Sunday 30 April 2017

जोगेश्वरी महात्म्य

सांगते जोगेश्‍वरीचे महात्म्य महान । सकल सुखाचे निधान ।
करावे अनुदिन त्याचे पठन । एक चित्ते वा करावे श्रवण ॥४९॥
जो करील असे पठन । देईल माता एक दिन त्यास दर्शन ।
पुत्र पौत्र तेजस्वी संतान । न संपेल कधी त्याचे धन ॥५०॥
जोगेश्‍वरीची प्रतिमा ज्याचे घरी । धन्य धन्य तो प्राणी संसारी ।
तयाच्या पुण्या नाही सरी । मातेस करावे नमन ॥५१॥
रोज जो जोगेश्‍वरीस नमस्कारी । त्यासी देखोनी मृत्यू पळे दूरी ।
संकटे होती घाबरी । पाहूनि भक्‍तासी त्या ॥५२॥
जे जोगेश्‍वरी मातेस पूजीती । त्यांची राहे निर्मळ मती ।
लाभती त्यास सार्‍या शक्‍ति । सत्य हे जाणावे ॥५३॥
नित्य करावे जोगेश्‍वरी पूजन । होईल आयुष्य सुखी संपन्न ।
दर्शने वाटते धन्य धन्य । आयुष्याचे हो सार्थक ॥५४॥
जोगेश्‍वरीचा वाचती जे पाठ । सुखाने भर जीवन काठोकाठ ।
रोग, मृत्यु दाविती पाठ । त्या जीवास दुःख कुठले ? ॥५५॥
जे ऐकती जोगेश्‍वरीचे महिमान । त्यांचे पाशी सुखाचे अक्षयी निधान ।
संकटे होती हैराण । जोगेश्‍वरी माता महान ॥५६॥
जे जोगेश्‍वरीची करिती आरती । तया घरची न सरे संपत्ती ।
न ये त्यांचेवरी आपत्ती । महीमा असे मातेचा ॥५७॥
जे जोगेश्‍वरीस विनवीती । मनो भावे अति सेवा करिती ।
प्रतिमे जवळ बसोनि प्रार्थिती । ते प्रिय होती देवीस ॥५८॥
जे जोगेश्‍वरीची निंदा करिती । भ्रमिष्ट हो त्यांची जाणा मती ।
मृत्युस ते सवे बोलाविती । जाणा हे त्रिवार सत्य ॥५९॥
श्रध्दा ठेवूनि देवीवरी सत्य । जी जोगेश्‍वरीस भजते नित्य ।
तिचे होईल सुंदर, बुध्दिवान अपत्य । भाग्यवती ती खरी ॥६०॥
ज्या नारी जोगेश्‍वरी पूजन करिती । त्या सदा सौभाग्यवती होती ।
मिळे पुत्र, पौत्र संपत्ती । जोगेश्‍वरी दर्शने ॥६१॥
जी नारी भाव धरोनी प्रातःकाळी । जोगेश्‍वरीस वाहे फूल वा पाकळी ।
ती भाग्यवती हो आगळी । श्रध्दा ठेवा अंतरी ॥६२॥
ज्या जोगेश्‍वरी पूजा चुकती । पुढील जन्मी सौभाग्य न पावती ।
नर्काकडे जाई त्यांची गती । कटु सत्य हे जाणा ॥६३॥
भावे जोगेश्‍वरी प्रदक्षिणा करिती । ते देवीचे आवडते भक्‍त निश्‍चीती ।
निर्मल सदा राहे त्यांची मती । धन्य धन्य ते भक्‍त ॥६४॥
जोगेश्‍वरी पूजन ज्या नारी करिती । चिरंजीव तयांची हो संतती ।
अखंड सौभाग्य तयासी । सत्य हे जाणा ॥६५॥
जे करीती जोगेश्‍वरी भक्‍ती । तयासी नाही जन्म मरण अंती ।
राहती मातेच्या नित्य चरणी । चिरंजीव ते जाणावे ॥६६॥
जोगेश्‍वरी मंदिर माहेर । माऊली जोगेश्‍वरी थोर ।
सांभाळी मायेने हळुवार । महिमा तिचा महान ॥६७॥
जे प्राणी घालिती जोगेश्‍वरीस दंडवत । शांती नांदे त्यांचे सदैव घरात ।
श्रध्दा पाहिजे मात्र ह्रुदयात । ना संशय ठेवा मनी ॥६८॥
उणे बोले जो जोगेश्‍वरीस । त्याचा करी ती निर्वंश ।
नर्कात त्याचा असे प्रवेश । कठोर हे तत्व जाणा ॥६९॥
जोगेश्‍वरी नाव उच्चारीती निशीदिनी । त्यास मिळती सौख्य शांतीच्या खाणी ।
तारीते संकटातूनि जोगेश्‍वरी जननी । कृपाळू माता अशी ॥७०॥ स्त्री पुरुष दोघे जण । करिती जोगेश्‍वरीचे पूजन ।
त्यांचे जाई वांझ पण । हे जाणावे सत्य ॥७१॥
त्रैलोक्य असे जोगेश्‍वरीजवळ । तीर्थांचे पावन जळ सकळ ।
पूजा मातेस ठेऊनि मन निर्मळ । भाग्यासी नाही उणे ॥७२॥
जोगेश्‍वरी निर्गुण निराकार । तिला नसे आकार ।
पण जाहली साकार मंदिरी । भक्‍ता साठी पुण्यनगरी ॥७३॥
जैसी वैशाखात साऊली । तैसी असे जोगेश्‍वरी माऊली ।
उध्दरला तो प्राणी ज्यास पावली । सत्य हे जाणा ॥७४॥
कल्पतरुची छाया जोगेश्‍वरी । जाणते भक्‍ताची इच्छा अंतरी ।
जणू माता भेटे सासरी । प्रेम तसे तिचे ॥७५॥
स्मरण मातेचे सदा करावे । अखंड नाम जपत जावे ।
जोगेश्‍वरी स्मरणे पावावे । मनी समाधान ॥७६॥
सुख दुःख उद्वेग चिंता । अथवा आनंद रुप असता ।
जोगेश्‍वरी स्मरणा विण सर्वथा । भक्‍तानी राहूच नये ॥७७॥
संपत्ती अथवा येता विपत्ती । जैसी येईल काळगती ।
जोगेश्‍वरी नामस्मरणाची स्थिती । सांडूच नये कदापि ॥७८॥
वैभव सामर्थ्य आणि सत्ता । उत्कट भाग्य अति भोगिता ।
जोगेश्‍वरी नामे संकटे नासती । जोगेश्‍वरी नामे विघ्ने निवारती ।
महापापी उध्दरती । नामाचा महिमा असे मोठा ॥८०॥
सर्वास जोगेश्‍वरी नामाचा अधिकार । जोगेश्‍वरी नामी नाही लहान थोर ।
जोगेश्‍वरी नामे बहुत जनाचा उध्दार । जोगेश्‍वरी विना काही नाही ॥८१॥
जोगेश्‍वरी ही अक्षरे चारी । सदा उच्चारी ज्याची वैखरी ।
तो परम पावन संसारी । होऊनि इतराते तारी ॥८२॥
बाळपणी तरुणकाळी । कठीण काळी वृध्दापकाळी । सर्वकाळी अंतकाळी ।
नामस्मरण जोगेश्‍वरीचे असावे ॥८३॥
जोगेश्‍वरी नामे अनेक भक्‍त तरले । नाना अपघातापासून सुटले ।
संकटातून कित्येक वाचले । जोगेश्‍वरी नामे झाले पावन ॥८४॥
जोगेश्‍वरी मातेसी ओळखावे । जीवन सार्थकाचि करावे ।
दुःख दुसर्‍याचे जाणावे । परपीडेवर नसावे अंतःकरण ॥८५॥
असे ऐसे जोगेश्‍वरी महात्म्य महान । करी सावित्री समग्र ते निरुपण ।
म्हणे होते सार्थक पूर्ण जीवन । करिता श्रध्देने याचे पठण ॥८६॥
माता जोगेश्‍वरी असे थोर । सांभाळ करी तुमचा हळुवार ।
घ्या वसा तिचा तुम्ही वर्षभर । व्हाल दुःखातून अहो पार ॥८७॥
घेतला वसा टाकू नये । गर्व कोणता करु नये ।
चांगले कृत्य सोडू नये । सुख दुःख समान मानावे ॥८८॥
पहाटे करुनि स्नान, व्हावे पवित्र । पूजावी जोगेश्‍वरी समोर ठेऊनि चित्र ।
विसरावे सारे गात्र अन्‌ गात्र । उपवास करावा दिनभरी ॥८९॥
वहावीत एक्याऐंशी फुले प्रतिमेवरी । "श्री जोगेश्‍वरी भगवती" मंत्र हा नवाक्षरी ।
म्हणूनि श्रध्देने स्मरावी जोगेश्‍वरी । पाठ वाचावा भाव ठेऊनि अंतरी ॥९०॥
व्रत हे श्रध्देने वर्षभरी करावे । उद्यापनी सवाष्णीस जेऊ घालावे ।
गरीबास यथाशक्‍ति दान वाटावे । बांगडया बारा अन्‌ सवाष्णीस ॥९१॥
केल्याने हे जोगेश्‍वरी मातेचे व्रत । प्रसन्न होईल प्राचीन ग्रामदैवत ।
पूर्ण करील तुमचे सकल मनोरथ । बाधतील ना संकटे व्यथा ॥९२॥
ऐकूनि हे सर्व ऐश्‍वर्याने आचरिले व्रत । वर्षभरी करी सारे श्रध्देने नियमीत ।
तो काय घडला चमत्कार नाही सांगत असत्य । पति तिचा प्रकटला हो पुन्हा जिवंत ॥९३॥
वेड कन्येचे हळूहळू विरत जाई । आले परत परदेशातून पुत्र, जावई ।
न्हावू लागली ऐश्‍वर्या पुन्हा वैभवी । जोगेश्‍वरी मातेची होता कृपा तिचेवरी ॥९४॥
हा पाठ करिता श्रवण पठन । सकळ संकटे जाती निरसून ।
दुःख दारिद्रय अति भीषण । न ये कधी भक्‍तावरी ॥९५॥
करा जोगेश्‍वरी प्रतिमेस पूजन । नेईल माता भव सागर तरुन ।
आनंदाने बहरेल सारे जीवन । श्रध्दा पाहिजे मात्र अंतरी ॥९६॥
पूजा श्री जोगेश्‍वरी माता नित्य । नका होऊ कधी भय क्रान्त ।
सरेल जीवनातील भ्रान्त । भक्‍तांची कैवारी माता ॥९७॥
नका होऊ मनी हिंपूटी । घाला मातेच्या चरणास मिठी ॥
वाचविल तीच तुम्हास संकटी । आदि माया जोगेश्‍वरी ॥९८॥
जोगेश्‍वरी माता सौभाग्य दायिनी । वर दायिनी कनवाळू जननी ।
सामर्थ्य महान तिच्या असे स्तवनी । मुक्‍त व्हाल दुःखातूनि ॥९९॥
जोगेश्‍वरीने विश्‍व सारे कोंदले । मूल तत्व हे ज्यानी जाणिले ।
जीवन त्याना कळले । ब्रह्मांडाचे रहस्य उलगडले ॥१००॥
जीवन-वैभव सारे क्षण भंगुर । भासे सत्य, परि असे नश्‍वर ।
श्री जोगेश्‍वरीचा एकच आधार, तत्त्व हे ठसवा अंतरी ॥१०१॥

जीव-भगवंत संवाद

जन्मापासुनि काळ हा दवडिला त्वां व्यर्थ माझा हरी ।
नाही साधन साधिले तीळभरी त्वां निर्मिले श्रीहरी ॥
स्नान संध्या जपादिक पुजा तुझी मला न घडे ।
कर्ता तूच हरी म्हणोनि पुसणे अन्याय कोणाकडे ॥
कृष्णा सत्तर दोनशें दिन मला गर्भि तुवां घातले ।
गर्भापासुनि सोडुनि हरि पुढे अज्ञान तू दीधले ॥
तेही तू निर्दाळुनीच विषयीं कां गोविले स्त्रीकडे ।
कर्ता तूच हरी म्हणोनि पुसणे अन्याय कोणाकडे ॥
झाले यौवन प्राप्त जो जखडलो संसार हा जोडूनि ।
कान्ता, सन्तति, संपदेत रमलो सौख्यांध मी होऊनी ॥
कोठे शक्ती अता तपादि करण्या वार्ध्यक्य देहा जडे ।
कर्ता तूच हरी म्हणोनि पुसणे अन्याय कोणाकडे ॥
झाला वर्धक देह हा विकळतो गात्रें पहा भंगली ।
चक्षु घ्राण गळी, मुखी श्रवतसे काया हरी विटली ॥
झाले दंत भग्न मुखात अवघे जिव्हा रसीं ना जडे ।
कर्ता तूच हरी म्हणोनि पुसणे अन्याय कोणाकडे ॥
इतके भाषण परिसुनी श्रीधरें प्रत्युत्तरा दिधले ।
जें जें तू वदलास मानव मूढा आम्हाकडे लाविले ॥
जैसे संचित पूर्विचे तप असे ते भोगणे रे घडे ।
कर्ता कोण मनीं विचारुनि पहा अन्याय कोणाकडे ॥
कर्ता करविता सत्य न खरा सत्कर्म तू नाचरे ।
तुला मी असे नसे शिकविले प्रारब्ध तुझे खरे ॥
तुला साठ घडित एक घटका मत्साधने ना जडे ।
कर्ता कोण मनीं विचारुनि पहा अन्याय कोणाकडे ॥
अज्ञाता तुला मति नसे कैसा भजावा हरी ।
झाले ज्ञान तरी कितीक आठवी पण नाही आठविला हरी ॥
तेव्हा तू विषयात मग्न म्हणूनी मित्रत्व मोहाकडे ।
कर्ता कोण मनीं विचारुनि पहा अन्याय कोणाकडे ॥
नाही तीर्थ विलोकिले नाही मला नयनीं कधी पाहिले ।
भोजन घातले द्विजवरा नाही हवीं होमिले ॥
गोधूमा तिळखाद्य उदका देहीमती ना तुटे ।
कर्ता कोण मनीं विचारुनि पहा अन्याय कोणाकडे ॥
-- अज्ञात

Saturday 29 April 2017

गजानन बावनी

जय जय सदगुरू गजानना | रक्षक तूची भक्तजना ||१|| निर्गुण तू परमात्मा तू | सगुण रुपात गजानन तू ||२|| सदेह तू, परी विदेह तू | देह असून देहातीत तू ||३|| माघा वैद्य सप्तमी दिनी | शेगावात प्रगटोनी ||४|| उष्ट्या पत्रावालीनिमित्त | विदेह्त्व तव हो प्रगट ||५|| बंकट लालावारी तुझी | कृपा जाहली ती साची ||६|| गोसाव्याच्या नवसासाठी | गांजा घेसी लावून ओठी ||७|| तव पद तीर्थे वाचविला | जानराव तो भक्त भला ||८|| जानाकीरामा चिंच वणे | नासावोनी स्वरूपी आणणे ||९|| मुकीन चंदूचे कानवले | खाउन कृतार्थ त्या केले ||१०|| विहिरी माजी जलविहीना | केले देवा जल भरणा ||११|| मध माश्यांचे डंख तुवा | सहन सुखे केले देवा ||१२|| त्यांचे काटे योगबले | काढुनी सहजी दाखविले ||१३|| कुस्ती हरीशी खेळोनि | शक्ती दर्शन घडवोनी ||१४|| वेद म्हणुनी दाखविला | चकित द्रविड ब्राह्मण झाला ||१५|| जळत्या पर्याकावरती | ब्रह्म्हगीरीला ये प्रचीती ||१६|| टाकळीकर हरिदासाचा | अश्व शांत केला साचा ||१७|| बाळकृष्ण बाळापुराचा | समर्थ भक्ताची जो होता ||१८|| रामदास रूपे तुला | दर्शन देवोनी तोषविला ||१९|| सुकुलालाची गोमाता | द्वाड बहु होती ताता ||२०|| कृपा तुझी होताच क्षणी | शांत जाहली ती जननी ||२१|| घुडे लक्ष्मण शेगावी | येता व्याधी तू निरवी ||२२|| दांभिकता परी ती त्याची | तू न चालवोनी घे साची ||२३|| भास्कर पाटील तव भक्त | उद्धरलासी तू त्वरित ||२४|| आज्ञा तव शिरसावंद्य | काकाही मानती तुज वंद्य ||२५|| विहिरीमाजी रक्षियला | देवा तू गणू जवरयाला ||२६|| पिताम्बराकार्वी लीला | वठला आंबा पल्लवीला ||२७|| सुबुद्धी देशी जोश्याला | माफ करी तो दंडाला ||२८|| सवडत येशील गंगाभारती | थुंकून वारिली रक्तपिती ||२९|| पुंडलिकाचे गंडांतर | निष्टा जाणून केले दूर ||३०|| ओंकारेश्वरी फुटली नौका | तारी नर्मदा क्षणात एका ||३१|| माधवनाथा समवेत | केले भोजन अदृष्ट ||३२|| लोकमान्य त्या टिळकांना | प्रसाद तूची पाठविला ||३३|| कवर सुताची कांदा भाकर | भक्शिलास तू त्या प्रेमाखातर ||३४|| नग्न बैसोनी गाडीत | लीला दाविली विपरीत ||३५|| बायजे चित्ती तव भक्ती | पुंडलीकावारी विरक्त प्रीती ||३६|| बापुना मनी विठल भक्ती | स्वये होशी तू विठ्ठल मूर्ती ||३७|| कवठ्याच्या त्या वारकऱ्याला | मरीपासुनी वाचविला ||३८|| वासुदेव यती तुज भेटे | प्रेमाची ती खुण पटे ||३९|| उद्धट झाला हवालदार | भस्मीभूत झाले घरदार ||४०|| देहान्ताच्या नंतरही | कितीजना अनुभव येई ||४१|| पडत्या मजूर झेलीयेले | बघती जन आश्चर्य भले ||४२|| अंगावरती खांब पडे | स्त्री वांचे आश्चर्य घडे ||४३|| गजाननाच्या अद्भुत लीला | अनुभव येती आज मितीला ||४४|| शरण जाऊनी गजानना | दुक्ख तयाते करी कथना ||४५|| कृपा करी तो भक्तांसी | धावून येतो वेगेसी ||४६|| गजाननाची बावन्नी | नित्य असावी ध्यानी मनी ||४७|| बावन्न गुरुवार नेमे | करी पाठ बहु भक्तीने ||४८|| विघ्ने सारी पळती दूर | सर्व सुखांचा येई पूर ||४९|| चिंता सारया दूर करी | संकटातूनी पार करी ||५०|| सदाचार रत साद भक्ता | फळ लाभे बघता बघता ||५१|| सुरेश बोले जय बोला | गजाननाची जय बोला || जय बोला हो जय बोला | गजाननाची जय बोला ||५२||
|| अनंत कोटी ब्रम्हांड नायक, महाराजाधिराज योगीराज, सद्गुरू श्री गजानन महाराज की जय ||

Friday 28 April 2017

उत्तम गुण

श्रोतीं व्हावे समाधान। आता सांगतो उत्तम गुण॥ जेणे करिता बाणे खुण। सर्वज्ञपणाची॥१॥
वाट पुसल्याविण जाउ नये। फळ ओळखल्याविण खाऊ नये॥ पडिली वस्तु घेऊ नये। येकायेकी॥२॥
विचारेविण बोलो नये। विवंचनेविण चालो नये॥ मर्यादेविण हालो नये। काही येक॥३॥
प्रीतीविण रुसो नये। चोरास वोळखी पुसो नये॥ रात्री पंथ क्रमु नये। येकायेकी॥४॥
जनी आर्जव तोडु नये। पापद्रव्य जोडू नये॥ पुण्यमार्ग सोडू नये। कदाकाळी॥५॥
वक्तयास खोदु नये। ऐक्यतेशी फोडू नये॥ विद्या-अभ्यास सोडू नये। काही केल्या॥६॥
तोंडाळासी भांडो नये। वाचाळासी तंडो नये॥ संतसंग खंडु नये। अंतर्यामी॥७॥
अति क्रोध करु नये। जिवलगांस खेदु नये॥ मनी वीट मानु नये। शिकवणेचा॥८॥
क्षणाक्षणा रुसो नये। लटिका पुरुषार्थ बोलो नये॥ केल्याविण सांगो नये। आपुला पराक्रमु॥९॥
आळसे सुख मानू नये। चाहाडी मनास आणू नये॥ शोधल्याविण करू नये। कार्य काही॥१०॥
सुखा आंग देऊ नये। प्रेत्न पुरुषे सांडू नये॥ कष्ट करि त्रासो नये। निरंतर॥११॥
कोणाचा उपकार घेउ नये। घेतला तरी राखो नये॥ परपीडा करु नये। विश्वासघात॥१२॥
शोच्येविण असो नये। मळिण वस्त्र नेसो नये॥ जाणारास पसो नये। कोठे जातोस म्हणऊनी॥१३॥
सत्यमार्ग सांडू नये। असत्य पंथे जाउ नये॥ कदा अभिमान घेउ नये। असत्याचा॥१४॥
अपकीर्ती ते सांडावी। सत्कीर्ती वाढवावी॥ विवेके दृढ धरावी। वाट सत्याची॥१५॥

Thursday 27 April 2017

आत्मषटक

मनोबुद्ध्यहंकारचित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः चिदानंदरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥१॥
मन, बुद्धि, अहंकार किंवा चित्त म्हणजे मी नव्हे. त्याचप्रमाणे कान, जीभ, नाक किंवा नेत्र म्हणजे मी नव्हे. आकाश, जल, पृथ्वी, तेज किंवा वायु ही पंचमहाभूतें म्हणजे मी नव्हे. मी शिव म्हणजे मंगलमय चिदानन्दरूप (शिवस्वरूप) आहे. ॥१॥
न च प्राणसंज्ञो न वै पंचवायुर्न वा सप्तधातुर्न वा पंचकोशः।
न वाक् पाणिपादौ न चोपस्थपायू चिदानंदरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥२॥
शरीरात संचार करणारा जो प्राणवायू आहे तो मी नव्हे. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे पंचप्राण ही मी नव्हे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र हे सप्तधातूही मी नाही. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनन्दमय हे पंचकोशही मी नाही. त्याचप्रमाणे वाणी, हात, पाय, जननेन्द्रिय किंवा गुदस्थान ही पंचकर्मेंन्द्रियें ही मी नव्हे. मी शिव म्हणजे मंगलमय चिदानन्दरूप (शिवस्वरूप) आहे. ॥२॥
न मे द्वेषरोगौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः ।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानंदरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥३॥
माझ्या ठिकाणी कोणाबद्दलही द्वेष किंवा कशाबद्दलही आसक्ती नाही. मला लोभ किंवा मोह नाही. त्याचप्रमाणे मला कशाचाही गर्व किंवा कोणाबद्दलही ईर्ष्या नाही. मला धर्म, अर्थ, काम किंवा मोक्ष ह्या चतुर्विध पुरूषार्थापैकी कशाचीही अपेक्षा नाही. मी शिव म्हणजे मंगलमय चिदानन्दरूप (शिवस्वरूप) आहे. ॥३॥
न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःख न मंत्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानंदरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥४॥
मला पुण्य नाही, पाप नाही, सुख किंवा दुःखही नाही. त्याचप्रमाणें मन्त्र, तीर्थ, वेद किंवा यज्ञ म्हणजे मी नाही. मी भोजन (क्रिया), भोज्य (पदार्थ) किंवा भोक्ता (उपभोगणारा) मी नाही. मी शिव म्हणजे मंगलमय चिदानन्दरूप (शिवस्वरूप) आहे. ॥४॥
न मे मृत्युशंका न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म ।
न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानंदरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥५॥
मला मृत्युची भीती नाही, माझ्या दृष्टीने ब्राम्हण, शूद्र इ. जातीभेद उरले नाहीत. मला कोणी माता-पिता नाहीत तसेच मला जन्मही नाही. मला कोणी बन्धू, मित्र, गुरु अथवा शिष्य नाही. (तसेच मीही कोणाचा नाही.) मी शिव म्हणजे मंगलमय चिदानन्दरूप (शिवस्वरूप) आहे. ॥५॥
अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् ।
सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानंदरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥६॥
मी निर्विकल्प म्हणजे भेदातीत आहे, निराकार आहे. (मला कोणताही आकार नाही.) मी सर्व इन्द्रियांना व्यापून राहिलों आहे. मी विभु म्हणजे सम्पूर्ण विश्वाला व्यापून राहणारा आहे. मी सदासर्वकाळ समरूप म्हणजे एकरूप आहे. मला मुक्ति नाही तसेच संसाराचे बंधनही नाही. मी शिव म्हणजे मंगलमय चिदानन्दरूप (शिवस्वरूप) आहे. ॥६॥

अन्नपूर्णास्तोत्रम्

नित्यानन्दकरी वराभयकरी सौन्दर्यरत्नाकरी निर्धूताखिलघोरपावनकरी प्रत्यक्षमाहेश्वरी ।
प्रालेयाचलवंशपावनकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देही कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥१॥
हे अन्नपूर्णा माते ! तू सर्वांना नेहमी आनंद देणारी आहेस. तू एका हाताने वरमुद्रा आणि दुसऱ्या हाताने अभयमुद्रा धारण केलेली आहे. तू सर्व प्रकारच्या रत्नांची खाण आहेस. तू सम्पूर्ण पातकांचा नाश करणारी असून प्रत्यक्ष महेश्वराची प्राणवल्लभा आहेस. तू जन्म घेऊन हिमालयाचा वंश पवित्र केला आहेस. तू काशी नगरीची अधीश्वरी आहेस. कृपापूर्ण दृष्टीने आधार देऊन हे आई, अन्नपूर्णेश्वरी मला तू भिक्षा दे. ॥१॥
नानारत्नविचित्रभूषणकरी हेमाम्बराडम्बरी मुक्ताहारविलम्बमानविलसद्‍वक्षोजकुम्भान्तरी ।
काश्मीरागुरूवासिता रुचिकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देही कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥२॥
जिच्या हातामध्यं अनेक प्रकारचीं रत्नजडित आश्चर्यकारक भूषणें आहेत, जिच्या सिंहासनाच्या प्रभावळीवर सोन्याचे भरजरी वस्त्र शोभत आहे, जिच्या वक्षःस्थलावर मोत्यांचे हार शोभा देत आहेत, केशर, कस्तुरी, अंगरू, चंदन ह्यांचे उटणें अंगाला लावल्याने जिचे अंग अधिक शोभत आहे, भक्त जनांना कृपेचा आधार देणारी अन्नपूर्णा माते ! तू मला भिक्षा घाल. ॥२॥
योगानन्दकरी रिपुक्षयकरी धर्माथनिष्ठाकरी चन्द्रार्कानलभासमानलहरी त्रैलोक्यरक्षाकरी ।
सर्वैश्वर्यसमस्तवांछनकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देही कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥३॥
हे अन्नपूर्णा माते ! अव्दैतात प्राप्त होणारा आनंद तू व्दैतातही प्राप्त करून देतेस. सर्व शत्रूंचा नाश करतेस. धर्माच्या ठिकाणीं तूच निष्ठा निर्माण करतेस. चंद्र, सूर्य आणि अग्नि ह्यांच्या तेजाप्रमाणे तुझ्या कांतीच्या छ्टा भासतात. तू त्रैलोक्याचे रक्षण करतेस. जगाला सर्व प्रकारचे वांछित ऎश्वर्य देतेस, तू काशी नगरीत वास्तव्य करतेस. अशा प्रकारे सर्वांवर कृपा करणाऱ्या माते ! तू मला भिक्षा घाल. ॥३॥
कैलासाचलकन्दरालयकरी गौरी उमाशङ्करी कौमारी निगमार्थगोचरकरी ॐकारबीजाक्षरी ।
मोक्षव्दारकपाटपाटनकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देही कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥४॥
हे आई ! तू कैलास पर्वताच्या गुहेत राहतेस. तू गौरी आहेस. तूच उमा असून शंकराने तुझा अंगीकार केल्याने तुला शांकरी असे देखिल म्हणतात. तू कैवारी म्हणजे कार्तिक स्वामीची आई आहेस.तूच वेदांचा अर्थ स्पष्ट करतेस. ओंकार म्हणजेच प्रणव हेंच तुझ्या ज्ञानाचे बीज आहे. तू अक्षरी म्हणजे अविनाशी आहेस. भक्तांसाठी तू मोक्षाचे दरवाजे उघडतेस. अशा हे आई ! तू मला भिक्षा घाल. ॥४।
दृश्यादृश्यविभूतवाहनकरी ब्रम्हाण्डभाण्डोदरी लीलानाटकसूत्रभेदनकरी विज्ञानदीपाङ्कुरी ।
श्रीविश्वेशमनःप्रसादनकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देही कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥५॥
हे अन्नपूर्णा माते ! दृश्य आणि अदृश्य अशा ज्या काही ईश्वराच्या विभूती आहेत त्यांना आपापले कार्य करण्याची शक्ति तूच देतेस. सम्पूर्ण ब्रम्हाण्डरूपी भांडे तुझ्याच उदरात सामावलेले आहे. लीलेने तूच हे जगत् रूपी नाटक करतेस - चालवतेस. तुझ्याच कृपेने भक्तांच्या ह्दयात ज्ञानरूपी दीप प्रज्वलित होतो. काशीविश्वेश्वराच्या मनाला तूच प्रसन्न करतेस. अशा हे आई ! तू मला भिक्षा घाल. ॥५॥
उर्वी सर्वजनेश्वरी भगवती मातान्नपूर्णेश्वरी वेणीनीलसमानकुन्तलहरी नित्यान्नदानेश्वरी ।
सर्वानन्दकरी सदाशुभकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देही कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥६॥
हे आई ! तुझे मूल्य पृथ्वीपेक्षाही अधिक आहे. तू सर्व जनांची अधीश्वरी आहेस. तू पूर्णतेचे अन्न खायला देणारी माता आहेस. तुझ्या काळ्याभोर केसांच्या वेणीने मन आकृष्ट होते. तू नेहमी अन्नाचें दान करतेस, सर्वांना आनंद देतेस. नेहमी सर्वांचे कल्याण करतेस. सर्वांवर कृपा करणाऱ्या हे माते ! तू मला भिक्षा घाल. ॥६॥
आदिक्षान्तिसमस्तवर्णनकरी शम्भोस्त्रिभावाकरी काश्मीरात्रिपुरेश्वरी त्रिनयनी नित्याङ्कुरा शर्वरी ।
कामाकाङ्क्षकरी जनोदयकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देही कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥७॥
आई ! 'अ' पासुन 'क्ष' पर्यंतच्या सर्व शब्दात तुझीच शक्ति आहे. कल्याण करणारी शक्ति जो शंभु त्याची तू प्राणवल्लभा आहेस. तुझ्या ठिकाणीं तीनही (प्रेमभाव, आत्मीयता आणि एकभाव) भाव आहेत. तुझ्या एकाच शरीरात काश्मीर म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि लिंग अशी तीन शरींरे आहेत. तुझ्या नेत्रात पोषक, शोधक आणि स्निग्ध असे तीन भाव आहेत. तुझ्या भावांना सतत अकुंर फुटत असतात. तू प्रेमाने फटके मारतेस. तू कामना पूर्ण करतेस आणि सर्व जीवांचा उदय करतेस. अशा हे माते ! तू मला भिक्षा घाल. ॥७॥
देवी सर्वविचित्ररत्नरचिता दाक्षायणी सुन्दरी वामा स्वादुपयोगधरप्रियकरी सौभाग्यमाहेश्वरी ।
भक्ताभीष्टकरी दशाशुभहरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देही कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥८॥
हे आई ! तू देवी म्हणजे प्रकाशरूप आहेस. तू स्वकार्यात दक्ष आहेस.(दक्ष प्रजापतीची कन्या म्हणूनही पार्वतीला दाक्षायणी असे नाव आहे.) तू सुन्दर आणि आकर्षक आहेस. तुझे स्तन्य मधुर आहे. तू सर्वांचे प्रिय करतेस. तू सर्व सौभाग्यसंपन्न अशी प्रत्यक्ष महेश्वराची पत्नी आहेस. (तू सर्व जगाला सौभाग्य देणारी आहेस.) तू भक्तांचे कल्याण करतेस. तू दहा प्रकारची पापें नाहीशी करतेस. (अशुभ म्हणजे पाप. तीन कायिक, चार वाचिक आणि तीन मानसिक पापें आहेत.) अशा हे मातें ! तू मला भिक्षा घाल. ॥८॥
चन्द्रार्कालयकोटिकोटिसदृशा चन्द्रांशुबिम्बाधरी चन्द्रार्काग्निसमानकुंडलधरी चन्द्रार्कवर्णेश्वरी ।
मालापुस्तकपाशसांकुशधरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देही कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥९॥
हे आई ! कोटि कोटि चंद्र, सूर्य वा अग्नि ह्यांच्या तेजापेक्षाही तुझे तेज अधिक आहे. तुझे ओठ उदयाला येणाऱ्या चंद्राच्या किरणाप्रमाणे आरक्त आहेत. कानातील कुण्डले चंद्र-सूर्याप्रमाणे झळकत आहेत, अग्निप्रमाणे देदिप्यमान आहेत. तुझा वर्णही चंद्र-सूर्याप्रमाणेच आहे. तू हातात पाश, माळा, पुस्तक आणि अंकुश धारण करतेस. अशा हे आई ! तू मला भिक्षा घाल. ॥९॥
क्षत्रत्राणकरी महाऽभयकरी माता कृपासागरी साक्षान्मोक्षकरी सदा शिवकरी विश्वेश्वरी श्रीधरी ।
दक्षाक्रन्दकरी निरामयकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देही कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥१०॥
हे माते अन्नपूर्णे ! समाजाचे रक्षण करणाऱ्या क्षत्रियांचेही तूच रक्षण करतेस. मोठमोठ्या भयांचे, संकटांचे तू हरण करतेस, अभय देतेस. तू सर्वांची माता आहेस. तू कृपासागर आहेस. मोक्ष देणारी आहेस. सदासर्वकाळ कल्याण करणारी आहेस. तू विश्वाची स्वामिनी आहेस. अव्याहत ऎश्वर्य देणारी आहेस. दक्ष प्रजापतीला तू आक्रन्दन करायला लावलेस. (दक्ष म्हणजे व्यवहारी. ह्यांना ध्येयनिष्ठ आणि तत्त्वनिष्ठ माणसें आवडत नाहीत. ध्येयनिष्ठ, तत्त्वनिष्ठ माणसांवर आक्रमण करणाऱ्यांचा तू नाश करतेस.) तू भक्तजनांना निरामय करतेस. अशा हे आई ! तू मला भिक्षा घाल. ॥१०॥
भगवती भवरोगात्पीडितं दुष्कृतोत्थात् सुतदुहितृकलत्रोपद्रवेणानुयातम् ।
विलसदमृतदृष्ट्या वीक्ष्य विभ्रान्तचित्तं सकलभुवनमातस्त्राहि मामों नमस्ते ॥११॥
हे आई भगवतें ! मीच आचरलेल्या दुष्कृत्यांनी प्राप्त झालेल्या ह्या भवरोगाने मी अत्यन्त पीडित झालों आहे. पुत्र, कन्या, पत्नी ह्यांच्या उपद्रवाने हैराण झालो आहे. मी ह्या संसारात अत्यन्त गोंधळून गेलो आहे. अशा माझ्याकडे तू अमृतमय प्रसन्न दृष्टीने पाहा. ओंकारस्वरूप असलेल्या तुला माझा नमस्कार असो. ॥११॥
माहेश्वरीमाश्रितकल्पवल्लीमहम्भवोच्छेदकरीं भवानींम् ।
क्षुधार्तजायातनयाद्युपेतस्त्वामन्नपूर्णे शरणं प्रपद्ये ॥१२॥
हे आई अन्नपूर्णे ! लोकदृष्ट्या तू महेश्वराची अर्धांगी परन्तु तत्त्वतः अधिष्ठानशक्ति आहेस. आश्रितांचे सर्व मनोरथ पूर्ण करणारी आहेस. भक्तांचा अहंकार आणि दुःखमय संसार ह्यांचा नाश करणारी आहेस. कल्याण, उत्कर्ष आणि समृद्धि ह्यांची प्राप्ति तूच करून देतेस. भुकेने व्याकूळ झालेला, पुत्र-कलत्र इत्यादि परिवाराने युक्त असा मी तुला शरण आलों आहे. ॥१२॥
दारिद्र्यदावानलदह्यमानं पाह्यन्नपूर्णे गिरिराजकन्ये । 
कृपाम्बुधौ मज्जय मां त्वदीये त्वत्पादपद्मार्पितचित्तवृत्तिम् ॥१३॥
हे गिरिराज कन्ये ! दारिद्र्यरूपी वणव्याने मी चोहीकडून होरपळून निघत आहे. माझा दाह शान्त होण्यासाठीं मी माझ्या सर्व चित्तवृत्ति तुझ्या चरणकमलांवर अर्पण केल्या आहेत. तू मला तुझ्या कृपारूपी सागरात निमग्न कर. माझे रक्षण कर. ॥१३॥
अन्नपूर्णे सदा पूर्णे शङ्करप्राणवल्लभे ।
ज्ञानवैराग्यसिद्‍ध्यर्थं भिक्षां देही च पार्वति ॥१४॥
हे माते अन्नपूर्णे ! तू सदा, नित्य परिपूर्ण आहेस. तू शंकराची प्राण वल्लभा आहेस. माझ्या ठिकाणी ज्ञान आणि वैराग्य निर्माण होण्यासाठी हे आई ! तू मला भिक्षा घाल. ॥१४॥
माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः ।
बान्धवाः शिवभक्ताश्च स्वेदेशो भुवनत्रयम् ॥१५॥
देवी पार्वती माझी माता आहे. भगवान महेश्वर माझे पिता आहेत. सर्व शिवभक्त हे माझे बांधव आहेत आणि त्रिभुवन हाच माझा स्वदेश आहे. ॥१५॥
इति श्रीमच्छंकराचार्यविरचितमन्नपूर्णास्तोत्रं संपूर्णम् ।

Wednesday 26 April 2017

अक्कलकोट स्वामी स्तोत्र

ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थास नम: |
ॐ नमो श्रीगजवदना | गणराया गौरीनंदना | विघ्नेशा भवभयहरणा | नमन माझे साष्टागी || १||
नंतर नमिली श्री सरस्वती | जगन्माता भगवती | ब्रम्ह्य कुमारी वीणावती | विद्यादात्री विश्वाची || २||
नमन तैसे गुरुवर्या | सुखनिधान सदगुरुराया | स्मरूनी त्या पवित्र पायां | चित्तशुध्दी जाहली || ३||
थोर ॠषिमुनी संतजन बुधगण आणि सज्जन | करुनी तयांसी नमन | ग्रंथरचना आरंभिली ||४||
श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुनी तुमच्या पवित्र पायां | स्तोत्र महात्म्य तुमचे गावया | प्रारंभ आता करतो मी || ५||
नांव गांव खुद्द स्वामींचे | किंवा त्यांच्या मातापित्यांचे | कोणालाच ठाऊक नाही साचें | अंदाज मात्र अनेक || ६||
त्यांच्या जन्मासंबंधाने, आख्यायिका लिहिली एकानें | तीच सत्य मानुनी प्रत्येकाने | समाधान मानावे || ७ ||
म्हणे उत्तर भारती एका स्थानी | घनदाट कर्दळीच्या बनीं | स्वामी प्रगटले वारुळांतुनी | लाकुडतोड्याच्या निमित्ताने || ८ ||
कुर्‍हाडीचा घाव बसून, त्याचा राहिला कायमचा वण | आगळी ती अवतार खूण | प्रत्यक्ष पाहीली सर्वांनी || ९ ||
एका भक्तानें केला प्रश्न, स्वामी तुमची जात कोण | तेव्हां दिलें उत्तर छान | स्वमुखेंच समर्थानी || १० ||
मी यजुवेदी ब्राम्हण | माझे नांव नृसिंहभान | काश्यप गोत्र राशी मीन | ऐसें स्वामी म्हणाले ||११ ||
खरें खोटें देव जाणे | बरें नाही खोलांत शिरणें | ईश्ववरी करणीची कारणें | आपण काय शोधावी || १२ ||
दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण | नरदेह तरीही केला धारण | सकळं भूप्रदेश केला पावन | आपुल्या चरणस्पर्शाने || १३ ||
नंतर स्वामी निघाले तिथून | तीर्थयात्रेसी केले प्रयाण | दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण | प्रत्यक्ष फिरुनी पाहिलें || १४ ||
दत्तवास्तव्य जेथे निरंतर | तो थोर पर्वत गिरनार | तेथेच गेले अगोदर | नंतर फिरले इतरत्र || १५ ||
यात्रेचे प्रवास संपले | तेव्हा मंगळवेढ्यासी आले | तेथे थोडे दिवस राहिले | दामाजीच्या गांवात || १६ ||
काही काळ तिथे गेला | पुण्यवंतांना प्रभाव कळला | जनसमुदाय भजनीं लागला | साक्षात्कारी यतीच्या || १७ ||
पुढे अक्कलकोट हें | वास्तव्याचे झाले ठिकाण | अखेरपर्यंत तिथेंच राहून | अनंत लीला दाखविल्या || १८ ||
तेजःपुंज शरीर गोमटें, सरळ नासिका कान मोठे | आजानुबाहू कौपिन छोटे | दिगंबर असती अनेकदां || १९||
स्वामी समर्थ अक्कलकोटचे | चवथे अवतार दत्तात्रयाचे | तीन अवतार यापूर्वीचे | गुरुचरित्री वर्णिले || २० ||
पहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपादवल्लभ | नृसिंहसरस्वती हे तिसरे नांव शुभ | गाणगापूर दर्शन देवदुर्लभ | जागृत दत्तस्थान ते || २१ ||
तेथे होउनी साक्षात्कार | पहावयासी येती चवथा अवतार | अक्कलकोट पुण्यभूमि थोर | जेथे प्रत्यक्ष दत्त वसे || २२ ||
अक्कलकोटी नित्य राहूनी | अगाध गूढ लीला करूनी | भक्तांसी साक्षात्कार देऊनी | गुप्त झाले अनेकदा || २३ ||
नास्तिक होते कोणी त्यांना | चमत्कार दाखविले नाना | शेवटी कराया क्षमायाचना | लागले स्वामी चरणांसी || २४ ||
स्वामी सर्वसाक्षी उदार | साक्षात दत्ताचे अवतार | कधी सौम्य कधी उग्रतर | स्वरुप दाविलें दासांना || २५ ||
ज्यांनी त्यांची सेवा केली | त्यांची कुळे पावन झाली | जन्मोजन्मीची पापें जळली | पुण्यराशी मिळाल्या || २६ ||
सत्पुरुषाची करणी अगाध | वाणी गूढ निर्विवाद | झाल्याविण कृपाप्रसाद | अर्थ त्याचा समजेना || २७ ||
स्वामींचे बोलणे थोडें | जणूं काय कठीण कोडें | अर्थ काढावे तितुके थोडे | त्यात भविष्य असे भरलेलें || २८ ||
जाणणारे तेच जाणिती | घेती त्यांच्या संकेताची प्रचिती | ज्याचा तोच उमजे चित्तीं | इतरां अर्थबोध होईना || २९ ||
कोणाकोणाला पादुका दिधल्या | कोणाला वाहिल्या लाखोल्या | कोणाच्या मस्तकी मारिल्या | पायांतल्या वाहाणाही || ३० ||
ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणें | स्वामीनी दिले भरपूर देणें | कोणा पुत्र कोणा सोनेनाणे | कोणा जीवनदानही दिलें त्यांनी || ३१ ||
अनेकांच्या व्याधी केल्या दूर | अनेकांना दाखविले चमत्कार | अनेकांना शिक्षा घोर | केल्या त्यांनी अनेकदा || ३२ ||
सर्व साक्षी अंतर्ज्ञानी | पूर्णब्रम्ह्य ब्रम्ह्यज्ञानी | म्हणूनच हव्या त्या ठिकाणी | दर्शन दिधलें भक्ताना || ३३ ||
न सांगता सर्व जाणिले | ज्याचें त्याला योग्य उत्तर दिलें | लोण्याहुनी मृदु ह्रदय द्रवलें | दु:खी कष्टी जीवांसाठी || ३४ ||
दयेचा अथांग सागर | भक्तांसाठी परम उदार | अनेकांचा केला उध्दार | सदुपदेश दिक्षा देऊनी || ३५ ||
स्वामीराया दत्तात्रेया | तुमच्या कृपेची असावी छाया | हीच प्रार्थना तुमच्या पायां | मागणे नाही आणखी || ३६ ||
मजवरी होता कृपादृष्टी | दत्तमय भासेल सर्व सृष्टी | सुखसंपत्तीची होईल वृष्टी | सकल सिध्दी लाभती || ३७ ||
ऐसी श्रध्दा माझे मनी | उपजली आहे आतां म्हणुनीं | मिठी घातली तव चरणीं | धाव पाव समर्था तूं || ३८ ||
तुमची करावी कैसी सेवा | हे मज ठाऊक नाही देवा | ओळखुनी माझ्या भोळ्या भावा | वरदहस्त ठेवा मस्तकीं || ३९
संसार तापें पोळलों भारी, दूर करा ही दु:खे सारी | तुमच्यावीण माझा कैवारी | अन्य कोणी दिसेना || ४० ||
तुमचे पाय माझी काशी | पंढरपूर सर्व तीर्थे तशी | आहेत तुमच्या चरणांपाशी | मग यात्रेस जाऊ कशाला || ४१ ||
अक्कल्कोटचे समर्थ स्वामी | रंगून जातां त्यांचे नामीं | ब्रम्हा विष्णू शिवधामी | सर्व भक्ती पोंचते || ४२ ||
स्वामी समर्थांची मूर्ति आठवावी | त्यांचे पायी दृढ श्रध्दा ठेवावी | आणी आपली भावना असावी | मनोभावें ऐसी कीं || ४३ ||
पाठीशीं आहेत अक्कलकोट स्वामी | उगीच कशास भ्यावे मी | काहींच पडणार नाही कमी | समर्थांच्या दासासी || ४४ ||
भाग्यवान ते जे लागले भजनी | वादविवाद केले पंडितांनी | मग एकमुखानें सर्वांनी | मान्य केली थोर योग्यता || ४५ ||
वेदांताचा अर्थ लाविला | पंडितांचा ताठा जिरविला | भाविक भक्तांना दिधला | धीर अनेक संकटी || ४६ ||
स्वामी तुमचे चरित्र आगळें | अतर्क्य अलौकिक जगावेगळे | त्यांत प्रेमाचे सागर सांठले | धन्य धन्य ज्यांना उमजलें ते || ४७ ||
बाळप्पा चोळप्पादि सर्वांनी | लहान मोठ्या अधिकार्‍यांनी | गरीबांपासून श्रीमंतांनी | सेवा केली यथाशक्ती || ४८ ||
जे जे तुमच्या भजनीं लागले | त्यांचे त्यांचे कल्याण झालें | हवें हवें ते सारें मिळाले | श्री समर्थ कृपेनें || ४९ ||
पुढे संपल्या लीला संपले खेळ | ताटातुटीची आली वेळ | स्वामी म्हणजे परब्रम्ह्य केवळ | परब्रह्म्यांत मिळालें || ५० ||
शके अठराशें बहुधान्यनाम संवत्संरी | चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी | पुण्य घटिका तिसर्‍या प्रहरी | स्वामी गेले निजधामा || ५१ ||
बोलता बोलता आला अंतकाळ | प्रकृतीत झाली चलबिचल | क्षणात पापण्या झाल्या अचल | निजानंदी झाले निमग्न || ५२ ||
वचनपूर्तींसाठी निर्णयानंतर | पांचवा दिवस शनिवार | स्वामी प्रगटले निलेगांवाबाहेर | दिलें दर्शन भाऊसाहेबांसी || ५३ ||
ऐसा यती दत्त दिगंबर | संपवूनी आपूला अवतार | निजधामा गेला निरंतर | भक्त झाले पोरके || ५४ ||
बातमी जेव्हा सर्वत्र पसरली | जनता शोकाकुल झाली | सर्व भक्तमंडळी हळहळली | अन्नपाणीही सुचेना || ५५ ||
गावोगांवीची भक्तमंडळी | अक्कलकोटी गोळा झाली | समर्थांची समाधी पाहिली | आपल्या साश्रू नयनांनी || ५६ ||
चवथा अवतार संपला | तरीही चैतन्यरुपें तिथेच राहिला | अक्कलकोट पुण्यभूमीला | क्षेत्रत्वा प्राप्त जाहलें || ५७ ||
अजूनही जे येती समाधीदर्शना | त्यांच्या व्याधी आणी विवंचना | संकटे आणी दु:खे नाना | स्वामी दूर करतात || ५८ ||
याचे असती असंख्य दाखले | अनेकांनी अनुभवले | म्हणूनी महाराजांची पाऊले | आपणही वंदूंया || ५९ ||
नम्र होउनी त्यांचे चरणीं | कळकळने करुंया विनवणी | स्वामींना यावी करुणा म्हणूनी | प्रार्थना त्यांना करुंया || ६० ||
जयजय दत्ता अवधूता | अक्कलकोट स्वामी समर्था | सदगुरु दिगंबरा भगवंता | दया करी गा मजवरी || ६१ ||
अनेकांच्या संकटी आला धावून | आता माझी प्रार्थना ऐकून | समर्थराया देई दर्शन | दूर लोटु नको मला || ६२ ||
व्यवहारी मी जगतो जीवन | अनेक पापें घडती हातून | तव नामाचें होते विस्मरण | क्षमा याची असावी || ६३ ||
सदगुरुराया कृपा करावी | तुमची सेवा नित्य घडावी | ऐसी बुध्दी मजला द्यावी | पापे सर्व पळावी || ६४ ||
सुखाचें व्हावे जीवन ऐहिक | धनदौलत मिळावी, मिळावे पुत्रपौत्रसुख | गृहसौख्य आणी वाहनसुख | अंती सदगति लाभावी || ६५ ||
तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा | म्हणुनी याचना करतों देवा | उदार मनाने वर द्यावा | आणी तथास्तु म्हणावे || ६६ ||
तुमची होतां कृपा पूर्ण | जीवन माझें होईल धन्य | म्हणुनी आलों तव पायी शरण | दत्तराया दयाघना || ६७ ||
मी एक मानव सामान्य | तुमची सेवा नित्य घडावी म्हणून | या पोथीचें करितों वाचन | दान द्या तुमच्या कृपेचे || ६८ ||
वेडीवाकुडी माझी सेवा | स्वीकारावी स्वामी देवा | वरदहस्त नित्य मस्तकीं ठेवा | हीच अंती विनंती || ६९ ||
शके अठराशे नव्याण्ण्व वर्षी | चैत्रमासीं शुक्लपक्षी | शुभ रामनवमी दिवशी || पोथी पूर्ण झाली ही || ७० ||
स्वामींचे चित्र ठेऊनी पुढ्यांत | किंवा स्वामींच्या एखाद्या मठांत | बसुनी ही पोथी वाचावी मनांत | इच्छा सफल होईल || ७१ ||
माणिकप्रभू , साई शिरडीश्वर | आणी अक्कलकोट्चे दिगंबर | एकाच तत्वाचे तीन अविष्कार | भेद त्यांत नसे मुळी || ७२ ||
एकाची करितां भक्ती | तिघांनाही पावते ती | ऐसी ठेऊनी आपली वृत्ती | पोथी नित्य वाचावी || ७३ ||
या पोथीचे करितां नित्य पठण | प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न | करतील सर्व मनोरथ पूर्ण | सत्य सत्य वाचा ही || ७४ ||
ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थापर्णमस्तु || शुभं भवतु || ॐ शांति:शांति:शांति: || (ओवी संख्या ७४ )
|| " श्री अक्कलकोटस्वामी स्तोत्र ---माहात्म्य सम्पूर्ण " ||

Monday 24 April 2017

चांगदेवपासष्टी

स्वस्ति श्री वटेशु । जो लपोनि जगदाभासु । दावी मग ग्रासु । प्रगटला करी ॥ १ ॥
प्रगटे तंव तंव न दिसे । लपे तंव तंव आभासे । प्रगट ना लपाला असे । न खोमता जो ॥ २ ॥
बहु जन्व जंव होये । तंव तंव कांहींच न होये । कांहीं नहोनि आहे । अवघाचि जो ॥ ३ ॥
सोनें सोनेपणा उणे । न येतांचि झालें लेणें । तेंवि न वेंचतां जग होणे । अंगें जया ॥ ४ ॥
कल्लोळकंचुक । न फेडितां उघडें उदक । ते न्वी जगेंसी सम्यक् । स्वरूप जो ॥ ५ ॥
परमाणूचिया मांदिया । पृथ्वीपणें न वचेचि वायां । तेंवी विश्वस्फूर्तिं इया । झांकवेना जो ॥ ६ ॥
कळांचेनि पांघुरणें । चंद्रमा हरपों नेणें । कां वन्ही दीपपणें । आन नोहे ॥७ ॥
म्हणोनि अविद्यानिमित्तें । दृश्य द्रष्टत्व वर्ते । तें मी नेणें आइते । ऐसेंचि असे ॥ ८ ॥
जेंवी नाममात्र लुगडें । येर्हवीं सुतचि तें उघडें । कां माती मृद्भांडें । जयापरी ॥ ९ ॥
तेंवी द्रष्टा दृश्य दशे । अतीत द्र्‌ई~ण्मात्र जें असे । तेंचि द्रष्टादृश्यमिसें । केवळ होय ॥ १० ॥
अलंकार येणें नामें । असिजे निखिल हेमें । नाना अवयवसंभ्रमें । अवयविया जेंवी ॥ ११ ॥
तेंवी शिवोनि पृथीवरी । भासती पदार्थांचिया परी । प्रकाशे ते एकसरी । संवित्ति हे ॥ १२ ॥
नाहीं तें चित्र दाविती । परि असे केवळ भिंती । प्रकाशे ते संवित्ति । जगदाकारें ॥ १३ ॥
बांधयाचिया मोडी । बांधा नहोनि गुळाचि गोडी । तयापरि जगपरवडी । संवित्ति जाण ॥ १४ ॥
घडियेचेंइ आकारें । प्रकाशिजे जेवीं अंबरें । तेंवी विश्वस्फुर्तिं स्फुरें । स्फुर्तिचि हे ॥ १५ ॥
न लिंपतां सुखदुःख । येणें आकारें क्षोभोनि नावेक । होय आपणिया सन्मुख । आपणचि जो ॥ १६ ॥
तया नांव दृश्याचें होणें । संवित्ति दृष्ट्टत्वा आणिजे जेणें । बिंबा बिंबत्व जालेपणें । प्रतिबिंबाचेनि ॥ १७ ॥
तेंवी आपणचि आपुला पिटीं । आपणया दृश्य दावित उठी । दृष्टादृश्यदर्शन त्रिपुटी । मांडें तें हे ॥ १८ ॥
सुताचिये गुंजे । आंतबाहेर नाहीं दुजें । तेवी तीनपणेविण जाणिजे । त्रिपुटि हें ॥ १९ ॥
न्य्सधें मुख जैसें देखिजतसें दर्पणमिसें । वायांचि देखणें ऐसें । गमों लागे ॥ २० ॥
तैसें न वचतां भेदा । संवित्ति गमे त्रिधा । हेचि जाणे प्रसिद्धा । उपपत्ति इया ॥ २१ ॥
दृश्याचा जो उभारा । तेंचि द्रष्ट्रत्व होये संसारा । या दोहींमाजिला अंतरा । दृष्टं पंगु होय ॥ २२ ॥
दृश्य जेधवां नाहीं । तेधवां दृष्ट घेऊनि असे काई ? । आणि दृश्येंविण कांहीं । दृष्ट्रत्व होणें । २३ ॥
म्हणोनि दृश्याचे जालेंपणें । दृष्टि द्रष्ट्रत्व होणें । पुढती तें गेलिया जाणें । तैसेचि दोन्ही ॥ २४ ॥
एवं एकचि झालीं ती होती । तिन्ही गेलिया एकचि व्यक्ति । तरी तिन्ही भ्रांति । एकपण साच ॥ २५ ॥
दर्पणाचिया आधि शेखीं । मुख असतचि असे मुखीं । माजीं दर्पण अवलोकीं । आन कांहीं होये ? ॥ २६ ॥
पुढें देखिजे तेणे बगे । देखतें ऐसें गमों लागे । परी दृष्टीतें वाउगें । झकवित असे ॥ २७ ॥
म्हणोनि दृश्याचिये वेळे । दृश्यद्रष्ट्टत्वावेगळें । वस्तुमात्र निहाळे । आपणापाशीं ॥ २८ ॥
वाद्यजातेविण ध्वनी । काष्ट्जातेविण वन्ही । तैसें विशेष ग्रासूनी । स्वयेंचि असे ॥ २९ ॥
जें म्हणतां नये कांहीं । जाणो नये कैसेही । असतचि असे पाही । असणें जया ॥ ३० ॥
आपुलिया बुबुळा । दृष्टि असोनि अखम डोळा । तैसा आत्मज्ञानीं दुबळा । ज्ञानरूप जो ॥ ३१ ॥
जें जाणणेंचि कीं ठाईं । नेणणें कीर नाहीं । परि जाणणें म्हणोनियांही । जाणणें कैंचें ॥ ३२ ॥
यालागीं मौनेंचि बोलिजे । कांहीं नहोनि सर्व होईजे । नव्हतां लाहिजे । कांहीच नाहीं ॥ ३३ ॥
नाना बोधाचिये सोयरिके । साचपण जेणें एके । नाना कल्लोळमाळिके । पाणि जेंवि ॥ ३४ ॥
जें देखिजतेविण । एकलें देखतेंपण । हें असो आपणीया आपण । आपणचि जें ॥ ३५ ॥
जें कोणाचे नव्हतेनि असणें । जें कोणाचे नव्हतां दिसणें । कोणाचें नव्हतां भोगणें । केवळ जो ॥ ३६ ॥
तया पुत्र तूं वटेश्वराचा । रवा जैसा कापुराचा । चांगया मज तुज आपणयाचा । बोल ऐके ॥ ३७ ॥
ज्ञानदेव म्हणे । तुज माझा बोल ऐकणें । ते तळहाता तळीं मिठी देणें । जयापरि । ३८ ॥
बोलेंचि बोल ऐकिजे । स्वादेंचि स्वाद चाखिजे । कां उजिवडे देखिजे । उजिडा जेंवि ॥ ३९ ॥
सोनिया वरकल सोनें जैसा । कां मुख मुखा हो आरिसा । मज तुज संवाद तैसा । चक्रपाणि ॥ ४० ॥
गोडिये परस्परें आवडी । घेतां काय न माये तोंडी । आम्हां परस्परें आवडी । तो पाडु असे ॥ ४१ ॥
सखया तुझेनि उद्देशें । भेटावया जीव उल्हासे । कीं सिद्धभेटी विसकुसे । ऐशिया बिहे ॥ ४२ ॥
भेवों पाहे तुझें दर्शन । तंव रूपा येनों पाहे मन । तेथें दर्शना होय अवजतन । ऐसें गमों लागे ॥ ४३ ॥
कांहीं करी बोले कल्पी । कां न करी न बोले न कल्पी । ये दोन्ही तुझ्या स्वरूपीं । न घेति उमसू ॥ ४४ ॥
चांगया ! टुझेनि नांवे । करणें न करणें न व्हावें । हें काय म्हणों परि न धरवे । मीपण हें ॥ ४५ ॥
लवण पाणियाचा थावो । माजि रिघोनि गेलें पाहो । तंव तेंचि नाहीं मा काय घेवो । माप जळा ॥ ४६ ॥
तैसें तुज आत्मयातें पाही । देखो गेलिया मीचि नाहीं । तेथें तून् कैचा काई । कल्पावया जोगा ॥ ४७ ॥
जो जागोनि नीद देखे । तो देखणेपणा जेंवि मुके । तेंवि तूंतें देखोनि मी थाके । कांहीं नहोनि ॥ ४८ ॥
अंधाराचे ठाईं । सूर्यप्रकाश तंव नाहीं । परी मी आहें हें कांहीं । नवचेचि जेंवि ॥ ४९ ॥
तेंवि तूंतें मी गिवसी । तेथें तूंपण मीपणेंसी । उखते पडे ग्रासीं । भेटीचि उरे ॥ ५० ॥
डोळ्याचे भूमिके । डोळा चित्र होय कौतुकें । आणि तेणेंचि तो देखे । न डंडळितां ॥ ५१ ॥
तैसी उपजतां गोष्टी । न फुटतां दृष्टि । मीतूंवीण भेटी । माझी तुझी ॥ ५२ ॥
आतां मी तूं या उपाधी । ग्रासूनि भेटी नुसधी । ते भोगिली अनुवादीं । घोळघोळू ॥ ५३ ॥
रूपतियाचेनि मिसें । रूचितें जेविजे जैसें । कां दर्पणव्याजें दिसे । देखतें जेंवि ॥ ५४ ॥
तैसी अप्रमेयें प्रमेयें भरलीं । मौनाचीं अक्षरें भली । रचोनि गोष्टी केली । मेळियेचि ॥ ५५ ॥
इयेचें करुनि व्याज । तूं आपणयातें बुझ । दीप दीपपणें पाहे निज । आपुलें जैसें ॥ ५६ ॥
तैसी केलिया गोठी । तया उघडिजे दृष्टी । आपणिया आपण भेटी । आपणामाजी ॥ ५७ ॥
जालिया प्रळयीं एकार्णव । अपार पाणियाची धांव । गिळी आपुला उगव । तैसें करी ॥ ५८ ॥
ज्ञानदेव म्हणे नामरूपें । विण तुझें साच आहे आपणपें । तें स्वानंदजीवनपे । सुखिया होई ॥ ५९ ॥
चांगया पुढत पुढती । घरा आलिया ज्ञानसंपत्ति । वेद्यवेदकत्वही अतीतीं । पदीं बैसें ॥ ६० ॥
चांगदेवा तुझेनि व्याजें । माउलिया श्रीनिवृत्तिराजे । स्वानुभव रसाळ खाजें । दिधलें लोभें ॥ ६१ ॥
एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे । दोन्ही डोळस आरिसे । परस्पर पाहतां कैसें । मुकले भेदा ॥ ६२ ॥
तियेपरि जो इया । दर्पण करील ओंविया । तो आत्माएवढिया । मिळेल सुखा ॥ ६३ ॥
नाहीं तेंचि काय नेणों असें । दिसें तेंचि कैसें नेणों दिसे । असें तेंचि नेणों आपैसे । तें कीं होइहे ॥ ६४ ॥
निदेपरौते निदैजणें । जागृति गिळोनि जागणें । केलें तैसें जुंफणें । ज्ञानदेवो म्हणे ॥ ६५ ॥

Sunday 23 April 2017

निर्झरास - बालकवी

गिरिशिखरे, वनमालाही दरीदरी घुमवित येई कड्यावरुनि घेऊन उड्या खेळ लतावलयी फुगड्या घे लोळण खडकावरती फिर गरगर अंगाभवती, जा हळूहळू वळसे घेत लपत-छपत हिरवाळीत, पाचूंची हिरवी राने झुलव गडे, झुळझुळ गाणे । वसंतमंडप - वनराई आंब्याची पुढती येई. श्रमलासी खेळून खेळ नीज सुखे क्षणभर बाळ । हीं पुढची पिवळी शेतें सळसळती - गाती गीतें, झोप कोठुनि तुला तरी, हास लाडक्या । नाच करी बालझरा तूं बालगुणी, बाल्यचि रे । भरिसी भुवनी ।
बालतरू हे चोहिकडे प्रेमभरे त्यावर तूहि बुदबुद-लहरी फुलवेली सौंदर्ये हृदयामधली गर्द सावल्या सुखदायी इवलाली गवतावरती झुलवित अपुले तुरे-तुरे जादूनेच तुझ्या बा रे? सौंदर्याचा दिव्य झरा या लहरीलहरीमधुनी ताल तुला देतात गडे! मुक्त-मणि उधळून देई! फुलव सारख्या भवताली. हे विश्वी उधळून खुली वेलीची फुगडी होई! रानफुले फुलती हसती निळी लव्हाळी दाट भरे. वन नंदन बनले सारे! बालसंतचि तू चतुरा; स्फूर्ती दिव्य भरिसी विपिनी
आकाशामधुनी जाती इंद्रधनूची कमान ती रम्य तारका लुकलुकती शुभ्र चंद्रिका नाच करी ही दिव्ये येती तुजला वेधुनि त्यांच्या तेजाने धुंद हृदय तव परोपरी त्या लहरीमधुनी झरती नवल न, त्या प्राशायाला गंधर्वा तव गायन रे मेघांच्या सुंदर पंक्ति; ती संध्या खुलते वरती; नीलारुण फलकावरती; स्वर्गधरेवर एकपरी; रात्रंदिन भेटायाला! विसरुनिया अवघी भाने मग उसळे लहरीलहरी दिव्य तुझ्या संगीततति! स्वर्गहि जर भूवर आला! वेड लाविना कुणा बरे!
पर्वत हा, ही दरीदरी गाण्याने भरली राने, गीतमय स्थिरचर झाले! व्यक्त तसे अव्यक्तहि ते मुरलीच्या काढित ताना धुंद करुनि तो नादगुणे दिव्य तयाच्या वेणुपरी गाउनि गे झुळझुळ गान गोपि तुझ्या हिरव्या वेली तुझ्या वेणुचा सूर तरी तव गीते भरली सारी. वर-खाली गाणे गाणे! गीतमय ब्रम्हांड झुले! तव गीते डुलते झुलते! वृंदावनि खेळे कान्हा; जडताहि हसवी गाने; तूहि निर्झरा! नवलपरी विश्वाचे हरिसी भान! रास खेळती भवताली! चराचरावर राज्य करी
काव्यदेविचा प्राण खरा या दिव्याच्या धुंदिगुणे मी कवितेचा दास, मला परि न झरे माझ्या गानी जडतेला खिळुनी राही दिव्यरसी विरणे जीव ते जीवित न मिळे माते दिव्यांची सुंदर माला तूच खरा कविराज गुणी अक्षय तव गायन वाहे तूच निर्झरा! कविश्वरा! दिव्याला गासी गाणे. कवी बोलती जगांतला, दिव्यांची असली श्रेणी! हृदयबंध उकलत नाही! जीवित हे याचे नाव; मग कुठुनि असली गीते? ओवाळी अक्षय तुजला! सरस्वतीचा कंठमणी अक्षयात नांदत राहे!
शिकवी रे, शिकवी माते फुलवेली-लहरी असल्या वृत्तिलता ठायी ठायी प्रेमझरी-काव्यस्फूर्ति प्रगटवुनि चौदा भुवनी अद्वैताचे रज्य गडे! प्रेमशांतिसौंदर्याही मम हृदयी गाईल गाणी आणि असे सगळे रान तेवि सृष्टीची सतार ही दिव्य तुझी असली गीते! मम हृदयी उसळोत खुल्या! विकसू दे सौंदर्याही! ती आत्मज्योती चित्ती दिव्य तिचे पसरी पाणी! अविच्छिन्न मग चोहिकडे! वेडावुनि वसुधामाई रम्य तुझ्या झुळझुळ वाणी! गाते तव मंजुळ गान, गाईल मम गाणी काही!

Saturday 22 April 2017

श्रावणमासी हर्ष मानसी

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे; क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे.
वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणि भासे!
झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा! तो उघडे तरू शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे
उठता वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा; सर्व नभावर होय रेखिल सुंदरतेचे रूप महा.
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते, उतरूनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते.
फडफड करून भिजले अपुले पंख पाखरे सावरिती; सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती.
खिल्लारे ही चरती रानी, गोपहि गाणी गात फिरे, मंजुळ पावा गात तयाचा श्रावणमहिमा एकसुरे.
सुवर्णचम्पक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला, पारिजातही बघता भामा, रोष मनीचा मावळला!
सुंदर परडीघेऊनि हाती पुरपकंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले-पत्री खुडती.
देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयात, वदनी त्यांच्या वाचुनि घ्यावे श्रावण महिन्याचे गीत!

Thursday 20 April 2017

शबरी

तो काळ आर्यांच्या विजयाचा व विस्ताराचा होता. आर्य प्रथम पंजाबात आले, तेथे नीट पाय रोवून ते आणखी पुढे सरकले. गंगा व यमुना या सुंदर विशाल नद्यांच्या गहिऱ्या पाण्याने समृद्ध व सुपीक झालेल्या रमणीय प्रदेशांत आर्य राजे करुन राहू लागले. सृष्टिसुंदरीने वरदहस्त ठेवलेल्या याच प्रदेशात, जनकासारखे राजर्षी जन्मले. धर्म, तत्त्वज्ञान, कला यांचा विकास येथेच प्रथम झाला व संस्कृतिसूर्याचे हे येथील किरण हळूहळू अखिल भारतवर्षावर पसरु लागले.
उत्तर हिंदुस्थानात आर्यांच्या वसाहती सर्वत्र होण्यापूर्वीच ओढ्या प्रांतातून समुद्रकिनार्यापर्यंत येऊन तेथे गलबतात बसून काही धाडसी आर्य खाली सिलोन ऊर्फ लंका बेटात गेले. या बेटाजवळ मोत्यांच्या खाणी होत्या. सोन्याच्या खाणी होत्या. हे राज्य समृद्ध झाले. लंकाधीश रावणासारखा महत्त्वाकांक्षी राजा उत्तरेकडे दिग्विजय करण्यास निघाला व नाशिकपर्यंत आला. तेथे त्याने आपले अधिकारी ठेवले. रावणासारखे राजे दक्षिणेकडून उत्तरेकडे येत होते, तर दुसरे संस्कृतिप्रसार करणारे धाडसी ऋषी विंध्यपर्वत ओलांडून खाली दक्षिणेकडे येत होते.
दंतकथांमधून इतिहास निर्मावा लागतो. अगस्ती हा विंध्यपर्वत ओलांडून दक्षिणेकडे आलेला पहिला संस्कृतिप्रसारक होय, ही गोष्ट त्याने विंध्यपर्वतास वाढू नकोस, असे सांगितले त्यात दिसून येते. अगस्तीने फार प्रवास केलेला असावा. तीन आचमने करुन त्याने सात समुद्र प्राशन केले, यातील अर्थ हा असेल की, तीन पर्यटनांत तो सात समुद्र ओलांडून आला. दंडकारण्यात प्रवेश करणारा पहिला ऋषी अगस्तीच होय. त्याच्या पाठोपाठ भारद्वाज, मतंग, अत्रि प्रभृत्री ऋषी येऊ लागले व आपापले आश्रम रमणीय अशा ठिकाणी स्थापू लागले. चित्रकूट हे पर्वताचे नावच त्या पर्वताची सुंदरता पटवून देते, तेथे भारद्वाज ऋषी राहिले. ज्याप्रमाणे ख्रिस्ती मिशनरी रानटी लोकांत जाऊन तेथे आपले बंगले बांधतात व त्यांना आपल्या धर्माची दीक्षा देतात, त्याप्रमाणे आमचे हे प्राचीन आर्य धर्मप्रचारक रानटी लोकांत जाऊन आश्रम स्थापून त्यांना संस्कृतिज्ञान देऊ लागले.
हळूहळू या वैराग्यशील, ध्यानधारणासंपन्न, निष्पाप अशा ऋषींच्या साध्या राहणीचा व सुंदर आचरणाचा परिणाम या दंडकारण्यातील कातकरी, भिल्ल, कोळी इत्यादी लोकांवर होऊ लागला. या लोकांचा व ऋषींचा संबंध येऊ लागला. भिल्ल वगैरे जातींची लहान लहान राज्ये होती. हे राजे आपली मुलेबाळे या ऋषींच्या आश्रमात शिकण्यासाठी कधीकधी ठेवीत. प्रेमाने व निर्लोभतेने येथील लोकांची हृदये वश करुन घेऊन सुंदर ज्ञान व पवित्र आचार हे ऋषी त्यांस शिकवू लागले. रानटी लोकांच्या हृदय मंदिरात ज्ञानाचा दिवा प्रकाशू लागला.
अशाच थोर ऋषींपैकी मतंग ऋषी हे एक होते. पंपासरोवराच्याजवळ त्यांचा आश्रम होता. आजूबाजूला रमणीय व विशाल वनराजी होती. मतंग ऋषींची पत्नी ही अत्यंत साध्वी व पतिपरायण होती. आश्रमाच्या आसमंतातले वातावरण अतिशय प्रसन्न व पावन असे ती ठेवीत असे. आश्रमात हरिणमयूरादी सुंदर पशुपक्षी पाळलेले होते. सकाळच्या वेळी पाखरांना अंगणात नीवार धान्य टाकताना व हरणांना हिरवा चारा घालताना ऋषिपत्नीस मोठा आनंद होत असे, कारण तीच तिची लडिवाळ मुलेबाळे होती.
मतंग ऋषी फार थोर मनाचे होते. प्रातःकाळी नदीवर स्नान करुन नंतर ते संध्या, ईश्वरपूजा व ध्यानधारणा करीत. तदनंतर आश्रमाच्या भोवती जे कोणी रहिवाशी येतील, त्यांना खुणांनी मोडक्या तोडक्या भाषेत सुरेख गोष्टी सांगत. हळूहळू ते त्यांची भाषा शिकू लागले आणि आपले उन्नत व उदात्त विचार त्यांना सांगू लागले. जरी त्या रानटी लोकांना प्रथम प्रथम विशेष समजत नसे, तरी त्या पावन वातावरणाचा, ऋषींच्या व्यक्त्तिमाहात्म्याचा त्यांच्या मनावर संस्कार झाल्याशिवाय राहत नसे. पावित्र्य हे न बोलता बोलते, न शिकविता शिकविते. दिव्याची ज्योत निःस्तब्धपणे अंधार हरण करीत असते. थोर लोकांचे नामोच्चारणही जर मनास उन्नत करते, तर त्यांचे प्रत्यक्ष दर्शन किती प्रभावशाली असेल बरे!
मतंग ऋषींच्या आश्रमापासून काही कोसांच्या अंतरावर एका भिल्ल राजाचे राज्य होते. राज्य लहानसेच होते. भिल्लांचा राजा जरी रानटी होता, तरी तोही ऋषींच्या आचरणाने व उपदेशाने थोडा सुधारला होता. या भिल्ल राजास एक पाचसहा वर्षांची मुलगी होती. मुलगी काळीसावळीच होती; पण तिचा चेहरा तरतरीत होता. रानातील हरिणीच्या डोळ्यांसारखेच तिचे डोळे खेळकर व पाणीदार असून ती हरिणीप्रमाणेच चपळही होती. घरात बसून राहणे तिला कधीच आवडत नसे; घडीची म्हणून तिला उसंत माहीत नसे. भिल्ल राजाचीच ती मुलगी. लहानपणी तीही लहानसे धनुष्य घेऊन हरणांच्या पाठीमागे लागे. आपल्या मुलीचे कोडकौतुक राजा-राणी कितीतरी करीत. मनुष्य रानटी असो वा सुधारलेला असो; मनुष्यस्वभाव हा सर्वत्र सारखाच आहे. रानटी मनुष्यालाही प्रेम समजते, त्याला मुलेबाळे आवडतात. रानटी मनुष्यही आनंदाने हसतो व दुःखाने रडतो.
आईबापांच्या प्रेमळ सहवासात लहानगी शबरी वाढत होती. एक दिवस भिल्ल राजा आपल्या राणीला म्हणाला, "आपल्या या मुलीला मतंग ऋषींच्या आश्रमात ठेवले तर? मी याविषयी त्यांना विचारले, तेव्हा त्यांच्या पत्नीने मोठ्या आनंदाने संमती दिली. ऋषिपत्नीलाही मूलबाळ नाही. ऋषिपत्नी मला म्हणाली, 'खरंच, तुमची मुलगी आश्रमात ठेवा; मी तिला शिकवीनसवरीन; पोटच्या मुलीप्रमाणे तिच्यावर प्रेम करीन.' मग बोल, तुझे म्हणणे काय आहे ते. मुलीस तिथे पाठविण्यास तुझी संमती आहे ना? ती तुझ्यासारखीच अडाणी राहावी, असे तुला वाटते का?"
राणी म्हणाली, "मी आपल्या इच्छेविरुद्ध नाही. मनाला कसेसेच वाटते हे खरे; तरी पण मुलीचे कल्याण होईल, तेच केले पाहिजे. आपल्या लहानपणी आपणांस नाही असे ऋषी भेटले; परंतु आपल्या मुलीच्या भाग्याने भेटले आहेत, तर ती तरी चांगली होवो."
उभयता मातापितरांनी मुलीला आश्रमात पाठविण्याचा निश्चय केला. शुभ दिवशी त्या भिल्ल राजाने शबरीस बरोबर घेतले, तिला पालखीत बसविले आणि मतंग ऋषींच्या आश्रमात आणून सोडिले. कन्येस ऋषींच्या स्वाधीन करुन राजा म्हणाला, "महाराज, ही माझी मुलगी आपल्या स्वाधीन करीत आहे. ही सर्वस्वी आपलीच समजा व तिला नीट वळण लावा."
ऋषिपत्नी म्हणाली, "राजा, निश्चिंत ऐस. ही माझीच मुलगी मी समजेन. मी तिला मजजवळ घेऊन निजेन, तिची वेणीफणी करीन. ती येथील हरिणांमोरांबरोबर खेळेल-खिदळेल व त्यांच्याजवळ शिकेल. काही काळजी करु नकोस बरं!"
राजाने मुलीसाठी तांबड्या रंगाची वल्कले केली होती, ती तिला दिली. मुलीला पोटाशी धरुन नंतर राजा निघून गेला.
शबरी आश्रमात वाढू लागली. ऋषिपत्नी तिचे कितीतरी कोडकौतुक करी. आश्रमात गाई होत्या. गाईंच्या वासरांबरोबर शबरी खेळे, उड्या मारी. तिने गाईंना नदीवर न्यावे, त्यांस पाणी पाजावे. गाईचे धारोष्ण दूध शबरीला फार आवडे. प्राचीन कालीन आर्यांचे गाय हेच धन असे. 'गोधन' हा शब्द प्रसिद्ध आहे.
शबरी सकाळी लवकर उठे. ऋषिपत्नीने तिचे दात आधी नीट घासावेत, मग तिची वेणीफणी करावी. शबरीचे केस नीट विंचरुन कोणीही आजपर्यंत बांधले नव्हते. ऋषिपत्नी शबरीच्या केसांत सुंदर फुले घाली. शबरी म्हणजे राणीच शोभे. मग शबरीने स्नान करावे, देवपूजेसाठी सुरेख फुले गोळा करुन आणावीत. दूर्वांकुरांनी गुंफून तिने हार करावेत व आश्रमाच्या दारांवर त्यांची तोरणे करुन लावावीत.
ऋषींची पूजा वगैरे झाली म्हणजे शबरीला जवळ घेऊन ते तिला सुंदर स्तोत्रे शिकवीत, सूर्याच्या उपासनेचे मंत्र अर्थासह तिला म्हणावयास सांगत. उषादेवीची सुंदर गाणी ते तिजकडून म्हणवीत. उषादेवीचे एक गाणे मतंग ऋषींना फार आवड. त्याचा अर्थ पुढीलप्रमाणे होता- 'ती पहा, अमृताची जणू काय ध्वजाच, अमर जीवनाची जणू पताकाच अशी उषा येत आहे. ही उषा लवकर उठणाऱ्याला संपत्ती देते. ही आकाशदेवतेची मुलगी आहे. सुंदर दवबिंदूंचे हार घालून आपल्या झगझगीत रथात बसून ती येते. ती आपल्या भक्तांना काही उणे पडू देत नाही. ही उषादेवी किती सुंदर, पवित्र व धन्यतम अशी आहे!'
अशा प्रकारच्या गोड कविता शबरीला मतंग ऋषी शिकवीत असत. ऋषींच्या तोंडून त्या सुंदर कवितांचे विवरण ऐकताना लहानग्या शबरीचेही हृदय भरुन येई.
एक दिवस रात्रीची वेळ झाली होती. मतंग ऋषींची सायंसंध्या केव्हाच आटपली होती. गाईगुरे बांधली होती. हरिणपाडसे शिंगे अंगात खुपसून निजली होती. ऋषी व त्यांची पत्नी बाहेर अंगणात बसली होती. फलाहार झाला होता. नभोमंडलात दंडकारण्याची शोभा पाहण्यासाठी एकेक तारका येत होती.
शबरी आकाशाकडे पाहून म्हणाली, "तात, हे तारे कोठून येतात? काय करतात? रोज रोज आकाशात येण्याचा व थंडीत कुडकुडण्याचा त्यांना त्रास नसेल का होत?"
ऋषी म्हणाले, "बाळ, तू अजून लहान आहेस. मनुष्य कसा वागतो, शबरी कशी वागते, हे सारे पाहण्यासाठी हे वरुणदेवाचे हेर आहेत, हे तारे वरुणदेवतेचे दूत आहेत. डोळ्यांत तेल घालून मनुष्याची कृत्ये ते पाहत असतात व माणसांची वाईट कृत्ये पाहून ते तारे रडतात. त्यांचे जे अश्रू त्यांनाच तू दवबिंदू म्हणतेस. झाडामाडांच्या पानांवर ते दवबिंदू टपटप पडताना तू नाही का ऐकलेस? सकाळी पानांफुलांवर, दूर्वांकुरांवर ते अश्रू कसे मोत्यांसारखे चमकतात!"
शबरी म्हणाली, "तात, मी आज त्या हरिणपाडसास बाणाने टोचले, ते त्यांना दिसले असेल का?"
ऋषी म्हणाले, "होय. दिवसा लोकांकडे लक्ष ठेवण्याचे काम सूर्य करतो; रात्री ते काम चंद्र व तारे करतात."
शबरीचे ते प्रेमळ व निष्कपट डोळे पाण्याने डबडबून आले व ती म्हणाली, "तात, मघा त्या मोराच्या पिसाऱ्यातील पीस उपटण्यास मी गेले, ते पाहून तारे आज रडतील का? मोर कसा निजला होता!"
ऋषी म्हणाले, "होय. परंतु हे काय? वत्से शबरी, अशी रडू नकोस. पूस, डोळे पूस आधी. तू त्या ताऱ्यांची प्रार्थना कर व म्हण, आजपासून हरणांना, मोरांना मी दुखविणार नाही."
शबरीने हात जोडले व आकाशाकडे तोंड करुन ती म्हणाली, "हे देवदूतांनो, हे तारकांनो, या मुलीला क्षमा करा. माझ्यासाठी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मी आजपासून बाणाच्या टोकाने हरणांस टोचणार नाही, पक्ष्यांची पिसे उपटणार नाही. मला क्षमा करा."
ऋषीने शबरीचे वात्सल्याने अवघ्राण केले. व ऋषिपत्नीने तिला प्रेमभराने हृदयाशी धरिले.
ऋषिपत्नी म्हणाली, "शबरी, तू फार गुणी आहेस."
शबरीच्या गंगायमुना थांबल्या व ऋषिपत्नीच्या मांडीवर डोके ठेवून ती झोपी गेली.
शबरी हळूहळू वयाने वाढत होती, मनाने वाढत होती. सत्य, दया, परोपकार यांचे ती धडे घेत होती. तिचे मन आता फुलासारखे हळुवार झाले होते. झाडांच्या फांदीलासुद्धा धक्का लावताना तिला आता वाईट वाटे.
एक दिवस मतंग ऋषी तिला म्हणाले, "शबरी, परमेश्वरास वाहण्यासाठी दोनचार फुले फार तर आणावीत. फुले हे वृक्षांचे सौंदर्य आहे. वृक्षांचे सौंदर्य आपण नष्ट करु नये. फूल घरी आणले तर किती लवकर कोमेजते; परंतु झाडावर ते बराच वेळ टवटवीत दिसते. आपण त्या फुलाला त्याच्या आईच्या मांडीवरुन ओढून लवकर मारतो. सकाळच्या वेळी फुलांचे हृदय, शबरी, भीतीने कापत असते. आपली मान मुरगळण्यास कोण खाटीक येतो, इकडे त्यांचे लक्ष असते. शबरी, आपण दुष्ट आहोत. मनुष्यप्राण्याला आपल्या प्रियजनांच्या संगतीत मरणे आवडते; या फुलांनाही तसेच नसेल का वाटत? शबरी, हे फूल तुझ्यासारखेच आहे. तेही हसते व कोमजते; त्यालाही जीव आहे. झाडामांडाकडे, फुलपाखरांकडे सुद्धा प्रेमाने पाहावयास शिकणे म्हणजे परमेश्वराच्या जवळ जाणे होय."
शबरी म्हणाली, "तात, लहानपणी मी तर शिकार करीत असे! माझे बाबा हरणे मारुन आणीत; शेळ्या, मेंढ्या आमच्याकडे मारल्या जायच्या."
ऋषी म्हणाले, "शबरी, ते तू आता विसरुन जा. आता निराळे आचरण ठेवावयास तू शिक. उगीच कोणाला दुखवू नकोस, कोणाची हिंसा करु नकोस. शेतीभाती करावी, वृक्षांची फळे खावीत, कंदमुळे भक्षावीत, अशी राहणी चांगली नाही का? शबरी, तुला चिमटा घेतला तर कसे वाटेल?"
इतक्यात ऋषिपत्नी बाहेर आली व म्हणाली, "मी तुम्हाला सांगू का कालची गंमत? त्या अशोकाच्या झाडावरील फुलांचा तुरा तोडून घेण्याची शबरीला अतिशय इच्छा झाली होती. तिने तीनतीनदा हात पुढे करावेत व आखडते घ्यावेत. शेवटी तिच्या डोळ्यांत पाणी आले व तिने त्या फुलांना चुंबून त्यांच्याकडे कारुण्याने पाहिले आणि ती निघून गेली. शबरी, मी सारे पाहत होते बरं का!" शबरी लाजली व ऋषीला कृतार्थता वाटली. हे रानफूल सात्त्विक सौंदर्याने, गुणगंधाने नटताना पाहून त्याला का धन्य वाटणार नाही? शबरी आता वयात आली, ती यौवनपूर्ण झाली. एक दिवस मतंग ऋषी तिला म्हणाले, "शबरी, तू शिकली सावरलीस, सद्गुणी झालीस. आता तू मोठी झाली आहेस. घरी जा. ब्रह्मचर्याश्रम सोडून गृहस्थाश्रमात तू आता प्रवेश कर; विवाह करुन सुखाने नांद." शबरी म्हणाली, "तात, मला हे पाय सोडून दूर जाववत नाही; मी इथेच तुमची सेवा करुन राहीन." त्या वेळेस ऋषी आणखी काही बोलले नाहीत. त्यांनी परभारे भिल्ल राजाला निरोप पाठविला, 'तुझी मुलगी आता उपवर झाली आहे; तरी तिला घेऊन घरी जा व तिचा विवाह कर.' निरोपाप्रमाणे राजाने दुसऱ्या एका भिल्ल राजाच्या मुलाची वर म्हणून योजना केली व शबरीला नेण्यासाठी तो आश्रमात आला. ऋषीने राजाचे स्वागत केले व त्याला फलाहार दिला. शबरीला पित्याच्या स्वाधीन करताना त्याने तिला शेवटचा उपदेश केला- "शबरी, सुखाने नांद प्राणिमात्रांवर प्रेम कर. सत्याने वाग. रवी, शशी, तारे आपल्या वर्तनाकडे पाहत आहेत, हे लक्षात धर. वत्से, जा. देव तुझे मंगल करो व तुला सत्पथावर ठेवो!" शबरी सद्गदित झाली होती. ऋषिपत्नीने तिला पोटाशी धरिले व म्हटले, "बाळे शबरी, अधूनमधून येत जा हो आश्रमात. आम्हाला आता हे घर खायला येईल. चुकल्याचुकल्यासारखे होईल. पूस हो डोळे. जाताना डोळ्यास अश्रू आणू नयेत. आता तुझा विवाह होईल. पती हाच देव मान. नीट जपून पावले टाक. तू शहाणी आहेस." मोठ्या कष्टाने शबरी निघाली. ऋषी व ऋषिपत्नी काही अंतरापर्यंत, गोदेच्या प्रवाहापर्यंत पोचवीत गेली. एक हरिणशावक शबरीने बरोबर नेलेच. शबरी गेली व जड पावलाने ऋषी व ऋषिपत्नी आश्रमात परत आली. त्या दिवशी त्यांस चैन पडले नाही. शबरीची पदोपदी त्यांना आठवण येई. आज दहा वर्षांनी शबरी राजवाड्यात परत आली होती. ती गेली त्या वेळी लहान होती, आज ती नवयौवनसंपन्न झाली होती. गेली तेव्हा अविकसित मनाने गेली; आज विकसित मनाने- सत्य, दया, हिंसा, परोपकार, प्रेम इत्यादी सद्गुणांनी फुललेल्या मनाने ती आली होती. शबरी लगेच आईला भेटली. सर्वांना आनंद झाला. दुपारची वेळ झाली होती व शबरी माडीवर दरवाजात उभी राहून आजूबाजूस पाहत होती, तो तिच्या दृष्टीस कोणते दृश्य पडले? एका आवारात चारपाचशे शेळ्यामेंढ्या बांधलेल्या होत्या. बाहेर कडक ऊन पडले होते. त्या मुक्या प्राण्यांना पाणी पाजले नव्हते, खाण्यास घातले नव्हते व त्यांजवर छाया नव्हती. उन्हात ते प्राणी तडफडत होते! शबरीचे कोमल मन कळवळले आणि ती तीरासारखी खाली गेली व आईला म्हणाली, "आई, ती मेंढरे कोकरे तिकडे का ग डांबून ठेविली आहेत? ना तेथे छाया, ना जल, ना चारा; जलविणे कशी माशाप्रमाणे तडफडत आहेत! आई, का गं असे?" आई म्हणाली, "बाळ, त्यांची पीडा, त्यांचे क्लेश उद्या संपतील. उद्या तुझा योजलेला पती येईल. तो श्रीमंत आहे. शेकडो लोक त्यांचेबरोबर येतील. त्यांना मेजवानी देण्यासाठी उद्या ह्या साऱ्यांची चटणी होईल. जा, तिकडे खेळ, मला काम आहे." शबरीच्या पोटात धस्स झाले! ती कावरीबावरी झाली. भिल्लांच्या हिंसामय जीवनाचा आजवर तिला विसर पडला होता. तिच्या मनात शेकडो विचार आले- 'उद्या माझ्या विवाहाचा मंगल दिवस! सुखदु:खाचा वाटेकरी, जन्माचा सहकारी उद्या मला लाभणार! माझ्या आयुष्यात उद्याचा केवढा भाग्याचा दिवस! उद्या आईबाप, आप्तेष्ट आनंदित होतील; परंतु या मुक्या प्राण्यांना तो मरण्याचा दिवस होणार! माझ्या विवाहसमारंभासाठी यांना मरावे लागणार! आणि मला पती मिळणार तोही असाच हिंसामय वृत्तीचा असणार! मी पुनश्च त्या हिंसामय जीवनात पडणार! छेः! कसे माझे मन कासावीस होत आहे! माझे विचार मी कोणास सांगू? माझे कोण ऐकणार येथे! नको, हा विवाहच नको. हा मंगल प्रसंग नसून अमंगल आहे! माझ्या जीवनाच्या सोन्याची पुन्हा राख होणार अं? आपण येथून तत्काळ निघून जावे. रानावनात तपश्चर्येत काळ घालवावा." शबरीचे डोळे भरुन आले. ती आता रात्रीची वाट पाहत बसली. वाड्यात सर्वत्र लग्नघाई चाललीच होती. शबरी फाटकी वल्कले अंगावर घालून विरक्तपणे रात्री निघून गेली! कोणालाही ते माहीत नव्हते, फक्त अंधकाराला माहीत होते. मतंग ऋषी आश्रमात ब्रह्मध्यानात मग्न होते. सकाळचे काम करण्यात ऋषिपत्नी गढून गेली होती. इतक्यात शबरी तेथे आली. शबरीला पाहताच मोर नाचू लागले, हरणे उड्या मारु लागली, गाईंची वासरे हंबरु लागली. ऋषींनी डोळे उघडले. मुखकळा म्लान झालेली, दृष्टी अश्रूंनी डवरलेली अशी शबरी पाहून, ते आश्चर्यचकित झाले. शबरीच्या मुखेंदूवरील अश्रूंचे पटल पाहून ऋषींचे अंतःकरण विरघळले. शबरीने येऊन वंदन केले व एखाद्या अपराधिनीप्रमाणे ती जरा दूर उभी राहिली.
मतंग ऋषी म्हणाले, "शबरी, आज तर तुझ्या विवाहाचा मंगल दिवस. तू आज येथे रडत परत का आलीस? तुला कोणी रागे का भरले? आईबापांशी भांडण का झाले? शबरी, आईबापांसारखे अन्य दैवत नाही. बोल, अशी मुकी का तू?" ऋषी कोणाजवळ बोलत आहेत, हे पाहण्यासाठी ऋषिपत्नी बाहेर आली व पाहते, तो काल परत गेलेली शबरी! ती उद्गारली, "शबरी, अगं इकडे ये ना अशी. तू का कोणी परकी आहेस? अशी रडू नकोस. रडूनरडून डोळे लाल झाले! प्रेमळ पोर! ये अशी इकडे व सांग काय झाले ते." ते प्रेमळ शब्द ऐकून शबरी जवळ आली. सहानुभूतीच्या व प्रेमाच्या शब्दांनी बंद ओठ उघडतात, बंद हृदये उघडी होतात. ऋषिपत्नीच्या खांद्यावर मान ठेवून शबरी ओक्साबोक्शी रडू लागली. ऋषिपत्नी म्हणाली, "शबरी, अशी किती वेळ रडत बसणार तू? उगी नाही का राहत? काय झाले ते सारे सांग तर. या रडण्याने आम्ही काय बरे समजावे?" शबरीने डोळे पुसले आणि ती हात जोडून म्हणाली, "आई, तात, मला येथेच आश्रमात राहू द्या. मला आजपर्यंत आपण आधार दिलात, तसाच यापुढे द्या. मला नाही म्हणू नका. मी माझे आयुष्य आनंदाने येथे कंठीन, आश्रमाची झाडलोट करीन, गाईगुरे सांभाळीन, सडासंमार्जन करीन, आपले चरण चुरीन, तुमचे अमोल बोल ऐकेन." ऋषी म्हणाले, "शबरी, तू तर विवाहासाठी गेली होतीस. तू आता यौवनसंपन्न झाली आहेस. आश्रमात तरुण मुलीला ठेवणे आम्हालाही जरा संकटच वाटते. शिवाय, येथे दक्षिणेकडील राक्षासांचा कधीमधी हल्ला येईल. तू पतीसह संसार करावास, हे योग्य. वेल ही वृक्षावर चढल्यानेच शोभते. शबरी, असा वेडेपणा करु नकोस. जा, घरी माघारी जा. सुखाचा नेटका संसार कर." शबरीला हुंदका आला, तो तिला आवरेना. ती स्फुंदस्फुंदू झाली. पुनरपि धीर करुन सद्गदित स्वराने ती म्हणाली, "तात, असे कठोर नका होऊ. मला मग आजपर्यंत शिकवलेत तरी कशासाठी? सत्य, दया, हिंसा, परोपकार, प्रेम इत्यादी गुण आपण शिकवलेत. मी घरी गेले तर माझ्या विवाहासाठी शेकडो मुक्या प्राण्यांचा संहार होणार! ती मेंढरे कशी तडफडत होती! तात, भिल्लांचे जीवन हिंसामय आहे. मला मिळेल तो पती व सारी सासरची मंडळी हिंसामय जीवनात आनंद मानणार; येथे मी कशी सुखाने राहू? मला इकडे आड, तिकडे विहीर असे झाले आहे. 'बाप खाऊ घालीना, आई भीक मागू देईना' अशी स्थिती माझी झाली. गंगा आसऱ्यासाठी समुद्राकडे गेली व समुद्राने तिला झिडकारले, तर तिने जावे कोठे? नदी जलचरांवर रागावली तर त्यांनी कोठे जावे? महाराज, माझ्याबद्दल आपल्या मनात संशय येऊ देऊ नका. मी तरुण असले, तरी आपल्या पवित्र सान्निध्यात असल्यावर माझे पाऊल वेडेवाकडे पडणार नाही. आपले संरक्षण असले, आपली कृपादृष्टी असली, आपला आशीर्वाद असला, म्हणजे माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाही दुष्टाची छाती नाही. मला नाही म्हणू नका. मी तुमची मुलगी. तुम्ही वाढविलीत, तुम्ही पदरात घ्या. नका पायाने लोटू तात, कृपा करा. आई, कृपा कर!" ते करुणरसाने थबथबलेले शब्द ऐकून ऋषींचे दयामय अंतःकरण वितळले. ऋषी शबरीला म्हणाले, "मुली, तू मनाने फार थोर झाली आहेस. राहा, माझ्या आश्रमात तू राहा." शबरीच्या अंगावर एकदम मूठभर मांस चढल्यासारखे झाले. रडणारे डोळे हसू लागले, प्रेममय व शांत झाले. लगेच शबरी घरच्याप्रमाणे वागू लागली, कामधंदा करु लागली, पंपासरोवराचे पाणी भरुन घट आणू लागली. शबरीच्या जीवनात पावित्र्य, समाधान, आनंद, सरलता यांचे झरे वाहू लागले. शबरीचा पिता आला; परंतु मतंग ऋषींनी त्याला सर्व समजावून सांगितले. पिता न संतापता पुनरपि माघारी गेला. शबरीचे जीवन संथपणे वाहू लागले. शबरी आता तपस्विनी झाली, योगिनी झाली. तिच्या चर्येत, चालचलणुकीत पंपासरोवराची गंभीरता व पवित्रता होती. तेथील वनराजीची भव्यता व स्निग्धता, सुरभिता व सौम्यता तिच्या हृदयात होती. मतंग ऋषींजवळ सुखसंवाद करण्यात तिचे दिवस आनंदाने निघून जात. एक दिवस मतंग ऋषी म्हणाले, "शबरी, परमेश्वर जरी सर्व चराचरांत भरुन राहिला असला, तरी काही वस्तूंत परमेश्वराचे वैभव जास्त स्पष्टपणे प्रतीत होते व आपले मन तेथे विनम्र होते. उदाहरणार्थ, हा वटवृक्ष पहा. सर्व वृक्ष-वनस्पतींत ईश्वरी अंश भरलेला आहेच; परंतु गगनाला आपल्या फांद्यांनी उचलून धरणारा, आजूबाजूस आपले प्रेमळ पल्लवित हात पसरुन विश्वाला कवटाळू पाहणारा, हजारो पाखरांस आश्रय देणारा, पांथस्थांस शीतल व धनदाट छाया वितरणारा हा वटवृक्ष पाहिला, म्हणजे याच्या ठिकाणी असलेले परमेश्वरी वैभव जास्त स्पष्टपणे प्रकट झालेले दिसते आणि आपले मन वटवृक्षाबद्दल भक्तिभावाने भरुन येते. आपण त्याची पूजा करतो. शबरी, सर्व प्रवाहांच्या ठिकाणी परमेश्वर आहेच; परंतु हजारो कोस जमीन सुपीक करणारी, शेकडो शहरांना वाढवून त्यांना वैभवाने नटविणारी एखादी मोठी नदी, तिला आपण अधिक पवित्र मानतो. शबरी, सर्व फुलांच्या ठायी सौंदर्य, सुगंध, कोमलता आहे, पण कमलपुष्पाच्या ठायी हे गुण विशेष प्रतीत होतात; म्हणून त्याला आपण जास्त मान देतो. सर्वत्र असेच आहे. जे जे थोर आहे, उदात्त आहे, रमणीय आहे, विशाल आहे, त्याबद्दल साहजिकच आदर, भक्ती, प्रेम ही आपल्या हृदयात उत्पन्न होतात. शबरी, मनुष्यजातीतही असेच आहे. आपणा सर्वांच्या ठायी परमेश्वरी तत्त्व आहे. परंतु तुझ्या जातीतील लोकांपेक्षा तुझ्यामधील ईश्वरी तत्त्व जास्त स्पष्टपणे दिसून येते. म्हणून तुझ्याबद्दल आदर वाटतो. आकाशाचे प्रतिबिंब सर्वत्र पाण्यात पडलेले असते, परंतु निर्मळ पाण्यात ते स्पष्ट दिसते; त्याप्रमाणे परमेश्वराचे प्रतिबिंब निर्मळ पाण्यात स्पष्ट दिसते; त्याप्रमाणे परमेश्वराचे प्रतिबिंब निर्मळ हृदयात स्वच्छ पडलेले दिसून येते. शबरी, आपले मन आपण घासून घासून इतके स्वच्छ करावे की, परमेश्वराचे पवित्र प्रतिबिंब येथे पडावे व त्याचे तेज आपल्या डोळ्यांवाटे, वाणीवाटे, आपल्या प्रत्येक हालचालीत बाहेर पडावे. आपण आपले मन व बुद्धी ही घासून स्वच्छ करीत असतानाच इतरांच्याही हृदयाला स्वच्छ करण्याचा आपण प्रयत्न करावा. शबरी, तू तपस्विनी आहेस, तू आपले हृदय पवित्र केले आहेस. तू तुझ्या जातीतील स्त्री-पुरुषांची मनेही निर्मळ व प्रेमळ व्हावीत म्हणून प्रयत्न केले पाहिजेस. स्वतःचे खरे हित साधून परहितार्थ म्हणून सततोद्योग करीत राहणे, हे विचारशील मानवाचे जीवितकार्य आहे." मुनींची ती गंगौघाप्रमाणे वाहणारी पवित्र वाणी शबरी ऐकत होती. ते शब्द आपल्या हृदयात ती साठवीत होती. हात जोडून खाली ऋषींच्या पदकमांलकडे पाहत शबरी म्हणाली, "गुरुराया, ही शबरी अजून वेडीबावरी आहे. ती दुसऱ्याला काय शिकविणार? महाराज, सदैव मला तुमच्या चरणांजवळ ठेवा म्हणजे झाले!" अशा प्रकारचे प्रसंग, असे विचारसंलाप कितीदा तरी होत असत. शबरी आनंदाने जीवन कंठीत होती. वर्षांमागून वर्षे चालली. शबरी प्रेममय व भक्तिमय बनत चालली. तिला पाहून पशुपक्षी जवळ येत. तिच्या डोळ्यांतील प्रेममंदाकिनीने क्रूर पशूही आपले क्रौर्य विसरुन जात. तिच्या हातातून पाखरांनी दाणे घ्यावेत, तिच्या मांडीवर बसून भक्तिभावाने सद्गदित झाल्यामुळे तिच्या डोळ्यांतून घळघळ गळणारे अश्रू मोत्यांप्रमाणे पाखरांनी गिळावेत! शबरी - भिल्लाची पोर शबरी - प्रेमस्नेहाची देवता बनली होती. कधी कधी मतंग ऋषींच्या बरोबर शबरी इतर थोर ऋषींच्या आश्रमातही जात असे. शबरीची जीवनकथा, तिचे वैराग्य, तिचे ज्ञान व तिची शांत मुद्रा, हे पाहून ऋषी विस्मित होत व ते तिच्याबद्दल पूज्य भाव व्यक्त करीत. ऋषिपत्नींजवळ शबरी चराचरात भरलेल्या प्रेममय परमेश्वरांसंबंधी बोलू लागली म्हणजे ऋषिपत्नी चकित होत व शबरीच्या पायाला त्यांचे हात जोडले जात! मतंग ऋषी आता वृद्ध झाले व त्यांची पत्नीही वृद्ध झाली; दोघेही पिकली पाने झाली होती. आता सर्व कामधाम शबरीच करी. सेवा हाच तिचा आनंद होता. रात्रीच्या वेळी ऋषींचे सुरकुतलेले अस्थिचर्ममय पाय चेपताना, कधीकधी तिच्या पोटात धस्स होई. 'हे पाय लवकरच आपणास अंतरणार का?' असा विचार तिच्या मनात येऊन डोळ्यांत अश्रू जमत. झोप न लागणाऱ्या गुरुलाही झोप लागावी; परंतु मृत्यू लवकरच गुरुला नेणार का, या विचाराने शबरीस मात्र झोप लागू नये!
ऋषींच्या उपदेशाच्या गोष्टी ऐकताना तिच्या मनात विचार येई की, 'असे अमोल बोल आता किती दिवस ऐकावयास मिळणार? ही पवित्र गंगोत्री लवकरच बंद होईल का? ऋषींचे शब्द सतत ऐकत बसावेत,' असेच तिला वाटे.
एक दिवस मतंग ऋषी तिला म्हणाले, "शबरी, मरण हे कोणाला टळले आहे? केलेली वस्तू मोडते, गुंफलेला हार कोमेजतो. जे जन्मले ते मरणार, उगवले ते सुकणार, सृष्टीचा हा नियमच आहे. शबरी, एक दिवस तुला, मला हा मृण्मय देह सोडून जावे लागणार, फूल कोमेजले तरी त्याचा रंग, त्याचा सुगंध आपल्या लक्षात राहतो. त्याप्रमाणे माणूस गेले तरी त्याचा चांगुलपणा विसरला जात नाही." मतंग ऋषी असे बोलू लागले की शबरीला वाटे, ही निरवानिरवीची भाषा गुरुदेव का बोलत आहेत? हे शेवटचे का सांगणे आहे? आज मतंग ऋषी स्नानसंध्या करीत होते. एकाएकी त्यांना भोवळ आली. शबरी तीराप्रमाणे तेथे धावत आली आणि पल्लवांनी वारा घालू लागली. ऋषिपत्नीही आली व तिने पतीचे मस्तक मांडीवर घेतले. ऋषींनी डोळे उघडले. ते म्हणाले, "आता हा देह राहत नाही. तुळशीपत्र आणा, पंपासरोवराचे पाणी आणून मला दोन थेंब द्या. शबरी, जीवन अनंत आहे. मरण म्हणजे आनंद आहे."
शबरीने पाणी देऊन तुळशीपत्र तोंडावर ठेविले. 'ओम् ओम्' म्हणत मतंग ऋषी परब्रह्मात विलीन झाले! ऋषींचे प्राणोत्क्रमण होताच जिच्या मांडीवर त्यांचे मस्तक होते, ती त्यांची प्रेमळ पत्नीही एकाएकी प्राण सोडती झाली व तीही तेथे निश्चेष्ट पडली. पतिपत्नी ऐहिक जीवन सोडून चिरंतन जीवनात समरस झाली. परंतु शबरी-बिचारी शबरी-पोरकी झाली. तिला आता कोण पुसणार? तिला ज्ञान कोण देणार? रोज नवीन विचारांची नूतन सृष्टी तिला कोण दाखविणार? "शबरी, आज तू काहीच खाल्ले नाहीस. ही दोन फळे तरी खाच." असे तिला प्रेमाग्रहाने आता कोण म्हणणार? शबरीचा आधार तुटला. मूळ तुटलेल्या वेलीप्रमाणे तीही पडली; परंतु सावध झाली. तिने चिता रचली आणि गुरुचा व गुरुपत्नीचा देह तिने अग्निस्वाधीन केला.
मृत्युदेव आला व शबरीची ज्ञान देणारी मातापितरे तो घेऊन गेला. मृत्यू ही प्राणीमात्राची आई आहे. मृत्यू हा तरी कठोर नाही. मृत्यू नसता तर या जगात प्रेम व स्नेह ही दिसतो ना! मृत्यूमुळे जगाला रमणीयता आहे. हे मृत्यो, तुला कठोर म्हणतात ते वेडे आहेत. तू जगाची जननी आहेस. सायंकाळ झाली म्हणजे अंगणात खेळणारी मुलेबाळे दमली असतील, त्यांना आता निजवावे, म्हणजे पुन्हा ती सकाळी ताजीतवानी होऊन उठतील, या विचाराने आई त्यांना हळूच मागून जाऊन घरात घेऊन येते; त्याप्रमाणे या जगदंगणात मुले खेळून दमली असे पाहून आयुष्याच्या सायंकाळी, ही मृत्युमाता हळूच मागून येते व आपल्या बाळांना निजविते आणि पुन्हा नवीन जीवनाचा रस देऊन त्यांना खेळण्यासाठी पाठवून देते. अमरजीवनाच्या सागरात नेऊन सोडणारी मृत्युगंगा पवित्र आहे.
शबरीच्या मनात मृत्यूसंबंधी असेच विचार येत होते का? त्या आश्रमात ती आता एकटीच बसे. परंतु मनुष्य कितीही विचारी असला तरी त्याला पूर्वीच्या अनेक प्रेमळ स्मृती शेकडो सुखदुःखाचे प्रसंग आठवतात आणि त्याचे हृदय भरुन येते, नव्हे, येणारच. शबरीचे असेच होई. ती सकाळी गोदावरीचे पाणी आणी. तथापि गोदेच्या तीरावर पाणी भरण्याऐवजी तिचा भरलेला हृदयकलश नयनद्वारा गोदेच्या पात्रात रिता होई. परंतु मोरांच्या केकांना ती सावध होई व जड पावलांनी आश्रमात परत येई.
शबरीचे लक्ष आता कशातही लागेना. आश्रमातील हरणे, मोर यांना तिने इतर आश्रमांत पाठवून दिले व आपण एकटीच रानावनांत आता ती विचरत राही. झाडेमाडे हे तिचे मित्र, पशु-पक्षी हेच सखे-सवंगडी. ती कधी सुंदर गाणी गाई, स्तोत्रे म्हणे. कधी आकाशाकडे पाहत बसे, कधी हसे, तर कधी रडे. शबरी एक प्रकारे शून्यमस्तक झाली होती.
एक दिवस शबरी भारद्वाज ऋषींच्या आश्रमात गेली होती. तेथे पुष्कळ ऋषिमंडळी जमली होती. बोलता बोलता भारद्वाज ऋषी म्हणाले, "ऐकलेत का? अयोध्येच्या दशरथाचा प्रतापी पुत्र रामचंद्र, पित्याच्या वचनपालनार्थ राज्यवैभव सोडून बारा वर्षे वनवासात घालविण्यासाठी निघाला आहे. त्याची पत्नी सीता व बंधू लक्ष्मण हीही त्याच्याबरोबर आहेत. केवढे हे धीरोदात्त व त्यागमय वर्तन!" दुसरे ऋषी म्हणाले, "हेच परमेश्वराचे अवतार होत. परमेश्वराचे स्वरुप अशाच थोर विभूतींच्या द्वारा प्रकट होत असते. केवढी सत्यभक्ती! केवढा त्याग!" शबरी ऐकत होती ती म्हणाली, "खरेच, पूर्वी गुरुदेवांनी मला असेच सांगितले होते, 'जेथे जेथे विभूतिमत्व दिसेल तेथे तेथे परमेश्वर आहे, असे समज.' असे ते म्हणत. हा प्रभू रामचंद्र. त्याची पत्नी व त्याचा भाऊ सर्व वनवास पत्करतात, खरोखरच देवांचेच हे अवतार! मला केव्हा बरे त्यांचे दर्शन होईल? खरेच केव्हा बरे दर्शन होईल?"
शबरीचे डोळे तेजाने चमकत होते. तपश्चर्येने, शोकाने व वयाने ती आता वृद्ध दिसू लागली होती. तिचे शब्द ऐकून ऋषी मोहित झाले; परंतु एकाएकी शबरी तेथून, 'कधी बरे रामचंद्र पाहीन? कधी ती मूर्ती पाहीन?' असे म्हणत वेड्यासारखी पळत सुटली व बावरलेल्या हरिणीप्रमाणे रानात निघून गेली!
"राम, राम. केव्हा बरे तो नयनाभिराम राम मी डोळ्यांनी पाहीन व त्याचे पाय माझ्या आसवांनी भिजवीन? काय रे वृक्षांनो, श्रीरामचंद्राच्या येण्याची वार्ता तुमचा मित्र जो वायू, त्याने तुम्हांस कानात सांगितली आहे का? सांगा ना! केव्हा येईल तो रामचंद्र? केव्हा दिसेल ती सीतादेवी?"
शबरी वेडी झाली होती. तिने रोज ताजी फुले जमवावीत, त्यांचे सुंदर हार दिवसभर करावेत आणि मग आज रामचंद्र आला नाही, नाही आला, असे म्हणून ते हार नदीच्या पाण्यावर सोडून द्यावेत. रोज तिने गोड गोड फळे रामचंद्रासाठी गोळा करुन आणावीत आणि- "नाही आला माझा राम, नाही पुरले माझे काम, नाही आला मेघश्याम, नाही संपले माझे काम." असे म्हणत ती फळे वानरांपुढे टाकावीत.
कधी कधी पाखरांचे शब्द ऐकून शबरी म्हणे, 'ही पाखरे माझ्या रामाला साद घालीत आहेत का? पाखरांनो, तुम्हाला उडता येते; मग तुम्हालाही जर अजून रामचंद्र आलेला दिसत नाही तर मला कसा दिसणार?' वाऱ्याचे सळसळणे ऐकून, 'राम येत नाही म्हणून का वारा रडतो आहे?' असे तिने म्हणावे. रात्री काळवंडलेला चंद्र पाहून 'राम दिसत नाही म्हणून का चंद्र काळवंडला आहे?' असे तिने उद्गारावे. शबरीला एकच ध्यास, एकच भास, एकच तिला वेड, एकच तिचा विचार. शबरी रामचंद्रासाठी अधीर झाली होती!
रामचंद्र, सीतादेवी, लक्ष्मण दंडकारण्यात आली. एक दिवस भारद्वाज ऋषींकडे ती राहिली. तेथे अनेक ऋषी आले होते. रामचंद्रांचा विनय, धीरोदात्तता, तेज, पावित्र्य हे पाहून ऋषिजनांचे हृदय भरुन आले. वैराग्यमूर्ती, त्यागदेवता सीता पाहून त्यांचे हृदय विरघळले. सीता म्हणाली, "इकडील प्रेमळ सहवासात मला काटे फुलांसारखे वाटतात व दगडांची कोवळी पाने होतात. प्रभूंच्या संगतीत मला सर्व स्वर्गच आहे." रामचंद्रांना शबरीची गोष्ट ऋषींकडून कळली व ही वेडी शबरी कोठे भेटेल, असे त्यांनाही झाले.
तिघंजण वनवासार्थ पुढे निघाली. ऋषींच्या आश्रमात स्वागतसत्कार घेत ती फार दिवस राहत नसत. कारण ती सुखोपभोगासाठी आली नव्हती, वनात वैराग्यवृत्तीने व स्वावलंबनाने राहण्यास ती आली होती. त्रिवर्ग पुढे चालले व शबरीच्याच कथा त्यांच्या चालल्या होत्या एक साधी भिल्लकन्या, परंतु सत्संगतीने संस्काराने ती किती उदात्त विचारांची व थोर आचाराची झाली होती, ते ऐकून त्यांना विस्मय वाटला. खरेच, पडीत जमिनीत खते घालून, तिची नीट मशागत करुन जसे उत्कृष्ट पीक काढता येते; जेथे दगडधोंडे काटेकुटे आहेत, तेथेही प्रयत्न केले, तर फुलाफलांनी, सस्यांकुरांनी नटलेली सुंदर सृष्टी जशी शोभू लागते, तसेच मानवी मनाचेही आहे. या जगात प्रयत्न हा परीस आहे, प्रयत्नाने नरकाचे नंदनवन होते, कोळशाची माणके होतात. आपण शेताभातांची निगा राखून पीक काढतो; परंतु मानवी मनाची अमोल शेती आपण करीत नाही! या जगात, आपल्या हिंदुस्थानात कितीतरी ओसाड मनोभूमिका पडल्या आहेत. कोट्यावधी लोकांच्या मनोभूमिका आपणावर सद्विचारांचा, सत्संस्कारांचा पाऊस कधी कोसळेल म्हणून वाट पाहत आहेत; आपला उद्धार कधी होईल, अशी रात्रंदिवस त्या ओसाड मनोभागांना चिंता लागली आहे. फ्रेंच इंजिनियर सहारा वाळवंटात पाणी सोडून त्याचा समुद्र बनविणार होते. हिंदुस्थानातील लाखो मानवी हृदयांची वाळवंटे! तेथे ज्ञानमेघ आणून कोण ओली करणार? तेथे सद्गुणांचे पीक कोण घेणार? धैर्य, साहस, स्वार्थत्याग, सद्धर्म, दया, प्रेम, परोपकार, सदाचार, सहानुभूती, सहकार्य, माणुसकी, बंधुभाव, स्वच्छता या सद्गुणांचे पीक या शेकडो पडीत मनोभूमीतून कोण काढणार? देवाघरच्या या दैवी शेतीवर काम करणारे कष्टाळू मजूर आपणांत किती आहेत? भिल्ल, कातकरी, गोंड, अस्पृश्य अशा जाती- या सर्वांना ज्ञानाची शिदोरी कोण नेऊन देणार? ही भगवंताची मानसशेती करावयास, तिच्यावर खपण्यासाठी हजारो प्रामाणिक मजूर पाहिजे आहेत, हजारो मतंग मुनी हवे आहेत! शबरीलाही सत्संस्कारांनी पुण्यतमा करणारे मतंग मुनी कोठे, आणि 'तुम्ही अस्पृश्य, शिवू नका, तुम्हाला वेदाचा अधिकार नाही!' असली वाक्ये तोंडाने उच्चारणारे हल्लीचे हे शाब्दिक धर्ममार्तंड कोठे? पुनरपि या श्रीरामचंद्रांच्या भूमीत हजारो मतंग ऋषी झाल्याशिवाय देशोद्धार कसा होणार?
रामचंद्र, सीता, लक्ष्मण हा त्रिवर्ग वनमार्ग आक्रमीत होता, तो एका वृक्षाच्या खाली 'ही फळे रामचंद्राला आवडतील का? किती गोड आहेत! माझ्या दातांनी त्याची चव मी घेतली आहे; पण केव्हा येणार रामचंद्र? केव्हा येणार? केव्हा भेटणार? आजही हे गुंफलेले हार कोमेजून जाणार का?' असे शबरी स्वतःशी खिन्नपणे, प्रेमळपणे म्हणत होती. एकाएकी रामचंद्र, सीता, लक्ष्मण ही तिच्यासमोर उभी राहिली. शबरी चमकली. तिचे डोळे अश्रूंनी चमकले. ती उठून म्हणाली, "तुम्हीच ते; मला जरी माहीत नाही, तरी तुम्हीच ते. तुम्हीच रामचंद्र, होय ना? तुमचे प्रसन्न मुखच सांगत आहे. सीतामाई व प्रेमळ बंधू लक्ष्मण. तुम्हीच ते. किती तुमची वाट पाहत होते! तुमच्यासाठी दररोज फळे गोळा करावीत, हार गुंफावेत! लबाड वारा सांगेना, पाखरे सांगेनात, तुम्ही कधी येणार ते. बरे झाले, आलात तुम्ही! मला दर्शन दिलेत. मी कृतार्थ झाले. माझे गुरुदेव म्हणत, 'ज्याच्या ठिकाणी अनंत सद्गुण दिसतील, तो परमेश्वर समजावा.' तुम्ही निर्दोष, निष्कलंक आहात. तुम्हीच माझे परमेश्वर आहात. या, बसा. मी तुमची पूजा करते हां." असे म्हणून तिने तिघांना पल्लवांवर बसविले. तिने त्यांचे पाय धुतले व अश्रूंचे कढत पाणीही मधूनमधून त्यावर घातले. नंतर तिने त्यांच्या गळ्यांत घवघवीत हार घातले व ती मधुर फळे त्यांच्या पुढे ठेविली. रामचंद्र, सीता व लक्ष्मण या सर्वांचे अंतःकरण भरुन आले! त्यांना ती फळे खाववेत ना!
शबरी म्हणाली, "देवा, मी मूळची भिल्लीण म्हणून का फळे खात नाही? परंतु मी निर्मळ व प्रेमळ आहे. प्रेमाला, भक्ताला विटाळ नसतो. ही बोरे मुद्दाम मी चाखून पाहिली. चांगली गोड फळे पाहिजेत ना माझ्या रामाला? हं, रामा, घ्या ना! सीतामाई, घ्या ना!" सर्वांनी फळे घेतली. पालाशद्रोणातील पाणी तिने त्यांच्या हातावर घातले. नंतर शबरी उभी राहिली व हात जोडून म्हणाली, "देवा रामचंद्रा, जलदश्यामा रामा, सार्थ झाले! तुजला बघुनी देवा, मम डोळे धाले! उत्कंठा जी धरुनी हे होते प्राण, झाली देवा तृप्त आता नुरला काम! हे भगवंता, गुणसागरा, हे रघुनाथा, चरणी तुझिया ठेवितसे माथा! झाले दैवा, झाले मम जीवन धन्य, मागायचे नाही रे तुजला अन्य! जन्मोजन्मी देई भक्ती, मज सीतापति म्हणजे झाले दुसरे मनि काही नुरले! जलश्यामा!
शबरीने गाणे म्हणले व 'मला पदरात घ्या' असे म्हणून रामचंद्रांच्या पायांवर तिने मस्तक ठेविले, परंतु रामचंद्रांच्या पायी शबरी पडली, ती पुन्हा उठलीच नाही! विश्वव्यापी परमात्म्यात तिचे चित्तत्त्व मिळून गेले! ते देहपुष्प मात्र रामचरणी कोमेजून पडले!
तिघांना गहिवर आला. शबरीला त्यांनी अग्नी दिला व तिचे गुणवर्णन करीत ती तिघे गेली. शबरी देहाने गेली, परंतु कीर्तिरुपाने सदैव अमर आहे. जोपर्यंत भारतवर्ष आहे, रामायण आहे, राम-सीता यांची आठवण आहे, जोपर्यंत जगात भक्ती आहे, हृदय आहे, तोपर्यंत शबरीही आहे.
शबरी अमर आहे!

Wednesday 19 April 2017

आदिशक्ति भवानी स्तोत्र

नमो आदिमाया भगवती । अनादि सिध्दमूळ प्रकृति ॥ महालक्ष्मी त्रीजगती । बया दार उघड, बया दार उघड ॥१॥
हरिहर तुझे ध्यान करिती । चंद्रसुर्य कानी तळपती । गगनी ते तारांगणे रुळती । तेवी भांगी भरिले मोती ॥ बया दार उघड ॥२॥
नवखंड पृथ्वी तुझी चोळी । सप्तपाताळी पाऊले गेली ॥ एकवीस स्वर्ग मुगूटी झळाळी । बया दार उघड ॥३॥
जगदंबा प्रसन्न झाली । भक्‍तिकवाडे उघडली शंख चंद्राकित शोभली रुपसुंदरा साबळी । कोटीचंद्र सूर्य प्रभा वेल्हाळी । एका जनार्दनी माऊली । करी कृपेची साउली । भक्‍त जनाकारणे संपूर्ण झाली । बया दार उघड, बया दार उघड ॥४॥

सुगरणीचा खोपा - बहिणाबाई चौधरी

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिन
झोका झाडाले टांगला

पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामध्ये जीव
जीव झाडाले टांगला

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे माणसा

तिची उलीशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुला देले रे देवान
दोन हात दहा बोट....

जन्मभूमीचा त्याग

बहुळा नदीच्या तीरावर सायगाव म्हणून एक गाव होता. गाव मोठा सुखी व समृद्ध होता. गावात नाना प्रकारचे धंदे चालत. शेतकरी, विणकरी, रंगारी, पिंजारी, सोनार, सुतार, लोहार , कुंभार- सर्व प्रकारचे लोक होते. गावात भांडण बहुधा होत नसे. मारामारी होत नसे कोणी कोणाचा हेवादावा करीत नसे. सारे गुण्यागोविंदाने नांदत.
सायगावची एक विशिष्ट परंपरा होती. त्या गावचे लोक कधी राजाकडे न्याय मागायला जात नसत. ‘पाप करणारा असेल त्याला देव शिक्षा करीलच’ असे ते म्हणत. ‘पाप करणार्‍याचे मन त्याला खातच असते, आणखी त्याला शिक्षा कशाला?’ असेही कोणी म्हणत. जर गावात अपराध झालाच, तर सारे लोक देवळात जमत. कोणी अपराध केला त्याची चौकशी होई. अपराध करणार्‍याचे नाव देवासमोर सांगण्यात येई. त्याला दुसरी शिक्षा नसे. गावातील सर्व लहान-थोरांना अपराध करणार्‍याचे नाव कळे. त्याच्याकडे सारे लोक ‘हा तो अपराधी’ अशा दृष्टीने बघत. हीच शिक्षा.
सायगावात विनू व मनू दोघे मित्र होते. विनूला मनूशिवाय करमत नसे व मनूला विनूशिवाय. मनू एकटा होता. त्याचे आईबाप मरण पावले होते. त्याची लहान बहीण होती. या बहिणीवर त्याचा फार लोभ. परंतु ती बहीणही देवाघरी गेली. मनूला अपार दु:ख झाले. जीवनात त्याला अर्थ वाटेना. कोणासाठी जगावे, का जगावे ते त्याला कळेना. परंतु विनूमुळे तो वेडा झाला नाही.
मनू विणकर होता. विणण्याची कला त्याच्या बोटांत होती. धाकटी बहीण होती. तेव्हा तिच्यासाठी तो विणी. पैसे मिळवून बहिणीला नटवी. पुढे-मागे बहिणीचे लग्न करावे त्यासाठी तो पैसे साठवी. परंतु बहीण देवाकडे निघून गेल्यावर मनू फारसे काम करीत नसे. देवाने त्याच्या जीवनाचे वस्त्र जणू दु:खाने विणले होते. ते दु:खाचे वस्त्र पांघरून मनू घरी कोपर्‍यात बसे विनू येई तेव्हा मात्र तो जरासा हसे.
असे काही दिवस गेले. एकदा काय झाले, त्या गावात एक परका पाहुणा आला. त्याच्याजवळ बरेचसे पैसे होते. विनूला पैसे पाहिजे होते. विनूच्या मनात पाप आले. त्या श्रीमंताचा खून करावा असे त्याच्या मनात आले. शेवटी त्याने संधी साधून त्या श्रीमंताचा खून केला. त्याची पिशवी त्याने लांबविली. परंतु खून पचवायचा कसा?
विनूने रक्ताने माखलेला सुरा मनूच्या उशाशी ठेवून दिला. मनू झोपलेला होता. विनू मुकाट्याने आपल्या घरी जाऊन पडला. सकाळ झाली. प्रवासी मरून पडलेला दिसला. सर्व गावभर वार्ता गेली. कोणी केला तो खून? कोणी केले ते पाप?
मनू जागा झाला. त्याच्या उशाशी रक्ताने माखलेला सुरा होता; तो दचकला. तो सुरा हातात घेऊन तो वेड्यासारखा बाहेर आला. लोक त्याच्याकडे पाहू लागले.
“हा पाहा लाल सुरा, रक्तानं रंगलेला सुरा! कुणाचं हे रक्त? कुठून आला हा सुरा? माझ्या उशाशी कुणी ठेवला? लाल लाल सुरा.” असे मनू बोलू लागला.
“यानंच या प्रवाशाचा खून केला असेल.”
“आणि स्वत: साळसूदपणा दाखवीत आहे.”
“त्याला खून करून काय करायचं होतं?”
“देवाला माहीत. एकटा तर आहे. पैसे हवेत कशाला?”
“लोभ का कुठं सुटतो?”
असे लोक म्हणू लागले. मनूला काही समजेना. तो वेड्याप्रमाणे बघू लागला.
“मी कशाला कोणाला मारू? मी आधीच दुःखाने मेलो आहे. मला कशाचीही इच्छा नाही. ना धनाची, ना सुखाची! कोणी तरी हा सुरा माझ्या उशाशी आणून ठेवला असावा. स्वत:चं पाप या गरीब मनूवर ढकलीत असावा.” मनू म्हणाला.
त्याच्या म्हणण्याकडे कोणी लक्ष देईना. शेवटी देवळात सारे लोक जमले. मनू तेथे दु:खाने हजर राहिला. मनूनेच तो खून केला असावा, असे सर्वांचे मत पडले. मनूची मान खाली झाली होती. ईश्वराने त्याचे आईबाप नेले होते; त्याची बहीण नेली होती. आता त्याची अब्रूही परमेश्वर नेऊ पाहात होता; जीवनातील सर्वांत मोठी मोलवान वस्तू. तीही आज जात होती. मनूने विनूकडे पाहिले. परंतु विनू त्याच्याकडे पाहीना. आपला मित्र तरी आपणांस सहानुभूती दाखवील असे मनूस वाटत होते. परंतु तीही आशा का विफळ होणार?
मनू उभा राहिला. तो म्हणाला, “सर्व गावानं मला अपराधी ठरवलं आहे, परंतु मी निष्पाप आहे. इथं असलेल्या सर्वांना का मी खुनी आहे असं खरोखर वाटतं? निदान माझा मित्र विनू तरी तसं म्हणणार नाही. मित्र मित्राला ओळखतो. माझा स्वभाव विनूला माहीत आहे. विनू, तुझं काय मत आहे ते सांग. सार्‍या गावानं जरी मला दोषी ठरविलं तरी मला त्याची पर्वा नाही, परंतु मित्र दोषी न ठरवो. विनू, तुझ्या डोळ्यांनाही मी खुनीच दिसतो का? सांग, तुझं मत सांग. तुझ्या मताची मला किंमत आहे. तुझ्यामुळं मी जगलो आहे. या जीवनात तुझाच काय तो एक स्नेहबंध मला आहे. विनू, बोल. माझ्याकडे बघ. माझे हात कोणाच्या उरात भोकसतील का सुरा? सुंदर वस्त्र विणणारे हे हात, ते का कोणाचं जीवनवस्त्र कापून टाकतील? शक्य आहे हे? सांग, मित्रा, तुझं मत सांग. तुला जे खरोखर वाटत असेल ते सांग.”
विनू उभा राहिला. तो म्हणाला, “मनू माझा मित्र आहे. परंतु सत्याशी माझी अधिक मैत्री आहे. सत्याला मी कधी सोडणार नाही. मनू, मनुष्याच्या मनात केव्हा काय येईल त्याचा नेम नसतो. निर्मळ आकाशात केव्हा काळे ढग येतील ते काय सांगावं? तुझ्या उशाशी तो सुरा होता. तो का दुसर्‍यानं आणून ठेवला? तूच तो खून केला असावास, मलाही असंच वाटतं. माझ्या मित्रानं खून करावा याचं इतर सर्वांपेक्षा मला अधिक वाईट वाटत आहे. ‘खुनी माणसाचा मित्र’ असं आता लोक मला म्हणतील व हिणवतील. मनू, काय केलंस हे? केलसं तर केलसं, परंतु पुन्हा निरपराधीपणाचा आव आणू बघतोस. हे तर फारच वाईट. हातून पाप झालं तर कदाचित दु:खाच्या लहरीत, उदासीनतेच्या लहरीत, वेडाच्या लहरीत केलं असशील हे पाप. परंतु ते कबूल करून गावाची क्षमा मागण्याऐवजी तू दंभ दाखवीत आहेस, काय याला म्हणावं?”
आपल्या मित्राच्या तोंडचे ते शब्द ऐकून मनूचे तोंड काळवंडले. जिथे त्याची सर्व आशा तिथेच निराशा पदरी आली. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्यानेही आपल्याविषयी गैरसमज करून घ्यावा ह्यासारखे दुनियेत दुसरे दु:ख नाही, तो सर्वांत प्रखर असा प्रहार असतो.
सभा संपली. मनूला ‘खूनी मनू’ म्हणून संबोधन्यात येऊ लागले. मनू घरातून बाहेर पडेना. तो भयंकर मन:स्थितीत होता. एके दिवशी रात्री सायगाव सोडून जाण्याचे त्याने ठरविले. तीव्र निराशेने तो घेरला गेला होता. ‘या जगात न्याय नाही, सत्य नाही, प्रेम नाही काही नाही!’ असे तो मनात म्हणाला. जगात देव नाही, धर्म नाही मरता येत नाही म्हणून जगायचे. जग म्हणजे एक भयाण वस्तू आहे असे त्याला वाटले.
मध्यरात्रीचा समय. सर्वत्र अंधार होता. मनूच्या मनात बाहेरच्या अंधाराहूनही अधिक काळाकुट्ट असा अंधार पसरला होता. परंतु तो उठला. ते पूर्वजांचे घर सोडून तो निघाला. जेथे त्याच्या आईबापांनी त्याला वाढविले, जेथे आपली पोरकी बहीण त्याने प्रेमाने वाढविली, असे ते घर सोडून तो निघाला. त्याला वाईट वाटले; त्याच्या डोळ्यांतून पाणी आले. परंतु शेवटी प्रणाम करून त्याने घराबाहेर पाऊल ठेवले. तो रस्ता चालू लागला. बहुळा नदीच्या तीरावर तो आला. त्या नदीत तो कितीदा तरी डुंबला असेल. मित्राबरोबर पोहला असेल. बहुळेच्या काठी एका खडकावर तो बसला. वरती तारे चमचम करीत होते. मनूच्या मनात शेकडो स्मृती जमल्या होत्या. हृदयात कालवाकालव होत होती. मोठ्या कष्टाने तो उठला. त्या मध्यरात्री बहुळेचे तो पाणी प्यायला. पुन्हा एकदा गावाकडे वळून त्याने प्रणाम केला. बहुळेला प्रणाम केला आणि वेगाने निघाला. लांब लांब जाण्यासाठी मनू निघाला, जेथे त्याला कोणी खुनी असे म्हणणार नाही तेथे जावयास तो निघाला. मातृभूमीला रामराम करून तो निघाला.