Monday 5 June 2017

पुरुषांचे माहेरपण लेखिका - प्रज्ञा रामतीर्थकर

माझी मोठी नणंद एक महिना आमच्या घरी म्हणजे तिच्या माहेरी राहून गेली...या एका महिन्यात, तिने बरेच  पदार्थ करून आम्हाला खाऊ घातले... रोज काहीतरी नवीन "खानदेशी" पदार्थ बनवून(माझ्यासाठी नवीन प्रकार) ताई आपल्या भावांना खुश करायची...माझा नवरा आणि दीर, दोघेपण "खानदेशी" खवैय्ये असल्याने त्याना ताई आल्यापासून इतके छान छान जेवण मिळू लागले की विचारू नका...कळणाची भाकर, मिरचीचा ठेचा, वांग्याचे भरीत, बट्ट्या, फुणके, सांजोऱ्या ,पुरणपोळी, आमरस-शेवया असे खानदेशी जेवणाचे बेत रोज चालू होते...दोघांची तब्येत एकदम सुधारली. ताई रोज जुन्या आठवणी सांगून, वेळोवेळी भावांना डोक्याला तेल चोपडून, त्यांची आस्थेने विचारपूस करून, त्याना एक महिना का होईना,  एका जुन्या पण हव्या हव्या वाटणार्‍या लहानपणात घेऊन गेली.   

"पुरुषांचे माहेरपण" ...वाचायला थोडे विचित्र वाटतेच. कारण आपण माहेरपण फक्त बायकांचे करतो, पुरुषांचे नाही...बायका आपली मायेची माणसे सोडून सासरी राहायला जातात, म्हणून त्यांना वर्षातून एकदा तरी माहेरपण हवे असते.माहेरपण हे बायकांचे मायेच्या माणसांना भेटण्याचे, विश्रांतीचे आणि कोड-कौतुक पुरवणारे एक हक्काचे स्थान असते. म्हणूनच बायकांचा आणि माहेरपणाचा यांचा जितका घनिष्ठ संबंध आहे तितका तो पुरूष आणि माहेर यांचा नसावा. 

पण सद्य परिस्थिती पाहता पुरूष पण आपले माहेर सोडून दुसरीकडे राहायला लागले आहेत. कारणे तशी बरीच आहेत...बरेच पुरूष नोकरी-धंद्यासाठी आपले घर आणि गाव सोडतात...नव्या गावात अथवा शहरात आपले घर नव्याने बसवतात...नवे गाव, नवी माणसे, नवे घर...सगळेच नवे अगदी सासरी आल्याप्रमाणेच... सोबत आपली माणसे म्हणजे आई-वडील, भावंडे वगैरे, नव्या ठिकाणी येतील असे नाही...मग हे पुरूष एकटेच संसार थाटतात, जमेल तसा स्वयंपाक करून खातात अगर खाणावळ लावतात...आणि लग्न झाल्यावर जर बायको वेगळ्या संस्कृतीची असेल तर मग पुन्हा सासुरवास सुरू. म्हणजे खाणे-पिणे वेगळ्या पद्धतीचे, सण-वार वेगळे असणार...थोडक्यात काय तर बर्‍याच पुरुषांना आज आपले माहेर सोडून दुसरीकडे राहावे लागते आणि असे पुरूष पण माहेरपणासाठी आसुसले असतात.

पण माहेर म्हणजे नक्की काय असावे? कोणी म्हणेल आई-वडील असावेत, भाऊ-बहीण असावेत...लहानपण जिथे आणि ज्यांच्या बरोबर गेले ते सगळे...हे असे असेल तर दुधात साखर...पण प्रत्येकाला हे असे माहेर मिळत नाही...मायेची माणसे काळाच्या पडद्याआड जातात...नवी माणसे त्या जागेत राहायला येतात...मग माहेर पूर्वीसारखे वाटत नाही...आणि हे बदल अपरिहार्य आहेत. आपल्या मागच्या पिढीला आहे का माहेर आता?

अजुन थोडा खोल विचार केला तर असे वाटते की माहेर म्हणजे मायेचे माणूस मग ते कोणीही असो...आई,वडील, भाऊ, बहीण असे कोणीही नातेवाईक नसले तरी ज्या व्यक्‍तिजवळ तुम्ही व्यक्त होऊ शकता अशी कोणीही, जी तुम्हाला आणि तुमच्या भावनांना समजून घेते अशी व्यक्ती...अशा मायेच्या माणसाजवळ आपण एक-दोन दिवस राहून मन मोकळे केले तर किती बरे वाटेल? भले तुम्ही गाव बदलेले तरी चालेल पण मायेचे माणूस तुम्हाला कोठेही येऊन भेटू शकते किंवा तुम्ही त्याच्याकडे जाऊ शकता. बरोबर ना?

पूर्वीच्या काळी आपण एकमेकांच्या गावी राहायला जायचो...अगदी आनंदाने महिनाभर राहून एकमेकांची सुख दुःखे वाटून घायचो...ती आनंदाची शिदोरी वर्षभर पुरायची...आता आपण पर्यटनाच्या नावाखाली हॉटेल मधून राहतो, पण "ती" आनंदाची शिदोरी काही कोणी बांधून देत नाही. आज आपणा सर्वांना माहेरपणाची गरज आहे...अगदी आपल्या आई-वडिलांना देखील माहेरपण हवे असते...हे सगळे करणे आपल्या हातात आहे...स्त्री-पुरूष, लहान-मोठे असे भेद न मानता,  एकदा बघा आपल्या मायेच्या माणसांना चारदिवस घरी बोलावून...वय, मानपान वगैरे विसरून त्यांचे माहेरपण करून बघा...आवडीचे पदार्थ खाऊ घाला, पोटभर गप्पा मारा, मने मोकळी करा...सुख-समाधान कुठे हरवले ते सापडेल...आणि बरोबरीने तुमचे पण माहेरपण अनुभवायला मिळेल.

माहेरपण ही एक आनंदाची शिदोरी आहे...मायेच्या माणसाबरोबर चार दिवस एकत्र राहून ती आपण बांधू शकतो आणि वर्षभर पुरवु शकतो.

प्रज्ञा रामतीर्थकर
२० मे  २०१७

No comments:

Post a Comment