Tuesday 28 February 2017

दासबोध/दशक आठवा - मायोद्भवाचा

॥ श्रीरामसमर्थ ॥ ॥ श्रीमत् दासबोध ॥ दशक आठवा : मायोद्भव समास पहिला : देवदर्शन ॥ श्रीराम ॥ श्रोतीं व्हावें सावध । विमळ ज्ञान बाळबोध । गुरुशिष्यांचा संवाद । अति सुगम परियेसा ॥ १ ॥ नाना शास्त्रें धांडोळितां । आयुष्य पुरेना सर्वथा । अंतरी संशयाची वेथा । वाढोंचि लागे ॥ २ ॥ नाना तिर्थें थोरथोरें । सृष्टिमध्यें अपारें । सुगमें दुर्गमें दुष्करें । पुण्यदायकें ॥ ३ ॥ ऐसीं तीर्थें सर्वहि करी । ऐसा कोण रे संसारी । फिरों जातां जन्मवरी । आयुष्य पुरेना ॥ ४ ॥ नाना तपें नाना दानें । नाना योग नाना साधनें । हें सर्वहि देवाकारणें । करिजेत आहे ॥ ५ ॥ पावावया देवाधिदेवा । बहुविध श्रम करावा । तेणें देव ठाईं पाडावा । हें सर्वमत ॥ ६ ॥ पावावया भगवंतातें । नाना पंथ नाना मतें । तया देवाचें स्वरूप तें । कैसे आहें ॥ ७ ॥ बहुत देव सृष्टीवरी । त्यांची गनना कोण करी । येक देव कोणेपरी । ठाईं पडेना ॥ ८ ॥ बहुविध उपासना । ज्याची जेथें पुरे कामना । तो तेथेंचि राहिला मना । सदृढ करूनि ॥ ९ ॥ बहु देव बहु भक्त । इच्ह्या जाले आसक्त । बहु ऋषी बहु मत । वेगळालें ॥ १० ॥ बहु निवडितां निवडेना । येक निश्चय घडेना । शास्त्रें भांडती पडेना । निश्चय ठाईं ॥ ११ ॥ बहुत शास्त्रीं बहुत भेद । मतांमतांस विरोध । ऐसा करितां वेवाद । बहुत गेले ॥ १२ ॥ सहस्त्रामधें कोणी येक । पाहे देवाचा विवेक । परी त्या देवाचें कौतुक । ठाईं न पडे ॥ १३ ॥ थाईं न पडे कैसें म्हणतां । तेथें लागली अहंता । देव राहिला परता । अहंतागुणें ॥ १४ ॥ आतां असो हें बोलणें । नाना योग ज्याकारणें । तो देव कोण्या गुणें । ठाईं पडे ॥ १५ ॥ देव कोणासी म्हणावें । कैसें तयासी जाणावें । तेंचि बोलणें स्वभावें । बोलिजेल ॥ १६ ॥ जेणें केले चराचर । केले सृष्ट्यादि व्यापार । सर्वकर्ता निरंतर । नाम ज्याचें ॥ १७ ॥ तेणें केल्या मेघमाळा । चंद्रबिंबीं अमृतकळा । तेज दिधलें रविमंडळा । जया देवें ॥ १८ ॥ ज्याची मर्यादा सागरा । जेणें स्थापिलें फणिवरा । जयाचेनि गुणें तारा । अंतरिक्ष ॥ १९ ॥ च्यारी खाणी च्यारी वाणी । चौर्यासि लक्ष जीवयोनी । जेणें निर्मिले लोक तिनी । तया नाव देव ॥ २० ॥ ब्रह्मा विष्णु आणी हर । हे जयाचे अवतार । तोचि देव हा निर्धार । निश्चयेंसीं ॥ २१ ॥ देव्हाराचा उठोनि देव । करूं नेणे सर्व जीव । तयाचेनि ब्रह्मकटाव । निर्मिला न वचे ॥ २२ ॥ ठाईं ठाईं देव असती । तेहिं केली नाहीं क्षिती । चंद्र सूर्य तारा जीमूती । तयांचेनि नव्हे ॥ २३ ॥ सर्वकर्ता तोचि देव । पाहों जातां निरावेव । ज्याची कळा लीळा लाघव । नेणती ब्रह्मादिक ॥ २४ ॥ येथें आशंका उठिली । ते पुढिलीये समासीं फीटली । आतां वृत्ती सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ २५ ॥ पैस अवकाश आकाश । कांहींच नाहीं जें भकास । तये निर्मळीं वायोस । जन्म जाला ॥ २६ ॥ वायोपासून जाला वन्ही । वन्हीपासुनी जालें पाणी । ऐसी जयाची करणी । अघटित घडली ॥ २७ ॥ उदकापासून सृष्टि जाली । स्तंभेविण उभारली । ऐसी विचित्र कळा केली । त्या नाव देव ॥ २८ ॥ देवें निर्मिली हे क्षिती । तीचे पोटीं पाषाण होती । तयासचि देव म्हणती । विवेकहीन ॥ २९ ॥ जो सृष्टिनिर्माणकर्ता । तो ये सृष्टीपुर्वीं होता । मग हे तयाची सत्ता । निर्माण जाली ॥ ३० ॥ कुल्लाळ पात्रापुर्वीं आहे । पात्रें कांहीं कुल्लाळ नव्हे । तैसा देव पूर्वींच आहे । पाषाण नव्हे सर्वथा ॥ ३१ ॥ मृत्तिकेचें शैन्य केलें । कर्ते वेगळे राहिले । कार्यकारण येक केलें । तरी होणार नाहीं ॥ ३२ ॥ तथापि होईल पंचभूतिक । निर्गुण नव्हे कांहीं येक । कार्याकारणाचा विवेक । भूतांपरता नाहीं ॥ ३३ ॥ अवघी सृष्टि जो कर्ता । तो ते सृष्टीहूनि पर्ता । तेथें संशयाची वार्ता । काढूंचि नये ॥ ३४ ॥ खांसूत्रींची बाहुली । जेणें पुरुषें नाचविली । तोचि बाहुली हे बोली । घडे केवी ॥ ३५ ॥ च्हयामंडपीची सेना । सृष्टिसारिखीच रचना । सूत्रें चाळी परी तो नाना । वेक्ति नव्हे ॥ ३६ ॥ तैसा सृष्टिकर्ता देव । परी तो नव्हे सृष्टिभाव । जेणें केले नाना जीव । तो जीव कैसेनी ॥ ३७ ॥ जें जें जया करणें पडे । तें तें तो हें कैसें घडे । म्हणोनि वायांचि बापुडे । संदेहीं पडती ॥ ३८ ॥ सृष्टि ऐसेंचि स्वभावें । गोपुर निर्मिलें बरवें । परी तो गोपुर कर्ता नव्हे । निश्चयेसीं ॥ ३९ ॥ तैसें जग निर्मिलें जेणें । तो वेगळा पूर्णपणें । येक म्हणती मूर्खपणें । जग तोचि जगदीश ॥ ४० ॥ एवं जगदीश तो वेगळा । जग निर्माण त्याची कळा । तो सर्वांमधें परी निराळा । असोन सर्वीं ॥ ४१ ॥ म्हणोनि भूतांचा कर्दमु । यासी अलिप्त आत्मारामु । अविद्यागुणें मायाभ्रमु । सत्यचि वाटे ॥४२ ॥ मायोपाधी जगडंबर । आहे सर्वहि साचार । ऐसा हा विपरीत विचार । कोठेंचि नाहीं ॥ ४३ ॥ म्हणोनि जग मिथ्या साच आत्मा । सर्वांपर जो परमात्मा । अंतर्बाह्य अंतरात्मा । व्यापूनि असे ॥ ४४ ॥ तयास म्हणावें देव । येर हें अवघेंचि वाव । ऐसा आहे अंतर्भाव । वेदांतीचा ॥ ४५ ॥ पदार्थवस्तु नासिवंत । हें तों अनुभवास येत । याकारणें भगवंत । पदार्थावेगळा ॥ ४६ ॥ देव विमळ आणी अचळ । शास्त्रें बोलती सकळ । तया निश्चळास चंचळ । म्हणों नये सर्वथा ॥ ४७ ॥ देव आला देव गेला । देव उपजला देव मेला । ऐसें बोलतां दुरिताला । काय उणें ॥ ४८ ॥ जन्म मरणाची वार्ता । देवास लागेना सर्वथा । देव अमर ज्याची सत्ता । त्यासी मृत्यु कैसेनी ॥ ४९ ॥ उपजणें आणी मरणें । येणें जाणें दुःख भोगणें । हें त्या देवाचें करणें । तो कारण वेगळा ॥ ५० ॥ अंतःकरण पंचप्राण । बहुतत्वीं पिंडज्ञान । यां सर्वांस आहे चळण । म्हणोनि देव नव्हेती ॥ ५१ ॥ येवं कल्पनेरहित । तया नाव भगवंत । देवपणाची मात । तेथें नाहीं ॥ ५२ ॥ तव शिष्यें आक्षेपिलें । तरी कैसें ब्रह्मांड केलें । कर्तेपण कारण पडिलें । कार्यामधें ॥ ५३ ॥ द्रष्टेपणें द्रष्टा दृश्यीं । जैसा पडे अनायांसीं । कर्तेपणे निर्गुणासी । गुण तैसे ॥ ५४ ॥ ब्रह्मांडकर्ता कवण । कैसी त्याची वोळखण । देव सगुण किं निर्गुण । मह निरोपावा ॥ ५५ ॥ येक म्हणती त्या ब्रह्मातें । इच्ह्यामात्रें सृष्टिकर्ते । सृष्टिकर्ते त्यापर्तें । कोण आहे ॥ ५६ ॥ आतां असो हे बहु बोली । सकळ माया कोठून जाली । ते हे आतां निरोपिली । पाहिजे स्वामी ॥ ५७ ॥ ऐसें ऐकोनि वचन । वक्ता म्हणे सावधान । पुढिले समासीं निरूपण । सांगिजेल ॥ ५८ ॥ ब्रह्मीं माया कैसी जाली । पुढें असे निरोपिली । श्रोतीं वृत्ति सावध केली । पाहिजे आतां ॥५९ ॥ पुढें हेंचि निरूपण । विशद केलें श्रवण । जेणें होय समाधान । साधकांचें ॥ ६० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देवदर्शननाम समास पहिला ॥ १ ॥

समास दुसरा : सूक्ष्मआशंकानिरूपण ॥ श्रीराम ॥ मागां श्रोतीं आक्षेपिलें । तें पाहिजे निरोपिलें । निरावेवीं कैसें जालें । चराचर ॥ १ ॥ याचें ऐसें प्रतिवचन । ब्रह्म जें कां सनातन । तेथें माया मिथ्याभान । विवर्तरूप भावे ॥ २ ॥ आदि येक परब्रह्म । नित्यमुक्त अक्रिय परम । तेथें अव्याकृत सूक्ष्म । जाली मूळमाया ॥ ३ ॥ ॥ श्लोक ॥ आद्यमेकं परब्रह्म नित्यमुक्तमविक्रियम् । तस्य माया समावेशो जीवमव्याकृतात्मकम् ॥ आशंका ॥ येक ब्रह्मा निराकार । मुक्त अक्रिये निर्विकार । तेथें माया वोडंबर । कोठून आली ॥ ४ ॥ ब्रह्म अखंड निर्गुण । तेथें इच्हा धरी कोण । निर्गुणीं सगुणेंविण । इच्हा नाहीं ॥ ॥ ५ ॥ मुळीं असेचिना सगुण । म्हणौनि नामें निर्गुण । तेथें जालें सगुण । कोणेपरी ॥ ६ ॥ निर्गुणचि गुणा आलें । ऐसें जरी अनुवादलें । लागों पाहे येणें बोलें । मूर्खपण ॥ ७ ॥ येक म्हणती निरावेव । करून अकर्ता तो देव । त्याची लीळा बापुडे जीव । काये जाणती ॥ ८ ॥ येक म्हणती तो परमात्मा । कोण जाणे त्याचा महिमा । प्राणी बापुडा जीवात्मा । काये जाणे ॥ ९ ॥ उगाच महिमा सांगती । शास्त्रार्थ अवघा लोपिती । बळेंचि निर्गुणास म्हणती । करूनि अकर्ता ॥ १० ॥ मुळीं नाहीं कर्तव्यता । कोण करून अकर्ता । कर्ता अकर्ता हे वार्ता । समूळ मिथ्या ॥ ११ ॥ जें ठाईंचें निर्गुण । तेथें कैचें कर्तेपण । तरी हे इच्हा धरी कोण । सृष्टिरचाव्याची ॥ १२ ॥ इच्हा परमेश्वराची । ऐसी युक्ती बहुतेकांची । परी त्या निर्गुणास इच्हा कैंची । हें कळेना ॥ १३ ॥ तरी हे इतुकें कोणें केलें । किंवा आपणचि जालें । देवेंविण उभारलें । कोणेपरी ॥ १४ ॥ देवेंविण जालें सर्व । मग देवास कैंचा ठाव । येथें देवाचा अभाव । दिसोन आला ॥ १५ ॥ देव म्हणे सृष्टिकर्ता । तरी येवं पाहे सगुणता । निर्गुणपणाची वार्ता । देवाची बुडाली ॥ १६ ॥ देव ठाईंचा निर्गुण । तरी सृष्टिकर्ता कोण । कर्तेपणाचें सगुण । नासिवंत ॥ १७ ॥ येथें पडिले विचार । कैसें जालें सचराचर । माया म्हणों स्वतंतर तरी हेंहि विपरीत दिसे ॥ १८ ॥ माया कोणीं नाहीं केली । हे आपणचि विस्तारली । ऐसें बोलतां बुडाली । देवाची वार्ता ॥ १९ ॥ देव निर्गुण स्वतसिद्ध । त्यासी मायेसि काये समंध । ऐसें बोलतां विरुद्ध । दिसोन आलें ॥ २० ॥ सकळ कांहीं कर्तव्यता । आली मायेच्याचि माथां तरी भक्तांस उद्धरिता । देव नाहीं कीं ॥ २१ ॥ देवेंविण नुस्ती माया । कोण नेईल विलया । आम्हां भक्तां सांभाळाया । कोणीच नाहीं ॥ २२ ॥ म्हणोनि माया स्वतंतर । ऐसा न घडे कीं विचार । मायेस निर्मिता सर्वेश्वर । तो येकचि आहे ॥ २३ ॥ तरी तो कैसा आहे ईश्वर । मायेचा कैसा विचार । तरी हें आतां सविस्तर । बोलिलें पाहिजे ॥ २४ ॥ श्रोतां व्हावें सावधान । येकाग्र करूनियां मन । आतां कथानुसंधान । सावध ऐका ॥ २५ ॥ येके आशंकेचा भाव । जनीं वेगळाले अनुभव । तेहि बोलिजेती सर्व । येथानुक्रमें ॥ २६ ॥ येक म्हणती देवें केली । म्हणोनि हे विस्तारली । देवास इच्ह्या नस्ती जाली । तरी हे माया कैंची ॥ २७ ॥ येक म्हणती देव निर्गुण । तेथें इच्हा करी कोण । माया मिथ्या हे आपण । जालीच नाही ॥ २८ ॥ येक म्हणती प्रत्यक्ष दिसे । तयेसी नाहीं म्हणतां कैसें । माया हे अनादि असे । शक्ती ईश्वराची ॥ २९ ॥ येक म्हणती साच असे । तरी हे ज्ञानें कैसी निरसे । साचासारिखीच दिसे । परी हे मिथ्या ॥ ३० ॥ येक म्हणती मिथ्या स्वभावें । तरी साधन कासया करावें । भक्तिसाधन बोलिलें देवें । मायात्यागाकारणें ॥ ३१ ॥ येक म्हणती मिथ्या दिसतें । भयें अज्ञानसन्येपातें । साधन औषधही घेईजेतें । परी तें दृश्य मिथ्या ॥ ३२ ॥ अनंत साधनें बोलिलीं । नाना मतें भांबावलीं । तरी माया न वचे त्यागिली । मिथ्या कैसी म्हणावी ॥ ३३ ॥ मिथ्या बोले योगवाणी । मिथ्या वेदशास्त्रीं पुराणीं । मिथ्या नाना निरूपणीं । बोलिली माया ॥ ३४ ॥ माया मिथ्या म्हणतां गेली । हे वार्ता नाहीं ऐकिली । मिथ्या म्हणतांच लागली । समागमें ॥ ३५ ॥ जयाचे अंतरीं ज्ञान । नाहीं वोळखिले सज्जन । तयास मिथ्याभिमान । सत्यचि वाटे ॥ ३६ ॥ जेणें जैसा निश्चये केला । तयासी तैसाचि फळला । पाहे तोचि दिसे बिंबला । तैसी माया ॥ ३७ ॥ येक म्हणती माया कैंची । आहे ते सर्व ब्रह्मचि । थिजल्या विघुरल्या घृताची । ऐक्यता न मोडे ॥ ३८ ॥ थिजलें आणी विघुरलें । हें स्वरूपीं नाहीं बोलिलें । साहित्य भंगलें येणें बोलें । म्हणती येक ॥ ३९ ॥ येक म्हणती सर्व ब्रह्म । हें न कळे जयास वर्म । तयाचें अंतरींचा भ्रम । गेलाच नाहीं ॥ ४० ॥ येक म्हणती येकचि देव । तेथें कैंचें आणिलें सर्व । सर्व ब्रह्म हें अपूर्व । आश्चिर्य वाटे ॥ ४१ ॥ येक म्हणती येकचि खरें । आनुहि नाहीं दुसरें । सर्व ब्रह्म येणें प्रकारें । सहजचि जालें ॥ ४२ ॥ सर्व मिथ्या येकसरें । उरलें तेंचि ब्रह्म खरें । ऐसीं वाक्यें शास्त्राधारें । बोलती येक ॥ ४३ ॥ आळंकार आणी सुवर्ण । तेथें नाहीं भिन्नपण । आटाआटी वेर्थ सीण । म्हणती येक ॥ ४४ ॥ हीन उपमा येकदेसी । कैसी साहेल वस्तूसी । वर्णवेक्ती अव्यक्तासी । साम्यता न घडे ॥ ४५ ॥ सुवर्णीं दृष्टी घालितां । मुळीच आहे वेक्तता । आळंकार सोनें पाहतां सोनेंचि असे ॥ ४६ ॥ मुळीं सोनेंचि हें वेक्त । जड येकदेसी पीत । पूर्णास अपूर्णाचा दृष्टांत । केवीं घडे ॥ ४७ ॥ दृष्टांत तितुका येकदेसी । देणें घडे कळायासी । सिंधु आणी लहरीसी । भिन्नत्व कैंचें ॥ ४८ ॥ उत्तम मधेम कनिष्ठ । येका दृष्टांतें कळे पष्ट । येका दृष्टांतें नष्ट । संदेह वाढे ॥ ४९ ॥ कैंचा सिंधु कैंची लहरी । अचळास चळाची सरी । साचा ऐसी वोडंबरी । मानूंच नये ॥ ५० ॥ वोडंबरी हे कल्पना । नाना भास दाखवी जना । येरवी हे जाणा । ब्रह्मचि असे ॥ ५१ ॥ ऐसा वाद येकमेकां । लागतां राहिली आशंका । तेचि आतां पुढें ऐका । सावध होऊनी ॥ ५२ ॥ माया मिथ्या कळों आली । परी ते ब्रह्मीं कैसी जाली । म्हणावी ते निर्गुणें केली । तरी ते मुळींच मिथ्या ॥ ५३ ॥ मिथ्या शब्दीं कांहींच नाहीं । तेथें केलें कोणें काई । करणें निर्गुणाचा ठाईं । हेंहि अघटित ॥ ५४ ॥ कर्ता ठांईचा अरूप । केलें तेंहि मिथ्यारूप । तथापी फेडूं आक्षेप । श्रोतयांचा ॥ ५५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सूक्ष्मआशंकानिरूपण समास दुसरा ॥ २ ॥

समास तिसरा : सूक्ष्मआशंकानिरूपण ॥ श्रीराम ॥ अरे जे जालेंचि नाहीं । त्याची वार्ता पुससी काई । तथापि सांगों जेणें कांहीं । संशय नुरे ॥ १ ॥ दोरीकरितां भुजंग । जळाकरितां तरंग । मार्तंडाकरितां चांग । मृगजळ वाहे ॥ २ ॥ कल्पेनिकरितां स्वप्न दिसे । सिंपीकरितां रुपें भासे । जळाकरितां गार वसे । निमिष्य येक ॥ ३ ॥ मातीकरितां भिंती जाली । सिन्धुकरितां लहरी आली । तिळाकरितां पुतळी । दिसों लागे ॥ ४ ॥ सोन्याकरितां अळंकार । तंतुकरितां जालें चीर । कासवाकरितां विस्तार । हातापायांचा ॥ ५ ॥ तूप होतें तरी थिजलें । तरीकरितां मीठ जालें । बिंबाकरितां बिंबलें । प्रतिबिंब ॥ ६ ॥ पृथ्वीकरितां जालें झाड । झाडाकरितां च्ह्याया वाड । धातुकरितां पवाड । उंच नीच वर्णाचा ॥ ७ ॥ आतां असो हा दृष्टांत । अद्वैतास कैंचें द्वैत । द्वैतेंविण अद्वैत । बोलतांच न ये ॥ ८ ॥ भासाकरितां भास भासे । दृश्याकरितां अदृश्य दिसे । अदृश्यास उपमा नसे । म्हणोनि निरोपम ॥ ९ ॥ कल्पेनेविरहित हेत । दृश्यावेगळा दृष्टांत । द्वैतावेगळें द्वैत । कैसें जालें ॥ १० ॥ विचित्र भगवंताची करणी । वर्णवेना सहस्त्रफणी । तेणें केली उभवणी । अनंत ब्रह्मांडाची ॥ ११ ॥ परमात्मा परमेश्वरु । सर्वकर्ता जो ईश्वरू । तयापासूनि विस्तारु । सकळ जाला ॥ १२ ॥ ऐसीं अनंत नामें धरी । अनंत शक्ती निर्माण करी । तोचि जाणावा चतुरीं । मूळपुरुष ॥ १३ ॥ त्या मूळपुरुषाची वोळखण । ते मूळमायाचि आपण । सकळ कांहीं कर्तेपण । तेथेंचि आलें ॥ १४ ॥ ॥ श्लोक ॥ कार्यकारण कर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते ॥ हे उघड बोलतां न ये । मोडों पाहातो उपाये । येरवीं हें पाहतां काय । साच आहे ॥ १५ ॥ देवापासून सकळ जालें । हें सर्वांस मानलें । परी त्या देवास वोळखिलें । पाहिजे कीं ॥ १६ ॥ सिद्धांचे जें निरूपण । जें साधकांस न मने जाण । पक्व नाहीं अंतःकर्ण । म्हणोनियां ॥ १७ ॥ अविद्यागुणें बोलिजे जीव । मायागुणें बोलिजे शिव । मूळमाया गुणें देव । बोलिजेतो ॥ १८ ॥ म्हणौनि कारण मूळमाया । अनंत शक्ती धरावया । तेथीचा अर्थ जाणावया । अनुभवी पाहिजे ॥ १९ ॥ मूळमाया तोचि मूळपुरुष । तोचि सर्वांचा ईश । अनंतनामी जगदीश । तयासीचि बोलिजे ॥ २० ॥ अवघी माया विस्तारली । परी हे निशेष नाथिली । ऐसिया वचनाची खोली । विरुळा जाणे ॥ २१ ॥ ऐसें अनुर्वाच्य बोलिजे । परी हें स्वानुभवें जाणिजे । संतसंगेविण नुमजे । कांही केल्यां ॥ २२ ॥ माया तोचि मूळपुरुष । साधकां न मने हें निशेष । परी अनंतनामी जगदीश । कोणास म्हणावें ॥ २३ ॥ नामरूप माये लागलें । तरी हें बोलणें नीटचि जालें । येथें श्रोतीं अनुमानिलें । कासयासी ॥ २४ ॥ आतां असो हे सकळ बोली । मागील आशंका राहिली । निराकारीं कैसी जाली । मूळमाया ॥ २५ ॥ दृष्टीबंधन मिथ्या सकळ । परी तो कैसा जाला खेळ । हेंचि आतां अवघें निवळ । करून दाऊं ॥ २६ ॥ आकाश असतां निश्चळ । मधें वायो जाला चंचळ । तैसी जाणावी केवळ । मूळमाया ॥ २७ ॥ रूप वायोचें जालें । तेणें आकाश भंगलें । ऐसें हें सत्य मानलें । नवचे किं कदा ॥ २८ ॥ तैसी मूळमाया जाली । आणी निर्गुणता संचली । येणें दृष्टांतें तुटली । मागील आशंका ॥ २९ ॥ वायु नव्हता पुरातन । तैसी मूळमाया जाण । साच म्हणतां पुन्हा लीन । होतसे ॥ ३० ॥ वायो रूपें कैसा आहे । तैसी मूळमाया पाहें । भासे परी तें न लाहे । रूप तयेचें ॥ ३१ ॥ वायो सत्य म्हणो जातां । परी तो न ये दाखवितां । तयाकडे पाहों जातां । धुळीच दिसे ॥ ३२ ॥ तैसी मूळमाया भासे । भासी परी ते न दिसे । पुढें विस्तारली असे । माया अविद्या ॥ ३३ ॥ जैसें वायोचेनि योगें । दृश्य उडे गगनमार्गें । मूळमायेच्या संयोगें । तैसें जग ॥ ३४ ॥ गगनीं आभाळ नाथिलें । अकस्मात उद्भवलें । मायेचेनि गुणें जालें । तैसें जग ॥ ३५ ॥ नाथिलेंचि गगन नव्हतें । अकस्मात आलें तेथें । तैसें दृश्य जालें येथें । तैसियापरी ॥ ३६ ॥ परी त्या आभाळाकरितां । गगनाची गेली निश्चळता । वाटे परी ते तत्वता । तैसीच आहे ॥ ३७ ॥ तैसें मायेकरितां निर्गुण । वाटे जालें सगुण । परी तें पाहतां संपूर्ण । जैसें तैसें ॥ ३८ ॥ आभाळ आले आणि गेलें । तरी गगन तें संचलें । तैसें गुणा नाहीं आलें । निर्गुण ब्रह्म ॥ ३९ ॥ नभ माथा लागलें दिसे । परी तें जैसें तैसें असे । तैसें जाणावें विश्वासें । निर्गुण ब्रह्म ॥ ४० ॥ ऊर्ध पाहातां आकाश । निळिमा दिसे सावकास । परि तो जाणिजे मिथ्याभास । भासलासे ॥ ४१ ॥ आकाश पालथें घातलें । चहूंकडे आटोपलें । वाटे विश्वास कोंडिले । परी तें मोकळेचि असे ॥ ४२ ॥ पर्वतीं निळा रंग दिसे । परी तो तया लागला नसे । अलिप्त जाणावे तैसें । निर्गुण ब्रह्म ॥ ४३ ॥ रथ धावतां पृथ्वी चंचळ । वाटे परी ते असे निश्चळ । तैसें परब्रह्म केवळ । निर्गुण जाणावें ॥ ४४ ॥ आभाळाकरितां मयंक । वाटे धावतो निशंक । परी तें अवघें माईक । आभाळ चळे ॥ ४५ ॥ झळे अथवा अग्निज्वाळ । तेणें कंपित दिसे अंत्राळ । वाटे परी तें निश्चळ । जैसें तैसें ॥ ४६ ॥ तैसें स्वरूप हें संचलें । असतां वाटे गुणा आलें । ऐसें कल्पनेसि गमलें । परी ते मिथ्या ॥ ४७ ॥ दृष्टिबंधनाचा खेळ । तैसी माया हे चंचळ । वस्तु शाश्वत निश्चळ । जैसी तैसी ॥ ४८ ॥ ऐसी वस्तु निरावेव । माया दाखवी अवेव । ईचा ऐसा स्वभाव । नाथिलीच हे ॥ ४९ ॥ माया पाहातां मुळीं नसे । परी हे साचा ऐसी भासे । उद्भवे आणि निरसे । आभाळ जैसें ॥ ५० ॥ ऐसी माया उद्भवली । वस्तु निर्गुण संचली । अहं ऐसी स्फुर्ति जाली । तेचि माया ॥ ५१ ॥ गुणमायेचे पवाडे । निर्गुणीं हें कांहींच न घडे । परी हें घडे आणी मोडे । सस्वरूपीं ॥ ५२ ॥ जैसी दृष्टी तरळली । तेणें सेनाच भासली । पाहातां आकाशींच जाली । परी ते मिथ्या ॥ ५३ ॥ मिथ्या मायेचा खेळ । उद्भव बोलिला सकळ । नानातत्वांचा पाल्हाळ । सांडूनियां ॥ ५४ ॥ तत्वें मुळींच आहेती । वोंकार वायोची गती । तेथीचा अर्थ जाणती । दक्ष ज्ञानी ॥ ५५ ॥ मूळमायेचे चळण । तेंचि वायोचें लक्षण । सूक्ष्म तत्वें तेंचि जाण । जडत्वा पावलीं ॥ ५६ ॥ ऐसीं पंचमाहांभूतें । पूर्वीं होती अवेक्तें । पुढें जालीं वेक्तें । सृष्टिरचनेसी ॥ ५७ ॥ मूळमायेचें लक्षण । तेंचि पंचभूतिक जाण । त्याची पाहें वोळखण । सूक्ष्मदृष्टीं ॥ ५८ ॥ आकाश वायोविण । इच्ह्याशब्द करी कोण । इच्हाशक्ती तेचि जाण । तेजस्वरूप ॥ ५९ ॥ मृदपण तेचि जळ । जडत्व पृथ्वी केवळ । ऐसी मूळमाया सकळ । पंचभूतिक जाणावी ॥ ६० ॥ येक येक भूतांपोटीं । पंचभूतांची राहाटी । सर्व कळे सूक्ष्मदृष्टी । घालून पाहातां ॥ ६१ ॥ पुढें जडत्वास आलीं । तरी असतीं कालवलीं । ऐसी माया विस्तारली । पंचभूतिक ॥ ६२ ॥ मूळमाया पाहातां मुळीं । अथवा अविद्या भूमंडळीं । स्वर्ग्य मृत्य पाताळीं । पांचचि भूतें ॥ ६३ ॥ ॥ श्लोक ॥ स्वर्गे मृत्यौ पाताले वा यत्किंचित्सचराचरं । सर्वपंचभूतकं राम षष्ठें किंचिन्न दृश्यते ॥ सत्य स्वरूप आदिअंतीं । मध्यें पंचभूतें वर्तती । पंचभूतिक जाणिजे श्रोतीं । मूळमाया ॥ ६४ ॥ येथें उठिली आशंका । सावध होऊन ऐका । पंचभूतें जालीं येका । तमोगुणापासुनी ॥ ६५ ॥ मूळमाया गुणापरती । तेथें भूतें कैंचि होतीं । ऐसी आशंका हे श्रोतीं । घेतली असे ॥ ६६ ॥ ऐसें श्रोतीं आक्षेपिलें । संशयास उभें केलें । याचें उत्तर दिधलें । पुढिले समासीं ॥ ६७ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सूक्ष्मआशंकानाम समास तिसरा ॥ ३ ॥

समास चवथा : सूक्ष्मपंचभूतेंनिरूपण ॥ श्रीराम ॥ मागील आशंकेचें मूळ । आतां होईल प्रांजळ । वृत्ति करावी निवळ । निमिष्य येक ॥ १ ॥ ब्रह्मीं मूळमाया जाली । तिच्या पोटा माया आली । मग ते गुणा प्रसवली । म्हणौनि गुणक्षोभिणी ॥ २ ॥ पुढें तिजपासाव कोण । सत्वरजतमोगुण । तमोगुणापासून निर्माण । जाली पंचभूतें ॥ ३ ॥ ऐसीं भूतें उद्भवलीं । पुढें तत्वें विस्तारलीं । एवं तमोगुणापासून जालीं । पंचमाहांभूतें ॥ ४ ॥ मूळमाया गुणापरती । तेथें भूतें कैंचीं होतीं । ऐसी आशंका हे श्रोतीं । घेतली मागां ॥ ५ ॥ आणिक येक येके भूतीं । पंचभूतें असती । ते हि आतां कैसी स्थिती । प्रांजळ करूं ॥ ६ ॥ सूक्ष्मदृष्टीचें कौतुक । मूळमाया पंचभूतिक । श्रोतीं विमळ विवेक । केला पाहिजे ॥ ७ ॥ आधीं भूतें तीं जाणावीं । रूपें कैसीं वोळखावी । मग तें शोधून पाहावीं । सूक्ष्मदृष्टीं ॥ ८ ॥ वोळखी नाही अंतरी । ते वोळखावी कोणेपरी । म्हणोनि भूतांची वोळखी चतुरीं । नावेक परिसावी ॥ ९ ॥ जें जें जड आणी कठिण । तें तें पृथ्वीचें लक्षण । मृद आणी वोलेपण । तितुकें आप ॥ १० ॥ जें जें उष्ण आणी सतेज । तें तें जाणावें पैं तेज । आतां वायोहि सहज । निरोपिजेल ॥ ११ ॥ चैतन्य आणी चंचळ । तो हा वायोचि केवळ । सून्य आकाश निश्चळ । आकाश जाणावें ॥ १२ ॥ ऐसीं पंचमाहांभूतें । वोळखी धरावी संकेतें । आतां येकीं पांच भूतें । सावध ऐका ॥ १३ ॥ जें त्रिगुणाहूनि पर । त्याचा सूक्ष्म विचार । यालागीं अति तत्पर । होऊन ऐका ॥ १४ ॥ सूक्ष्म आकाशीं कैसी पृथ्वी । तेचि आधीं निरोपावी । येथें धारणा धरावी । श्रोतेजनीं ॥ १५ ॥ आकाश म्हणजे अवकाश सून्य । सून्य म्हणिजे तें अज्ञान । अज्ञान म्हणिजे जडत्व जाण । तेचि पृथ्वी ॥ १६ ॥ आकाश स्वयें आहे मृद । तेंचि आप स्वतसिद्ध । आतां तेज तेंहि विशद । करून दाऊं ॥ १७ ॥ अज्ञानें भासला भास । तोचि तेजाचा प्रकाश । आतां वायो सावकाश । साकल्य सांगों ॥ १८ ॥ वायु आकाश नाहीं भेद । आकाशाइतुका असे स्तब्ध । तथापी आकाशीं जो निरोध । तोचि वायो ॥ १९ ॥ आकाशीं आकाश मिसळलें । हें तों नलगे किं बोलिलें । येणें प्रकारें निरोपिलें । आकाश् पंचभूत ॥ २० ॥ वायोमध्यें पंचभूतें । तेंहि ऐका येकचित्तें । बोलिजेती ते समस्तें । येथान्वयें ॥ २१ ॥ हळु फूल तरी जड । हळु वारा तरी निबिड । वायो लागतां कडाड । मोडती झाडें ॥ २२ ॥ तोलेंविण झाड मोडे । ऐसें हें कहिंच न घडे । तोल तोचि तये जडे । पृथ्वीचा अंश ॥ २३ ॥ येथें श्रोते आशंका घेती । तेथें कैचीं झाडें होतीं । झाडें नव्हतीं तरी शक्ती । कठिणरूप आहे ॥ २४ ॥ वन्हीस्फुलींग लाहान । कांहीं तऱ्ही असे उष्ण । तैसें सुक्ष्मीं जडपण । सूक्ष्मरूपें ॥ २५ ॥ मृदपण तेंचि आप । भास तेजाचें स्वरूप । वायो तेथें चंचळरूप । सहजचि आहे ॥ २६ ॥ सकळांस मिळोन आकाश । सहजचि आहे अवकाश । पंचभूतांचे अंश । वायोमधें निरोपिले ॥ २७ ॥ आतां तेजाचें लक्षण । भासलेंपण तें कठीण । तेजीं ऐसी वोळखण । पृथ्वीयेची ॥ २८ ॥ भासला भास वाटे मृद । तेजीं आप तेचि प्रसिद्ध । तेजीं तेज स्वतसिद्ध । सांगणेंचि नलगे ॥ २९ ॥ तेजीं वायो तो चंचळ । तेजीं आकाश निश्चळ । तेजीं पंचभूतें सकळ । निरोपिलीं ॥ ३० ॥ आतां आपाचें लक्षण । आप तेंचि जें मृदपण । मृदपण तें कठिण । तेचि पृथ्वी ॥ ३१ ॥ आपीं आप सहजचि असे । तेज मृदपणें भासे । वायो स्तब्धपणें दिसे । मृदत्वाआंगी ॥ ३२ ॥ आकाश न लगे सांगावें । तें व्यापकचि स्वभावें । आपीं पंचभूतांचीं नांवें । सूक्ष्म निरोपिलीं ॥ ३३ ॥ आतां पृथ्वीचें लक्षण । कठीण पृथ्वी आपण । कठिणत्वीं मृदपण । तेंचि आप ॥ ३४ ॥ कठिणत्वाचा जो भास । तोचि तेजाचा प्रकाश । कठिणत्वीं निरोधांश । तोचि वायो ॥ ३५ ॥ आकश सकळांस व्यापक । हा तों प्रगटचि विवेक । आकाशींच कांहीं येक । भास भासे ॥ ३६ ॥ आकाश तोडितां तुटेना । आकाश फोडितां फुटेना । आकाश परतें होयेना । तिळमात्र ॥ ३७ ॥ असो आतां पृथ्वीअंत । दाविला भूतांचा संकेत । येक भूतीं पंचभूत । तेंहि निरोपिलें ॥ ३८ ॥ परी हें आहाच पाहातां नातुडे । बळेंचि पोटीं संदेह पडे । भ्रांतिरूपें अहंता चढे । अकस्मात ॥ ३९ ॥ सूक्ष्मदृष्टीनें पाहातां । वायोचि वाटे तत्वता । सूक्ष्म वायो शोधूं जातां । पंचभूतें दिसती ॥ ४० ॥ एवं पंचभूतिक पवन । तेचि मूळमाया जाण । माया आणी सूक्ष्म त्रिगुण । तेहि पंचभूतिक ॥ ४१ ॥ भूतें गुण मेळविजे । त्यासी अष्टधा बोलिजे । पंचभूतिक जाणिजे । अष्टधा प्रकृति ॥ ४२ ॥ शोधून पाहिल्यावीण । संदेह धरणें मूर्खपण । याची पाहावी वोळखण । सूक्ष्मदृष्टीं ॥ ४३ ॥ गुणापासूनि भूतें । पावलीं पष्ट दशेतें । जडत्वा येऊन समस्तें । तत्वें जालीं ॥ ४४ ॥ पुढें तत्वविवंचना । पिंडब्रह्मांड तत्वरचना । बोलिली असे ते जना । प्रगटचि आहे ॥ ४५ ॥ हा भूतकर्दम बोलिला । सूक्ष्म संकेतें दाविला । ब्रह्मगोळ उभारला । तत्पूर्वीं ॥ ४६ ॥ या ब्रह्मांडापैलिकडिल गोष्टी । जैं जाली नव्हती सृष्टी । मूळमाया सूक्ष्मदृष्टीं । वोळखावी ॥ ४७ ॥ सप्तकंचुक प्रचंड । जालें नव्हतें ब्रह्मांड । मायेअविद्येचें बंड । ऐलिकडे ॥ ४८ ॥ ब्रह्मा विष्णु महेश्वर । हा ऐलिकडिल विचार । पृथ्वी मेरु सप्त सागर । ऐलिकडे ॥ ४९ ॥ नाना लोक नाना स्थानें । चन्द्र सूर्य तारांगणें । सप्त द्वीपें चौदा भुवनें । ऐलिकडे ॥ ५० ॥ शेष कूर्म सप्त पाताळ । येकविस स्वर्गें अष्ट दिग्पाळ । तेतिस कोटि देव सकळ । ऐलिकडे ॥ ५१ ॥ बारा आदित्य । अक्रा रुद्र । नव नाग सप्त ऋषेश्वर । नाना देवांचे अवतार । ऐलिकडे ॥ ५२ ॥ मेघ मनु चक्रवती । नाना जीवांची उत्पति । आतां असो सांगों किती । विस्तार हा ॥ ५३ ॥ सकळ विस्ताराचें मूळ । ते मूळ मायाच केवळ । मागां निरोपिली सकळ । पंचभूतिक ॥ ५४ ॥ सूक्ष्मभूतें जे बोलिलीं । तेचि पुढें जडत्वा आलीं । ते सकळहि बोलिलीं । पुढिले समासीं ॥ ५५ ॥ पंचभूतें पृथकाकारें । पुढें निरोपिलीं विस्तारें । वोळखीकारणें अत्यादरें । श्रोतीं श्रवण करावीं ॥ ५६ ॥ पंचभूतिक ब्रह्मगोळ । जेणें कळे हा प्रांजळ । दृश्य सांडून केवळ । वस्तुच पाविजे ॥ ५७ ॥ माहाद्वार वोलांडावें । मग देवदर्शन घ्यावें । तैसें दृश्य हे। सांडावें । जाणोनियां ॥ ५८ ॥ म्हणोनि दृश्याचा पोटीं । आहे पंचभूतांची दाटी । येकपणें पडिली मिठी । दृश्य पंचभूतां ॥ ५९ ॥ एवं पंचभूतांचेंचि दृश्य । सृष्टी रचली सावकास । श्रोतीं करून अवकाश । श्रवण करावें ॥ ६० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सूक्ष्मपंचभूतेंनिरूपणनाम समास चवथा ॥ ४ ॥

समास पांचवा : स्थूळपंचमहाभूतेंस्वरूपाकाशभेदोनाम ॥ श्रीराम ॥ केवळ मूर्ख तें नेणे । म्हणौन घडलें सांगणे । पंचभूतांचीं लक्षणें । विशद करूनि ॥ १ ॥ पंचभूतांचा कर्दम जाला । आतां न वचे वेगळा केला । परंतु कांहीं येक वेगळाला । करून दाऊं ॥ २ ॥ पर्वत पाषाण शिळा शिखरें । नाना वर्णें लहान थोरें । खडे गुंडे बहुत प्रकारें । जाणिजे पृथ्वी ॥ ३ ॥ नाना रंगांची मृत्तिका । नाना स्थळोस्थळीं जे कां । वाळुकें वाळु अनेका । मिळोन पृथ्वी ॥ ४ ॥ पुरें पट्टणें मनोहरें । नाना मंदिरें दामोदरें । नाना देवाळयें शिखरें । मिळोन पृथ्वी ॥ ५ ॥ सप्त द्वीपावती पृथ्वी । काये म्हणोनि सांगावी । नव खंडे मिळोन जाणावी । वसुंधरा ॥ ६ ॥ नाना देव नाना नृपती । नाना भाषा नाना रिती । लक्ष चौर्यासी उत्पत्ती । मिळोन पृथ्वी ॥ ७ ॥ नाना उद्वसें जें वनें । नाना तरुवरांचीं बनें । गिरीकंदरें नाना स्थानें । मिळोन पृथ्वी ॥ ८ ॥ नाना रचना केली देवीं । जे जे निर्मिली मानवी । सकळ मिळोन पृथ्वी । जाणिजें श्रोतीं ॥ ९ ॥ नाना धातु सुवर्णादिक । नाना रत्नें जे अनेक । नाना काष्ठवृक्षादिक । मिळोन पृथ्वी ॥ १० ॥ आतां असो हें बहुवस । जडांश आणी कठिणांश । सकळ पृथ्वी हा विश्वास । मानिला पाहिजे ॥ ११ ॥ बोलिलें पृथ्वीचे रूप । आतां सांगिजेल आप । श्रोतीं वोळखावें रूप । सावध होऊनी ॥ १२ ॥ वापी कूप सरोवर । नाना सरितांचें जें नीर । मेघ आणी सप्त सागर । मिळोन आप ॥ १३ ॥ ॥ श्लोकार्ध - क्षारक्षीरसुरासर्पिर्दधि इक्षुर्जलं तथा ॥ क्षारसमुद्र दिसताहे । सकळ जन दृष्टीस पाहे । जेथें लवण होताहे । तोचि क्षारसिंधु ॥ १४ ॥ येक दुधाचा सागर । त्या नाव क्षीरसागर । देवें दिधला निरंतर । उपमन्यासी ॥ १५ ॥ येक समुद्र मद्याचा । येक जाणावा घृताचा । येक निखळ दह्याचा । समुद्र असे ॥ १६ ॥ येक उसाच्या रसाचा । येक तो शुद्ध जळाचा । ऐसा सातां समुद्राचा । वेढा पृथ्वीयेसी ॥ १७ ॥ एवं भूमंडळीचें जळ । नाना स्थळींचें सकळ । मिळोन अवघें केवळ । आप जाणावें ॥ १८ ॥ पृथ्वीगर्भीं कितीयेक । पृथ्वीतळीं आवर्णोदक । तिहीं लोकींचें उदक । मिळोन आप ॥ १९ ॥ नाना वल्ली बहुवस । नाना तरुवरांचे रस । मधु पारा अमृत विष । मिळोन आप ॥ २० ॥ नाना रस स्नेहादिक । याहि वेगळे अनेक । जगावेगळे अवश्यक । आप बोलिजे ॥ २१ ॥ सारद्र आणी सीतळ । जळासारिखें पातळ । शुक्लीत शोणीत मूत्र लाळ । आप बोलिजे ॥ २२ ॥ आप संकेतें जाणावें । पातळ बोलें वोळखावें । मृद सीतळ स्वभावें । आप बोलिजे ॥ २३ ॥ जाला आपाचा संकेत । पातळ मृद गुळगुळित । स्वेद श्लेष्मा अश्रु समस्त । आप जाणावें ॥ २४ ॥ तेज ऐका सावधपणें । चंद्र सूर्य तारांगणें । दिव्य देह सतेजपणें । तेज बोलिजे ॥ २५ ॥ वन्ही मेघीं विद्युल्यता । वन्ही सृष्टी संव्हारिता । वन्ही सागरा जाळिता । वडवानळु ॥ २६ ॥ वन्ही शंकराचे नेत्रींचा । वन्ही काळाचे क्षुधेचा । वन्ही परीघ भूगोळाचा । तेज बोलिजे ॥ २७ ॥ जें जें प्रकाश रूप । तें तें तेजाचें स्वरूप । शोषक उष्णादि आरोप । तेज जाणावे ॥ २८ ॥ वायो जाणावा चंचळ । चैतन्य चेतवी केवळ । बोलणें चालणें सकळ । वायुमुळें ॥ २९ ॥ हाले डोले तितुका पवन । कांहीं न चले पवनेंविण । सृष्टी चाळाया कारण । मूळ तो वायो ॥ ३० ॥ चळण वळण आणी प्रासारण । निरोध आणी अकोचन । सकळ जाणावा पवन , चंचळरूपी ॥ ३१ ॥ प्राण अपान आणी व्यान । चौथा उदान आणी समान । नाग कुर्म कर्कश जाण । देवदत्त धनंजये ॥ ३२ ॥ जितुकें कांहीं होतें चळण । तितुकें वायोचें लक्षण । च्ंद्र सूर्य तारांगण । वायोचि धर्ता ॥ ३३ ॥ आकाश जाणावें पोकळ । निर्मळ आणी निश्चळ । अवकाशरूप सकळ । आकाश जाणावें ॥ ३४ ॥ आकाश सकळांस व्यापक । आकाश अनेकीं येक । आकाशामध्यें कौतुक । चहूं भूतांचे ॥ ३५ ॥ आकाशा ऐसें नाहीं सार । आकाश सकळांहून थोर । पाहातां आकाशाचा विचार । स्वरूपासारिखा ॥ ३६ ॥ तव शिष्यें केला आक्षेप । दोहीचें सारखेंचि रूप । तरी आकाशचि स्वरूप । कां म्हणो नये ॥ ३७ ॥ आकाश स्वरुपा कोण भेद । पाहातां दिसेती अभेद । आकाश वस्तुच स्वतसिद्ध । कां न म्हणावी ॥ ३८ ॥ वस्तु अचळ अढळ । वस्तु निर्मळ निश्चळ । तैसेंचि आकाश केवळ । वस्तुसारिखें ॥ ३९ ॥ ऐकोनि वक्ता बोले वचन । वस्तु निर्गुण पुरातन । आकाशाआंगी सप्त गुण । शास्त्रीं निरोपिलें ॥ ४० ॥ काम क्रोध शोक मोहो । भय अज्ञान सुन्यत्व पाहो । ऐसा सप्तविध स्वभाव । आकाशाचा ॥ ४१ ॥ ऐसें शात्राकारें बोलिलें । म्हणोनि आकाश भूत जालें । स्वरूप निर्विकार संचलें । उपमेरहित ॥ ४२ ॥ काचबंदि आणी जळ । सारिखेंच वाटे सकळ । परी येक काच येक जळ । शाहाणे जाणती ॥ ४३ ॥ रुवामधें स्फटिक पडिला । लोकीं तद्रूप देखिला । तेणें कपाळमोक्ष जाला । कापुस न करी ॥ ४४ ॥ तदुलामधें श्वेत खडे । तंदुलासारिखें वांकुडे । चाऊं जाता दांत पडे । तेव्हां कळे ॥ ४५ ॥ त्रिभागामधें खडा असे । त्रिभागासारिखाच भासे । शोधूं जातां वेगळा दिसे । कठिणपणें ॥ ४६ ॥ गुळासारिखा गुळदगड । परी तो कठिण निचाड । नागकांडी आणी वेखंड । येक म्हणो नये ॥ ४७ ॥ सोनें आणी सोनपितळ । येकचि वाटती केवळ । परी पितळेंसी मिळतां ज्वाळ । काळिमा चढे ॥ ४८ ॥ असो हे हीन दृष्टांत । आकाश म्हणिजे केवळ भूत । तें भूत आणी अनंत । येक कैसे ॥ ४९ ॥ वस्तुसी वर्णचि नसे । आकाश शामवर्ण असे । दोहींस साम्यता कैसे । करिती विचक्षण ॥ ५० ॥ श्रोते म्हणती कैंचें रूप । आकाश ठांईचे अरूप । आकाश वस्तुच तद्रूप । भेद नाहीं ॥ ५१ ॥ चहूं भूतांस नाश आहे । आकाश कैसें नासताहे । आकाशास न साहे । वर्ण वेक्ती विकार ॥ ५२ ॥ आकाश अचळ दिसतें । त्याचें काये नासों पाहातें । पाहातां आमुचेनि मतें । आकाश शाश्वत ॥ ५३ ॥ ऐसे ऐकोन वचन । वक्ता बोले प्रतिवचन । ऐक आतां लक्षण । आकाशाचें ॥ ५४ ॥ आकाश तमापासून जालें । म्हणोन काम क्रोधें वेष्टिलें । अज्ञान सुन्यत्व बोलिलें । नाम तयाचें ॥ ५५ ॥ अज्ञानें कामक्रोधादिक । मोहो भये आणी शोक । हा अज्ञानाचा विवेक । आकाशागुणें ॥ ५६ ॥ नास्तिक नकारवचन । तें सुन्याचें लक्षण । तयास म्हणती ह्रुदयसुन्य । अज्ञान प्राणी ॥ ५७ ॥ आकाश स्तब्धपणें सुन्य । सुन्य म्हणिजे तें अज्ञान । अज्ञान म्हणिजे कठिण । रूप तयाचें ॥ ५८ ॥ कठिण सुन्य विकारवंत । तयास कैसें म्हणावें संत । मनास वाटे हें तद्वत । आहाच दृष्टीं ॥ ५९ ॥ अज्ञान कालवलें आकाशीं । तया कर्दमा ज्ञान नासी । म्हणोनिया आकाशासी । नाश आहे ॥ ६० ॥ तैसें आकाश आणी स्वरूप । पाहातां वाटती येकरूप । परी दोहींमधें विक्षेप । सुन्यत्वाचा ॥ ६१ ॥ आहाच पाहातां कल्पेनिसी । सारिखेंच वाटे निश्चयेंसीं । परी आकाश स्वरूपासी । भेद नाही ॥ ६२ ॥ उन्मनी आणी सुषुप्ति अवस्ता । सारिखेच वाटे तत्वता । परी विवंचून पाहों जातां । भेद आहे ॥ ६३ ॥ खोटें खर्यासारिखें भाविती । परी परीक्षवंत निवडिती । कां कुरंगें देखोन भुलती । मृगजळासी ॥ ६४ ॥ आतां असो हा दृष्टांत । बोलिला कळाया संकेत । म्हणौनि भूत आणी अनंत । येक नव्हेती ॥ ६५ ॥ आकाश वेगळेपणें पाहावें । स्वरूपीं स्वरूपचि व्हावें । वस्तुचें पाहाणें स्वभावें । ऐसे असे ॥ ६६ ॥ येथें आशंका फिटली । संदेहवृत्ती मावळली । भिन्नपणें नवचे अनुभवली । स्वरूपस्थिती ॥ ६७ ॥ आकाश अनुभवा येतें । स्वरूप अनुभवापरतें । म्हणोनियां आकाशातें । साम्यता न घडे ॥ ६८ ॥ दुग्धासारिखा जळांश । निवडुं जाणती राजहंस । तैसें स्वरूप आणी आकाश । संत जाणती ॥ ६९ ॥ सकळ माया गथागोवी । संतसंगें हें उगवावी । पाविजे मोक्षाची पदवी । सत्समागमें ॥ ७० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे स्थूळपंचमहाभूतेंस्वरूपाकाशभेदोनाम समास पांचवा ॥ ५ ॥

समास सहावा : दुश्चीतनिरूपण ॥ श्रीराम ॥ श्रोता विनवी वक्तयासी । सत्संगाची महिमा कैसी । मोक्ष लाभे कितां दिवसीं । हें मज निरोपावें ॥ १ ॥ धरितां साधूची संगती । कितां दिवसां होते मुक्ती । हा निश्चय कृपामुर्ती । मज दिनास करावा ॥ २ ॥ मुक्ती लाभे तत्क्षणीं । विश्वासतां निरूपणीं । दुश्चितपणीं हानी । होतसे ॥ ३ ॥ सुचितपणें दुश्चीत । मन होतें अकस्मात । त्यास करावें निवांत । कोणे परीं ॥ ४ ॥ मनाच्या तोडून वोढी । श्रवणीं बैसावें आवडीं । सावधपणें घडीनें घडी । काळ सार्थक करावा ॥ ५ ॥ अर्थ प्रमेय ग्रंथांतरीं । शोधून घ्यावें अभ्यांतरीं । दुश्चीतपण आलें तरी । पुन्हां श्रवण करावें ॥ ६ ॥ अर्थांतर पाहिल्यावीण । उगेंचि करी जो श्रवण । तो श्रोता नव्हे पाषण । मनुष्यवेषें ॥ ७ ॥ येथें श्रोते मानितील सीण । आम्हांस केलें पाषाण । तरी पाषाणाचें लक्षण । सावध ऐका ॥ ८ ॥ वांकुडा तिकडा फोडिला । पाषाण घडून नीट केला । दुसरे वेळेसी पाहिला । तरी तो तैसाचि असे ॥ ९ ॥ टांकीनें खपली फोडिली । ते मागुती नाहीं जडली । मनुष्याची कुबुद्धि झाडिली । तरी ते पुन्हा लागे ॥ १० ॥ सांगतां अवगुण गेला । पुन्हा मागुतां जडला । याकरणें माहांभला । पाषाणगोटा ॥ ११ ॥ ज्याचा अवगुण झडेना । तो पाषाणाहून उणा । पाषाण आगळा जाणा । कोटिगुणें ॥ १२ ॥ कोटिगुणें कैसा पाषाण । त्याचेंहि ऐका लक्षण । श्रोतीं करावें श्रवण । सावध होऊनी ॥ १३ ॥ माणीक मोतीं प्रवाळ । पाचि वैडुर्य वज्रनीळ । गोमेदमणी परिस केवळ । पाषाण बोलिजे ॥ १४ ॥ याहि वेगळे बहुत । सूर्यकांत सोमकांत । नाना मोहरे सप्रचित । औषधाकारणें ॥ १५ ॥ याहि वेगळे पाषाण भले । नाना तिर्थीं जे लागले । वापी कूप सेखीं जाले । हरिहरमुर्ती ॥ १६ ॥ याचा पाहातं विचार । पाषाणा ऐसें नाहीं सार । मनुष्य तें काये पामर । पाषाणापुढें ॥ १७ ॥ तरी तो ऐसा नव्हे तो पाषाण। जो अपवित्र निःकारण । तयासातिखा देह जाण । दुश्चीत अभक्तांचा ॥ १८ ॥ आतां असो हें बोलणें । घात होतो दुश्चीतपणें । दुश्चीतपणाचेनि गुणें । प्रपंच ना परमार्थ ॥ १९ ॥ दुश्चीतपणें कार्य नासे । दुश्चीतपणें चिंता वसे । दुश्चीतपणें स्मरण नसे । क्षण येक पाहातां ॥ २० ॥ दुश्चीतपणें शत्रुजिणें । दुश्चीतपणें जन्ममरणें । दुश्चीतपणाचेनि गुणें । हानी होय ॥ २१ ॥ दुश्चीतपणें नव्हे साधन । दुश्चीतपणें न घडे भजन । दुश्चीतपणें नव्हे ज्ञान । साधकांसी ॥ २२ ॥ दुश्चीतपणें नये निश्चयो । दुश्चीतपणें न घडे जयो । दुश्चीतपणें होये क्षयो । आपुल्या स्वहिताचा ॥ २३ ॥ दुश्चीतपणें न घडे श्रवण । दुश्चीतपणें न घडे विवरण । दुश्चीतपणें निरूपण । हातींचे जाये ॥ २४ ॥ दुश्चीत बैसलाचि दिसे । परी तो असतचि नसे । चंचळ चक्रीं पडिलें असे । मानस तयाचें ॥ २५ ॥ वेडें पिशाच्य निरंतर । अंध मुके आणी बधिर । तैसा जाणावा संसार । दुश्चीत प्राणियांचा ॥ २६ ॥ सावध असोन उमजेना । श्रवण असोन ऐकेना । ज्ञान असोन कळेना । सारासारविचार ॥ २७ ॥ ऐसा जो दुश्चीत आळसी । परलोक कैंचा त्यासी । जयाचे जिवीं अहर्निशीं । आळस वसे ॥ २८ ॥ दुश्चीतपणापासुनि सुटला । तरी तो सवेंच आळस आला । आळसाहातीं प्राणीयांला । उसंतचि नाहीं ॥ २९ ॥ आळसें राहिला विचार । आळसें बुडाला आचार । आळसे नव्हे पाठांतर । कांहीं केल्यां ॥ ३० ॥ आळसें घडेना श्रवण । आळसें नव्हें निरूपण । आळसें परमार्थाची खूण । मळिण जाली ॥ ३१ ॥ आळसें नित्यनेम राहिला । आळसें अभ्यास बुडाला । आळसें आळस वाढला । असंभाव्य ॥ ३२ ॥ आळसें गेली धारणा धृती । आळसें मळिण जाली वृत्ती । आळसें विवेकाची गती । मंद जाली ॥ ३३ ॥ आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली । आळसें सुन्याकार जाली । सद्बुद्धि निश्चयाची ॥ ३४ ॥ दुश्चीतपणासवें आळस । आळसें निद्राविळास । निद्राविळासें केवळ नास । आयुष्याचा ॥ ३५ ॥ निद्रा आळस दुश्चीतपण । हेंचि मूर्खाचें लक्षण । येणेंकरिता निरूपण । उमजेचिना ॥ ३६ ॥ हें तिन्ही लक्षणें जेथें । विवेक कैंचा असेल तेथें । अज्ञानास यापरतें । सुखचि नाहीं ॥ ३७ ॥ क्षुधां लागतांच जेविला । जेऊन उठतां आळस आला । आळस येतां निजेला । सावकास ॥ ३८ ॥ निजोन उठतांच दुश्चीत । कदा नाहीं सावचित । तेथें कैचें आत्महित । निरूपणीं ॥ ३९ ॥ मर्कटापासीं दिल्हें रत्न । पिशाच्याहातीं निधान । दुश्चीतापुढें निरूपण । तयापरी होये ॥ ४० ॥ आतां असो हे उपपत्ती । आशंकेची कोण गती । कितां दिवसाइं होते मुक्ती । सज्जनाचेनि संगें ॥ ४१ ॥ ऐका याचें प्रत्योत्तर । कथेंसि व्हावें निरोत्तर । संतसंगाचा विचार । ऐसा असे ॥ ४२ ॥ लोहो परियेसी लागला । थेंबुटा सागरीं मिळाला । गंगे सरिते संगम जाला । तत्क्षणीं ॥ ४३ ॥ सावध साक्षपी आणी दक्ष । तयास तत्काळचि मोक्ष । इतरांस तें अलक्ष । लक्षिलें नवचे ॥ ४४ ॥ येथें शिष्यप्रज्ञाच केवळ । प्रज्ञावंतां नलगे वेळे । अनन्यास तत्काळ । मोक्ष लाभे ॥ ४५ ॥ प्रज्ञावंत आणी अनन्य । तयास नलगे येक क्षण । अनन्य भावार्थेंविण । प्रज्ञा खोटी ॥ ४६ ॥ प्रज्ञेविण अर्थ न कळे । विश्वासेंविण वस्तु ना कळे । प्रज्ञाविश्वासें गळे । देहाभिमान ॥ ४७ ॥ देहाभिमानाचे अंतीं । सहजचि वस्तुप्राप्ती । सत्संगें सद्गती । विलंबचि नाही ॥ ४८ ॥ सावध साक्षपी विशेष । प्रज्ञावंत आणी विश्वास । तयास साधनीं सायास । करणेंचि नलगे ॥ ४९ ॥ इतर भाविक साबडे । तयांसहि साधनें मोक्ष जोडे । साधुसंगें तत्काळ उडे । विवेकदृष्टी ॥ ५० ॥ परी तें साधन मोडुं नये । निरूपणाचा उपाये । निरूपणें लागे सोय । सर्वत्रांसी ॥ ५१ ॥ आतां मोक्ष आहे कैसा । कैसी स्वरूपाची दशा । त्याचे प्राप्तीचा भर्वसा । सत्संगें केवी ॥ ५२ ॥ ऐसें निरूपण प्रांजळ । पुढें बोलिलें असे सकळ । श्रोतीं होऊनियां निश्चळ । अवधान द्यावें ॥ ५३ ॥ अवगुण त्यागावयाकारणें । न्यायनिष्ठुर लागे बोलणें । श्रोतीं कोप न धरणें । ऐसिया वचनाचा ॥ ५४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दुश्चीतनिरूपणनाम समास सहावा ॥

समास सातवा : मोक्षलक्षण ॥ श्रीराम ॥ मागां श्रोतयांचा पक्ष । कितां दिवसां होतो मोक्ष । तेचि कथा श्रोते दक्ष । होऊन ऐका ॥ १ ॥ मोक्षास कैसें जाणावें । मोक्ष कोणास म्हणावें । संतसंगें पावावें । मोक्षास कैसें ॥ २ ॥ तरी बद्ध म्हणिजे बांधला । आणि मोक्ष म्हणिजे मोकळा जाला । तो संतसंगें कैसा लाधला । तेंचि ऐका ॥ ३ ॥ प्राणी संकल्पें बांधला । जीवपणें बद्ध जाला । तो विवेकें मुक्त केला । साधुजनीं ॥ ४ ॥ मी जीव ऐसा संकल्प । दृढ धरितां गेले कल्प । तेणें प्राणी जाला अल्प । देहबुद्धीचा ॥ ५ ॥ मी जीव मज बंधन । मज आहे जन्ममरण । केल्या कर्माचें फळ आपण । भोगीन आतां ॥ ६ ॥ पापाचें फळ तें दुःख । आणी पुण्याचें फळ तें सुख । पापपुण्य अवश्यक । भोगणें लागे ॥ ७ ॥ पापपुण्य भोग सुटेना । आणी गर्भवासहि तुटेना । ऐसी जयाची कल्पना । दृढ जाली ॥ ८ ॥ तया नाव बांधला। जीवपणें बद्ध जाला । जैसा स्वयें बांधोन कोसला । मृत्यु पावे ॥ ९ ॥ तैसा प्राणी तो अज्ञान । नेणें भगवंताचें ज्ञान । म्हणे माझें जन्ममरण । सुटेचिना ॥ १० ॥ आतां कांहीं दान करूं । पुढिलया जन्मास आधारु । तेणें सुखरूप संसारु । होईल माझा ॥ ११ ॥ पूर्वीं दान नाहीं केलें । म्हणोन दरिद्र प्राप्त जालें । आतां तरी कांहीं केलें । पाहिजे कीं ॥ १२ ॥ म्हणौनी दिलें वस्त्र जुनें । आणी येक तांब्र नाणें । म्हणे आतां कोटिगुणें । पावेन पुढें ॥ १३ ॥ कुशावर्तीं कुरुक्षेत्रीं । महिमा ऐकोन दान करी । आशा धरिली अभ्यांतरीं । कोटिगुणांची ॥ १४ ॥ रुका आडका दान केला । अतितास टुक्डा घातला । म्हणे माझा ढीग जाला । कोटि टुकड्यांचा ॥ १५ ॥ तो मी खाईन पुढिलिये जन्मीं । ऐसें कल्पीं अंतर्यामीं । वासना गुंतली जन्मकर्मीं । प्राणीयांची ॥ १६ ॥ आतां मी जें देईन । तें पुढिले जन्मीं पावेन । ऐसें कल्पी तो अज्ञान । बद्ध जाणावा ॥ १७ ॥ बहुतां जन्माचे अंतीं । होये नरदेहाची प्राप्ती । येथें न होतां ज्ञानें सद्गती । गर्भवस चुकेना ॥ १८ ॥ गर्भवास नरदेहीं घडे । ऐसें हें सर्वथा न घडे । अकस्मात भोगणें पडे । पुन्हा नीच योनी ॥ १९ ॥ ऐसा निश्चयो शास्त्रांतरीं । बहुतीं केला बहुतांपरीं । नरदेह संसारीं । परम दुल्लभ असे ॥ २० ॥ पापपुण्य समता घडे । तरीच नरदेह जोडे । येरवीं हा जन्म न घडे । हें व्यासवचन भागवतीं ॥ २१ ॥ ॥ श्लोक ॥ नरदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं । प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारं । मायानुकुलेन नभस्वतेरितं । पुमान्भबाब्धिं न तरेत्स आत्महा ॥ नरदेह दुल्लभ । अल्प संकल्पाचा लाभ । गुरु कर्णधारी स्वयंभ । सुख पाववी ॥ २२ ॥ दैव अनुकुळ नव्हे जया । स्वयें पापी तो प्राणीया । भवब्धी न तरवे तया । आत्महत्यारा बोलिजे ॥ २३ ॥ ज्ञानेंविण प्राणीयांसी । जन्ममृत्य लक्ष चौर्यासी । तितुक्या आत्महत्या त्यासी । म्हणोन आत्महत्यारा ॥ २४ ॥ नरदेहीं ज्ञानेंविण । कदा न चुके जन्ममरण । भोगणें लागती दारुण । नाना नीच योनी ॥ २५ ॥ रीस मर्कट श्वान सूकर । अश्व वृषभ म्हैसा खर । काक कुर्कूट जंबुक मार्जर । सरड बेडुक मक्षिका ॥ २६ ॥ इत्यादिक नीच योनी । ज्ञान नस्तां भोगणें जनीं । आशा धरी मुर्ख प्राणी ॥ पुढिलिया जन्माची ॥ २७ ॥ हा नरदेह पडतां । तोंचि पाविजे मागुतां । ऐसा विश्वास धरिजां । लाज नाहीं ॥ २८ ॥ कोण पुण्याच संग्रहू । जे पुन्हा पाविजे नरदेहो । दुराशा धरिली पाहो । पुढिलिया जन्माची ॥ २९ ॥ ऐसा मुर्ख अज्ञान जन । केलें संकल्पें बंधन । शत्रु आपणासि आपण । होऊन ठेला ॥ ३० ॥ ॥ श्लोक ॥ अत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः । ऐसे संकल्पाचें बंधन । संतसंगे तुटे जाण । ऐक तयाचें लक्षण । सांगिजेल ॥ ३१ ॥ पांचा भूतांचें शरीर । निर्माण जालें सचराचर । प्रकृतिस्वभावें जगदाकार । वर्तों लागे ॥ ३२ ॥ देह अवस्ता अभिमान । स्थानें भोग मात्रा गुण । शक्ती आदिकरुन लक्षण । चौपुटी तत्वांचें ॥ ३३ ॥ ऐसी पिंडब्रह्मांड रचना । विस्तारें वाढली कल्पना । निर्धारितां तत्वज्ञाना । मतें भांबावलीं ॥ ३४ ॥ नाना मतीं नाना भेद । भेदें वाढती वेवाद । परी तो ऐक्यतेचा संवाद । साधु जाणती ॥ ३५ ॥ तया संवादाचे लक्षण । पंचभूतिक देह जाण । त्या देहामधें कारण । आत्मा वोळखावा ॥ ३६ ॥ देह अंती नासोन जाये । त्यास आत्मा म्हणों नये । नाना तत्वांचा समुदाय । देहामधें आला ॥ ३७ ॥ अंतःकर्ण प्राणादिक । विषये इंद्रियें दशक । हा सूक्ष्माच विवेक । बोलिला शास्त्रीं ॥ ३८ ॥ घेतां सूक्ष्माची शुद्धी । भिन्न अंतःकरण मन बुद्धी । नाना तत्वांचे उपाधी । वेगळा आत्मा ॥ ३९ ॥ स्थूळ सूक्ष्म कारण । माहाकारण विराट हिरण्य । अव्याकृत मूळप्रकृति जाण । ऐसे अष्टदेह ॥ ४० ॥ च्यारी पिंडी च्यारी ब्रह्मांडीं । ऐसी अष्टदेहाची प्रौढी । प्रकृती पुरुषांची वाढी । दशदेह बोलिजे ॥ ४१ ॥ ऐसें तत्वांचे लक्षण । आत्मा साक्षी विलक्षण । कार्य कर्ता कारण । दृश्या तयाचें ॥ ४२ ॥ जीवशिव पिंडब्रह्मांड । मायेअविद्येचें बंड । हें सांगता असे उदंड । परी आत्मा तो वेगळा ॥ ४३ ॥ पाहों जातां आत्मे च्यारी । त्यांचे लक्षण अवधारीं । हें जाणोनि अभ्यांतरीं । सदृढ धरावें ॥ ४४ ॥ एक जीवात्मा दुसरा शिवात्मा । तिसरा परमात्मा जो विश्वात्मा । चौथा जाणिजे निर्मळात्मा । ऐसे च्यारी आत्मे ॥ ४५ ॥ भेद उंच नीच भासती । परी च्यारी एकचि असती । येविषीं दृष्टांत संमती। सावध ऐका ॥ ४६ ॥ घटाकाश मठाकाश । महदाकाश चिदाकाश । अवघे मिळोन आकाश । येकचि असे ॥ ४७ ॥ तैसा जीवात्मा आणि शिवात्मा । परमात्मा आणी निर्मळाता । अवघा मिळोन आत्मा । येकचि असे ॥ ४८ ॥ घटीं व्यापक जें आकाश । तया नाव घटाकाश । पिंडी व्यापक ब्रह्मांश । त्यास जीवात्मा बोलिजे ॥ ४९ ॥ मठीं व्यापक जें आकाश । तया नाव मठाकाश । तैसा ब्रह्मांडीं जो ब्रह्मांश । त्यास शिवात्मा बोलिजे ॥ ५० ॥ मठाबाहेरील आकाश । तयाअ नांव महदाकाश । ब्रह्मांडाबाहेरील ब्रह्मांश । त्यास परमात्मा बोलिजे ॥ ५१ ॥ उपधीवेगळें आकाश । तया नाव चिदाकाश । तैसा निर्मळात्मा परेश । तो उपधिवेगळा ॥ ५२ ॥ उपाधियोगें वाटे भिन्न । परी तें आकाश अभिन्न । तैसा अत्मा स्वानंदघन । येकचि असे ॥ ५३ ॥ दृश्या सबाह्य अंतरीं । सूक्ष्मात्मा निरंतरीं । त्याचि वर्णावया थोरी । शेष समर्थ नव्हे ॥ ५४ ॥ ऐसे आत्म्याचें लक्षण । जाणतां नाहीं जीवपण । उपाधी शोधतां अभिन्न । मुळींच आहे ॥ ५५ ॥ जीवपणें येकदेसी । अहंकारें जन्म सोसी । विवेक पाहतां प्राणीयांसी । जन्म कैंचा ॥ ५६ ॥ जन्ममृत्यापासून सुटला । या नाव जाणिजे मोक्ष जाला । तत्वें शोधितां पावला । तत्वता वस्तु ॥ ५७ ॥ तेचि वस्तु ते आपण । हें माहावाक्याचें लक्षण । साधु करीती निरूपण । आपुलेन मुखें ॥ ५८ ॥ जेचि क्षणी अनुग्रह केला । तेचि क्षणीं मोक्ष जाला । बंधन कांहीं आत्मयाला । बोलोंचि नये ॥ ५९ ॥ आतां आशंका फिटली । संदेहवृत्ती मावळली । संतसंगें तत्काळ जाली । मोक्षपदवी ॥ ६० ॥ स्वप्नामधें जो बांधला । तो जागृतीनें मोकळा केला । ज्ञानविवेकें प्राणीयाला । मोक्षप्राप्ती ॥ ६१ ॥ अज्ञाननिसीचा अंतीं । संकल्पदुःखें नासती । तेणें गुणें होये प्राप्ती । तत्काळ मोक्षाची ॥ ६२ ॥ तोडावया स्वप्नबंधन । नलगे आणिक साधन । तयास प्रेत्न जागृतीवीण । बोलोंचि नये ॥ ६३ ॥ तैसा संकल्पें बांधला जीव । त्यास आणिक नाही उपाव । विवेक पाहतां वाव । बंधन होये ॥ ६४ ॥ विवेक पाहिल्याविण । जो जो उपाव तो तो सीण । विवेक पाहातां आपण । आत्माच असे ॥ ६५ ॥ आत्मयाचा ठांई कांहीं । बद्ध मोक्ष दोनी नाहीं । जन्ममृत्य हें सर्वहि । आत्मत्वीं न घडे ॥ ६६ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मोक्षलक्षणनाम समास सातवा ॥ ७ ॥

समास आठवा : आत्मदर्शन ॥ श्रीराम ॥
मागां जाले निरूपण । परमात्मा तो तूंचि जाण । तया परमात्मयाचें लक्षण । तें हें ऐसें असे ॥ १ ॥ जन्म नाही मृत्यु नाहीं । येणें नाहीं जाणें नाहीं । बद्ध मोक्ष दोनी नाहीं । परमात्मयासी ॥ २ ॥ परमात्मा निर्गुण निराकार । परमात्मा अनंत अपार । पर्मात्मा नित्य निरंतर । जैसा तैसा ॥ ३ ॥ पर्मात्मा सर्वांस व्यापक । परमात्मा अनेकीं येक । परमात्मयाचा विवेक । अतर्क्य आहे ॥ ४ ॥ ऐसी परमात्मयाची स्थिती । बोलताती वेद श्रुती । परमात्मा पाविजे भक्तीं । येथें संशय नाही ॥ ५ ॥ तये भक्तीचें लक्षण । भक्ती नवविधा भजन । नवविधा भजनें पावन । बहु भक्त जाले ॥ ६ ॥ तया नवविधामध्यें सार । आत्मनिवेदन थोर । तयेचा करावा विचार । स्वानुभवें स्वयें ॥ ७ ॥ आपुलिया स्वानुभवें । आपणास निवेदावें । आत्मनिवेदन जाणावें । ऐसें असे ॥ ८ ॥ महत्पूजेचा अंतीं । देवास मस्तक वाहाती । तैसी आहे निकट भक्ती । आत्मनिवेदनाची ॥ ९ ॥ आपणांस निवेदिती । ऐसे भक्त थोडे असती । तयांस परमात्मा मुक्ती । तत्काळ देतो ॥ १० ॥ आपणांस कैसें निवेदावें । कोठें जाऊन पडावें । किंवा मस्तक तोडावें । देवापुढें ॥ ११ ॥ ऐसें ऐकोन बोलणें । वक्ता वदे सर्वज्ञपणें । श्रोतां सावधान होणें । येकाग्र चित्तें ॥ १२ ॥ आत्मनिवेदनाचें लक्षण । आधीं पाहावें मी कोण । मग परमात्मा निर्गुण । तो वोळखावा ॥ १३ ॥ देवभक्ताचें शोधन । करितां होतें आत्मनिवेदन । देव आहे पुरातन । भक्त पाहे ॥ १४ ॥ देवास वोळखों जातां । तेथें जाली तद्रूपता । देवभक्तविभक्तता । मुळींच नाहीं ॥ १५ ॥ विभक्त नाहीं म्हणोन भक्त । बद्ध नाहीं म्हणोन मुक्त । अयुक्त नाहीं बोलणें युक्त । शास्त्राधारें ॥ १६ ॥ देवाभक्ताचें पाहातां मूळ । होये भेदाचें निर्मूळ । येक परमात्मा सकळ । दृश्यावेगळा ॥ १७ ॥ तयासि होतां मिळणी । उरी नाहीं दुजेपणीं । देवभक्त हे कडसणी । निरसोन गेली ॥ १८ ॥ आत्मनिवेदनाचे अंतीं । जे कां घडली अभेदभक्ती । तये नाव सायोज्यमुक्ती । सत्य जाणावी ॥ १९ ॥ जो संतांस शरण गेला । अद्वैतनिरूपणें बोधला । मग जरी वेगळा केला । तरी होणार नाहीं ॥ २० ॥ नदीं मिळाली सागरीं । ते निवडावी कोणेपरी । लोहो सोनें होतां माघारी । काळिमा न ये ॥ २१ ॥ तैसा भगवंतीं मिळाला । तो नवचे वेगळा केला । देव भक्त आपण जाला । विभक्त नव्हे ॥ २२ ॥ देव भक्त दोनी येक । ज्यासी कळला विवेक । साधुजनीं मोक्षदायेक । तोचि जाणावा ॥ २३ ॥ आतां असो हें बोलणें । देव पाहावा भक्तपणें । तेणें त्यांचें ऐश्वर्य बाणे । तत्काळ आंगीं ॥ २४ ॥ देहचि होऊन राहिजे । तेणें देहदुःख साहिजे । देहातीत होतां पाविजे । परब्रह्म तें ॥ २५ ॥ देहातीत कैसें होणें । कैसें परब्रह्म पावणें । ऐश्वर्याची लक्षणें । कवण सांगिजे ॥ २६ ॥ ऐसें श्रोतां आक्षेपिलें । याचे उत्तर काये बोलिलें । तेंचि आतां निरोपिलें । सावध ऐका ॥ २७ ॥ देहातीत वस्तु आहे । तें तूं परब्रह्म पाहें । देहसंग हा न साहे । तुज विदेहासी ॥ २८ ॥ ज्याची बुद्धी होये ऐसी । वेद वर्णिती तयासी । शोधितां नाना शास्त्रांसी । न पडे ठांई ॥ २९ ॥ ऐश्वर्य ऐसें तत्वता । बाणें देहबुद्धि सोडितां देह मी ऐसें भावितां । अधोगती ॥ ३० ॥ याकारणें साधुवचन । मानूं नये अप्रमाण । मिथ्या मानितां दूषण । लागों पाहे ॥ ३१ ॥ साधुवचन तें कैसें । काये धरावें विश्वासें । येक वेळ स्वामी ऐसें । मज निरोपावें ॥ ३२ ॥ सोहं आत्मा स्वानंदघन । अजन्मा तो तूंचि जाण । हेंचि साधूचें वचन । सदृढ धरावें ॥ ३३ ॥ महावाक्याचें अंतर । तुंचि ब्रह्म निरंतर । ऐसिया वचनाचा विसर । पडोंचि नये ॥ ३४ ॥ देहासि होईल अंत । मग मी पावेन अनंत । ऐसें बोलणें निभ्रांत । मानूंचि नये ॥ ३५ ॥ येक मुर्ख ऐसें म्हणती । माया नासेल कल्पांतीं । मग आम्हांस ब्रह्मप्राप्ती । येरवीं नाहीं ॥ ३६ ॥ मायेसी होईल कल्पांत । अथवा देहासी येईल अंत । तेव्हां पावेन निवांत । परब्रह्म मी ॥ ३७ ॥ हें बोलणें अप्रमाण । ऐसें नव्हे समाधान । समाधानाचें लक्षण । वेगळेंचि असे ॥ ३८ ॥ शैन्य अवघेंचि मरावें । मग राज्यपद प्राप्त व्हावें । शैन्य अस्तांचि राज्य करावें । हें कळेना ॥ ३९ ॥ माया असोनिच नाहीं । देह असतांच विदेही । ऐसें समाधान कांहीं । वोळखावें ॥ ४० ॥ राज्यपद हातासी आलें । मग परिवारें काय केलें । परिवारा देखतां राज्य गेलें । हें तों घडेना ॥ ४१ ॥ प्राप्त जालियां आत्मज्ञान । तैसें दृश्य देहभान । दृष्टीं पडतां समाधान । जाणार नाही ॥ ४२ ॥ मार्गीं मूळी सर्पाकार । देखतां भये आलें थोर । कळतां तेथील विचार । मग मारणें काये ॥ ४३ ॥ तैसी माया भयानक । विचार पाहातां माईक । मग तयेचा धाक । कायसा धरावा ॥ ४४ ॥ देखतां मृगजळाचे पूर । म्हणे कैसा पावों पैलपार । कळतां तेथीचा विचार । सांकडें कैंचें ॥ ४५ ॥ देखतां स्वप्न भयानक । स्वप्नीं वाटे परम धाक । जागृती आलीयां साशंक । कासया व्हावें ॥ ४६ ॥ तथापी माया कल्पनेसी दिसे । आपण कल्पनेतीत असे । तेथें उद्वेग काईसे । निर्विकल्पासी ॥ ४७ ॥ अंतीं मतीं तेचि गती । ऐसें सर्वत्र बोलती । तुझा अंतीं तुझी प्राप्ती । सहजचि जाली ॥ ४८ ॥ चौंदेहाचा अंत । आणी जन्म मुळाचा प्रांत । अंतांप्रांतासी अलिप्त । तो तुं आत्मा ॥ ४९ ॥ जयासी ऐसी आहे मती । तयास ज्ञानें आत्मगती । गती आणी अवगती । वेगळाचि तो ॥ ५० ॥ मति खुंटली वेदांची । तेथें गती आणी अवगती कैंची । आत्मशास्त्रगुरुप्रचिती । ऐक्यता आली ॥ ५१ ॥ जीवपणाची फिटली भ्रांती । वस्तु आली आत्मप्रचिती । प्राणी पावला उत्तमगती । सद्गुरुबोधें ॥ ५२ ॥ सद्गुरुबोध जेव्हां जाला । चौंदेहांस अंत आला । तेणें निजध्यास लागला । सस्वरूपीं ॥ ५३ ॥ तेणें निजध्यासें प्राणी । धेयंचि जाला निर्वाणीं । सायोज्यमुक्तीचा धनी । होऊन बैसला ॥ ५४ ॥ दृश्य पदार्थ वोसरतां । आवघा आत्माचि तत्वता । नेहटून विचारें पहातां । दृश्य मुळींच नाहीं ॥ ५५ ॥ मिथ्या मिथ्यत्वें पाहिलें । मिथ्यापणें अनुभवा आलें । श्रोतीं पाहिजे ऐकिलें । या नाव मोक्ष ॥ ५६ ॥ सद्गुरुवचन हृदईं धरी । तोचि मोक्षाचा अधिकारी । श्रवण मनन केलेंचि करी । अत्यादरें ॥ ५७ ॥ जेथें आटती दोन्ही पक्ष । तेथें लक्ष ना अलक्ष । या नाव जाणिजे मोक्ष । नेमस्त आत्मा ॥ ५८ ॥ जेथें ध्यान धारणा सरे । कल्पना निर्विकल्पीं मुरे । केवळ ज्ञेप्तिमात्र उरे । सूक्ष्म ब्रह्म ॥ ५९ ॥ भवमृगजळ आटलें । लटिकें बंधन सुटलें । अजन्म्यास मुक्त केलें । जन्मदुःखापासुनी ॥ ६० ॥ निःसंगाची संगव्याधी । विदेहाची देहबुद्धी । विवेकें तोडिली उपाधी । निःप्रपंचाची ॥ ६१ ॥ अद्वैताचें तोडिलें द्वैत । येकांतास दिला एकांत । अनंतास दिला अंत । अनंताचा ॥ ६२ ॥ जागृतीस चेवविलें । चेईर्यास सावध केलें । निजबोधास प्रबोधिलें । आत्मज्ञान ॥ ६३ ॥ अमृतास केलें अमर । मोक्षास मुक्तीचें घर । संयोगास निरंतर । योग केला । ६४ ॥ निर्गुणास निर्गुण केलें । सार्थकाचें सार्थक जालें । बहुतां दिवसां भेटलें । आपणासि आपण ॥ ६५ ॥ तुटला द्वैताचा पडदा । अभेदें तोडिलें भेदा । भूतपंचकाची बाधा । निरसोन गेली ॥ ६६ ॥ जालें साधनाचें फळ । निश्चळास केलें निश्चळ । निर्मळाचा गेला मळ । विवेकबळें ॥ ६७ ॥ होतें सन्निध चुकलें । ज्याचें त्यास प्राप्त जालें । आपण देखतां फिटलें । जन्मदुःख ॥ ६८ ॥ दुष्टस्वप्नें जाजावला । ब्रह्मण नीच याती पावला । आपणांसी आपण सांपडला । जागेपणें ॥ ६९ ॥ ऐसें जयास जालें ज्ञान । तया पुरुषाचें लक्षण । पुढिले समासीं निरूपण । बोलिलें असे ॥ ७० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मदर्शननाम समास आठवा ॥ ८ ॥

समास नववा : सिद्धलक्षण ॥ श्रीराम ॥ अंतरी गेलीयां अमृत । बाह्या काया लखलखित । अंतरस्थिति बाणतां संत । लक्षणें कैसीं ॥ १ ॥ जालें आत्मज्ञान बरवें । हे कैसेनि पां जाणावें । म्हणौनि बोलिलीं स्वभावें । साधुलक्षणें ॥ २ ॥ ऐक सिद्धांचे लक्षण । सिद्ध म्हणिजे स्वरूप जाण । तेथें पाहातां वेगळेपण । मुळीच नाहीं ॥ ३ ॥ स्वरूप होऊन राहिजे । तया नाव सिद्ध बोलिजे । सिद्धस्वरूपींच साजे । सिद्धपण ॥ ४ ॥ वेदशास्त्रीं जें प्रसिद्ध । सस्वरूप स्वतसिद्ध । तयासिच बोलिजे सिद्ध । अन्यथा न घडे ॥ ५ ॥ तथापी बोलों काहीं येक । साधकास कळाया विवेक । सिद्धलक्षणाचें कौतुक । तें हें ऐसें असे ॥ ६ ॥ अंतरस्थित स्वरूप जाली । पुढें काया कैसी वर्तली । जैसी स्वप्नीची नाथिली । स्वप्नरचना ॥ ७ ॥ तथापि सिद्धांचें लक्षण । कांहीं करूं निरूपण । जेणें बाणे अंतर्खूण । परमार्थाची ॥ ८ ॥ सदा स्वरूपानुसंधान। हें मुख्य साधूचें लक्षण । जनीं असोन आपण । जनावेगळा ॥ ९ ॥ स्वरूपीं दृष्टी पडतां । तुटोन गेली संसारचिंता । पुढें लागली ममता । निरूपणाची ॥ १० ॥ हें साधकाचें लक्षण । परी सिद्धाआंगीं असे जाण । सिद्धलक्षण साधकेंविण । बोलोंच नये ॥ ११ ॥ बाह्य साधकाचें परी । आणी स्वरूपाकार अंतरीं । सिद्धलक्षण चतुरीं । जाणिजे ऐसें ॥ १२ ॥ संदेहरहीत साधन । तेचि सिद्धांचे लक्षण । अंतर्बाह्य समाधान । चळेना ऐसें ॥ १३ ॥ अचळ जाली अंतरस्थिती । तेथें चळणास कैची गती । स्वरूपीं लागतां वृत्ती । स्वरूपचि जाली ॥ १४ ॥ मग तो चळतांच अचळ । चंचळपणें निश्चळ । निश्चळ असोन चंचळ । देह त्याचा ॥ १५ ॥ स्वरूपीं स्वरूपचि जाला । मग तो पडोनिच राहिला । अथवा उठोनि पळाला । तरी चळेना ॥ १६ ॥ येथें कारण अंतरस्थिती । अंतरींच पाहिजे निवृत्ती । अंतर लागलें भगवंतीं । तोचि साधु ॥ १७ ॥ बाह्य भलतैसें असावे । परी अंतर स्वरूपीं लागावें । लक्षणे दिसती स्वभावें । साधुआंगीं ॥ १८ ॥ राजीं बैसतां अवलिळा । आंगीं बाणे राजकळा । स्वरूपीं लागतां जिव्हाळा । लक्षणे बाणती ॥ १९ ॥ येरव्ही अभ्यास करितां । हाता न चढती सर्वथा । स्वरूपीं राहावें तत्त्वतां । स्वरूप हौनी ॥ २० ॥ अभ्यासाचा मुगुटमणी । वृत्ती राहावी निर्गुणीं । संतसंगें निरूपणीं । स्थिती बाणे ॥ २१ ॥ ऐसीं लक्षणें बरवीं । स्वरूपाकारें अभ्यासावीं । स्वरूप सोडितां गोसावी । भांबावती ॥ २२ ॥ आतां असो हें बोलणें । ऐका साधूची लक्षणें । जेणें समाधान बाणे । साधकाअंगीं ॥ २३ ॥ स्वरूपीं भरतां कल्पना । तेथें कैंची उरेल कामना । म्हणौनियां सधुजना । कामचि नाहीं ॥ २४ ॥ कल्पिला विषयो हातींचा जावा । तेणें गुणें क्रोध यावा । साधुजनाचा अक्षै ठेवा । जाणार नाहीं ॥ २५ ॥ म्हणोनि ते क्रोधरहित । जाणती स्वरूप संत । नासिवंत हे पदार्थ । सांडुनिया ॥ २६ ॥ जेथें नाहीं दुसरी परी । क्रोध यावा कोणावरी । क्रोधरहित चराचरीं । साधुजन वर्तती ॥ २७ ॥ आपुला आपण स्वानंद । कोणावरी करावा मद । याकारणें वादवेवाद । तुटोन गेला ॥ २८ ॥ साधु स्वरूप निर्विकार । तेथें कैंचा तिरस्कार । आपला आपण मत्सर । कोणावरी करावा ॥ २९ ॥ साधु वस्तु अनायासें । याकारणें मत्सर नसे । मदमत्सराचें पिसें । साधुसी नाहीं ॥ ३० ॥ साधु स्वरूप स्वयंभ । तेथें कैंचा असेल दंभ । जेथेन् द्वैताचा आरंभ जालाच नाही ॥ ३१ ॥ जेणें दृष्य केलें विसंच । तयास कैंचा हो प्रपंच । याकारणें निःप्रपंच । साधु जाणावा ॥ ३२ ॥ अवघें ब्रह्मांड त्याचे घर । पंचभूतिक हा जोजार । मिथ्या जाणोन सत्वर । त्याग केला ॥ ३३ ॥ याकारणें लोभ नसे । साधु सदा निर्लोभ असे । जयाची वासना समरसे । शुद्धस्वरूपीं ॥ ३४ ॥ आपुला आपण आघवा । स्वार्थ कोणाचा करावा । म्हणोनि साधु तो जाणावा । शोकरहित ॥ ३५ ॥ दृष्य सांडुन नासिवंत । स्वरूप सेविलें शाश्वत । याकारणें शोकरहित । साधु जाणावा ॥ ३६ ॥ शोकें दुखवावी वृत्ती । तरी ते जाहली निवृत्ती । म्हणोनि साधु आदिअंतीं । शोकरहीत ॥ ३७ ॥ मोहें झळंबावें मन । तरी तें जाहालें उन्मन । याकारणें साधुजन । मोहातीत ॥ ३८ ॥ सधु वस्तु अद्वये । तेथें वाटेल भये । परब्रह्म तें निर्भये । तोचि साधु ॥ ३९ ॥ याकारणें भयातीत । साधु निर्भय निवांत । सकळांस मांडेल अंत । साधु अनंतरूपी ॥ ४० ॥ सत्यस्वरूपें अमर जाला । भये कैंचें वाटेल त्याला । याकारणें साधुजनाला । भयेचि नाहीं ॥ ४१ ॥ जेथें नाहीं द्वंद्वभेद । आपला आपण अभेद । तेथें कैंचा उठेल खेद । देहबुद्धीचा ॥ ४२ ॥ बुद्धिनें नेमिलें निर्गुणा । त्यास कोणीच नेईना । याकारणें साधुजना । खेदचि नाहीं ॥ ४३ ॥ आपण एकला ठाईचा । स्वार्थ करावा कोणाचा । दृष्य नसतां स्वार्थाचा । ठावचि नाहीं ॥ ४४ ॥ साधु आपणचि येक । तेथें कैंचा दुःखशोक । दुजेविण अविवेक । येणार नाहीं ॥ ४५ ॥ आशा धरितां परमार्थाची । दुराशा तुटली स्वार्थाची । म्हणोनि नैराशता साधूची । वोळखण ॥ ४६ ॥ मृदपणें जैसे गगन । तैसें साधुचें लक्षण । याकरणें साधुवचन । कठीण नाहीं ॥ ४७ ॥ स्वरूपाचा संयोगीं । स्वरूपचि जाला योगी । याकरणें वीतरागी । निरंतर ॥ ४८ ॥ स्थिती बाणतां स्वरूपाची । चिंता सोडीली देहाची । याकरणें होणाराची । चिंता नसे ॥ ४९ ॥ स्वरूपीं लागतां बुद्धी । तुटे अवघी उपाधी । याकारणें निरोपाधी । साधुजन ॥ ५० ॥ साधु स्वरूपींच राहे । तेथें संगचि न साहे । म्हणोनि साधु तो न पाहे । मानापमान ॥ ५१ ॥ अलक्षास लावी लक्ष । म्हणोनि साधु परम दक्ष । वोढूं जाणती कैपक्ष । परमार्थाचा ॥ ५२ ॥ स्वरूपीं न साहे मळ । म्हणोनि साधु तो निर्मळ । साधु स्वरूपचि केवळ । म्हणोनियां ॥ ५३ ॥ सकळ धर्मामधें धर्म । स्वरूपीं राहाणें हा स्वधर्म । हेंचि जाणें मुख्य वर्म । साधुलक्षणाचें ॥ ५४ ॥ धरीतां साधूची संगती । आपषाच लागे स्वरूपस्थिती । स्वरूपस्थितीनें बाणती । लक्षणें आंगीं ॥ ५५ ॥ ऐसीं साधूचीं लक्षणें । आंगीं बाणती निरूपणें । परंतु स्वरूपीं राहाणें । निरंतर ॥ ५६ ॥ निरंतर स्वरूपीं साहातां । स्वरूपचि होईजे तत्त्वतां । मग लक्षणें आंगीं बाणतां । वेळ नाहीं ॥ ५७ ॥ स्वरूपीं राहिल्यां मती । अवगुण अवघेचि साडती । परंतु यासी सत्संगती । निरूपण पाहिजे ॥ ५८ ॥ सकळ सृष्टीचा ठाईं । अनुभव येकचि नाहीं । तो बोलिजेल सर्वहि । पुढिले समासीं ॥ ५९ ॥ कोणें स्थितीनें राहाती । कैसा अनुभव पाहाती । रामदास म्हणे श्रोतीं । अवधान देणें ॥ ६० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सिद्धलक्षणनाम समास नववा ॥

समास दहावा : शून्यत्वनिरसन ॥ श्रीराम ॥ जनाचे अनुभव पुसतां । कळहो उठिल अवचिता । हा कथाकल्लोळ श्रोतां । कौतुकें ऐकावा ॥ १ ॥ येक म्हणती हा संसारु । करितां पाविजे पैलपारु । आपला नव्हे कीं जोजारु । जीव देवाचे ॥ २ ॥ येक म्हणती हें न घडे । लोभ येऊन आंगीं जडे । पोटस्तें करणें घडे । सेवा कुटुंबाची ॥ ३ ॥ येक म्हणती स्वभावें । संसार करावा सुखें नावें । कांहीं दान पुण्य करावें । सद्गतीकारणें ॥ ४ ॥ येक म्हणती संसार खोटा । वैराग्यें घ्यावा देशवटा । येणें स्वर्ग्यलोकींच्या वाटा । मोकळ्या होती ॥ ५ ॥ येक म्हणती कोठें जावें । वेर्थचि कासया हिंडावें । आपुलें आश्रमी असावें । आश्रमधर्म करूनी ॥ ६ ॥ येक म्हणती कैंचा धर्म । अवघा होतसे अधर्म । ये संसारीं नाना कर्म । करणें लागे ॥ ७ ॥ येक म्हणती बहुतांपरी । वासना असावी वरी । येणेंचि तरिजे संसारीं । अनायासें ॥ ८ ॥ येक म्हणती कारण भाव । भावेंचि पाविजे देव । येर हें अवघेंचि वाव । गथागोवी ॥ ९ ॥ येक म्हणती वडिलें जीवीं । अवघीं देवचि मानावीं । मायेबापें पूजीत जावीं । येकाभावें ॥ १० ॥ येक म्हणती देवब्राह्मण । त्यांचें करावें पूजन । मायेबाप नारायेण । विश्वजनाचा ॥ ११ ॥ येक म्हणती शास्त्र पाहावें । तेथें निरोपिलें देवें । तेणें प्रमाणेंचि जावें । परलोकासी ॥ १२ ॥ येक म्हणती अहो जना । शास्त्र पाहातां पुरवेना । याकारणें साधुजना । शरण जावें ॥ १३ ॥ येक म्हणती सांडा गोठी । वायांचि करिता चाउटी । सर्वांस कारण पोटीं । भूतदया असावी ॥ १४ ॥ येक म्हणती येकचि बरवें । आपुल्या आचारें असावें । अंतकाळीं नाम घ्यावें । सर्वोत्तमाचें ॥ १५ ॥ येक म्हणती पुण्य असेल । तरीच नाम येईल । नाहीं तरी भुली पडेल । अंतकाळीं ॥ १६ ॥ येक म्हणती जीत असावे । तंवचि सार्थक करावें । येक म्हणती फिरावें । तिर्थाटण ॥ १७ ॥ येक म्हणती हे अटाटी । पाणीपाषाणाची भेटी । चुबकळ्या मारितां हिंपुटी । कासाविस व्हावें ॥ १८ ॥ येक म्हणती सांडी वाचाळी । अगाध महिमा भूमंडळीं । दर्शनमात्रें होय होळी । माहापातकाची ॥ १९ ॥ येक म्हणती तीर्थ स्वभावें । कारण मन अवरावें । येक म्हणती कीर्तन करावें । सावकास ॥ २० ॥ येक म्हणती योग बरवा । मुख्य तोचि आधीं साधावा । देहो अमरचि करावा । अकस्मात ॥ २१ ॥ येक म्हणती ऐसें काये । काळवंचना करूं नये । येक म्हणती धरावी सोये । भक्तिमार्गाची ॥ २२ ॥ येक म्हणती ज्ञान बरवें । येक म्हणती साधन करावें । येक म्हणती मुक्त असावें । निरंतर ॥ २३ ॥ येक म्हणती अनर्गळा । धरीं पापाचा कंटाळा । येक म्हणती रे मोकळा । मार्ग आमुचा ॥ २४ ॥ येक म्हणती हें विशेष । करूं नये निंदा द्वेष । येक म्हणती सावकास । दुष्टसंग त्यागावा ॥ २५ ॥ येक म्हणती ज्याचें खावें । त्या सन्मुखचि मरावें । तेणें तत्काळचि पावावें । मोक्षपद ॥ २६ ॥ येक म्हणती सांडा गोठी । आधीं पाहिजे ते रोटी । मग करावी चाउटी । सावकास ॥ २७ ॥ येक म्हणती पाउस असावा । मग सकळ योग बरवा । कारण दुष्काळ न पडावा । म्हणिजे बरें ॥ २८ ॥ येक म्हणती तपोनिधी । होतां वोळती सकळ सिद्धी । येक म्हणती रे आधीं । इंद्रपद साधावें ॥ २९ ॥ येक म्हणती आगम पाहावा । वेताळ प्रसन्न करून घ्यावा । तेणें पाविजे देवा । स्वर्गलोकीं ॥ ३० ॥ येक म्हणती अघोरमंत्र । तेणें होईजे स्वतंत्र । श्रीहरी जयेचा कळत्र । तेचि वोळे ॥ ३१ ॥ ती लागले सर्व धर्म । तेथें कैंचें क्रियाकर्म । येक म्हणती कुकर्म । तिच्या मदे ॥ ३२ ॥ येक म्हणती येक साक्षप । करावा मृत्यंजयाचा जप । तेणें गुणें सर्व संकल्प । सिद्धीतें पावती ॥ ३३ ॥ येक म्हणती बटु भैरव । तेणें पाविजे वैभव । येक म्हणती झोटिंग सर्व । पुर्वितसे ॥ ३४ ॥ येक म्हणती काळी कंकाळी । येक म्हणती भद्रकाळी । येक म्हणती उचिष्ट चांडाळी । साहें करावी ॥ ३५ ॥ येक म्हणती विघ्नहर । येक म्हणती भोळा शंकर । येक म्हणती सत्वर । पावे भगवती ॥ ३६ ॥ येक म्हणती मल्लारी । सत्वरचि सभाग्य करी । येक म्हणती माहा बरी । भक्ति वेंकटेशाची ॥ ३७ ॥ येक म्हणती पूर्व ठेवा । येक म्हणती प्रेत्न करावा । येक म्हणती भार घालावा । देवाच वरी ॥ ३८ ॥ येक म्हणती देव कैंचा । अंतचि पाहातो भल्यांचा । येक म्हणती हा युगाचा । युगधर्म ॥ ३९ ॥ येक आश्चीर्य मानिती । येक विस्मयो करिती । येक कंटाळोन म्हणती । काये होईल तें पाहावें ॥ ४० ॥ ऐसे प्रपंचिक जन । लक्षणें सांगतां गहन । परंतु कांहीं येक चिन्ह । अल्पमात्र बोलिलों ॥ ४१ ॥ आतां असो हा स्वभाव । ज्ञात्यांचा कैसा अनुभव । तोहि सांगिजेल सर्व । सावध ऐका ॥ ४२ ॥ येक म्हणती करावी भक्ती । श्रीहरी देईल सद्गती । येक म्हणती ब्रह्मप्राप्ती । कर्मेंचि होये ॥ ४३ ॥ येक म्हणती भोग सुटेना । ज्न्ममरण हें तुटेना । येक म्हणती उर्मी नाना । अज्ञानाच्या ॥ ४४ ॥ येक म्हणती सर्व ब्रह्म । तेथें कैंचें क्रियाकर्म । येक म्हणती हा अधर्म । बोलोंचि नये ॥ ४५ ॥ येक म्हणती सर्व नासें । उरलें तेंचि ब्रह्म असे । येक म्हणती ऐसें नसे । समाधान ॥ ४६ ॥ सर्वब्रह्म केवळ ब्रह्म । दोनी पूर्वपक्षाचे भ्रम । अनुभवाचें वेगळें वर्म । म्हणती येक ॥ ४७ ॥ येक म्हणती हें न घडे । अनुर्वाच्य वस्तु घडे । जें बोलतां मोन्य पडे । वेदशास्त्रांसी ॥ ४८ ॥ तव श्रोता अनुवादला । म्हणे निश्चये कोण केला । सिद्धांतमतें अनुभवाला । उरी कैंची ॥ ४९ ॥ अनुभव देहीं वेगळाले । हें पूर्वीच बोलिलें । आतां कांहीं येक केलें । नवचे कीं ॥ ५० ॥ येक साक्षत्वें वर्तती । साक्षी वेगळाचि म्हणती । आपण दृष्टा ऐसी स्थिती । स्वानुभवाची ॥ ५१ ॥ दृश्यापासून द्रष्टा वेगळा । ऐसी अलिप्तपणाची कळा । आपण साक्षत्वें निराळा । स्वानुभवे ॥ ५२ ॥ सकळ पदार्थ जाणतां । तो पदार्थाहून पर्ता । देहीं असोनी अलिप्तता । सहजचि जाली ॥ ५३ ॥ येक ऐसें स्वानुभवें । म्हणती साक्षत्वें वर्तावें । दृश्य असोनि वेगळें व्हावें । द्रष्टेपणें ॥ ५४ ॥ येक म्हणती नाहीं भेद । वस्तु ठाईंची अभेद । तेथें कैंचा मतिमंद द्रष्टा आणिला ॥ ५५ ॥ अवघी साकरचि स्वभावें । तेथें कडु काय निवडावें । द्रष्टा कैंचा स्वानुभवें । अवघेंचि ब्रह्म ॥ ५६ ॥ प्रपंच परब्रह्म अभेद । भेदवादी मानिती भेद । परी हा आत्मा स्वानंद । आकारला ॥ ५७ ॥ विघुरलें तुप थिजलें । तैसें निर्गुणचि गुणा आलें । तेथें काय वेगळें केलें । द्रष्टेपणें ॥ ५८ ॥ म्हणौनि द्रष्टा आणी दृश्य । अवघा येकचि जगदीश । द्रष्टेपणाचे सायास । कासयासी ॥ ५९ ॥ ब्रह्मचि आकारलें सर्व । ऐसा येकांचा अनुभव । ऐसे हे दोनी स्वभाव । निरोपिले ॥ ६० ॥ अवघा आत्मा आकाराअ । आपण भिन्न कैंचा उरला । दुसरा अनुभव बोलिला । ऐसियापरी ॥ ६१ ॥ ऐक तिसरा अनुभव । प्रपंच सारूनियां सर्व । कांहीं नाहीं तोचि देव । ऐसें म्हणती ॥ ६२ ॥ दृश्य अवघें वेगळें केलें । केवळ अदृश्यचि उरलें । तेंचि ब्रह्म अनुभविलें । म्हणती येक ॥ ६३ ॥ परी तें ब्रह्म म्हणों नये । उपायासारिखा अपाये । सुन्यत्वास ब्रह्म काये । म्हणों येईल ॥ ६४ ॥ दृश्य अवघें वोलांडिलें । अदृश्य सुन्यत्वीं पडिलें । ब्रह्म म्हणौनि मुरडलें । तेथुनिच मागे ॥ ६५ ॥ इकडे दृश्य तिकडे देव । मध्यें सुन्यत्वाचा ठाव । तयास मंदबुद्धिस्तव । प्राणी ब्रह्म म्हणे ॥ ६६ ॥ रायास नाहीं वोळखिलें । सेवकास रावसें कल्पिलें । परी तें अवघें वेर्थ गेलें । राजा देखतां ॥ ६७ ॥ तैसें सुन्यत्व कल्पिलें ब्रह्म । पुढें देखतां परब्रह्म । सुन्यत्वचा अवघा भ्रम । तुटोन गेला ॥ ६८ ॥ परी हा सूक्ष्म आडताळा । वारी विवेकें वेगळा । जैसें दुग्ध घेऊन जळा । राजहंस सांडी ॥ ६९ ॥ आधीं दृश्या सोडिलें । मग सुन्यत्व वोलांडिलें । मूळमायेपरतें देखिलें । परब्रह्म ॥ ७० ॥ वेगळेपणें पाहाणें घडे । तेणें वृत्ति सुन्यत्वीं पडे । पोटीं संदेह पवाडे । सुन्यत्वाचा ॥ ७१ ॥ भिन्नपणें अनुभविलें । तयास सुन्य ऐसें बोलिलें । वस्तु लक्षितां अभिन्न जालें । पाहिजे आधीं ॥ ७२ ॥ वस्तु आपणचि होणें । ऐसें वस्तुचें पाहाणें । निश्चयेंसीं भिन्नपणें । सुन्यत्व लाभे ॥ ७३ ॥ याकारणें सुन्य कांहीं । परब्रह्म होणार नाहीं । वस्तुरूप होऊन पाहीं । स्वानुभवें ॥ ७४ ॥ आपण वस्तु सिद्धचि आहे । मन मी ऐसें कल्पूं नये । साधु सांगती उपाये । तूंचि आत्मा ॥ ७५ ॥ मन मी ऐसें नाथिलें । संतीं नाहीं निरोपिलें । मानावें कोणाच्या बोलें । मन मी ऐसें ॥ ७६ ॥ संतवचनीं ठेवितां भावे । तोचि शुद्ध स्वानुभव । मनाचा तैसाच स्वभाव । आपण वस्तु ॥ ७७ ॥ जयाचा घ्यावा अनुभव । तोचि आपण निरावेव । आपुला घेती अनुभव । विश्वजन ॥ ७८ ॥ लोभी धन साधूं गेले । तंव ते लोभी धनचि जाले । मग भाग्यपुरुषीं भोगिलें । सावकास ॥ ७९ ॥ तैसें देहबुद्धी सोडितां । साधकास जालें तत्वता । अनुभवाची मुख्य वार्ता । ते हे ऐसी ॥ ८० ॥ आपण वस्तु मुळीं येक । ऐसा ज्ञानाचा विवेक । येथून हा ज्ञानदशक । संपूर्ण जाला ॥ ८१ ॥ आत्मज्ञान निरोपिलें । येथामतीनें बोलिलें । न्यूनपर्ण क्ष्मा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ ८२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सुन्यत्वनिर्शननाम समास दहावा ॥ ॥ दशक आठवा समाप्त ॥

दासबोध/दशक सातवा - चौदा ब्रह्मांचा

॥ श्रीरामसमर्थ ॥ ॥ श्रीमत् दासबोध ॥ । सप्तम दशक ॥ समास पहिला : मंगलाचरण ॥ श्रीराम ॥ विद्यावंतांचा पूर्वजू । गजानन एकद्विजू । त्रिनयन चतुर्भुजू । परशुपाणि ॥ १॥ कुबेरापासून अर्थ । वेदांपासून परमार्थ । लक्ष्मीपासून समर्थ । भाग्यासी आले ॥ २॥ तैशी मंगळमूर्ती आद्या । तियेपासून झाल्या सकळ विद्या । तेणें कवि लाघवगद्या । सत्पात्रें जाहलीं ॥ ३॥ जैशीं समर्थाचीं लेकुरें । नाना अलंकारीं सुंदरें । मूळपुरुषाचेनि द्वारें । तैसे कवी ॥ ४॥ नमूं ऐशिया गणेंद्रा । विद्याप्रकाशपूर्णचंद्रा । जयाचेनि बोधसमुद्रा । भरतें दाटे बळें ॥ ५॥ जो कर्तृत्वास आरंभ । मूळपुरुष मूळारंभ । जो परात्पर स्वयंभ । आदि अंतीं ॥ ६॥ तयापासून प्रमदा । इच्छाकुमारी शारदा । आदित्यापासून गोदा । मृगजळ वाहे ॥ ७॥ जे मिथ्या म्हणतांच गोंवी । मायिकपणें लाघवी । वक्तयास वेढा लावी । वेगळेपणें ॥ ८॥ जे द्वैताची जननी । कीं ते अद्वैताची खाणी । मूळमाया गवसणी । अनंत ब्रह्मांडांची ॥ ९॥ कीं ते अवडंबरी वल्ली । अनंत ब्रह्मांडें लगडली । मूळपुरुषाची माउली । दुहितारूपें ॥ १० । वंदूं ऐशी वेदमाता । आदिपुरुषाची जे सत्ता । आतां आठवीन समर्था । सद्गुरूसी ॥ ११॥ जयाचेनि कृपादृष्टी । होय आनंदाची वृष्टी । तेणें गुणें सर्व सृष्टी । आनंदमय ॥ १२॥ कीं तो आनंदाचा जनक । सायुज्यमुक्तीचा नायक । कैवल्यपददायक । अनाथबन्धू ॥ १३॥ मुमुक्षचातकीं सुस्वर । करुणां पाहिजे अंबर । वोळे कृपेचा जलधर । साधकांवरी ॥ १४॥ कीं तें भवार्णवींचें तारूं । बोधें पाववी पैलपारू । महाआवर्तीं आधारू । भाविकांसी ॥ १५॥ कीं तो काळाचा नियंता । नाना संकटीं सोडविता । कीं ते भाविकाची माता । परम स्नेहाळ ॥ १६॥ कीं तो परत्रींचा आधारू । कीं तो विश्रांतीचा थारू । नातरी सुखाचें माहेरू । सुखरूप ॥ १७॥ ऐसा सद्गुरु पूर्णपणीं । तुटे भेदाची कडसणी । देहेंविण लोटांगणीं । तया प्रभूसी ॥ १८॥ साधु संत आणि सज्जन । वंदूनियां श्रोतेजन । आतां कथानुसंधान । सावध ऐका ॥ १९॥ संसार हाचि दीर्घ स्वप्न । लोभें वोसणती जन । माझी कांता माझें धन । कन्या पुत्र माझे ॥ २०॥ ज्ञानसूर्य मावळला । तेणें प्रकाश लोपला । अंधकारें पूर्ण झाला । ब्रह्मगोळ अवघा ॥ २१॥ नाहीं सत्वाचें चांदणें । कांहीं मार्ग दिसे जेणें । सर्व भ्रांतीचेनि गुणें । आपेंआप न दिसे ॥ २२॥ देहबुद्धिअहंकारे । निजले घोरती घोरे । दुःखें आक्रंदती थोरे । विषयसुखाकारणें ॥ २३॥ निजले असतांचि मेले । पुनः उपजतांच निजले । ऐसे आले आणि गेले । बहुत लोक ॥ २४॥ निदसुरेपणेंचि सैरावैरा । बहुतीं केल्या येरझारा । नेणोनियां परमेश्वरा । भोगिले कष्ट ॥ २५॥ त्या कष्टांचें निरसन । व्हावया पाहिजे आत्मज्ञान । म्हणोनि हें निरूपण । अध्यात्मग्रंथीं ॥ २६॥ सकळ विद्यामध्यें सार । अध्यात्मविद्येचा विचार । दशमाध्यायीं शाङ्‌र्गधर । भगवद्गीतेंत बोलिला ॥ २७॥ अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥ याकारणें अद्वैतग्रंथ । अध्यात्मविद्येचा परमार्थ । पावावया तोचि समर्थ । जो सर्वांगें श्रोता ॥ २८॥ जयाचें चंचळ हृदय । तेणें ग्रंथ सोडूंचि नये । सोडितां अलभ्य होय । अर्थ येथींचा ॥ २९॥ जयास जोडला परमार्थ । तेणें पहावा हा ग्रंथ । अर्थ शोधितां परमार्थ । निश्चयो बाणे ॥ ३०॥ जयास नाहीं परमार्थ । तयास न कळे येथींचा अर्थ । नेत्रेंविण निधानस्वार्थ । अंधास न कळे ॥ ३१॥ एक म्हणती मराठें काये । हें तों भल्यानें ऐकों नये । तीं मूर्खें नेणती सोयें । अर्थान्वयांची ॥ ३२॥ लोहाची मांदूस केली । नाना रत्नें सांठविलीं । तीं अभाग्यानें त्यागिलीं । लोखंड म्हणोनि ॥ ३३॥ तैशी भाषा प्राकृत । अर्थ वेदांत आणि सिद्धांत । नेणोनि त्यागिती भ्रांत । मंदबुद्धीस्तव ॥ ३४॥ अहाच सांपडतां धन । त्याग करणें मूर्खपण । द्रव्य घ्यावें सांठवण । पाहोंचि नये ॥ ३५॥ परिस देखिला अंगणीं । मार्गीं सांपडला चिंतामणी । अव्हा वेल महागुणी । कूपामध्यें ॥ ३६॥ तैसें प्राकृतीं अद्वैत । सुगम आणि सप्रचीत । अध्यात्म लाभे अकस्मात । तरी अवश्य घ्यावें ॥ ३७॥ न करितां व्युत्पत्तीचा श्रम । सकळ शास्त्रार्थ होय सुगम । सत्समागमाचें वर्म । तें हें ऐसें असे ॥ ३८॥ जें व्युत्पत्तीनें न कळे । तें सत्समागमें कळे । सकळ शास्त्रार्थ आकळे । स्वानुभवासी ॥ ३९॥ म्हणोनि कारण सत्समागम । तेथें नलगे व्युत्पत्तिश्रम । जन्मसार्थकाचें वर्म । वेगळेंचि असे ॥ ४०॥ भाषाभेदाश्च वर्तन्ते अर्थ एको न संशयः । पात्रद्वये यथा खाद्यं स्वादभेदो न विद्यते ॥ १॥ भाषापालटें कांहीं । अर्थ वाया जात नाहीं । कार्यसिद्धि ते सर्वही । अर्थाचपासीं ॥ ४१॥ तथापि प्राकृताकरितां । संस्कृताची सार्थकता । येऱ्हव्हीं त्या गुप्तार्था । कोण जाणे ॥ ४२॥ आतां असो हें बोलणें । भाषा त्यागून अर्थ घेणें । उत्तम घेऊन त्याग करणें । सालीटरफलांचा ॥ ४३॥ अर्थ सार भाषा पोंचट । अभिमानें करवी खटपट । नाना अहंतेनें वाट । रोधिली मोक्षाची ॥ ४४॥ शोध घेतां लक्ष्यांशाचा । तेथें आधीं वाच्यांश कैंचा । अगाध महिमा भगवंताचा । कळला पाहिजे ॥ ४५॥ मुकेपणाचें बोलणें । हें जयाचें तोचि जाणें । स्वानुभवाचिये खुणें । स्वानुभवी पाहिजे ॥ ४६॥ अर्थ जाणे अध्यात्माचा । ऐसा श्रोता मिळेल कैंचा । जयासि बोलतां वाचेचा । हव्यासचि पुरे ॥ ४७॥ परीक्षावंतापुढें रत्न । ठेवितां होय समाधान । तैसें ज्ञानियापुढें ज्ञान । बोलावें वाटे ॥ ४८॥ मायाजाळें दुश्चित होय । तें निरूपणें कामा नये । संसारिका कळे काय । अर्थ येथींचा ॥ ४९॥ व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन । बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो । अव्यवसायिनाम् ॥ १॥ व्यवसायी जो मळिण । त्यासि न कळे निरूपण । येथें पाहिजे सावधपण । अतिशयेंसीं ॥ ५०॥ नाना रत्नें नाना नाणीं । दुश्चितपणें घेतां हानी । परीक्षा नेणतां प्राणी । ठकला तेथें ॥ ५१॥ तैसें निरूपणीं जाणा । आहाच पाहतां कळेना । मराठेंचि उमजेना । कांहीं केल्या ॥ ५२॥ जेथें निरूपणाचे बोल । आणि अनुभवाची ओल । ते संस्कृतापरी सखोल । अध्यात्मश्रवण ॥ ५३॥ माया ब्रह्म वोळखावें । तयास अध्यात्म म्हणावें । तरी तें मायेचें जाणावें । स्वरूप आधीं ॥ ५४॥ माया सगुण साकार । माया सर्व विकार । माया जाणिजे विस्तार । पंचभूतांचा ॥ ५५॥ माया दृश्य दृष्टीस दिसे । मायाभास मनास भासे । माया क्षणभंगुर नासे । विवेकें पाहतां ॥ ५६॥ माया अनेक विश्वरूप । माया विष्णूचें स्वरूप । मायेची सीमा अमूप । बोलिजे तितुकी थोडी ॥ ५७॥ माया बहुरूप बहुरंग । माया ईश्वराचा संग । माया पाहतां अभंग । अखिल वाटे ॥ ५८॥ माया सृष्टीची रचना । माया आपली कल्पना । माया तोडितां तुटेना । ज्ञानेंविण ॥ ५९॥ ऐशी माया निरूपिली । स्वल्प संकेतें बोलिली । पुढें वृत्ति सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ ६०॥ पुढें ब्रह्मनिरूपण । निरूपिलें ब्रह्मज्ञान । जेणें तुटे मायाभान । एकसरें ॥ ६१॥ हरिः ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके मंगलाचरणनिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १॥

जय जय रघुवीर समर्थ ॥ समास दुसरा : ब्रह्मनिरूपण श्रीराम ॥ ब्रह्म निर्गुण निराकार । ब्रह्म निःसंग निराकार । ब्रह्मास नाहीं पारावार । बोलती साधू ॥ १॥ ब्रह्म सर्वांस व्यापक । ब्रह्म अनेकीं एक । ब्रह्म शाश्वत हा विवेक । बोलिला शास्त्रीं ॥ २॥ ब्रह्म अच्युत अनंत । ब्रह्म सदोदित संत । ब्रह्म कल्पनेरहित । निर्विकल्प ॥ ३॥ ब्रह्म दृश्यावेगळें । ब्रह्म शून्यत्वानिराळें । ब्रह्म इन्द्रियांच्या मेळें । चोजवेना ॥ ४॥ ब्रह्म दृष्टीस दिसेना । ब्रह्म मूर्खास असेना । ब्रह्म सद्गुरुविण येइना । अनुभवासी ॥ ५॥ ब्रह्म सकळांहूनि थोर । ब्रह्मा ऐसें नाहीं सार । ब्रह्म सूक्ष्म अगोचर । ब्रह्मादिकांसी ॥ ६॥ ब्रह्म शब्दीं ऐसें तैसें । बोलिजे त्याहूनि अनारिसें । परी तें श्रवणअभ्यासें । पाविजे ब्रह्म ॥ ७॥ ब्रह्मास नामें अनंत । परी तें ब्रह्म नामातीत । ब्रह्मास हे दृष्टांत । देतां न शोभती ॥ ८॥ ब्रह्मासारिखें दुसरें । पाहतां काय आहे खरें । ब्रह्मीं दृष्टांतउत्तरें । कदा न साहती ॥ ९॥ यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह ॥ जेथें वाचा निवर्तती । मनास नाहीं ब्रह्मप्राप्ती । ऐसें बोलिती श्रुती । सिद्धांतवचन ॥ १०॥ कल्पनारूप मन पाहीं । ब्रह्मीं कल्पनाचि नाहीं । म्हणोनि हें वाक्य कांहीं । अन्यथा नव्हे ॥ ११॥ आतां मनासि जें अप्राप्त । तें कैसेनि होईल प्राप्त । ऐसें म्हणाल तरी कृत्य । सद्गुरुविण नाहीं ॥ १२॥ भांडारगृहें भरलीं । परी असती आडकलीं । हातास न येतां किल्ली । सर्वही अप्राप्त ॥ १३॥ तरी ते किल्ली कवण । मज करावी निरूपण । ऐसी श्रोता पुसे खूण । वक्तयासी ॥ १४॥ सद्गुरुकृपा तेचि किल्ली । जेणें बुद्धी प्रकाशली । द्वैतकपाटें उघडलीं । एकसरां ॥ १५॥ तेथें सुख असे वाड । नाहीं मनासी पवाड । मनेंविण कैवाड । साधनांचा ॥ १६॥ त्याची मनाविण प्राप्ती । कीं वासनेविण तृप्ती । तेथें न चले व्युत्पत्ती । कल्पनेची ॥ १७॥ तें परेहुनी पर । मनबुद्धिअगोचर । संग सोडितां सत्वर । पाविजे तें ॥ १८॥ संग सोडावा आपुला । मग पहावें तयाला । अनुभवी तो या बोला । सुखावेल गा ॥ १९॥ आपण म्हणजे मीपण । मीपण म्हणजे जीवपण । जीवपण म्हणजे अज्ञान । संग जडला ॥ २०॥ सोडितां तया संगासी । ऐक्य होय निःसंगासी । कल्पनेविण प्राप्तीसी । अधिकार ऐसा ॥ २१॥ मी कोण ऐसें नेणिजे । तया नांव अज्ञान बोलिजे । अज्ञान गेलिया पाविजे । परब्रह्म तें ॥ २२॥ देहबुद्धीचें थोरपण । परब्रह्मीं न चले जाण । तेथें होतसे निर्वाण । अहंभावासी ॥ २३॥ ऊंच नीच नाहीं परी । रायारंका एकच सरी । झाला पुरुष अथवा नारी । तरी एकचि पद ॥ २४॥ ब्राह्मणांचें ब्रह्म तें सोंवळें । शूद्राचें ब्रह्म तें ओंवळें । ऐसें वेगळें आगळें । तेथें असेचिना ॥ २५॥ ऊंच ब्रह्म तें रायासी । नीच ब्रह्म तें परिवारासी । ऐसा भेद तयापाशीं । मुळींच नाहीं ॥ २६॥ सकळांस मिळोन ब्रह्म एक । तेथें नाहीं अनेक । रंक अथवा ब्रह्मादिक । तेथेंचि जाती ॥ २७॥ स्वर्ग मृत्यु आणि पाताळ । तिहीं लोकींचे ज्ञाते सकळ । सकळांसि मिळोनि एकचि स्थळ । विश्रांतीचें ॥ २८॥ गुरुशिष्यां एकचि पद । तेथें नाहीं भेदाभेद । परी या देहाचा संबंध । तोडिला पाहिजे ॥ २९॥ देहबुद्धीच्या अंतीं । सकळांसि एकचि प्राप्ती । एकं ब्रह्म द्वितीयं नास्ति । हें श्रुतीचें वचन ॥ ३०॥ साधु दिसती वेगळाले । परी ते स्वस्वरूपीं मिळाले । अवघे मिळोनि एकचि झाले । देहातीत वस्तु ॥ ३१ । ब्रह्म नाहीं नवें जुनें । ब्रह्म नाहीं अधिक उणें । उणें भावील तें सुणें । देहबुद्धीचें ॥ ३२॥ देहबुद्धीचा संशयो । करी समाधानाचा क्षयो । चुके समाधानसमयो । देहबुद्धियोगें ॥ ३३॥ देहाचें जें थोरपण । तेंचि देहबुद्धीचें लक्षण । मिथ्या जाणोन विचक्षण । निंदिती देह ॥ ३४॥ देह पावे जंवरी मरण । तंवरी धरी देहाभिमान । पुन्हा दाखवी पुनरागमन । देहबुद्धि मागुती ॥ ३५॥ देहाचेनि थोरपणें । समाधानासि आणिलें उणें । देह पडेल कोण्या गुणें । हेंही कळेना ॥ ३६॥ हित आहे देहातीत । म्हणोनि निरूपिती संत । देहबुद्धीनें अनहित । हो)ऊंचि लागे ॥ ३७॥ सामर्थ्यबळें देहबुद्धि । योगियांस तेही बाधी । देहबुद्धीची उपाधी । पैसावों लागे ॥ ३८॥ म्हणोनि देहबुद्धि झडे । तरीच परमार्थ घडे । देहबुद्धीनें बिघडे । ऐक्यता ब्रह्मींची ॥ ३९॥ विवेक वस्तूकडे ओढी । देहबुद्धि तेथूनि पाडी । अहंता लावूनि निवडी । वेगळेपणें ॥ ४०॥ विचक्षणें याकारणें । देहबुद्धि त्यजावी श्रवणें । सत्य ब्रह्मीं साचारपणें । मिळोन जावें ॥ ४१॥ सत्य ब्रह्म तें कवण । ऐसा श्रोता करी प्रश्न । प्रत्युत्तर दे आपण । वक्ता श्रोतयासी ॥ ४२॥ म्हणे ब्रह्म एकचि असे । परी तें बहुविध भासे । अनुभव देहीं अनारिसे । नाना मतीं ॥ ४३॥ जें जें जया अनुभवलें । तेंचि तयासी मानलें । तेथेंचि त्याचें विश्वासलें । अंतःकरण ॥ ४४॥ ब्रह्म नामरूपातीत । असोनि नामें बहुत । निर्मळ निश्चळ निवांत । निजानन्द ॥ ४५॥ अरूप अलक्ष अगोचर । अच्युत अनंत अपरंपार । अदृश्य अतर्क्य अपार । ऐशीं नामें ॥ ४६॥ नादरूप ज्योतिरूप । चैतन्यरूप सत्तारूप । स्वस्वरूप साक्षरूप । ऐशीं नामें ॥ ४७॥ शून्य आणि सनातन । सर्वेश्वर आणि सर्वज्ञ । सर्वात्मा जगज्जीवन । ऐशीं नामें ॥ ४८॥ सहज आणि सदोदित । शुद्ध बुद्ध सर्वातीत । शाश्वत आणि शब्दातीत । ऐशीं नामें ॥ ४९॥ विशाळ विस्तीर्ण विश्वंभर । विमळ वस्तु व्योमाकार । आत्मा परमात्मा परमेश्वर । ऐशीं नामें ॥ ५०॥ परमात्मा ज्ञानघन । एकरूप पुरातन । चिद्रूप चिन्मात्र जाण । नामें अनाम्याचीं ॥ ५१॥ ऐशीं नामें असंख्यात । परी तो परेश नामातीत । त्याचा करावया निश्चितार्थ । ठेविलीं नामें ॥ ५२॥ तो विश्रांतीचा विश्राम । आदिपुरुष आत्माराम । तें एकचि परब्रह्म । दुसरें नाहीं ॥ ५३॥ तेंचि कळावयाकारणें । चौदा ब्रह्मांचीं लक्षणें । सांगिजेती तेणें श्रवणें । निश्चयो बाणे ॥ ५४॥ खोटें निवडितां एकसरें । उरलें तें जाणिजे खरें । चौदा ब्रह्में शास्त्राधारें । बोलिजेती ॥ ५५॥ हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके ब्रह्मनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २॥

समास तीसरा : चदुर्ध्शब्रह्मनिरूपण श्रीराम ॥ श्रोतां व्हावें सावधान । आतां सांगतों ब्रह्मज्ञान । जेणें होये समाधान । साधकांचें ॥ १॥ रत्नें साधाया कारणें । मृत्तिका लागे एकवटणें । चौदा ब्रह्मांचीं लक्षणें । जाणिजे तैसीं ॥ २॥ पदार्थेंविण संकेत । द्वैतावेगळा दृष्टांत । पूर्वपक्षेंविण सिद्धांत । बोलतांचि नये ॥ ३॥ आधीं मिथ्या उभारावें । मग तें ओळखोन सांडावें । पुढें सत्य तें स्वभावें । अंतरीं बाणे ॥ ४॥ म्हणोन चौदा ब्रह्मांचा संकेत । बोलिला कळावया सिद्धांत । येथें श्रोतीं सावचित्त । क्षण एक असावें ॥ ५॥ पहिलें तें शब्दब्रह्म । दुजें ओमित्येकाक्षरं ब्रह्म । तिसरें खंब्रह्म । बोलिली श्रुती ॥ ६॥ चौथें जाण सर्वब्रह्म । पांचवें चैतन्यब्रह्म । सहावें सत्ताब्रह्म । साक्षिब्रह्म सातवें ॥ ७॥ आठवें सगुणब्रह्म । नववें निर्गुण ब्रह्म । दहावें वाच्यब्रह्म । जाणावें पैं ॥ ८॥ अनुभव तें अकरावें । आनंदब्रह्म तें बारावें । तदाकार तें तेरावें । चौदावें अनिर्वाच्य ॥ ९॥ ऐशीं हीं चौदा ब्रह्में । यांचीं निरूपिलीं नामें । आतां स्वरूपांचीं वर्में । संकेतें दावूं ॥ १०॥ अनुभवेंविण भ्रम । या नां शब्दब्रह्म । आतां ओमित्येकाक्षरं ब्रह्म । तें एकाक्षर ॥ ११॥ खं शब्दें आकाशब्रह्म । महदाकाश व्यापक ब्रह्म । आतां बोलिजेल सूक्ष्म ब्रह्म । सर्वब्रह्म ॥ १२॥ पंचभूतांचें कुवाडें । जें जें तत्त्व दृष्टीस पडे । तें तें ब्रह्मचि रोकडें । बोलिजेत आहे ॥ १३॥ या नांव सर्वब्रह्म । श्रुतिआश्रयाचें वर्म । आतां चैतन्यब्रह्म । बोलिजेल ॥ १४॥ पंचभूतादि मायेतें । चैतन्यचि चेतवितें । म्हणोनियां चैतन्यातें । चैतन्यब्रह्म बोलिजे ॥ १६॥ चैतन्यास ज्याची सत्ता । तें सत्ताब्रह्म तत्त्वतां । तये सत्तेस जाणता । या नांव साक्षिब्रह्म ॥ १७॥ साक्षित्व जयापासूनी । तेंहीं आकळिलें गुणीं । सगुणब्रह्म हे वाणी । तयासि वदे ॥ १८॥ जेथें नाहीं गुणवार्ता । तें निर्गुणब्रह्म तत्त्वतां । वाच्यब्रह्म तेंही आतां । बोलिजेल ॥ १९॥ या नांव अनुभवब्रह्म । आनंदवृत्तीचा धर्म । परंतु याचेंही वर्म । बोलवेना ॥ २०॥ ऐसें हें ब्रह्म आनंद । तदाकार तें अभेद । अनिर्वाच्य संवाद । तुटोनि गेला ॥ २१॥ ऐशीं हीं चौदा ब्रह्में । निरूपिलीं अनुक्रमें । साधकें पाहतां भ्रमें । बाधिजेना ॥ २२॥ ब्रह्म जाणावें शाश्वत । माया तेचि अशाश्वत । चौदा ब्रह्मांचा सिद्धांत । होईल आतां ॥ २३॥ शब्दब्रह्म तें शाब्दिक । अनुभवेंविण मायिक । शाश्वताचा विवेक । तेथें नाहीं ॥ २४॥ जेथें क्षर ना अक्षर । तेथें कैंचें ओमित्येकाक्षर । शाश्वताचा विचार । तेथें न दिसे ॥ २५॥ खंब्रह्म ऐसें वचन । तरी शून्यातें नाशी ज्ञान । शाश्वताचें अधिष्ठान । तेथें न दिसे ॥ २६॥ सर्वत्रांस होतो अंत । हें तों प्रगटचि दिसत । प्रळय बोलिला निश्चित । वेदांतशास्त्रीं ॥ २७॥ ब्रह्मप्रळय मांडेल जेथें । भूतान्वय कैंचा तेथें । म्हणोनिअ सर्वब्रह्मातें । नाश आहे ॥ २८॥ अचळासी आणी चळण । निर्गुणास लावितां गुण । आकारास विचक्षण । मानीतना ॥ २९॥ जें निर्माण पंचभूत । तें प्रत्यक्ष नाशवंत । सर्वब्रह्म हे मात । घडे केंवीं ॥ ३०॥ असो आतां हें बहुत । सर्वब्रह्म नाशवंत । वेगळेपणास अंत । पाहणें कैंचें ॥ ३१॥ आतां जयास चेतवावें । तेंचि मायिक स्वभावें । तेथें चैतन्याच्या नांवें । नाश आला ॥ ३२॥ परिवारेंविण सत्ता । ते सत्ता नव्हे तत्त्वतां । पदार्थेंविण साक्षता । तेही मिथ्या ॥ ३३॥ सगुणास नाश आहे । प्रत्यक्षास प्रमाण काये । सगुणब्रह्म निश्चयें । नाशवंत ॥ ३४॥ निर्गुण ऐसें जें नांव । त्या नांवास कैंचा ठाव । गुणेंवीण गौरव । येईल कैंचें ॥ ३५॥ माया जैसें मृगजळ । ऐसें बोलती सकळ । कां तें कल्पनेचें आभाळ । नाथिलेंचि ॥ ३६॥ ग्रामो नास्ति कुतः सीमा । जन्मेंविण जीवात्मा । अद्वैतासी उपमा । द्वैताची असे ॥ ३७॥ मायेविरहित सत्ता । पदार्थाविण जाणता । अविद्येविण चैतन्यता । कोणास आली ॥ ३८॥ सत्ता चैतन्यता साक्षी । सर्वही गुणांचिये पाशीं । ठायींचें निर्गुण त्यासीं । गुण कैंचें ॥ ३९॥ ऐसें जें गुणरहित । तेथें नामाचा संकेत । तोचि जाणावा अशाश्वत । निश्चयेंसीं ॥ ४०॥ निर्गुण ब्रह्मासी संकेतें । नामें ठेविलीं बहुतें । तें वाच्यब्रह्म त्यातें । नाश आहे ॥ ४१॥ आनंदाचा अनुभव । हाही वृत्तीचाच भाव । तदाकारीं ठाव । वृत्तीस नाहीं ॥ ४२॥ अनिर्वाच्य याकारणें । संकेतवृत्तीच्या गुणें । तया संकेतास उणें । निवृत्तीनें आणिलें ॥ ४३॥ अनिर्वाच्य ते निवृत्ती । तेचि उन्मनीची स्थिती । निरुपाधि विश्रांती । योगियांची ॥ ४४॥ वस्तु जे कां निरुपाधी । तेचि सहज समाधी । जेणें तुटे आधिव्याधी । भवदुःखाची ॥ ४५॥ जो उपाधीचा अंत । तोचि जाणावा सिद्धांत । सिद्धांत आणि वेदांत । धादांत आत्मा ॥ ४६॥ असो ऐसें जें शाश्वत ब्रह्म । जेथें नाहीं मायाभ्रम । अनुभवी जाणे वर्म । स्वानुभवें ॥ ४७॥ आपुलेनि अनुभवें । कल्पनेसि मोडावें । मग सुकाळीं पडावें । अनुभवाचे ॥ ४८॥ निर्विकल्पासि कल्पावें । कल्पना मोडे स्वभावें । मग नसोनि असावें । कल्पकोटी ॥ ४९॥ कल्पनेचें एक बरें । मोहरितांच मोहरे । स्वरूपीं घालितां भरे । निर्विकल्पीं ॥ ५०॥ निर्विकल्पास कल्पितां । कल्पनेचि नुरे वार्ता । निःसंगास भेटों जातां । निःसंग होइजे ॥ ५१॥ पदार्था ऐसें ब्रह्म नव्हे । मा तें हातीं धरूनि द्यावें । असो हें अनुभवावें । सद्गुरुमुखें ॥ ५२॥ पुढें कथेच्या अन्वयें । केलाचि करूं निश्चये । जेणें अनुभवास ये । केवळ ब्रह्म ॥ ५३॥ हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके चतुर्दशब्रह्मनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३॥

समास चवथा : विमलब्रह्मनिरूपण श्रीराम ॥ ब्रह्म नभाहूनि निर्मळ । पाहतां तैसेंचि पोकळ । अरूप आणि विशाळ । मर्यादेवेगळें ॥ १॥ एकवीस स्वर्गें सप्त पाताळ । मिळोन एक ब्रह्मगोळ । ऐसें अनंत तें निर्मळ । व्यापून असे ॥ २॥ अनंत ब्रह्मांडांखालतें । अनंत ब्रह्मांडांवरुतें । तेणेंविण स्थळ रितें । अणुमात्र नाहीं ॥ ३॥ जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं । ऐशी वदे लोकवाणी । तेणेंविण रिता प्राणी । एकही नाहीं ॥ ४॥ जळचरां जैसें जळ । बाह्य अभ्यंतरीं निखळ । तैसें ब्रह्म हें केवळ । जीवमात्रासी ॥ ५॥ जळावेगळा ठाव आहे । ब्रह्माबाहेरी जातां न ये । म्हणोनि उपमा न साहे । जळाची तया ॥ ६॥ आकाशाबाहेरी पळों जातां । पुढें आकाशचि तत्त्वतां । तैसा तया अनंता । अंतचि नाहीं ॥ ७॥ परी जें अखंड भेटलें । सर्वांगास लिगडिलें । अति निकट परी चोरलें । सकळांसि जें ॥ ८॥ तयामध्येंचि असिजे । परी तयासी नेणिजे । उपजे भास नुपजे । परब्रह्म तें ॥ ९॥ आकाशामध्यें आभाळ । तेणें आकाश वाटे डहुळ । परी तें मिथ्या निवळ । आकाशचि असे ॥ १०॥ नेहार देतां आकाशीं । चक्रें दिसती डोळ्यांसी । तैसें दृश्य ज्ञानियांसी । मिथ्यारूप ॥ ११॥ मिथ्याचि परी आभासे । निद्रितांसी स्वप्न जैसें । जागा झालिया आपैसें । बुझों लागे ॥ १२॥ तैसें आपुलेनि अनुभवें । ज्ञानें जागृतीस यावें । मग मायिक स्वभावें । कळों लागे ॥ १३॥ आतां असो हें कुवाडें । जें ब्रह्मांडापैलीकडे । तेंचि आतां निवाडें । उमजोन दावूं ॥ १४॥ ब्रह्म ब्रह्मांडीं कालवलें । पदार्थमात्रासि व्यापून ठेलें । सर्वांमध्यें विस्तारलें । अंशमात्रें ॥ १५॥ ब्रह्मामध्यें सृष्टी भासे । सृष्टीमध्यें ब्रह्म असे । अनुभव घेतां आभासे । अंशमात्रें ॥ १६॥ अंशमात्रें सृष्टीभीतरीं । बाहेरी मर्यादा कोण करी । सगळें ब्रह्म ब्रह्मांडोदरीं । माईल कैसें ॥ १७॥ अमृतीमध्यें आकाश । सगळें सांठवतां प्रयास । म्हणोन तयाचा अंश । बोलिजे तो ॥ १८॥ ब्रह्म तैसें कालवलें । परी तें नाहीं हालवलें । सर्वांत परी संचलें । संचलेपणें ॥ १९॥ पंचभूतीं असे मिश्रित । परंतु तें पंचभूतातीत । पंकीं आकाशीं अलिप्त । असोनि जैसें ॥ २०॥ ब्रह्मास दृष्टांत न घडे । बुझावया देणें घडे । परी दृष्टांतीं साहित्य पडे । विचारितां आकाश ॥ २१॥ खंब्रह्म ऐशी श्रुती । गगनसदृशं हे स्मृती । म्हणोन ब्रह्मास दृष्टांतीं । आकाश घडे ॥ २२॥ काळिमा नसतां पितळ । मग तें सोनेंचि केवळ । शून्यत्व नसतां निर्मळ । आकाश ब्रह्म ॥ २३॥ म्हणोन ब्रह्म जैसें गगन । आणि माया जैसा पवन । आढळे परी दर्शन । नव्हे त्याचें ॥ २४॥ शब्दसृष्टीची रचना । होत जात क्षणक्षणां । परंतु ते स्थिरावेना । वायूच ऐसी ॥ २५॥ असो ऐशी माया मायिक । शाश्वत तें ब्रह्म एक । पाहों जातां अनेक । व्यापून असे ॥ २६॥ पृथ्वीसि भेदूनि आहे । परी तें ब्रह्म कठिण नव्हे । दुजी उपमा न साहे । तया मृदुत्वासी ॥ २७॥ पृथ्वीहूनि मृदु जळ । जळाहूनि तो अनळ । अनळाहूनि कोमळ । वायु जाणावा ॥ २८॥ वायूहूनि तें गगन । अत्यंतचि मृदु जाण । गगनाहूनि मृदु पूर्ण । ब्रह्म जाणावें ॥ २९॥ वज्रास असे भेदिलें । परी मृदुत्व नाहीं गेलें । उपमेरहित संचलें । कठिण ना मृदु ॥ ३०॥ पृथ्वीमध्यें व्यापूनि असे । पृथ्वी नासे तें न नासे । जळ शोषे तें न शोषे । जळीं असोनी ॥ ३१॥ तेजीं असे परी जळेना । पवनीं असे तरी चळेना । गगनीं असे परी कळेना । परब्रह्म तें ॥ ३२॥ शरीरीं अवघें व्यापलें । परी तें नाहीं आढळलें । जवळीच दुरावलें । नवल कैसें ॥ ३३॥ सन्मुखचि चहूंकडे । तयामध्यें पाहणें घडे । बाह्याभ्यंतरीं रोकडें । सिद्धचि आहे ॥ ३४॥ तयांमध्येंचि आपण । आपणां सबाह्य तें जाण । दृश्या वेगळी खूण । गगनासारिखी ॥ ३५॥ कांहीं नाहींसें वाटलें । तेथेंचि तें कोंदाटलें । जैसें न दिसें आपुलें । आपणासि धन ॥ ३६॥ जो जो पदार्थ दृष्टीस पडे । तें त्या पदार्था पैलीकडे । अनुभवे हें कुवाडें । उकलावें ॥ ३७॥ मागें पुढें आकाश । पदार्थेंविण जो पैस । पृथ्वीविण भकाश । एकरूप ॥ ३८॥ जें जें रूप आणि नाम । तो तो नाथिलाचि भ्रम । नामरूपातीत वर्म । अनुभवी जाणती ॥ ३९॥ नभीं धूम्राचे डोंगर । उचलती थोर थोर । तैसें दावी वोडंबर । मायादेवी ॥ ४०॥ ऐशी माया अशाश्वत । ब्रह्म जाणावें शाश्वत । सर्वांठायीं सदोदित । भरलें असे ॥ ४१॥ पोथी वाचूं जातां पाहे । मातृकामध्यें भरलें आहे । नेत्रीं रिघोनियां राहे । मृदुपणें ॥ ४२॥ श्रवणें शब्द ऐकतां । मनें विचार पाहतां । मना सबाह्य तत्त्वतां । परब्रह्म तें ॥ ४३॥ चरणीं चालतां मार्गीं । जें आडळे सर्वांगीं । करें घेतां वस्तुलागीं । आडवें ब्रह्म ॥ ४४॥ असो इंद्रियसमुदाव । तयामध्यें वर्ते सर्व । जाणों जातां मोडे हांव । इंद्रियांची ॥ ४५॥ जें जवळीच असे । पांहों जातां न दिसे । न दिसोन वसे । कांहीं एक ॥ ४६॥ जें अनुभवेंचि जाणावें । सृष्टीचेनि अभावें । आपुलेनि स्वानुभवें । पाविजे ब्रह्म ॥ ४७॥ ज्ञानदृष्टीचें देखणें । चर्मदृष्टी पाहों नेणे । अंतरवृत्तीचिये खुणे । अंतरवृत्ति साक्ष ॥ ४८॥ जाणे ब्रह्म जाणे माया । जाणे अनुभवाच्या ठाया । ते येक जाणावी तुर्या । सर्वसाक्षिणी ॥ ४९॥ साक्षत्व वृत्तीचें कारण । उन्मनी ते निवृत्ति जाण । जेथें विरे जाणपण । विज्ञान तें ॥ ५०॥ जेथें अज्ञान सरे । ज्ञान तेंही नुरे । विज्ञानवृत्ति मुरे । परब्रह्मीं ॥ ५१॥ ऐसें ब्रह्म शाश्वत । जेथें कल्पनेसी अंत । योगिजना एकांत । अनुभवें जाणावा ॥ ५२॥ हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके विमलब्रह्मनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४॥

समास पांचवा : द्वैतकल्पनानिरसन श्रीराम ॥ केवळब्रह्म जें बोलिलें । तें अनुभवास आलें । आणि मायेचेंहि लागलें । अनुसंधान ॥ १॥ ब्रह्म अंतरीं प्रकाशे । आणि मायाही प्रत्यक्ष दिसे । आतां हें द्वैत निरसे । कवणेपरी ॥ २॥ तरी आतां सावधान । एकाग्र करूनियां मन । मायाब्रह्म हें कवण । जाणताहे ॥ ३॥ सत्य ब्रह्माचा संकल्प । मिथ्या मायेचा विकल्प । ऐशिया द्वैताचा जल्प । मनचि करी ॥ ४॥ जाणे ब्रह्म जाणे माया । ते येक जाणावी तुर्या । सर्व जाणे म्हणोनियां । सर्वसाक्षिणी ॥ ५॥ ऐक तुर्येचें लक्षण । जेथें सर्व जाणपण । सर्वचि नाहीं कवण । जाणेल गा ॥ ६॥ संकल्पविकल्पाची सृष्टी । जाली मनाचियें पोटीं । तें मनचि मिथ्या शेवटीं । साक्षी कवणु ॥ ७॥ साक्षत्व चैतन्यत्वसत्ता । हे गुण ब्रह्माचिया माथां । आरोपले जाण वृथा । मायागुणें ॥ ८॥ घटामठाचेनि गुणें । त्रिविधा आकाश हें बोलणें । मायेचेनि खरेंपणें । गुण ब्रह्मीं ॥ ९॥ जंव खरेपण मायेसी । तंवचि साक्षित्व ब्रह्मासी । मायेअविद्येचे निरासीं । द्वैत कैंचें ॥ १०॥ म्हणोनि सर्वसाक्षी मन । तेंचि जालिया उन्मन । मग तुर्यारूप ज्ञान । तें मावळोन गेलें ॥ ११॥ जयास द्वैत भासलें । तें मन उन्मन झालें । द्वैताअद्वैतांचें तुटलें । अनुसंधान ॥ १२॥ एवं द्वैत आणि अद्वैत । होये वृत्तीचा संकेत । वृत्ति झालिया निर्वृत्त । द्वैत कैंचें ॥ १३॥ वृत्तिरहित जें ज्ञान । तेंचि पूर्ण समाधान । जेथें तुटे अनुसंधान । मायाब्रह्मींचें ॥ १४॥ मायाब्रह्म ऐसा हेत । मनें कल्पिला संकेत । ब्रह्म कल्पनेरहित । जाणती ज्ञानी ॥ १५॥ जें मनबुद्धिअगोचर । जें कल्पनेहून पर । तें अनुभवितां साचार । द्वैत कैंचें ॥ १६॥ द्वैत पाहतां ब्रह्म नसे । ब्रह्म पाहतां द्वैत नासे । द्वैताद्वैत भासे । कल्पनेसी ॥ १७॥ कल्पना माया निवारी । कल्पना ब्रह्म थावरी । संशय धरी आणि वारी । तेही कल्पना ॥ १८॥ कल्पना करी बंधन । कल्पना दे समाधान । ब्रह्मीं लावी अनुसंधान । तेही कल्पना ॥ १९॥ कल्पना द्वैताची माता । कल्पनाचि ज्ञप्ति तत्त्वता । बद्धता आणि मुक्तता । कल्पनागुणें ॥ २०॥ कल्पना अंतरीं सबळ । नसते दावी ब्रह्मगोळ । क्षण एक ते निर्मळ । स्वरूप कल्पी ॥ २१॥ क्षण एक धोका वाहे । क्षण एक स्थिर राहे । क्षण एक पाहे । विस्मित हौनी ॥ २२॥ क्षण एकांत उमजे । क्षण एक निर्बुजे । नाना विकार करिजे । ते कल्पना जाणावी ॥ २३॥ कल्पना जन्माचें मूळ । कल्पना भक्तीचें फळ । कल्पना तेचि केवळ । मोक्षदात्री ॥ २४॥ असो ऐशी हे कल्पना । साधनें दे समाधाना । येऱ्हवीं हे पतना । मूळच कीं ॥ २५॥ म्हणोनि सर्वांचें मूळ । ते हे कल्पनाचि केवळ । इचें केलिया निर्मूळ । ब्रह्मप्राप्ती ॥ २६॥ श्रवण आणि मनन । निजध्यासें समाधान । मिथ्या कल्पनेचें भान । उडोनि जाय ॥ २७॥ शुद्ध ब्रह्माचा निश्चय । करी कल्पनेचा जय । निश्चितार्थें संशय । तुटोनि जाय ॥ २८॥ मिथ्या कल्पनेचें कोडें । कैसें राहे साचापुढें । जैसें सूर्याचेनि उजेडें । नासे तम ॥ २९॥ तैसें ज्ञानाचेनि प्रकाशें । मिथ्या कल्पना हे नासे । मग हें तुटे आपैसें । द्वैतानुसंधान ॥ ३०॥ कल्पनेनें कल्पना उडे । जैसा मृगें मृग सांपडे । कां शरें शर आतुडे । आकाशमार्गीं ॥ ३१॥ शुद्ध कल्पनेचें बळ । झालिया नासे शबल । हेंचि वचन प्रंजळ । सावध ऐका ॥ ३२॥ शुद्ध कल्पनेची खूण । स्वयें कल्पिजे निर्गुण । स्वस्वरूपीं विस्मरण । पडोंचि नेदी ॥ ३३॥ सदा स्वरूपानुसंधान । करी द्वैताचें निरसन । अद्वैतनिश्चयाचें ज्ञान । तेचि शुद्ध कल्पना ॥ ३४॥ अद्वैत कल्पी ते शुद्ध । द्वैत कल्पी ते अशुद्ध । अशुद्ध तेंचि प्रसिद्ध । शबल जाणावें ॥ ३५॥ शुद्ध कल्पनेचा अर्थ । अद्वैताचा निश्चितार्थ । आणि शबल ते व्यर्थ । द्वैत कल्पी ॥ ३६॥ अद्वैतकल्पना प्रकाशे । तेच क्षणीं द्वैत नासे । द्वैतासरिसी निरसे । शबलकल्पना ॥ ३७॥ कल्पनेनें कल्पना सरे । ऐसें जाणावें चतुरें । शबल गेलियानंतरें । उरली ती शुद्ध ॥ ३८॥ शुद्ध कल्पनेचें रूप । तेंचि कल्पी स्वरूप । स्वरूप कल्पितां तद्रूप । होय आपण ॥ ३९॥ कल्पनेसी मिथ्यत्व आलें । सहजचि तद्रूप झालें । आत्मनिश्चयें नाशिलें । कल्पनेसी ॥ ४०॥ जेचि क्षणीं निश्चय चळे । तेचि क्षणीं द्वैत उफाळे । जैसा अस्तमानीं प्रबळे । अंधकार ॥ ४१॥ तैसें ज्ञान होतां मलिन । अज्ञान प्रबळे जाण । याकारणें श्रवण । अखंड असावें ॥ ४२॥ आतां असो हें बोलणें जालें । आशंका फेडूं येका बोलें । जयास द्वैत भासलें । तें तूं नव्हेसी सर्वथा ॥ ४३॥ मागील आशंका फिटली । इतुकेन ही कथा संपली । पुढें वृत्ति सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ ४४॥ हरिॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके द्वैतकल्पनानिरसननिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५॥

समास सहावा : बद्धमुक्‌तनिरूपण श्रीराम ॥ अद्वैतब्रह्म निरूपिलें । जें कल्पनेरहित संचलें । क्षणएक तदाकार केलें । मज या निरूपणें ॥ १॥ परी म्यां तदाकार व्हावें । ब्रह्मचि होऊन असावें । पुनः संसारास न यावें । चंचळपणें सर्वथा ॥ २॥ कल्पनारहित जें सुख । तेथें नाहीं संसारदुःख । म्हणोनि तेंचि एक । होऊन असावें ॥ ३॥ ब्रह्मचि होइजे श्रवणें । पुन्हां वृत्तिवरी लागे येणें । ऐसें सदा येणें जाणें । चुकेना कीं ॥ ४॥ मनें अंतरिक्षीं जावें । क्षणएक ब्रह्मचि व्हावें । पुन्हां तेथून कोसळावें । वृत्तिवरी मागुती ॥ ५॥ प्रत्यावृत्ति सैरावैरा । किती करूं येरज़ारा । पायीं लावूनियां दोरा । कीटक जैसा ॥ ६॥ उपदेशकाळीं तदाकार । होतां पडे हें शरीर । अथवा नेणें आपपर । ऐसें झालें पाहिजे ॥ ७॥ ऐसें नसतां जें बोलणें । तेंचि वाटे लाजिरवाणें । ब्रह्म होऊन संसार करणें । हेंही विपरीत दिसे ॥ ८॥ जो स्वयें ब्रह्मचि झाला । तो मागुता कैसा आला । ऐसें ज्ञान माझें मजला । प्रशस्त न वाटे ॥ ९॥ ब्रह्मचि होऊन जावें । कां तें संसारीच असावें । दोहींकडे भरंगळावें । किती म्हणोनि ॥ १०॥ निरूपणीं ज्ञान प्रबळे । उठोन जातां तें मावळे । मागुता काम क्रोध खवळे । ब्रह्मरूपासी ॥ ११॥ ऐसा कैसा ब्रह्म झाला । दोहींकडे अंतरला । वोडगस्तपणेंचि गेला । संसार त्याचा ॥ १२॥ घेतां ब्रह्मसुखाची गोडी । संसारिक मागें वोढी । संसार करितां आवडी । ब्रह्मीं उपजे मागुती ॥ १३॥ ब्रह्मसुख नेलें संसारें । संसार गेला ज्ञानद्वारें । दोहीं अपुरीं पुरें । एकही नाहीं ॥ १४॥ याकारणें माझें चित्त । चंचळ झालें दुश्चित । काय करणें निश्चितार्थ । एकही नाहीं ॥ १५॥ ऐसा श्रोता करी विनंती । आतां रहावें कोणे रीतीं । म्हणे अखंड माझी मती । ब्रह्माकार नाहीं ॥ १६॥ आतां याचें प्रत्युत्तर । वक्ता देईल सुंदर । श्रोतीं व्हावें निरुत्तर । क्षण एक आतां ॥ १७॥ ब्रह्मचि होऊन जे पडले । तेचि मुक्तिपदास गेले । येर ते काय बुडाले । व्यासादिक ॥ १८॥ श्रोता विनंती करी पुढती । शुक मुक्तो वामदेवो वा हे श्रुती । दोघेचि मुक्त आदिअंतीं । बोलत असे ॥ १९॥ वेदें बद्ध केले सर्व । मुक्त शुक वामदेव । वेदवचनीं अभाव । कैसा धरावा ॥ २०॥ ऐसा श्रोता वेदाधारें । देता झाला प्रत्युत्तरें । दोघेचि मुक्त अत्यादरें । प्रतिपाद्य केले ॥ २१॥ वक्ता बोले याउपरी । दोघेचि मुक्त सृष्टीवरी । ऐसें बोलतां उरी । कोणास आहे ॥ २२॥ बहु ऋषि बहु मुनी । सिद्ध योगी आत्मज्ञानी । झाले पुरुष समाधानी । असंख्यात ॥ २३॥ प्रऱ्हादनारदपराशरपुंडरीक- व्यासांबरीषशुकशौनकभीष्मदाल्भ्यान् । रुक्मांगदार्जुनवसिष्ठविभीषणादीन् पुण्यानिमान्परमभागवतान्स्मरामि ॥ १॥ कविऱरिरंतरिक्षः प्रबुद्धः पिप्पलायनः । आविऱोत्रो । अथ द्रुमिलश्चमसः करभाजनः ॥ २॥ यांहीवेगळे थोर थोर । ब्रह्मा विष्णु महेश्वर । आदिकरून दिगंबर । विदेहादिक ॥ २४॥ शुक वामदेव मुक्त झाले । येर हे अवघेच बुडाले । या वचनें विश्वासले । ते पढतमूर्ख ॥ २५॥ तरी वेद कैसा बोलिला । तो काय तुम्हीं मिथ्या केला । ऐकोन वक्ता देता झाला । प्रत्युत्तर ॥ २६॥ वेद बोलिला पूर्वपक्ष । मूर्ख तेथेंचि लावी लक्ष । साधु आणि व्युत्पन्न दक्ष । त्यांस हें न माने ॥ २७॥ तथापि हें जरी मानलें । तरी वेदसामर्थ्य बुडालें । वेदाचेनि उद्धरिलें । न वचे कोणा ॥ २८॥ वेदाअंगीं सामर्थ्य नसे । तरी या वेदासि कोण पुसे । म्हणोनि वेदीं सामर्थ्य असे । जन उद्धरावया ॥ २९॥ वेदाक्षर घडे ज्यासी । तो बोलिजे पुण्यराशी । म्हणोनि वेदीं सामर्थ्यासी । काय उणें ॥ ३०॥ वेद शास्त्र पुराण । भाग्यें झालिया श्रवण । तेणें होइजे पावन । हें बोलती साधु ॥ ३१॥ श्लोक अथवा श्लोकार्ध । नाहीं तरी श्लोकपाद । श्रवण होतां एक शब्द । नाना दोष जाती ॥ ३२॥ वेद शास्त्रीं पुराणीं । ऐशा वाक्यांच्या आयणी । अगाध महिमा व्यासवाणी । वदोनि गेली ॥ ३३॥ एकाक्षर होतां श्रवण । तात्काळचि होइजे पावन । ऐसें ग्रंथाचें महिमान । ठायीं ठायीं बोलिलें ॥ ३४॥ दोहींवेगळा तिजा नुद्धरे । तरी महिमा कैंचा उरे । असो हें जाणिजे चतुरें । येरां गाथागोवी ॥ ३५॥ वेद शास्त्रें पुराणें । कैशीं होती अप्रमाणें । दोघावांचूनि तिसरा कोणें । उद्धरावा ॥ ३६॥ म्हणसी काष्ठ होऊनि पडिला । तोचि एक मुक्त झाला । शुक तोही अनुवादला । नाना निरूपणें ॥ ३७॥ शुक मुक्त ऐसें वचन । वेद बोलिला हें प्रमाण । परी तो नव्हता अचेतन । ब्रह्माकार ॥ ३८॥ अचेतन ब्रह्माकार । असता शुक योगीश्वर । तरी सारासार विचार । बोलणें न घडे ॥ ३९॥ जो ब्रह्माकार झाला । तो काष्ठ होऊन पडिला । शुक भागवत बोलिला । परीक्षितीपुढें ॥ ४०॥ निरूपण हें सारासार । बोलिला पाहिजे विचार । धांडोळावें चराचर । दृष्टांताकारणें ॥ ४१॥ क्षण एक ब्रह्मचि व्हावें । क्षण एक दृश्य धांडोळावें । नाना दृष्टांतीं संपादावें । वक्तृत्वासी ॥ ४२॥ असो भागवतनिरूपण । शुक बोलिला आपण । तया अंगीं बद्धपण । लावूं नये कीं ॥ ४३॥ म्हणोनि बोलतां चालतां । निचेष्टित पडिलें नसतां । मुक्ति लाभे सायुज्यता । सद्गुरुबोधें ॥ ४४॥ येक मुक्त एक नित्यमुक्त । एक जाणावे जीवन्मुक्त । येक योगी विदेहमुक्त । समाधानी ॥ ४५॥ सचेतन ते जीवन्मुक्त । अचेतन ते विदेहमुक्त । दोहीवेगळे नित्यमुक्त । योगेश्वर जाणावे ॥ ४६॥ स्वरूपबोधें स्तब्धता । ते जाणावी तटस्थता । तटस्थता आणि स्तब्धता । हा देहसंबंध ॥ ४७॥ येथें अनुभवासीच कारण । येर सर्व निष्कारण । तृप्ति पावावी आपण । आपुल्या स्वानुभवें ॥ ४८॥ कंठमर्याद जेविला । त्यास म्हणती भुकेला । तेणें शब्दें जाजावला । हें तों घडेना ॥ ४९॥ स्वरूपीं नाहीं देह । तेथें कायसा संदेह । बद्ध मुक्त ऐसा भाव । विदेहाचकडे ॥ ५०॥ देहबुद्धी धरून चिंतीं । मुक्त ब्रह्मादिक नव्हेती । तेथें शुकाची कोण गती । मुक्तपणाची ॥ ५१॥ मुक्तपण हेंचि बद्ध । मुक्त बद्ध हें अबद्ध । स्वस्वरूप स्वतःसिद्ध । बद्ध ना मुक्त ॥ ५२॥ मुक्तपणाची पोटीं शिळा । बांधतां जाइजे पाताळा । देहबुद्धीची अर्गळा । स्वरूपीं न संटे ॥ ५३॥ मीपणापासून सुटला । तोचि एक मुक्त जाहला । मुका अथवा बोलिला । तरी तो मुक्त ॥ ५४॥ जयास बांधावें तें वाव । तेथें कैंचा मुक्तभाव । पाहों जातां सकळ वाव । गुणवार्ता ॥ ५५॥ बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो न मे वस्तुतः । गुणस्य मायामूलत्वान्न मे मोक्षो न बंधनम् ॥ १॥ तत्त्वज्ञाता परमशुद्ध । तयासि नाहीं मुक्त बद्ध । मुक्त बद्ध हा विनोद । मायागुणें ॥ ५६॥ जेथें नाम रूप हें सरे । तेथें मुक्तपण कैंचें उरे । मुक्त बद्ध हें विसरे । विसरपणेंशीं ॥ ५७॥ बद्ध मुक्त झाला कोण । ऐसा श्रोता करी प्रश्न । बाधक जाणावें मीपण । धर्त्यास बाधी ॥ ५८॥ एवं हा अवघा श्रम । अहंतेचा जाण भ्रम । मायातीत जो विश्राम । सेविला नाहीं ॥ ५९॥ असो बद्धता आणि मुक्तता । आली कल्पनेच्या माथां । ते कल्पना तरी तत्त्वतां । साच आहे ॥ ६०॥ म्हणोनि हें मृगजळ । माया नाथिलें आभाळ । स्वप्न मिथ्या तात्काळ । जागृतीस होय ॥ ६१॥ स्वप्नीं बद्ध मुक्त झाला । तो जागृतीस नाहीं आला । कैंचा कोण काय झाला । कांहीं कळेना ॥ ६२॥ म्हणोन मुक्त विश्वजन । जयांस झालें आत्मज्ञान । शुद्धज्ञानें मुक्तपण । समूळ वाव ॥ ६३॥ बद्ध मुक्त हा संदेह । धरी कल्पनेचा देह । साधु सदा निःसंदेह । देहातीत वस्तु ॥ ६४॥ आतां असो हें पुढती । पुढें रहावें कोणें रीतीं । तेंचि निरूपण श्रोतीं । सावध परिसावें ॥ ६५॥ हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके बद्धमुक्तनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६॥

जय जय रघुवीर समर्थ ॥ समास सातवा : साधनप्रतिष्ठानिरूपण श्रीराम ॥ वस्तूसि जरी कल्पावें । तरी ते निर्विकल्प स्वभावें । तेथें कल्पनेच्या नावें । शून्याकार ॥ १॥ तथापि कल्पूं जातां । न ये कल्पनेच्या हाता । ओळखी ठायीं न पडे चित्ता । भ्रंश पडे ॥ २॥ कांहीं दृष्टीस न दिसे । मनास तेही न भासे । न भासे न दिसे । कैंसें ओळखावें ॥ ३॥ पाहों जातां निराकार । मनासि पडे शून्याकार । कल्पूं जातां अंधकार । भरला वाटे ॥ ४॥ कल्पूं जातां वाटे काळें । परी ते काळें ना पिंवळें । आरक्त निळें ना ढवळें । वर्णरहित ॥ ५॥ जयास वर्णव्यक्ति नसे । भासाहूनि अनारिसें । रूपचि नाहीं कैसें । ओळखावें ॥ ६॥ न दिसतां ओळखण । किती धरावी आपण । हें तों श्रमासीच कारण । होत असे ॥ ७॥ जो निर्गुण गुणातीत । जो अदृश्य अव्यक्त । जो अचिंत्य चिंतनातीत । परमपुरुष ॥ ८॥ अचिंत्याव्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने । समस्तजगदाधारमूर्तये ब्रह्मणे नमः ॥ १॥ अचिंत्य तें चिंतावें । अव्यक्तास आठवावें । निर्गुणास ओळखावें । कोणेपरी ॥ ९॥ जें दृष्टीसचि न पडे । जें मनासही नातुडे । तया कैसें पाहणें घडे । निर्गुणासी ॥ १०॥ असंगाचा संग धरणें । निरवलंबीं वास करणें । निःशब्दासी अनुवादणें । कोणेपरी ॥ ११॥ अचिंत्यासि चिंतूं जातां । निर्विकल्पासि कल्पितां । अद्वैताचें ध्यान करितां । द्वैतचि उठे ॥ १२॥ आतां ध्यानचि सांडावें । अनुसंधान तें मोडावें । तरी मागुतें पडावें । महासंशयीं ॥ १३॥ द्वैताच्या भेणें अंतरीं । वस्तु न पाहिजे तरी । तेणें समाधाना उरी । कदा असेचिना ॥ १४॥ सवे लावितां सवे पडे । सवे पडतां वस्तु आतुडे । नित्यानित्यविचारें घडे । समाधान ॥ १५॥ वस्तु चिंतितां द्वैत उपजे । सोडी करितां कांहींच नुमजे । शून्यत्वें संदेहीं पडिजे । विवेकेंविण ॥ १६॥ म्हणोनि विवेक धरावा । ज्ञानें प्रपंच सारावा । अहंभाव ओसरावा । परी तो ओसरेना ॥ १७॥ परब्रह्म तें अद्वैत । कल्पितांच उठे द्वैत । तेथें हेतु आणि दृष्टांत । कांहींच न चले ॥ १८॥ तें आठवितां विसरिजे । कां तें विसरोन आठविजे । जाणोनियां नेणिजे । परब्रह्म तें ॥ १९॥ त्यास न भेटतां होय भेटी । भेटों जातां पडे तुटी । ऐसी हे नवल गोष्टी । मुकेपणाची ॥ २०॥ तें साधूं जातां साधवेना । नातरी सोडितां सुटेना । लागला संबंध तुटेना । निरंतर ॥ २१॥ तें असतचि सदा असे । नातरी पाहतां दुराशे । न पाहतां प्रकाशे । जेथें तेथें ॥ २२॥ जेथें अपाय तेथें उपाय । आणि उपाय तोचि अपाय । हें अनुभवेंविण काय । उमजों जाणे ॥ २३॥ तें नुमजतांचि उमजे । उमजोन कांहींच नुमजे । तें वृत्तिविण पाविजे । निवृत्तिपद ॥ २४॥ तें ध्यानीं धरितां नये । चिंतनीं चिंतावें तें काये । मनामध्यें न समाये । परब्रह्म तें ॥ २५॥ त्यास उपमे द्यावें जळ । तरी तें निर्मळ निश्चळ । विश्व बुडालें सकळ । परी तें कोरडेंचि असे ॥ २६॥ नव्हे प्रकाशासारिखें । अथवा नव्हे काळोखें । आतां तें कासयासारिखें । सांगावें हो ॥ २७॥ ऐसें ब्रह्म निरंजन । कदा नव्हे दृश्यमान । लावावें तें अनुसंधान । कोणे परी ॥ २८॥ अनुसंधान लावूं जातां । कांहीं नाहीं वाटे आतां । नेणे मनाचिये माथां । संदेह वाजे ॥ २९॥ लटिकेंचि काय पहावें । कोठें जाऊन रहावें । अभाव घेतला जीवें । सत्यस्वरूपाचा ॥ ३०॥ अभावचि म्हणों सत्य । तरी वेद शास्त्रें कैसें मिथ्य । आणि व्यासादिकांचें कृत्य । वाउगें नव्हे ॥ ३१॥ म्हणोनि मिथ्या म्हणतां नये । बहुत ज्ञानाचे उपाय । बहुतीं निर्मिलीं तें काय । मिथ्या म्हणावें ॥ ३२॥ अद्वैतज्ञानाचा उपदेश । गुरुगीता तो महेश । सांगतां होय पार्वतीस । महाज्ञान ॥ ३३॥ अवधूत गीता केली । गोरक्षास निरूपिली । ते अवधूतगीता बोलिली । ज्ञानमार्ग ॥ ३४॥ विष्णु होऊन राजहंस । विधीस केला उपदेश । ते हंसगीता जगदीश । बोलिला स्वमुखें ॥ ३५॥ ब्रह्मा नारदातें उपदेशित । चतुःश्लोकी भागवत । पुढें व्यासमुखें बहुत । विस्तारलें ॥ ३६॥ वासिष्ठसार वसिष्ठ ऋषी । सांगता झाला रघुनाथासी । कृष्ण सांगे अर्जुनासी । सप्तश्लोकी गीता ॥ ३७॥ ऐसें सांगावें तें किती । बहुत ऋषि बोलिले बहुतीं । अद्वैतज्ञान आदि अंतीं । सत्यचि असे ॥ ३८॥ म्हणोन मिथ्या आत्मज्ञान । म्हणतां पाविजे पतन । प्रज्ञेरहित ते जन । तयांस हें कळेना ॥ ३९॥ जेथें शेषाची प्रज्ञा मंदली । श्रुतीस मौनमुद्रा पडिली । जाणपणें न वचे वदली । स्वरूपस्थिती ॥ ४०॥ आपणास नुमजे बरवें । म्हणोनि मिथ्या कैसें करावें । नातरी सुदृढ धरावें । सद्गुरुमुखें ॥ ४१॥ मिथ्या तेंचि सत्य झालें । सत्य असोनि मिथ्या केलें । संदेहसागरीं बुडालें । अकस्मात मन ॥ ४२॥ मनास कल्पायाची सवे । मनें कल्पिलें तें नव्हे । तेणें गुणें संदेह धांवे । मीपणाचेनि पंथें ॥ ४३॥ तरी तो पंथचि मोडावा । मग परमात्मा जोडावा । समूळ संदेह तोडावा । साधूचेनि संगतीं ॥ ४४॥ मीपण शस्त्रें तुटेना । मीपण फोडितां फुटेना । मीपण सोडितां सुटेना । कांहीं केल्या ॥ ४५॥ मीपणें वस्तु नाकळे । मीपणें भक्ति मावळे । मीपणें शक्ति गळे । वैराग्याची ॥ ४६॥ मीपणें प्रपंच न घडे । मीपणें परमार्थ बुडे । मीपणें सकळही उडे । यश कीर्ति प्रताप ॥ ४७॥ मीपणें मैत्री तुटे । मीपणें प्रीति आटे । मीपणें लिगटे । अभिमान अंगीं ॥ ४८॥ मीपणें विकल्प उठे । मीपणें कलह सुटे । मीपणें संमोह फुटे । ऐक्यतेचा ॥ ४९॥ मीपण कोणासीच न साहे । तें भगवंतीं कैसेनि साहे । म्हणून मीपण सांडून राहे । तोचि समाधानी ॥ ५०॥ मीपण कैसे । म् त्यागावें । ब्रह्म कैसें अनुभवावें । समाधान कैसें पावावें । निःसंगपणें ॥ ५१॥ आणिक एक समाधान । मीपणेंविण साधन । करूं जाणे तोचि धन्य । समाधानी ॥ ५२॥ मी ब्रह्मचि झालों स्वतां । साधन करील कोण आतां । ऐसें मनीं कल्पूं जातां । कल्पनाचि उठे ॥ ५३॥ ब्रह्मीं कल्पना न साहे । तेचि तेथें उभी राहे । तयेसी शोधूनि पाहे । तोचि साधु ॥ ५५॥ निर्विकल्पासि कल्पावें । परी कल्पिलें तें आपण न व्हावें । मीपणास त्यागावें । येणें रीतीं ॥ ५६॥ ब्रह्मविद्येच्या लपणीं । कांहींच न व्हावें असोनी । दक्ष आणि समाधानी । तोचि हें जाणें ॥ ५७॥ जयास आपण कल्पावें । तेंचि आपण स्वभावें । येथें कल्पनेच्या नांवें । शून्य आलें ॥ ५८॥ पदींहून चळों नये । करावे साधनउपाये । तरीच सांपडे सोये । अलिप्तपणाची ॥ ५९॥ राजा राजपदीं असतां । उगीच चाले सर्व सत्ता । साध्यचि होऊन तत्त्वतां । साधन करावें ॥ ६०॥ साधन आलें देहाच्या माथां । आपण देह नव्हे सर्वथा । ऐसा करून अकर्ता । सहजचि आहे ॥ ६१॥ देह आपण ऐसें कल्पावें । तरीच साधन त्यागावें । देहातीत असतां स्वभावें । देह कैंचा ॥ ६२॥ ना तें साधन ना तें देह । आपण आपला निःसंदेह । देहींच असोन विदेह । स्थिति ऐशी ॥ ६३॥ साधनेंविण ब्रह्म होतां । लागों पाहे देहममता । आळस प्रबळे तत्त्वतां । ब्रह्मज्ञानमिसें ॥ ६४॥ परमार्थमिसें अर्थ जागे । ध्यानमिसें निद्रा लागे । मुक्तिमिसें दोष भोगे । अनर्गळता ॥ ६५॥ निरूपणमिसें निंदा घडे । संवादमिसें विवाद पडे । उपाधिमिसें येऊन जडे । अभिमान अंगीं ॥ ६६॥ तैसा ब्रह्मज्ञानमिसें । आळस अंतरीं प्रवेशे । म्हणे साधनाचें पिसें । काय करावें ॥ ६७॥ किं करोमि क्व गच्छामि किं गृह्णामि त्यजामि किम् । आत्मना पूरितं सर्वं महाकल्पांबुना यथा ॥ १॥ वचन आधारीं लाविलें । जैसें शस्त्र फिरविलें । स्वतां हाणोनि घेतलें । जयापरी ॥ ६८॥ तैसा उपायाचा अपाय । विपरीतपणें स्वहित जाय । साधन सोडितां होय । मुक्तपणें बद्ध ॥ ६९॥ साधन करितांच सिद्धपण । हातींचें जाईल निघोन । तेणेंगुणें साधन । करूंच नावडे ॥ ७०॥ लोक म्हणती हा साधक । हेचि लज्जा वाटे एक । साधन करिती ब्रह्मादिक । हें ठाउकें नाहीं ॥ ७१॥ आतां असो हे अविद्या । अभ्याससारिणी विद्या । अभ्यासें पाविजे आद्या । पूर्ण ब्रह्म ॥ ७२॥ अभ्यास करावा कवण । ऐसा श्रोता करी प्रश्न । परमार्थाचें साधन । बोलिलें पाहिजे ॥ ७३॥ याचें उत्तर श्रोतयासी । दिधलें पुढियलें समासीं । निरूपिलें साधनासी । परमार्थाच्या ॥ ७४॥ हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके साधनप्रतिष्ठानिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७॥

समास आठवा : श्रवणनिरूपण श्रीराम ॥ ऐक परमार्थाचें साधन । जेणें होय समाधान । तें तूं जाण गा श्रवण । निश्चयेंसीं ॥ १॥ श्रवणें आतुडे भक्ती । श्रवणें उद्भवे विरक्ती । श्रवणें तुटे आसक्ती । विषयांची ॥ २॥ श्रवणें घडे चित्तशुद्धी । श्रवणें होय दृढ बुद्धी । श्रवणें तुटे उपाधी । अभिमानाची ॥ ३॥ श्रवणें निश्चयो घडे । श्रवणें ममता मोडे । श्रवणें अंतरीं जोडे । समाधान ॥ ४॥ श्रवणें आशंका फिटे । श्रवणें संशयो तुटे । श्रवण होतां पालटे । पूर्वगुण आपुला ॥ ५॥ श्रवणें आवरे मन । श्रवणें घडे समाधान । श्रवणें तुटे बंधन । देहबुद्धीचें ॥ ६॥ श्रवणें मीपण जाय । श्रवणें धोका न ये । श्रवणें नाना अपाय । भस्म होती ॥ ७॥ श्रवणें होय कार्यसिद्धि । श्रवणें लागे समाधी । श्रवणें घडे सर्वसिद्धी । समाधानाची ॥ ८॥ सत्संगावरी श्रवण । तेणें कळे निरूपण । श्रवणें हो)इजे आपण । तदाकार ॥ ९॥ श्रवणें प्रबोध वाढे । श्रवणें प्रज्ञा चढे । श्रवणें विषयांचे ओढे । तुटोनि जाती ॥ १०॥ श्रवणें विचार कळे । श्रवणें ज्ञान हें प्रबळे । श्रवणें वस्तु निवळे । साधकांसी ॥ ११॥ श्रवणें सद्बुद्धि लागे । श्रवणें विवेक जागे । श्रवणें मन हें मागे । भगवंतासी ॥ १२॥ श्रवणें कुसंग तुटे । श्रवणें काम ओहटे । श्रवणें धोका आटे । एकसरां ॥ १३॥ श्रवणें मोह नासे । श्रवणें स्फूर्ति प्रकाशे । श्रवणें सद्वस्तु भासे । निश्चयात्मक ॥ १४॥ श्रवणें होय उत्तम गती । श्रवणें आतुडे शांती । श्रवणें पाविजे निवृत्ती । अचळपद ॥ १५॥ श्रवणा-ऐसें सार नाहीं । श्रवणें घडे सर्व कांहीं । भवनदीच्या प्रवाहीं । तरणोपाय श्रवणें ॥ १६॥ श्रवण भजनाचा आरंभ । श्रवण सर्वीं सर्वारंभ । श्रवणें होय स्वयंभ । सर्व कांहीं ॥ १७॥ प्रवृत्ति अथवा निवृत्ति । श्रवणेंविण न घडे प्राप्ती । हे तों सकळांस प्रचीती । प्रत्यक्ष आहे ॥ १८॥ ऐकिल्याविण कळेना । हें ठाउकें आहे जनां । त्याकारणें मूळ प्रयत्ना । श्रवण आधीं ॥ १९॥ जें जन्मीं ऐकिलेंचि नाहीं । तेथें पडिजे संदेहीं । म्हणोनिया दुजें कांहीं । साम्यता न घडे ॥ २०॥ बहुत साधनें पाहतां । श्रवणास न घडे साम्यता । श्रवणेंविण तत्त्वता । कार्य न चले ॥ २१॥ न देखतां दिनकर । पडे अवघा अंधकार । श्रवणेंविण प्रकार । तैसा होय ॥ २२॥ कैशी नवविधा भक्ती । कैशी चतुर्विधा मुक्ती । कैशी आहे सहजस्थिती । हें श्रवणेंविण न कळे ॥ २३॥ न कळे षट्कर्माचरण । न कळे कैसें पुरश्चरण । न कळे कैसें उपासन । विधियुक्त ॥ २४॥ नाना व्रतें नाना दानें । नाना तपें नाना साधनें । नाना योग तीर्थाटणें । श्रवणेंविण न कळती ॥ २५॥ नाना विद्या पिंडज्ञान । नाना तत्त्वांचें शोधन । नाना कळा ब्रह्मज्ञान । श्रवणेंविण न कळे ॥ २६॥ अठरा भार वनस्पती । एक्या जळें प्रबळती । एक्या रसें उत्पत्ती । सकळ जीवांची ॥ २७॥ सकळ जीवांस एक पृथ्वी । सकळ जीवांस एक रवी । सकळ जीवांस वर्तवी । एक वायु ॥ २८॥ सकळ जीवांस एक पैस । जयास बोलिजे आकाश । सकळ जीवांचा वास । एक परब्रह्मीं ॥ २९॥ तैसें सकळ जीवांस मिळोन । सार एकचि साधन । तें हें जाण श्रवण । प्राणिमात्रांसीं ॥ ३०॥ नाना देश भाषा मतें । भूमंडळीं असंख्यातें । सर्वांस श्रवणापरतें । साधनचि नाहीं ॥३१॥ श्रवणें घडे उपरती । बद्धाचे मुमुक्षु होती । मुमुक्षूचे साधक अती । नेमेंसिं चालती ॥ ३२॥ साधकांचे होति सिद्ध । अंगीं बाणतां प्रबोध । हें तों आहे प्रसिद्ध । सकळांस ठाउकें ॥ ३३॥ ठायींचे खळ चांडाळ । तेचि होती पुण्यशीळ । ऐसा गुण तात्काळ । श्रवणाचा ॥ ३४॥ जो दुर्बुद्धि दुरात्मा । तोचि होय पुण्यात्मा । अगाध श्रवणाचा महिमा । बोलिला न वचे ॥ ३५॥ तीर्थव्रतांची फळश्रुती । पुढें होणार सांगती । तैसें नव्हे हातींच्या हातीं । सप्रचीत श्रवणें ॥ ३६॥ नाना रोग नाना व्याधी । तत्काळ तोडिजे औषधी । तैशी आहे श्रवणसिद्धी । अनुभवी जाणती ॥ ३७॥ श्रवणाचा विचार कळे । तरीच भाग्यश्री प्रबळे । मुख्य परमात्मा आकळे । स्वानुभवासी ॥ ३८॥ या नांव जाणावें मनन । अर्थालागीं सावधान । निदिध्यासें समाधान । होत असे ॥ ३९॥ बोलिल्याचा अर्थ कळे । तरीच समाधान निवळे । अकस्मात अंतरीं वोळे । निःसंदेह ॥ ४०॥ संदेह जन्माचें मूळ । तें श्रवणें होय निर्मूळ । पुढें सहजचि प्रांजळ । समाधान ॥ ४१॥ जेथें नाहीं श्रवण मनन । तेथें कैंचें समाधान । मुक्तपणाचें बंधन । जडलें पायीं ॥ ४२॥ मुमुक्षु साधक अथवा सिद्ध । श्रवणेंविण तो बद्ध । श्रवणमननें शुद्ध । चित्तवृत्ति होय ॥ ४३॥ जेथें नाहीं नित्य श्रवण । तें जाणावें विलक्षण । तेथें साधकें एक क्षण । क्रमूं नये सर्वथा ॥ ४४॥ जेथें नाहीं श्रवणस्वार्थ । तेथें कैंचा हो परमार्थ । मागें केलें तितुकें व्यर्थ । श्रवणेंविण होय ॥ ४५॥ तस्मात् श्रवण करावें । साधन मनीं धरावें । नित्य नेमें तरावें । संसारसागरीं ॥ ४६॥ सेविलेंचि सेवावें अन्न । घेतलेंचि घ्यावें जीवन । तैसें श्रवण मनन । केलेंचि करावें ॥ ४७॥ श्रवणाचा अनादर । आळस करी जो नर । त्याचा होय अपहार । स्वहिताविषयीं ॥ ४८॥ आळसाचें संरक्षण । परमार्थाची बुडवण । याकारणें नित्य श्रवण । केलेंचि पाहिजे ॥ ४९॥ आतां श्रवण कैसें करावें । कोण्या ग्रंथास पाहावें । पुढिलिये समासीं आघवें । सांगिजेल ॥ ५०॥ हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके श्रवणनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८॥

समास नववा : श्रवणनिरूपण श्रीराम ॥ आतां श्रवण कैसें करावें । तेंही सांगिजेल स्वभावें । श्रोतीं अवधान द्यावें । एकचित्तें ॥ १॥ एक वक्तृत्व श्रवणीं पडे । तेणें झालें समाधान मोडे । केला निश्चयो विघडे । अकस्मात ॥ २॥ तें वक्तृत्व त्यागावें । जें मायिक स्वभावें । तेथें निश्चयाच्या नांवें । शून्याकार ॥ ३॥ एक्या ग्रंथें निश्चयो केला । तो दुजयानें उडविला । तेणें संशयचि वाढला । जन्मवरी ॥ ४॥ जेथें संशय तुटती । होय आशंकानिवृत्ती । अद्वैतग्रंथ परमार्थीं । श्रवण करावे ॥ ५॥ जो मोक्षाचा अधिकारी । तो परमार्थपंथ धरी । प्रीति लागली अंतरीं । अद्वैतग्रंथाची ॥ ६॥ जेणें सांडिला इहलोक । जो परलोकींचा साधक । तेणें पाहावा विवेक । अद्वैतशास्त्रीं ॥ ७॥ जयास पाहिजे अद्वैत । तयापुढें ठेवितां द्वैत । तेणें क्षोभलें उठे चित्त । तया श्रोतयांचें ॥ ८॥ आवडीसारिखें मिळे । तेणें सुखचि उचंबळे । नाहीं तरी कंटाळे । मानस ऐकतां ॥ ९॥ ज्याची उपासना जैसी । त्यासि प्रीति वाढे तैसी । तेथें वर्णितां दुजयासी । प्रशस्त न वाटे ॥ १०॥ प्रीतीचें लक्षण ऐसें । अंतरीं उठे अनायासें । पाणी पाणवाटें जैसें । आपणचि धांवे ॥ ११॥ तैसा जो आत्मज्ञानी नर । तयास नावडे इतर । तेथें पाहिजे सारासार- । विचारणा ते ॥ १२॥ जेथें कुळदेवी भगवती । तेथें पाहिजे सप्तशती । इतर देवांची स्तुती । कामा न ये सर्वथा ॥ १३॥ घेतां अनंताच्या व्रता । तेथें नलगे भगवद्गीता । साधुजनांसि वार्ता । फळाशेचि नाहीं ॥ १४॥ वीरकंकण घालितां नाकीं । परी तें शोभा पावेना कीं । जेथील तेथें आणिकीं । कामा न ये सर्वथा ॥ १५॥ नाना माहात्म्यें बोलिलीं । जेथील तेथें वंद्य झालीं । विपरीत करून वाचिलीं । तरी तें विलक्षण ॥ १६॥ मल्हारीमाहात्म्य द्वारकेसी । द्वारकामाहात्म्य नेलें काशीसी । काशीमाहात्म्य व्यंकटेशीं । शोभा न पावे ॥ १७॥ ऐसें सांगतां असे वाड । परी जेथील तेथेंचि गोड । तैसी ज्ञानियांस चाड । अद्वैतग्रंथाची ॥ १८॥ योगियांपुढे राहाण । परीक्षावंतापुढें पाषाण । पंडितापुढें डफगाण । शोभा न पावे ॥ १९॥ वेदज्ञापुढें जती । निस्पृहापुढें फळश्रुति । ज्ञानियापुढें पोथी । कोकशास्त्राच्ची ॥ २०॥ ब्रह्मचर्यापुढें नाचणी । रासक्रीडा निरूपणीं । राजहंसापुढें पाणी । ठेविलें जैसें ॥ २१॥ तैसें अंतर्निष्ठापुढें । ठेविलें शृंगारी टीपडें । तेणें त्याचें कैसें घडे । समाधान । २२॥ रायास रंकाची आशा । तक्र सांगणें पीयूषा । संन्याशास वोवसा । उच्छिष्टचांडाळीचा ॥ २३॥ कर्मनिष्ठा वशीकरण । पंचाक्षरीया निरूपण । तेथें भंगे अंतःकरण । सहजचि त्याचें ॥ २४॥ तैसे पारमार्थिक जन । तयांस नसतां आत्मज्ञान । ग्रंथ वाचितां समाधान । होणार नाहीं ॥ २५॥ आतां असो हें बोलणें । जयास स्वहित करणें । तेणें सदा विवरणें । अद्वैतग्रंथीं ॥ २६॥ आत्मज्ञानी एकचित्त । तेणें पाहणें अद्वैत । एकांत स्थळीं निवांत । समाधान ॥ २७॥ बहुत प्रकारें पाहतां । ग्रंथ नाहीं अद्वैतापरता । परमार्थास तत्वतां । तारूंच कीं ॥ २८॥ इतर जे प्रापंचिक । हास्य विनोद नवरसिक । हित नव्हे तें पुस्तक । परमार्थासी ॥ २९॥ जेणें परमार्थ वाढे । अंगीं अनुताप चढे । भक्तिसाधन आवडे । त्या नांव ग्रंथ ॥ ३०॥ जो ऐकतांच गर्व गळे । कां ते भ्रांतीच मावळे । नातरी एकसरी वोळे । मन भगवंतीं ॥ ३१॥ जेणें होय उपरती । अवगुण अवघे पालटती । जेणें चुके अधोगती । त्या नांव ग्रंथ ॥ ३२॥ जेणें धारिष्ट चढे । जेणें परोपकार घडे । जेणें विषयवासना मोडे । त्या नांव ग्रंथ ॥ ३३॥ जेणें ग्रंथ परत्र साधन । जेणें ग्रंथें होय ज्ञान । जेणें होइजे पावन । त्या नांव ग्रंथ ॥ ३४॥ ग्रंथ बहुत असती । नाना विधानें फळश्रुती । जेथें नुपजे विरक्ती भक्ति । तो ग्रंथचि नव्हे ॥ ३५॥ मोक्षेंविण फळश्रुती । ते दुराशेची पोथी । ऐकतां ऐकतां पुढती । दुराशाच वाढे ॥ ३६॥ श्रवणीं लोभ उपजेल जेथें । विवेक कैंचा असेल तेथें । बैसलीं दुराशेचीं भूतें । तयां अधोगती ॥ ३७॥ ऐकोनीच फळश्रुती । पुढें तरी पावों म्हणती । तयां जन्म अधोगती । सहजचि जाहली ॥ ३८॥ नाना फळें पक्षी खाती । तेणेंचि तयां होय तृप्ती । परी त्या चकोराचे चित्तीं । अमृत वसे ॥ ३९॥ तैसें संसारी मनुष्य । पाहे संसाराची वास । परी जे भगवंताचे अंश । ते भगवंत इच्छिती ॥ ४०॥ ज्ञानियास पाहिजे ज्ञन । भजकास पाहिजे भजन । साधकास पाहिजे साधन । इच्छेसारिखें ॥ ४१॥ परमार्थ्यास पाहिजे परमार्थ । स्वार्थ्यास पाहिजे स्वार्थ । कृपणास पाहिजे अर्थ । मनापासूनी ॥ ४२॥ योगियास पाहिजे योग । भोगियास पाहिजे भोग । रोगियास पाहिजे रोग- । हरती मात्रा ॥ ४३॥ कवीस पाहिजे प्रबंध । तार्किकास पाहिजे तर्कवाद । भाविकास संवाद । गोड वाटे ॥ ४४॥ पंडितास पाहिजे व्युत्पत्ती । विद्वानास अध्ययनप्रीती । कलावंतास आवडती । नाना कळा ॥ ४५॥ हरिदासांस आवडे कीर्तन । शुचिर्भूतांस संध्यास्नान । कर्मनिष्ठांस विधिविधान । पाहिजे तें ॥ ४६॥ प्रेमळास पाहिजे करुणा । दक्षता पाहिजे विचक्षणा । चातुर्य पाहे शहाणा । आदरेंसीं ॥ ४७॥ भक्त पाहे मूर्तिध्यान । संगीत पाहे तालज्ञान । रागज्ञानी तानमान । मूर्च्छना पाहे ॥ ४८॥ योगाभ्यासी पिंडज्ञान । तत्त्वज्ञानी तत्त्वज्ञान । नाडीज्ञानी मात्राज्ञान । पाहतसे ॥ ४९॥ कामिक पाहे कोकशास्त्र । चेटकी पाहे चेटकीमंत्र । यंत्री पाहे नाना यंत्र । आदरेंसी ॥ ५०॥ टवाळासि आवडे विनोद । उन्मतास नाना छंद । तामसास प्रमाद । गोड वाटे ॥ ५१॥ मूर्ख होय नादलुब्धी । निंदक पाहे उणी संधी । पापी पाहे पापबुद्धी । लावून अंगीं ॥ ५२॥ एकां पाहिजे रसाळ । एकां पाहिजे पाल्हाळ । एकां पाहिजे केवळ । साबडी भक्ती ॥ ५३॥ आगमी पाहे आगम । शूर पाहे संग्राम । एक पाहती नाना धर्म । इच्छेसारिखे ॥ ५४॥ मुक्त पाहे मुक्तलीला । सर्वज्ञ पाहे सर्वज्ञकळा । ज्योतिषी भविष्य पिंगळा । वर्णूं पाहे ॥ ५५॥ ऐसें सांगावें तें किती । आवडीसारिखें ऐकती । नाना पुस्तकें वाचिती । सर्वकाळ ॥ ५६॥ परी परत्रसाधनेंविण । म्हणों नये तें श्रवण । जेथें नाहीं आत्मज्ञान । तया नांव करमणूक ॥ ५७॥ गोडीविण गोडपण । नाकेंविण सुलक्षण । ज्ञानेंविण निरूपण । बोलोंचि नये ॥ ५८॥ आतां असो हें बहुत । ऐकावा परमार्थ ग्रंथ । परमार्थग्रंथेंविण व्यर्थ । गाथागोवी ॥ ५९॥ म्हणोनि नित्यानित्यविचार । जेथें बोलिला सारासार । तोचि ग्रंथ पैलपार । पाववी विवेकें ॥ ६०॥ हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके श्रवणनिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९॥

समास दहावा : देहान्तनिरूपण श्रीराम ॥ मिथ्या तेंचि झालें सत्य । सत्य तेंचि झालें असत्य । मायाविभ्रमाचें कृत्य । ऐसें असे पाहतां ॥ १॥ सत्य कळावयाकारणें । बोलिलीं नाना निरूपणें । तरी उठेना धरणें । असत्याचें ॥ २॥ असत्य अंतरीं बिंबलें । न सांगतां तें दृढ झालें । सत्य असोन हरपलें । जेथील तेथें ॥ ३॥ वेद शास्त्रें पुराणें सांगती । सत्याचा निश्चयो करिती । तरि न ये आत्मप्रचीती । सत्य स्वरूप ॥ ४॥ सत्य असोन आच्छादलें । मिथ्या असोन सत्य झालें । ऐसें विपरीत वर्तलें । देखतदेखतां ॥ ५॥ ऐसी मायेची करणी । कळों आली तत्क्षणीं । संतसंगें निरूपणीं । विचार घेतां ॥ ६॥ मागां झालें निरूपण । देखिलें आपणासि आपण । तेणें बाणली खूण । परमार्थाची ॥ ७॥ तेणें समाधान झालें । चित्त चैतन्यीं मिळालें । निजस्वरूपें ओळखिलें । निजवस्तूसी ॥ ८॥ प्रारब्धें टाकिला देहो । बोधें फिटला संदेहो । आतांचि पडो अथवा राहो । मिथ्या कलेवर ॥ ९॥ ज्ञानियांचें जें शरीर । तें मिथ्यत्वें निर्विकार । जेथें पडे तेचि सार । पुण्यभूमी ॥ १०॥ साधुदर्शनें पावन तीर्थ । पुरती त्यांचे मनोरथ । साधू न येतां जिणें व्यर्थ । तया पुण्यक्षेत्रांचें ॥ ११॥ पुण्यनदीचें जें तीर । तेथें पडावें हें शरीर । हा इतर जनांचा विचार । साधु तोंचि नित्यमुक्त ॥ १२॥ उत्तरायण तें उत्तम । दक्षिणायन तें अधम । हा संदेहीं वसे भ्रम । साधु तो निःसंदेही ॥ १३॥ शुक्लपक्ष उत्तरायण । गृहीं दीप दिवामरण । अंतीं रहावें स्मरण । गतीकारणें ॥ १४॥ इतुकें नलगे योगियासी । तो जितचि मुक्त पुण्यराशी । तिलांजली पापपुण्यासी । दिधली तेणें ॥ १५॥ देहाचा अंत बरा झाला । देह सुखरूप गेला । त्यास म्हणती धन्य झाला । अज्ञान जन ॥ १६॥ जनांचें विपरीत मत । अंतीं भेटतो भगवंत । ऐसें कल्पून घात । करिती आपुला स्वयें ॥ १७॥ जितां सार्थक नाहीं केलें । व्यर्थ आयुष्य निघोन गेलें । मुळीं धान्यचि नाहीं पेरिलें । तें उगवेल कैंचें ॥ १८॥ जरी केलें ईश्वरभजन । तरी तो होइजे पावन । जैसें वेव्हारितां धन । राशी माथां लाभे ॥ १९॥ दिधल्याविण पाविजेना । पेरिल्याविण उगवेना । ऐसें हें वाक्य जनां । ठाउकेंचि आहे ॥ २०॥ न करितां सेवेच्या व्यापारा । स्वामीस म्हणे कोठें मुशारा । तैसें अंतीं अभक्त नरा । स्वहित न घडे ॥ २१॥ जितां नाहीं भगवद्भक्ती । मेल्या कैंची होईल मुक्ती । असो जे जे ऐसें करिती । ते ते पावती तैसेंचि ॥ २२॥ एवं न करितां भगवद्भजन । अंतीं न होइजे पावन । जरी आलें बरवें मरण । तरी भक्तिविण अधोगती ॥ २३॥ म्हणोन साअधूनें आपुलें । जीत असतांच सार्थक केलें । शरीर कारणीं लागलें । धन्य त्याचें ॥ २४॥ जे कां जीवन्मुक्त ज्ञानी । त्यांचें शरीर पडो रानीं । अथवा पडो स्मशानीं । तरी ते धन्य झाले ॥ २५॥ साधूंचा देह खितपला । अथवा श्वानादिकीं भक्षिला । हें प्रशस्त न वाटे जनांला । मंदबुद्धीस्तव ॥ २६॥ अंत बरा नव्हेचि म्हणोन । कष्टी होती इतर जन । परी ते बापुडे अज्ञान । नेणती वर्म ॥ २७॥ जो जन्मलाचि नाहीं ठायींचा । त्यास मृत्यु येईल कैंचा । विवेकबळें जन्ममृत्यूचा । घोट भरिला जेणें ॥ २८॥ स्वरूपानुसंधानबळें । सगळीच माया नाडळे । तयाचा पार न कळे । ब्रह्मादिकांसी ॥ २९॥ तो जित असतांचि मेला । मरणास मारून जियाला । जन्म मृत्यु न स्मरे त्याला । विवेकबळें ॥ ३०॥ तो जनीं दिसतो परी वेगळा । वर्ततां भासे निराळा । दृश्य पदार्थ त्या निर्मळा । स्पर्शलाचि नाहीं ॥ ३१॥ असो ऐसे साधु जन । त्यांचें घडलिया भजन । तेणें भजनें पावन । इतर जन होती ॥ ३२॥ सद्गुरूचा जो अंकित साधक । तेणें केलाच करावा विवेक । विवेक केलिया तर्क । फुटे निरूपणीं ॥ ३३॥ हेंचि साधकासी निरवणें । अद्वैत प्रांजळ निरूपणें । तुमचेंहि समाधान बाणे । साधूच ऐसें ॥ ३४॥ जो संतांसी शरण गेला । तो संतचि होऊन ठेला । इतर जनां उपयोगा आला । कृपाळुपणें ॥ ३५॥ ऐसें संतांचें महिमान । संतसंगें होतें ज्ञान । सत्संगापरतें साधन । आणिक नाहीं ॥ ३६॥ गुरुभजनाचेनि आधारें । निरूपणाचेनि विचारें । क्रियाशुद्ध निर्धारें । पाविजे पद ॥ ३७॥ परमार्थाचें जन्मस्थान । तेंचि सद्गुरूचें भजन । सद्गुरुभजनें समाधान । अकस्मात बाणे ॥ ३८॥ देह मिथ्या जाणोनि जीवें । याचें सार्थकचि करावें । भजनभावें तोषवावें । चित्त सद्गुरूचें ॥ ३९॥ शरणागताची वाहे चिंता । तो एक सद्गुरु दाता । जैसें बाळका वाढवी माता । नाना यत्नेंकरूनी ॥ ४०॥ यस्य देवे पराभक्तिर्यथा देवे तथा गुरौ ॥ म्हणोनि सद्गुरूचें भजन । जयास घडे तोचि धन्य । सद्गुरुवीण समाधान । आणिक नाहीं ॥ ४१॥ सरली शब्दाची खटपट । आला ग्रंथाचा शेवट । येथें सांगितलें स्पष्ट । सद्गुरुभजन ॥ ४२॥ सद्गुरुभजनापरतें कांहीं । मोक्षदायक दुसरें नाहीं । जयांस न मने तिहीं । अवलोकावी गुरुगीता ॥ ४३॥ तेथें निरूपिलें बरवें । पार्वतीप्रति सदाशिवें । याकारणें सद्भावें । सद्गुरुचरण सेवावे ॥ ४४॥ जो ये ग्रंथींचा विवेक । विवंचून पाहे साधक । तयास सांपडे एक । निश्चयो ज्ञानाचा ॥ ४५॥ ज्या ग्रंथीं बोलिलें अद्वैत । तो म्हणूं नये प्राकृत । सत्य जाणावा वेदांत । अर्थाविषयीं ॥ ४६॥ प्राकृतें वेदांत कळे । सकळ शास्त्रीं पाहतां मिळे । आणि समाधान निवळे । अंतर्यामीं ॥ ४७॥ तें प्राकृत म्हणों नये । जेथें ज्ञानाचा उपाय । मूर्खासि हें कळे काय । मर्कटा नारिकेळ जैसें ॥ ४८॥ आतां असो हें बोलणें । अधिकारपरत्वें घेणें । शिंपीमधील मुक्त उणें । म्हणों नये ॥ ४९॥ जेथें नेति नेति म्हणती श्रुती । तेथें न चले भाषाव्युत्पत्ती । परब्रह्म आदि अंतीं । अनिर्वाच्य ॥ ५०॥ हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके देहातीतनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १०॥ ॥ दशक सातवा समाप्त ॥