Wednesday 14 June 2017

वय...

पैलतीर दिसतोय तरी
प्रेम काही संपत नाही...

अजून तरी 'वय झाले'
असे काही वाटत नाही!


मुलं झाली, फुलं झाली,
पशु, पक्षी, पाने झाली...
माणसं आपली झाली,
परकी झाली, तरी
प्रेम काही सरत नाही...

अजून तरी 'वय झाले'
असे काही वाटत नाही!


कुरळ्या बटांवर,
गालावरच्या खळ्यांवर,
मलमली तारुण्यावर...
प्रेम करणं काही केल्या
सुटत नाही...

अजून तरी 'वय झाले'
असे काही वाटत नाही!


रातराणीच्या गंधावर,
दरवळणाऱ्या मोगऱ्यावर,
गुलाबाच्या कळीवर,
मनमोहक त्या चाफ्यावर...
बेधुंद होऊन बरसणं
काही थांबत नाही...

अजून तरी 'वय झाले'
असे काही वाटत नाही!


कथा कादंबऱ्यात रमणं,
कवितेवर मरणं,
हातात हात घालून
चांदण्यात फिरणं,
तिच्याशिवाय रुचत नाही...

अजून तरी 'वय झाले'
असे काही वाटत नाही!


मोगरा केसात माळताना
तिच्यात गुंतणं काही
टळत नाही...
कोरडं कोरडं जगणं
मनाला काही पटत नाही...

अजून तरी 'वय झाले'
असे काही वाटत नाही!


बरसणाऱ्या सरीत
उफाळणारं प्रेम आवरत नाही...
तुझ्यामाझ्या मनातलं
प्रेम काही मिटत नाही...

अजून तरी 'वय झाले'
असे काही वाटत नाही!


तुझ्या शिवाय राहणे
थोडे म्हणून जमत नाही...
गंधाबरोबर फुलांचं,
डोळ्यांबरोबर अश्रूंचं
नातं काही तुटत नाही...

अजून तरी 'वय झाले'
असे काही वाटत नाही!


कितीही लुटले प्रेम तरी
प्रेम काही आटत नाही...

अजून तरी 'वय झाले'
असे काही वाटत नाही!

अजून तरी 'वय झाले'
असे काही वाटत नाही!!!

No comments:

Post a Comment