेळी देव हि देखील एक भावनिक गरज आहे हे आपण मान्य करत नाही.

माझा देव हि माझी एक सपोर्ट सिस्टिम आहे

आणि तिचं सगुण स्थान टिकवून ठेवायला मलाच खिशात हात घालावा लागणारे हे आपण मान्य करत नाही.

लालबागच्या राजाच्या पेटीचा जो काही कोट्यांमध्ये हिशोब आहे तो बाहेर काढायला आपण सरसावतो,

त्या पैशाच्या दानात किती लोकांचं कुटुंब चालू शकतं, किती शेतकरी आपलं घर सावरू शकतात हे हिशोब आपण हिरीरीने करतो.

पण दारू पिताना एका बीअरच्या पैशात एका कुटुंबाचं एका दिवसाचं जेवण सुटू शकेल हा हिशोब कुणी करायला जात नाही

की आय पी एलचं तीन चार हजाराचं तिकीट काढताना एखाद्या विद्यार्थ्याचा चार सहा महिन्यांचा अभ्यासाचा खर्च त्यातून भागू शकेल

हा विचार केला जात नाही.

तीच गोष्ट चित्रपटांची.

१०० कोटीचा धंदा केलेला पिक्चरच्या रेव्हेन्यूमध्ये आपलं सहा सातशे रुपयांचं कन्ट्रीब्युशन असतं

आणि तेही कुणाला तरी उपयोगी पडू शकेल हे आपल्याला मान्य करायचं नसतं.

येऊन जाऊन हिशोब सणांच्या आणि देवांच्या नावाखाली खर्च होणाऱ्या पैशाचा मागितला जातो.

लालबाग, सिद्धिविनायक किंवा अजून कोणतीही देवस्थाने ह्यांना मिळणारा पैसा हा सायलेन्सर तुटलेल्या बाईकसारखा आहे,

स्पीड २० चाच पण गोंगाट मात्र हा मोठा !!!


सर्वात महत्वाचं म्हणजे दान धर्म आणि इतर हिशोब ह्यासर्वांवर मेसेजेस आपल्या सणाच्या वेळीच येताना दिसतात.

एखाद्या खानाचा पिक्चर रिलीज होतोय, तो पाहू नका,

ते पैसे एखाद्या संस्थेला द्या

किंवा ३१ डिसेंबरला दारू पिऊ नका ते पैसे एखाद्या कुटुंबाला द्या असं कधी वाचलंय?

असं कधीच होणार नाही.

कारण भावनेत घोळवलेली भाषा वापरून आपले सण त्याने निष्प्रभ होणार नाहीत.

ते काम फक्त होळी, गणपती, दिवाळी ह्यातच होऊ शकतं.

आपली श्रद्धास्थानं बुडवणं, त्यांच्यापासून आपल्याला लांब नेणं हे एक कारस्थान आहे.

लोकांचे आदर्श बुडाले कि देश सहज बुडवता येतो.

भावनिक खच्चीकरण अर्थात डिमोरलायझेशनची हि एक पायरी आहे आणि आपण स्वतः हुन त्यावर जाऊन बसतोय.

त्यामुळे दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ.

आपली बुद्धी गहाण टाकू नका आणि बुद्धिभेद करणाऱ्या एकाही मेसेजला बळी पडू नका.

ज्याप्रमाणे समाजात तळागाळातल्या लोकांना हात देणं हे आपलं कर्तव्य आहे

त्याच प्रमाणे

देव, देश आणि धर्म ह्यांना बळ देणं हे आपलं काम आहे आणि ते विसरता कामा नये.

Friday 26 May 2017

ब्रिटनसह 74 देशांमध्ये सायबर हल्ला - रेनसमवेयर

ब्रिटनमधील अनेक रुग्णालयांमधील कॉम्प्युटर्स रेनसमवेयरच्या मदतीने हॅक करण्यात आले आहेत. जगभरातील 74 देश या सायबर हल्ल्याने कचाट्यात सापडले आहेत. या सायबर हल्ल्याच्या माध्यमातून जवळपास 75 हजार कॉम्प्युटर्सना लक्ष्य करण्यात आले आहे. WanaCrypt 2.0 नावाच्या रेनसमवेयरच्या मदतीने हॅकर्सनी ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा खंडित केली आहे.

रेनसमवेयर हा मालवेअरचा एक प्रकार असून त्यातून कॉम्युटरमधील डेटा रिमोटच्या मदतीने लॉक करता येतो. रेनसमवेयरच्या मदतीने हॅक केलेला कॉम्प्युटर अनलॉक करण्यासाठी हॅकर्स पैशांची मागणी करतात. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने नुकताच तयार केलेला प्रोग्रामचा वापर करुन हॅकर्सनी आरोग्य यंत्रणा हॅक केली असावी, असा अंदाज सायबर क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. रेनसमवेयर ईमेलच्या मदतीने पाठवला जात असून त्या माध्यमातून कॉम्प्युटर हॅक केले जात आहेत. यासोबतच हॅकर्स कॉम्प्रेस्ड आणि एन्क्रिप्टेड फाईल्सच्या मदतीने देखील कॉम्प्युटर्सला लक्ष्य करत आहेत.

सुदैवानं हा व्हायरस अद्याप भारतात पसरलेला नाही. पण याचा धोका कायम आहे. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी ते पाहूया...

तुमच्या सिस्टममध्ये चांगल्या कंपनीचा अँटी व्हायरस टाकून घ्या. तसेच अँटी व्हायरसची शेवटची तारीख लक्षात ठेऊन ते वेळच्या वेळी अपडेट करा. तसेच तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरला जेव्हा कधी मोबाइल, पेन ड्राईव्ह किंवा दुसरे कोणते डिव्हाईस जोडाल तेव्हा ते स्कॅन करुन घ्या. कोणत्या ऑनलाईन साइटवरुन काही डाऊनलोड करण्याआधी पहिले हे पाहा की ती वेबसाइट नोंदणीकृत आहे का. तसेच तुमची सिस्टम वेळच्या वेळी फॉर्मेट करत जा.

ती ..

 तिला ना सगळंच हवं असतं सगळंच करायचं असतं मनापासून मन लावून......

तिला सगळ्याची भारी हौस.. खाण्याची- खिलवण्याची, गाण्याची- कवितेची, फिरण्याची भटकंतीची आणि शांत गझल ऐकण्याची..

 तिला आवड आहे जगण्याची- समरसून , भरभरून

 बरोबर ना ?

खरेदी म्हणजे तर तिचा श्वास ! मग विंडो शोपिंग पण चालतं.. मूड ठीक करायला खरेदी हा एकमेव उपाय..

 संदिप खरे असो किंवा अरूण दाते, आशा भोसले तर वाह.. जगजित ची गझ़ल तर ती ऐकतेच ऐकते आणि उडत्या गाण्यावर ठेका पण धरते..

 लावणी पण निषिद्ध नाही आणि अभंग ही वर्ज्य नाही..
बाहेरचं जग पण तिला खुणावतं, त्याच बरोबर घराकडे तिचं दुर्लक्ष नाही..
कर्तव्यात कणभर कसूर नाही..

 जसा प्रसंग तसा तिचा वेष आणि वागणं.. पूजेला साडी आणि डान्स करताना मिडी , यात तिला वावगं वाटत नाही.. सर्व प्रकारची मजा तिला आवडते, सर्व अनुभव तिला घ्यायची इच्छा आहे..

 तिला घर पण सांभाळायचं आहे, मुलांकडे लक्ष द्यायचं आहे, घरातल्या इतर गोष्टीत तिला रस आहे.. आणि त्याच बरोबर तिला स्वतः ची आवड,ऋची पण जपायची आहे.. छंदात मन रमवायचं आहे, काही तरी नवीन, धाडसी करायचं आहे.. सगळ्यांच्या नजरेत स्वतः ला सिद्ध करायचं आहे.. स्वतः चं अस्तित्व तिला खुणावतं आहे..

 समाजाचं  ऋण फेडण्यासाठी श्रम करायची तयारी आहे, स्वतः ची कला जोपासण्यासाठी ती उत्सुक आहे..

केवळ वाहवा मिळवण्यासाठी नव्हे, तर एका कौतुकाच्या शब्दासाठी, तिची सारी धडपड आहे..

तिला जगण्याची आवड आहे, स्वत्व जगण्याची ओढ आहे, मित्र मैत्रिणीमधे रमण्याची आस आहे,

फक्त तिला एक खंबीर साथ हवी आहे, मूक संमती हवी आहे, तिच्या पंखात बळ भरणारी, तिच्या सोबत असणारी प्रेमळ संगत हवी आहे....
..
...प्रत्येक स्त्रीचे अंतरंग
*Group मधिल समस्त मैत्रीणीस समर्पीत...

कन्यादान

बाप  आणि लेक हे नाते शब्दांत मांडणे कठीण..

बाबा हा शहाळ्यासारखा असतो ...

बाहेरून कितीही कठोर असला तरी ....

आतून मात्र नितळ आणि मधुर पाण्याचा झरा असतो. ...

कुठलीही मुलगी...

जर डोळे  झाकून  एखाद्या पुरुषावर  विश्वास  ठेवू  शकते....तर तो फक्त तिच्या वडिलांवर …

लेक जर घराचे सौख्य असेल तर...

 त्या सौख्याचे पावित्र्य तिचा बाबा असतो....

संस्कार देणारी आई असली तरी...
 ते संस्कार जपणारा बाबा असतो.

संयम देणारी आई असली तरी...

 खंबीर बनवणारा बाबाच असतो...

बोट धरून चालायला शिकवणारा बाबाच असतो ...

 लेकीच्या हट्टासाठी घोडा होणाराही  बाबा असतो...

कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणाराही  बाबाच असतो...

पिकनिकसाठी पण पैसे बाबाच देतो...

shopping करताना आईने कमी  किमतीचा dress काढला तर....
 हळूच लेकीला विचारून भारी किमतीचा dress घेणारासुद्धा बाबाच असतो. ...

आईने काही काम सांगितले तर.... तिला दटावणारासुद्धा बाबाच असतो....

लेकीचे पहिले बोबडे बोल , तिने टाकलेले पहिले पाऊल , तिचे लाडिक वागणे,
 तिची घरभर पैंजणांची छुमछुम हे सगळे पाहून सुखावतो तो बाबा असतो आणि ....

लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळणारा ....
आणि प्रसंगी रागे भरणारा पण बाबाच असतो....

पण त्यात त्याची लेकीसाठी तळमळ असते, तिच्यासाठीची काळजी असते....

लेकीच्या प्रत्येक सुखासाठी झटणाराहि बाबाच !!!

आणि शेवटी मुलगी म्हणजे परक्याचे धन हे कटू सत्य पचवणाराही बाबाच !!!

ज्या लेकीला २०-२५ वर्षे जीवाच्या पलीकडे सांभाळले तिला एका क्षणात परक्याच्या हातात देताना त्याचे हृदय काय तुटत असेल ह्याची कल्पनाही करता येणार नाही. ..
आर्त धागे तुटल्याची ती वेदना कोणीच नाही समजू शकणार.

आपल्या लेकीला माहेरचा उंबरठा ओलांडून...
 सासरी जाताना पाहताना ढसाढसा रडणाराही बाबाच असतो....

आपल्या लेकीचा हात परक्याच्या हाती देताना... आतून तुटणारा बाबाच असतो...

"दिल्या घरी सुखी रहा  म्हणताना "
... मनातून खचलेलाही बाबाच असतो...

असा हा बाबा त्याच्या लेकीचे सर्वस्व असतो...

आणि फक्त लेकच तिच्या बाबाचे मन ओळखू शकते. ...

लेकीचा स्वतःपेक्षा  जास्त विश्वास तिच्या बाबावर असतो....

लग्नानंतर मुलीचे नाव जरी बदलले तरी....
तिचे बाबा बरोबरचे नाते कधीच बदलत नाही ....

ती शेवटपर्यंत तिच्या बाबाची छोटी परीच असते....

एक गोंडस परी …
                                                     आज जागतिक कन्या  दिन....ज्यांना कन्यारत्न आहेत अशा सर्वांना जागतिक कन्या दिनाच्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा!!

   👏👏लक्षात ठेवा..👏👏

मुलगा वारस आहे.....मुलगी पारस आहे..

मुलगा वंश आहे........मुलगी अंश आहे.....

मुलगा आन आहे........मुलगी शान आहे...

मुलगा तन आहे........... मुलगी मन आहे....

मुलगा संस्कार आहे... मुलगी संस्कृती आहे

मुलगा आग आहे.......  मुलगी बाग आहे....

मुलगा दवा आहे.........मुलगी दुऑ आहे....

मुलगा भाग्य आहे......मुलगी सौभाग्य आहे

मुलगा शब्द आहे........मुलगी अर्थ आहे....

मुलगा गीत आहे........तर मुलगी संगीत आहे..

👩लेक वाचवा.....
👩लेक वाढवा....
👧लेक घडवा....

ज्याना मुलगी नाही त्यानी सुनेला जीव लावा, 

Forward  to  all .....

BOX OFFICE

नाटकाला जाताना आपण प्रथम नाट्यगृहाबाहेर असलेल्या बुकिंग ऑफिसमधून  तिकिट विकत घेतो. पण तशी पद्धत शेक्सपियरच्या काळात नव्हती. त्याकाळी तिकिटाची खिडकीच नसायची. त्याऐवजी नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारापाशी एक 'मेटल बॉक्स' ठेवलेला असायचा. या बॉक्सच्या फटीतून चार पेनीचं नाणं आत टाकलं की प्रेक्षकांना आत प्रवेश मिळायचा. 

हा बॉक्स इतक्या छोट्या आकाराचा असायचा की तो नाण्यांनी लगेच भरून जायचा. नाण्यांनी भरलेला हा छोटा बॉक्स घेऊन थिएटरचा एक माणूस स्टेजच्या मागच्या बाजूला असलेल्या ऑफिसमध्ये जायचा आणि हा बॉक्स तिथे ठेऊन रिकामा बॉक्स घेऊन परत प्रवेशद्वारापाशी यायचा. येताना ऑफिसच्या दाराला कुलूप लावायला तो विसरायचा नाही. हे सर्व होईपर्यंत प्रवेशद्वाराबाहेर खोळंबलेले प्रेक्षक चार पेनीचं नाणं या बॉक्समध्ये टाकून आत शिरायचे.

हे छोटे बॉक्सेस ज्या खोलीत ठेवले जायचे त्या खोलीला 'बॉक्स ऑफिस' म्हणायचे. आजही 'बॉक्स ऑफिस' हा शब्दप्रयोग आपण वापरतो, पण त्याचा उगम शेक्सपियरच्या काळात झाला.

छोटे बॉक्स ठेवण्यापेक्षा आणि ते सतत बदलत बसण्यापेक्षा एक मोठा बॉक्स का ठेवायचे नाहीत, असं कुणाला वाटू शकेल. त्याचं कारण हेच होतं की, हा बॉक्स पळवला जाईल याची भीती असायची. शेक्सपियरचं 'ग्लोब थिएटर' ज्या भागात होतं, तिथे चोर, डाकू, दरोडेखोर, वेश्या यांचा सुळसुळाट होता आणि चोऱ्यामाऱ्यांचं प्रमाण मोठं होतं. नाण्यांनी भरलेला मोठा बॉक्स चोरीला गेला, तर नुकसानही तेवढंच मोठं होणार, हा विचार छोटे बॉक्सेस वापरण्यामागे असायचा...

अनलिमिटेड बुफे

अनलिमिटेड बुफे मागचं अर्थशास्त्र व वैद्यकशास्त्र! (पैसे वसूल करायचे असतील तर नक्की वाचा)

काही ठराविक किंमतीत अनलिमिटेड बुफे लंच/डिनर हा प्रकार तुम्ही कित्येकदा अनुभवला असेल. जेवणाचा प्रकार (शाकाहारी, मांसाहारी इ.) कोणता आहे यावरून बुफेच्या किंमती थोड्याशा बदलतात, पण जास्त फरक नसतो. प्रत्येक बुफे हा अर्थशास्त्रीय भाषेत surplus साठीच छोटेखानी युद्ध असते. Consumer Surplus जितका कमी करता येईल तितका हॉटेलचा फायदा असतो; आणि मोजक्या पैशात जितके जास्त अन्न खाता येईल (थोडक्यात consumer surplus वाढवता येईल) तितका ग्राहकाचा फायदा असतो. आणि या सगळ्या अर्थशास्त्रीय युद्धाला वैद्यकाच्या काही नियमांची जोड असते. कसे ते पाहूया!

१) बुफेची किंमत कशी ठरते? - साधारणपणे मनुष्याच्या जठराची (stomach) कमाल क्षमता असते १.५ लिटर. थोडक्यात कितीही मी-मी म्हणणारा बकासुर १.५ लिटर पेक्षा जास्त अन्न एका वेळेस खाऊ शकत नाही. आता बुफे मधल्या 100 पदार्थांपैकी सगळ्यात महागडा पदार्थ किलोच्या भावात घ्या आणि त्याची १.५ किलोची किंमत बुफेला लावून टाका. BBQ Nation मध्ये सगळ्यात महाग काय असते तर Prawns, साधारण ५०० रुपये किलो, म्हणून BBQ Nation चा मांसाहारी बुफे ७५०-८०० रुपयांपासून सुरू होतो. तुम्ही पोटभर prawns खाल्ले तरी त्यांना नुकसान नाही.

२) वेलकम ड्रिंक, सूप चे मायाजाल - सगळ्या बुफेच्या ठिकाणी self service असली तरी welcome drink किंवा सूप मात्र तुम्हाला टेबल वर दिले जाते. त्यात तुमचे खूप काही आदरातिथ्य करायचा हेतू नसतो. गोड welcome drink ने तुमच्या मेंदूला एक छान साखरेचा डोस मिळतो आणि तुमचा मेंदू तुमची भुकेची मात्रा कमी करून टाकतो, पोट रिकामं असलं तरी. सूप तुमच्या पोटात भरपूर जागा व्यापून टाकतात आणि मग परत जास्त खायची इच्छा राहत नाही. त्यामुळे या दोन्ही गोष्टी देण्यात हॉटेलवाला तुम्हाला तुमची १.५ लिटर जठरक्षमता वापरण्यापासून थांबवत असतो.

३) वेटर, एक उपद्रवी सैनिक - तुम्ही BBQ Nation मध्ये non-veg grill लावायला सांगा आणि गंमत पहा. येणारा वेटर तुम्हाला जास्तीत जास्त चिकन किंवा फिश (दोन्ही १२० रुपये किलो) खायला आणून देत जाईल. तुम्ही मटण किंवा Prawns (४५० ते ५०० रुपये किलो) कितीही मागत राहा, तुम्हाला ते अत्यंत कमी आणि खूप उशीराने दिले जाते. अपेक्षा एवढीच असते की तुम्ही भुकेच्या तडाख्यात दुसरे काहीतरी खायला घ्यावे आणि तुमचा surplus कमी करून घ्यावा. ५०० रुपये किलोच्या prawns च्या जागी तुम्ही १२० रुपये किलोचे चिकन खाल्ले तर ७५० रुपयांतले तुम्ही जास्तीत जास्त २०० रुपये वसूल करणार, बाकी हॉटेलचा फायदा.

४) चाट, आईसक्रीम - कित्येक बुफेच्या ठिकाणी चाट, पापडीवाला ठेला हमखास लावलेला असतो. बायका आपल्या नैसर्गिक स्वभावाने तिकडे जाऊन पाणीपुरी खाऊन पोट भरतात. डोक्यावरून पाणी, ५० रुपयांत एका बाईला चुरमुरे असलेली भेळ/चाट किंवा पाणीपुरी देऊन तिचे उरलेले पैसे हॉटेलवाला स्वतःकडे खेचत असतो. आईस्क्रीमची अवस्थाही तीच! स्वस्तातले फॅमिली पॅक वाले आईसक्रीम (२०० रुपये किलो) तुम्हाला नावाला डायफ्रूट शिंपडून चारायला हॉटेलवाल्याचा फायदाच असतो.

५) फळे, सॅलड - कितीही आरोग्यदायी असली तरी तुम्हाला ४० रुपये किलोचे कलिंगड, खरबूज, गाजर, काकडी चारण्याइतका आनंद हॉटेलवाला दुसऱ्या कशातच घेऊ शकत नाही. त्यामुळे हे हमखास तिथे मुबलक असणार.

६) गोडधोड/डेझर्ट - कितीही अट्टल खाणारा पाव किलोपेक्षा जास्त गोडधोड नाही खाऊ शकत, मेंदू खाऊच देत नाही. बुफेमधल्या डेझर्टच्या किमती पाहिल्या तर जास्तीत जास्त १०० रुपयांचे गोडधोड तुम्ही खाऊ शकता.

७) शाकाहारी लोक - तुम्ही समस्त बुफेवाल्यांसाठी हक्काचे बकरे असता. १० रुपये किलोचा बटाटा "तंदूर आलू" म्हणून तुम्हाला खाताना पाहून हॉटेलवाले ऑर्गझमीक आनंद घेत असतात. पनीर खा, स्वीट खा, फळे खा ... काहीही खा! तुमच्यासाठी हॉटेलवाला ३००-३५० च्या वर काहीही खर्चत नाही, आणि तुम्ही ७०० रुपये दक्षिणा देऊन येता.

तेव्हा खवय्यांनो, बुफेचा पैसा खऱ्या अर्थाने वसूल करायचा असेल तर फक्त महागातले अन्न, पोटभर खाऊन यावे. आणि तुम्हाला जर फक्त हौसेसाठीच बुफे खायचं असेल तर मग ५० रुपयांचे चाट खाऊन ८०० रुपये देऊन या... कुणाचं काहीही जात नाही!

- डॉ. विनय काटे

Monday 8 May 2017

ईशोपनिषद्

शुक्लयजुर्वेदाच्या कण्वशाखेच्या संहितेचा चाळिसावा अध्याय म्हणजे ईशोपनिषद किंवा ईशावास्योपनिषद होय. ह्या उपनिषदाचा मंत्र भागात समावेश होतो म्हणून ह्या उपनिषदाला जास्त महत्त्व आहे. सर्व उपनिषदात ह्याला पहिले स्थान दिले जाते. या उपनिषदाचा पहिला मंत्र "ईशावास्यमिदं" असा सुरू होतो म्हणून ह्याचे नाव ईशावास्योपनिषद् असे रूढ झाले.
॥ शान्तिपाठ ॥
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
ॐ शान्तिः । शान्तिः । शान्तिः ॥
सच्चिदानंदस्वरूप परब्रह्म सर्व प्रकारे पूर्ण आहे आणि हे दृश्य जगत् सुद्धा पूर्णच आहे. जरी पूर्ण परब्रह्मातून हे पूर्ण जगत् व्यक्त स्थितीस आलेले असले तरीही ह्या पूर्ण ब्रह्माच्या पूर्ण स्थितीला बाधा येत नाही. ते आहे तसेच पूर्ण राहते.

ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् । तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद् धनम् ॥१॥
अर्थ - ह्या जगात जे काही उत्पन्न होणारे व विलयास जाणारे आहे ते सर्व ईशतत्त्वाचा निवास असलेले आहे. त्या ईशतत्त्वाच्या साक्षीने त्यागबुद्धी ठेवून भोग्य वस्तूंचा उपभोग घे. ही सर्व प्रकारची सृष्टीतील संपदा खरोखर कोणाच्या मालकीची आहे? कोणाचीही एकट्याची नाही, म्हणून गिधाडासारखे काहीही हव्यासाने घेऊ नकोस. ॥१॥

कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छत समाः । एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ॥२॥
अर्थ - ह्या जगात शास्त्रविहित कर्मे करता करताच शंभर वर्षे जगण्याची इच्छा केली पाहिजे. ह्या प्रकारे कर्म केल्यास तुला (मनुष्याला) कर्म बंधनकारक होत नाही. ह्याहून दुसरा कर्मबंधनातून मुक्त होण्याचा मार्ग नाही. ॥२॥

असुर्या नाम ते लोका अन्धेन तमसाऽऽवृताः । ताँस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये के चात्महनो जनाः ॥ ३॥
अर्थ - जे अंधाराने, तमाने भरलेले लोक (स्थाने) आहेत त्यांचे नाव ’असुर्या’ लोक असे आहे. जे आत्मघात (आत्मा म्हणजेच देहादी उपाधी असे मानणे हाच आत्मघात) करतात ते मरणानंतर ह्याच ’असुर्या’ लोकाप्रत जातात. ॥३॥

अनैजदेकं मनसो जवीयो नैनद्देवा आप्रुवन् पूर्वमर्षत् | तद्भावतोऽन्यानत्येति तिष्ठत् । तस्मिन्नपो मातरिश्वा दधाति ॥४॥
अर्थ - ईश्वर सर्वांच्या आधीचा आहे. त्याचे ज्ञान इतर कोणाही देवांना नाही पण तो मात्र सर्व देवांना जाणतो. तो स्वतः स्थिर असून सर्वांना चालना देतो. सर्वांपेक्षा (मनापेक्षाही) तो वेगवान आहे. त्याच्याच सत्तेच्या आधीन होऊन सर्व पंचमहाभूते काम करतात. उदा. वारा वाहतो तो ईश्वराच्या सत्तेने, स्वतःच्या सत्तेने नव्हे.

तदेजति तन्निजति तद्दूरे दद्वन्तिके । तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्य बाह्यतः ॥५॥
अर्थ - ते ब्रह्म (किंवा ईश्वर) चेतन आहे तसेच स्थिरही आहे. एकाच वेळी त्याच्या ठिकाणी परस्परविरोधी भाव, सामर्थ्य, गुण आणि क्रिया असू शकतात. तोच त्याच्या अचिंत्य शक्तीचा महिमा आहे. अवतार कार्य ही जी त्याची लीला आहे ते त्याचे चल रूप आहे. आणि निर्गुणनिराकारपणे राहणे; अविनाशी, अविकारी असणे हे त्याचे स्थिरत्व आहे. ज्याला श्रद्धा व प्रेम नाही त्याला त्याचे दर्शन होत नाही; म्हणूनच तो सर्वात दूर आहे. पण प्रेमाने, आर्ततेने हाक मारताच तो क्षणार्धात भक्ताजवळ येऊन उभा राहतो, म्हणून तो सर्वात जवळ आहे. तसेच जेथे अग्नी, चंद्र वा सूर्य ह्यांचा प्रकाश पोहचत नाही तेथे त्याचे परमधाम आहे; अर्थात तो फार दूर आहे. पण जीवरूपाने सर्वांच्या अंतःरंगात आहे म्हणून सर्वात जवळ आहे. ॥५॥

यस्तु सर्वाणि भूतान्यात्मन्येवानुपश्यति । सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते ॥६॥
अर्थ - ईश्वराची आराधना / भक्ती करणाऱ्या भक्ताच्या मनाची शांत स्थिती कशी असते आणि कोणत्या प्रचीतीमुळे ती तशी होते ते ह्या मंत्रात सांगितले आहे. जो स्वतःमध्ये सर्व जगाला पाहातो आणि जगातील सर्व वस्तुमात्राच्या ठिकाणी स्वतःला पाहातो; त्याला दुसऱ्या कोणाचाही व कशाचाही तिरस्कार अथवा घृणा वाटत नाही. (कारण तशी घृणा केली तर आपणच आपली घृणा केली असे होईल.) तो सर्वत्र एकच ईशतत्त्व पाहातो. ॥६॥

यस्मिन्सर्वाणि भूतानि आत्मैवाभूद् विजानतः । तत्र को मोहः कः शोकः एकत्वमनुपश्यतः ॥७॥
अर्थ - पहिल्या श्लोकात "तेन त्यक्तेन भुञ्जीथाः" असे सांगितले. त्याग्यात भोग व भोगात कर्तृत्वभावनेचा त्याग आणि कोणाचेही धन (सर्व प्रकारचे सुख) हिरावून घेऊ नये हा संदेश दिला. नंतर तिरस्कार नसावा हे सांगितले. ह्या मंत्रात मोह (सुखामुळे) व शोक (दुःखामुळे) नसावेत असे सांगितले आहे आणि त्याची कारणमीमांसाही केली आहे. जर दुजेपणाच आपल्या जाणीवेत नसेल तर आपली एखादी वस्तू नष्ट झाली, दुसऱ्याने कोणीतरी नेली किंवा हवीशी वाटली पण मिळाली नाही तर मोह वाटणे किंवा शोक वाटणे ह्या गोष्टीच शक्य नाहीत. अशा व्यक्तीची शांती कशानेही ढळत नाही. त्याला सर्वत्र ऐक्याचाच अनुभव येत असतो. परमेश्वर माझ्यात आणि इतरांमध्ये एकत्वाने नांदत आहे अशी त्याची दृढ धारणा असते. त्याची बुद्धी सदैव "सम" च असते.

स पर्यगाच्छुक्रमकायमव्रणं अस्नाविरँ शुद्धमपापविद्धम् । कविर्मनीषी परिभूः स्वयंभूर्याथातत्थ्यतोऽर्थान् व्यदधाच्छाश्वतीभ्यः समाभ्यः ॥८॥
अर्थ - ज्याची अशी लोभ, मोह, शोकरहित समाधानी ऐक्यभावना दृढ असते तो महात्मा परमेश्वरस्वरूप होतो. परमेश्वर कसा आहे तर सर्वसाक्षी, स्वयंभू, सर्व वैभवसंपन्न, शरीर अविनाशी असलेला, तेजोमय, सर्वज्ञ, ज्ञानस्वरूप व प्राण्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना योग्य त्याच स्थितीत ठेवणारा असा आहे. ॥८॥

अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते । ततो भूय इव ते तमो य उ विद्यायाँ रताः ॥९॥
अर्थ - अज्ञानी लोक तर ईश्वराच्या अप्राप्तीरूपी अंधारात, जेथे काही दिसत नाही त्या अंधकारात पडतात. हे अविद्येने घडते. पण विद्याभास करणारे व त्यातच सर्वस्वी बुडून राहिलेले अर्थात ज्ञानी, विद्यावंतही जाणूनबुजूनही त्या अंधारात शिरतात. ॥९॥

अन्यदेवाहुर्विद्ययाऽन्यदाहुरविद्यया । इति शुश्रुम धीराणां ये नस्तद्विचचक्षिरे ॥१०॥
अर्थ - आत्मज्ञानी, धैर्यशील लोकांनी आम्हाला जे नीट शिकविले आहे ते आम्ही ऐकले आहे; ते म्हणजे विद्या व अविद्या ह्यांचा अर्थ अगदीच वेगळा आहे. ॥१०॥

विद्यां चाविद्यां च यस्तद्वेदोभयं सह। अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते॥ ११॥
अर्थ - कर्म व अकर्म ह्यांचे रहस्य मोठमोठे विद्वान पुरुषही जाणत नाहीत. त्यामुळे ज्ञानाचा अभिमानी मनुष्य कर्म हे ब्रह्मप्राप्तीला बाधक समजतो आणि उचित, विहित, अटळ कर्माचाही चुकीने त्याग करतो. पण त्या त्यागामुळे त्याची कर्म बंधनातून सुटका होतच नाही कारण कर्म न करणे हेच त्याचे कर्म होते. मोहाने/रागाने त्याग केला तर तो राजस/तामस त्याग; त्याग ठरत नाही. विहित कर्म अनासक्त राहून करणे हाच त्याग होय आणि अशा कर्मानेच "मृत्युं तीर्त्वा" म्हणजे कर्मबंधनच न लागल्यामुळे जन्ममृत्युच्या साखळीतून सुटका होते. उलट ज्ञानीपणाच्या अभिमानाने स्वैर व अविहित कर्मे घडून मनुष्य प्रमादी होतो आणि पुढे मूढ योनीतही जन्माला येतो. म्हणूनच कर्म हे जरी अविद्येच्या, मायेच्या, द्वैताच्या प्रांतातले असले तरीही त्याचे अनासक्ती व ईश्वरार्पण बुद्धीच्या आश्रयाने आचरण केले तर मनुष्य मृत्युलोकातून तरतो आणि भगवंताचे स्वरूप व कार्य जाणून तो अमृतत्वास पोहोचतो.

अन्धं तमः प्रविशन्ति येऽसंभूतिमुपासते. ततो भूय इव ते तमो य उ संभूत्यां रताः ॥१२॥
अर्थ - जे लोक देव, पितर मानव आदींची उपासना करतात ते तर अज्ञानाच्या अंधारात राहतातच पण जे परमेश्वराच्या अनादिअनंत रूपाची उपासना करतात आणि तीतच मग्न असतात ते ही पुन्हा जास्तच अंधारात प्रवेश करतात. ॥१२॥

अन्यदेवाहुः संभवादन्यदाहुरसंभवात् । इति शुश्रुम धीराणां ये नस्तद् विचचक्षिरे ॥१३॥
अर्थ - परमेश्वराची सर्वात्मभावाने उपासना करणे हाच ’संभव’ (संभूति) खरा अर्थ होय. तसेच परमेश्वराची आज्ञापालन करण्याचा भाग म्हणून देव, ब्राह्मण, गुरु, माता, पिता आदींचा पूज्य भावाने आदर करणे, त्यांची पूजा, सेवा करणे हा ’असंभव’ (असंभूति) चा खरा अर्थ होय. म्हणजेच विनाशशील आराध्य दैवताच्या ठिकाणीही परमेश्वराच्या अविनाशी स्वरूपाचीच आराधना करण्याची भावना ठेवणे, तसेच स्वतःकडे कर्तेपणाचा अभिमान न धरणे होय.

संभूतिं च विनाशं च यस्तद् वेदोभयóè सह । विनाशेन मृत्युं तीर्त्वा सम्भूत्याऽमृतमश्नुते ॥१४॥
अर्थ - अविनाशी परब्रह्म जो जाणतो व विनाशशील देवादिकांनाही जाणतो, तो त्या देवतांच्या उपासनेतूनही मृत्युवर मात करतो आणि परमेश्वराच्या आराधनेने तर तो पूर्ण अमृतत्त्व प्राप्त करतो. विनाशशील देवांकडून मिळणारे फळ क्षणजीवी आहे. जेवढे भोग्य पदार्थ आहेत ते सगळे परिणामी दुःखच देणारे असतात. पण त्या सर्वांत जी मूळ सत्ता आहे, शक्ती आहे ती परमेश्वराचीच आहे आणि देवादिकांसाठी जरी आपण उपासना केली तरी ती परमेश्वराचीच उपासना असते; अशा स्पष्ट धारणेने साधक जरी अन्य देवतांची उपासना करील तरीही तो मृत्युंजय होईल आणि संभूती म्हणजे परमेश्वराचेच व्यापक रूप जो मनी आणून त्याची आराधना करील तो ही जन्म-मरणापलीकडे शाश्वत अमृतरूप असा होईल. ॥१४॥

हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् । तत्त्वं पूषन्नापावृणु सत्यधर्माय दृष्टये ॥१५॥
अर्थ - सत्यावर मायेचे आवरण पडलेले आहे, ते आवरण दूर कर अशी पूषन् नामक सूर्यदेवतेची प्रार्थना ह्या श्लोकात आहे. परमेश्वराचे दर्शन घडण्याच्या बाबतीत "सोन्याचे पात्र" आड येते. परमेश्वराने कृपा करून मूळच्या आपल्या अव्यक्त रूपावर आलेले मायेचे आवरण दूर करावे. त्यानेच आमच्या दृष्टीला सत्य काय ते कळेल. साधक स्वप्रयत्नाने नित्यानित्यविवेक करील. पण सत्यस्वरूपाचा साक्षात्कार परमेश्वरी कृपेनेच होतो. सांसारीक जीवनात सुखोपभोग हे माणसाला मोठे विलोभनीय वाटतात म्हणून सोन्याचे पात्र अशा रूपकाचा उपयोग केला गेला आहे. ॥१५॥

पूषन्नेकर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन् समूह । तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसौ पुरुषः सोऽहमस्मि ॥१६॥
अर्थ - येथे पूषा, ऋषी, यम, सूर्य, प्राजापत्य इ. नावांनी ईश्वराला संबोधित केले आहे आणि अशी प्रार्थना केली आहे की, हे ईश्वरा, तुझे जे उत्तम कल्याणकारक रूप मी पाहिन, ज्या तुझ्या परमरूपाचे मी ध्यान करीन तो मीच आहे असा मला अनुभव येवो. ॥१६॥

वायुरनिलममृतमथेदं भस्मान्तóèशरीरम् । ॐ क्रतो स्मर कृतóèस्मर क्रतो स्मर कृतं स्मर ॥१७॥
अर्थ - प्राणापानादि वायू आणि सृष्टीतील वायू मिळून हे शरीर भस्म होऊन जावो पण आत्मरूपात अमरत्वच राहू दे. ह्या देहाचाही यज्ञ होऊ दे. हे यज्ञमय परमेश्वरा, माझे सर्व कर्म लक्षात घे आणि कर्माचा निवाडा करून मला अमृतमय अर्थात मुक्त कर. ॥१७॥

अग्ने नय सुपथा राये अस्मान् । विश्वानि देव वयुनानि विद्वान् युयोध्यस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठां । ते नम उक्तिं विधेम ॥१८॥
अर्थ - हे अग्ने, आम्हाला चांगल्या मार्गाने आणि जगातील सर्वोच्च असे धन किंवा संपदा म्हणजे परमेश्वराची भक्ती ती आम्हाला मिळो. हे देवा, तू ज्ञानी असून सर्व कर्मे जाणतोसच. जी आमच्या मार्गात अडथळा आणणारी पापे आहेत ती तू युद्ध करून नष्ट कर. आम्ही तुला वारंवार नमस्कार करतो. ॥१८॥
॥ शान्तिपाठ ॥
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
ॐ शान्तिः । शान्तिः । शान्तिः ॥