Friday 6 October 2017

ओव्या३६ ते५० अर्जुनविषादयोग सार्थ ज्ञानेश्वरी


🌼माधुर्यी मधुरता । शृंगारी सुरेखता ।रूढपण उचितां । दिसे भले ॥३६॥
✏  या (ग्रंथात) मधुरतेलाही गोडी प्राप्त झाली. शोभिवंत वस्तूंना अधिक सुरेखता आली.
योग्य वस्तूंना आलेला रुढपणाचा ही सुंदर प्रत्यय आला.
🌼एथ कळाविदपण कळा । पुण्यासी प्रतापु आगळा ।म्हणऊनि जन्मेजयाचे अवलीळा । दोष हरले ।३७|
✏येथे कलेला कुशलता, पुण्याला अधिक बळ प्राप्त झाले. म्हणूनच जनमेजयाचे दोष (भारत श्रवण केल्याने ) सहज नाहीसे झाले.
🌼आणि पाहता नावेक । रंगी सुरंगतेची आगळीक ।गुणां सगुणतेचे बिक । बहुवस एथ ॥३८॥
✏ क्षणभर विचार केला असता, असे दिसते की या रंगामध्ये आणखी विविध रंगांचा सहभाग किंवा सद्गुणांना आणखी चांगल्या गुणांची साथ अधिकतेने या ग्रंथात आढळते.
🌼भानुचेनि तेजें धवळले । जैसे त्रैलोक्य दिसे उजळले ।तैसे व्यासमती कळवलें । मिरवे विश्व ॥३९॥
✏ सूर्याच्या प्रकाशाने उजळलेले त्रैलोक्य तेजोमय दिसते. त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने व्यापिलेले सगळे विश्व शोभिवंत दिसते.
🌼कां सुक्षेत्रीं बीज घातले । ते आपुलेयापरी विस्तारले ।तैसे भारतीं सुरवाडले । अर्थजात ॥४०॥
✏चांगल्या कसदार जमिनीत पेरलेले बी आपल्या अंगच्या जोमाने उगवते त्याप्रमाणे चार पुरुषार्थ प्रफुल्लित झाले.
🌼ना तरी नगरांतरी वसिजे । तरी नागराचि होइजे ।तैसे व्यासोक्तितेजे । धवळित सकळ ॥४१॥
✏ शहरात किंवा नगरात वस्ती करुन राहिलेला मनुष्य सुसंस्कृत होतो. त्याप्रमाणे व्यासवाणीच्या तेजात (न्हाऊन निघाल्याने) सर्व विश्व ज्ञानमय झाले आहे.
🌼कीं प्रथमवयसाकाळीं । लावण्याची नव्हाळी ।प्रकटे जैसी आगळी । अंगनाअंगी ॥४२॥
✏ तारुण्यात प्रवेश करण्याच्या सुरवातीस नवतरुणीच्या अवयवामध्ये लावण्याचा भर अधिक उठावदार दिसतो.
🌼ना तरी उद्यानी माधवी घडे । तेथ वनशोभेचि खाणी उघडे ।आदिलापासोनि अपाडे । जियापरी ॥४३॥
✏ उद्यानात वसंत शोभा आली असता सर्व तरुवेलींवर पूर्वीपेक्षा अधिकच वनवैभव दिसू लागते.
🌼नाना घनीभूत सुवर्ण । जैसे न्याहाळितां साधारण ।मग अळंकारी बरवेपण । निवाडु दावी ॥४४॥
✏ लगडीच्या स्वरुपातील सोने साधारण दिसते. परंतु त्याचे अलंकार बनविल्यावर ते अधिक भूषविते.
🌼तैसे व्यासोक्ती अळंकारिले । आवडे ते बरवेपण पातले ।ते जाणोनि काय आश्रयिले । इतिहासी ॥४५॥
✏ त्याचप्रमाणे व्यासाच्या वाणीने अलंकृत झालेले सौंदर्य अधिक शोभायमान झाले. हे पाहून इतिहासाने त्याचा आश्रय केला.
🌼नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं । सानीव धरुनी आंगी ।पुराणे आख्यानरूपे जगीं । भारता आली ॥४६॥
✏ जगात सन्मान कीर्ती प्राप्त व्हावी म्हणून जणू काही पुराणे नम्रता धरून छोट्या छोट्या आख्यानाच्या रुपाने महाभारतात येऊन प्रसिद्ध झाली.
🌼म्हणऊनि महाभारतीं जे नाही । ते नोहेचि लोकी तिहीं ।येणे कारणे म्हणिपे पाहीं।व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥ ४७॥
✏ म्हणून महाभारतात जे नाही ते तिन्ही लोकात सापडणार नाही, यासाठी हे त्रिभुवन व्यासांचे उष्टे आहे. (व्यासानंतर झालेल्या कथा कल्पना या व्यासांपासूनच घेतल्या आहेत.) 
🌼ऐसी सुरस जगीं कथा । जे जन्मभूमि परमार्था ।मुनि सांगे नृपनाथा । जनमेजया ॥४८॥
✏ अशी ही जगातील अतिशय रसाळ कथा ब्रह्मज्ञानाचे उगमस्थान आहे. ती वैशंपायन मुनींनी श्रेष्ठ राजा जनमेजयास सांगितली.
🌼जे अद्वितीय उत्तम।पवित्रैक निरुपम ।परम मंगलधाम । अवधारिजो ॥४९॥
✏ ही कथा अद्वितीय, उत्कृष्ट, अत्यंत पवित्र, अनुपम, परमकल्याणाचे आश्रयस्थान असल्याने ती समजून घ्या.
🌼आता भारतीं कमळपरागु । गीताख्यु प्रसंगु ।जो संवादिला श्रीरंगु । अर्जुनेसी ॥५०॥
✏ आता भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला संवादरुपाने उपदेश दिला. तो गीता नावाचा विषय भारतरुपी कमळातील जणू पुष्प पराग आहे.

Thursday 5 October 2017

अर्जून विषादयोग ओव्या 26 ते 35 सार्थ ज्ञानेश्वरी

 ओव्या
💡॥॥
  🔔🔔
⛳🌺⛳🌺⛳🌺⛳🌺⛳
🌸का तीर्थे जिये त्रिभुवनी । तिये घडती समुद्रावगाहनी ।ना तरी अमृतरसास्वादनीं । रस सकळ ॥२६॥
✏  जगामध्ये जेवढी म्हणून तीर्थक्षेत्रे आहेत. त्या सर्वांची तीर्थस्नाने केवळ एकट्या समुद्रस्नानाने घडतात. किंवा फक्त अमृत सेवन केले असता, सर्व रसांची गोडी त्यामध्ये अंतर्भूत असते.
🌸तैसा पुढतपुढती तोची । मियां अभिवंदिला श्रीगुरूचि ।जे अभिलषित मनोरुची । पुरविता तो ॥२७॥
✏ त्याप्रमाणे एकट्या श्रीगुरुंच्या वंदनात सर्वांना वंदन घडते. म्हणून मी सद्गुरुंना वारंवार वंदन करतो. कारण ते मनात आलेले मनोरथ पूर्ण करतात.
🌸आता अवधारा कथा गहन । जे सकळां कौतुका जन्मस्थान ।की अभिनव उद्यान । विवेकतरूचे ॥२८॥
✏ आता ही कथा लक्षपूर्वक ऐका! जी कलेच्या नवलाईच्या आविर्भावाचे उगमस्थान, किंवा विचाररुपी तरुंचे नवे विशाल अपूर्व उद्यान आहे.
🌸ना तरी सर्व सुखांची आदि । जे प्रमेयमहानिधी ।नाना नवरससुधाब्धि । परिपूर्ण हे ॥२९॥
✏ म्हणून सर्वसुखाचे आश्रयस्थान आहे. अनेक तत्वार्थांचा मोठा साठा किंवा शृंगारादि नऊ रसांनी तुडुंब भरलेला सागरच आहे.
🌸की परमधाम प्रकट । सर्व विद्यांचे मूळपीठ ।शास्त्रजाता वसिष्ठ । अशेषांचे ॥३०॥
✏  सर्वांना उघडपणे दिसणारा सर्वोत्तम ज्ञानप्रकाश, किंवा सर्व विद्यांचे मूलस्थान किंवा सर्व शास्त्र समूहांचे आश्रयस्थान आहे.
🌸ना तरी सकळ धर्मांचे माहेर । सज्जनांचे जिव्हार । लावण्यरत्नभांडार । शारदियेचे ॥ ३१॥
✏ सर्वधर्मांचे माहेर सज्जनांचा जिव्हाळा आहे. किंवा सरस्वतीच्या लावण्यमय रत्नांचा खजिना, अशी आहे.
🌸नाना कथारूपे भारती । प्रकटली असे त्रिजगती ।आविष्करोनी महामती । व्यासाचिये ॥ ३२॥
✏ व्यासांच्या विशाल बुद्धीमध्ये प्रकट होऊन वाग्देवता या आख्यानाच्या रुपाने जगतात अवतरली आहे.
🌸म्हणोनी हा काव्यां रावो । ग्रंथ गुरुवतीचा ठावो ।एथुनि रसां आला आवो । रसाळपणाचा ॥ ३३॥
✏ त्यामुळे हा महाकाव्याचा राजा आहे. ग्रंथाच्या थोरपणाची सीमा आहे. येथूनच रसांना रसाळपणाची प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
🌸तेवींचि आइका आणिक एक । एथुनि शब्दश्री स्वच्छास्त्रिक ।आणि महाबोधि कोवळीक । दुणावली ॥ ३४॥
✏ तसेच आणखी एक ऐका ! या महाभारत ग्रंथामुळे शब्दाच्या संपत्तीला शुद्ध शास्त्रीयता प्राप्त झाली. ब्रह्म ज्ञानाचे निरुपण सुंदर समर्पक शब्दात करता येऊ लागले. उपदेशामध्ये कोमलता आली.
🌸एथ चातुर्य शहाणे झाले । प्रमेय रुचीस आले ।आणि सौभाग्य पोखले । सुखाचे एथ ॥ ३५॥
✏ येथे चातुर्य सुद्धा शहाणे झाले. प्रेमाला अधिकच मधुरता प्राप्त झाली. सुख भाग्यवान ठरले.

Wednesday 4 October 2017

अर्जुनविषादयोग ओव्या 11 ते 25 सार्थ ज्ञानेश्वरी

🌺तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु ।वेदांतु तो महारसु । मोदकु मिरवे ॥११
✏ तेव्हा तर्क(अनुमान)हाच कोणी फरस(कुर्‍हाड)निती(आचारधर्म,कमीकर्मविचार)हाचकोणी फरक करणारा किंवा चांगले आणि वाईट यातील फरक दाखवणारा.)अंकुश आणि वेदांत हा अत्यंत मधुर असलेला मोदक म्हणुन शोभतो.
🌺एके हाति दंतु । जो स्वभावता खंडितु ।तो बौद्धमत संकेतु | वार्तिकांचा ॥१२॥
✏  एका हातामध्ये जो मुळातच खंडीत झालेला असा दात आहे.ते बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादिलेले,स्वभावतःच खंडीत असलेले बौद्धमत यांचे निदर्शक आहे.
🌺मग सहजे सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु ।धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु । अभयहस्तु ॥१३॥
✏ मग(व्याससुमावरील वृत्तिच्या व्याख्यानातीलबौद्धमताचे खंडन)झाल्यावर चांगला(वेदानुकुल)तर्क करणारे तत्वज्ञान सहजपणे(सुप्रतिष्टिपित होते)तो सत्कारवादगणपतीचे इच्छित फल प्राप्त करुन देणारा.अभय हस्त होय धर्माची स्थापना (करणारे जे शास्ञ)तो धर्म जिज्ञासु लोकांसाठी सतत वर देणारा हस्त होय.
🌺देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु ।जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ॥१४॥
✏ जेथे समाधिसुखाचा परमानंद विशुद्ध स्वरुपात अनुभवास येतो.असे सारासार विवेकाने भरलेले विशुद्ध ज्ञान तीच सरळ लांब सोंड होय.
🌺तरी संवादु तोचि दशनु । जो समताशुभ्रवर्णु । देवो उन्मेषसुक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ॥१५॥
✏  _या संबंधात(युक्तिवादांचा,साधनांचा किंवा सृष्टीतील तत्वांचा)परस्परातील सुसंवाद हाच (गणेशमुर्तिचा)
निःपक्षपणारुपी  शुभ्र वर्ण असलेला दात होय अंतस्फुर्त ज्ञानरुप सुक्ष्मदृष्टी असलेला विघ्नाचा नियामक असा हा देव आहे._
🌺मज अवगमलिया दोनी । मीमांसा श्रवणस्थानी ।बोधमदामृत मुनी ।अली सेविती ॥१६॥
✏ पुर्व मीमांसा उत्तर मीमांसा गणेशमुर्तिच्या दोन्ही कानांच्या ठिकानी वाटतात.त्यातील ज्ञान मदरुप अमृत मुनीरुपी भ्रमर त्याचे सेवन करतात.
🌺प्रमेयप्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ ।सरिसे एकवटत । इभ मस्तकावरी ॥१७॥
✏ श्रुतीस्मृति यांच्यामध्ये प्रतिपादिलेली तत्वे हिच.(गणेशमुर्तिच्या)अंगावरील सतेज पोवळी असुन व्दैत आणि अद्वैत मते हीच त्या गजाननाच्या मस्तकावर तुल्य बळाने एकञ राहिली आहेत.
🌺उपरि दशोपनिषदे । जिये उदारे ज्ञानमकरंदे । तिये कुसुमे मुगुटी सुगंधे । शोभती भली ॥१८॥
✏ आत्मज्ञानरुपी मध देण्यास ज्याच्या पुष्परसाची ख्याती आहे. अशी ईश्यावास्यादी दहा उपनिषदे गंडस्थळावरील मुकुटावर शोधुन दिसतात.
🌺अकार चरणयुगुल । उकार उदर विशाल । मकार महामंडल । मस्तकाकारे ॥१९॥
✏ ॐ या अक्षरावर गणेशमुर्तिची कल्पना केली असता अकार हे दोन पाय ,उकार विशाल उदराच्या स्थानी स्थानी आणि मकार हे मस्तकाच्या आकारासारखे वर्तुळ दिसते.
🌺हे तिन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळले । ते मियां गुरूकृपा नमिले । आदिबीज ॥२०॥
✏ हे तिन्ही एकञ आले.त्यांनी सर्व वाड्ढमय विस्तार व्यापुन टाकला.सर्व सृष्टिच्या आद्द कारण (गणरायाला) मी वाकुन नमस्कार करतो
(ओवी 1ते20 गणपती देवतेचे  ज्ञानेश्वरी  लेखनाच्या  आरंभी  स्तवन केले आहे. )
🌺आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थकला कामिनी । ते शारदा विश्वमोहिनी । नमिली मियां ॥२१॥
✏  आता नविनच अपुर्व असे वाड्ढमय निर्मितेचे विलास करणारी उच्च कैाशल्ययुक्त वाचा वैभव प्रकटवनारी अशी जी सरस्वती तिला मी वंदन करतो.
(विद्येची देवता सरस्वती देवीचे स्तवन)
(यापुढे  सद्गुरुंचे स्तवन आहे. माऊली  आपले सद्गुरु  थोरले बंधू  निवृत्तीनाथ यांना वंदन करून  लेखनाचा आरंभ  करतात.)
🌺मज हृदयी सद्गुरू । तेणे तारिलो हा संसारपूरु । म्हणऊनि विशेष अत्यादरू । विवेकावरी ॥२२॥
✏  ज्यांनी मला या संसारपुरातुन तारिले.ज्या सद्गुरुनीं माझ्या अंतकरणात वास केला आहे.म्हणुन माझु बुद्धि विशेष करुन विवेकावर प्रेम करते.
🌺जैसे डोळ्यां अंजन भेटे । मग दृष्टीसी फांटा फुटे । मग वास पाहे तेथ प्रकटे । महानिधी ॥२३॥
✏  ज्याप्रमाने डोळ्यात अंजन घातल्यानंतर दृष्टिला विशेष सामर्थ्य प्राप्त होते.मग भुमीगत द्रव्याचा ठेवा सहजपणे दिसु लागतो.
🌺कां चिंतामणी जालया हाती।सदा विजयवृत्ति मनोरथी । तैसा मी पूर्णकाम श्री निवृत्ती । ज्ञानदेवो म्हणे ॥२४॥
✏  चिंतामनी स्वाधिन झाल्यावर सर्व मनोकामना सिद्धिला जातात त्याचप्रमाने सद्गुरु निवृत्तीनाथांमुळे माझ्या सर्व मनोकामना विजयी झाल्या आहेत.असे ज्ञानदेव सांगतात.
🌺म्हणोनि जाणतेनो गुरू भजिजे।तेणे कृतकार्य होईजे। जैसे मूळसिंचने सहजे|शाखापल्लव संतोषती ॥२५॥
✏  याकरिता शहान्या माणसांनी गुरुला शरण जावे. त्यांची सेवा करावी. ज्याप्रमाने एखाद्या झाडाला मुळाशी पाणी घातले असता. फांदी व पाने यांना आपोआप टवटवी येते. म्हणजेच कार्य तडीस(सिद्धिस)पोहचते.
⛳⛳⛳⛳💗⛳⛳⛳⛳⛳
॥जय जय रामकृष्ण हरि॥

Tuesday 3 October 2017

अर्जुनविषादयोग ओव्या 1 ते 10 सार्थ ज्ञानेश्वरी

ॐनमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या।जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥१॥
✏ ॐ ची माहिती (प्रतिपादन)केवळ वेदच करु शकतील. अशा आद्दतत्वाला नमस्कार असो .जो कोनी स्वःताच स्वःताला पुर्णपणे बरोबर जाणु शकतो.अशा आत्मरुप चित्तत्वाचा जयजयकार असो..
🌸देवा तूंचि गणेशु । सकलमति प्रकाशु ।म्हणे निवृत्ति दासु । अवधारिजो जी ॥२॥
✏  निवृत्तीनाथाचे सेवक ज्ञानदेव म्हणतात कि देवा,सर्वाच्यां बुद्धिला ज्ञानाचा प्रकाश असा तुंच गणेश आहेस.असे निश्चित समजावे.
🌸हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष ।तेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥३
✏  ज्याचे आकाराने वर्णरुप शरिर चांगले सुशोभित दिसते.असे हे वेद वाग्मय(पुर्ण शब्द ब्रम्ह)म्हणजे गणेशाची उत्तम सजविलेली मुर्ती आहे.
🌸स्मृति तेचि अवयव । देखा अंगिकभाव तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ॥४॥
✏ मन्वादिस्मृती हेच (गणेशमुर्तिचे)अवयव ,रसविष्कारांची पद्धत हीच जणु अवयवाच्या द्वारे प्रदर्शित होणारी भाव इच्छा अर्थाचे सौष्ठव हेच (गणेश मुर्तितिल)सौदर्याचे तेज आहे.
🌸अष्टादश पुराणे । तीचि मणिभूषणे ।पदपद्धती खेवणे । प्रमेयरत्नांची ॥५॥
✏ मुर्तितिल अठरापुराणे हेच खरे रत्नजडीत अलंकार तत्वार्थ हिच रत्ने,शब्दाची छंदोबद्ध रचना व त्याचे भिन्न भिन्न प्रकार हिच त्या रत्नाची कोंदणे होत.
🌸पदबंध नागर । तेचि रंगाथिले अंबर ।जेथ साहित्यवाणे |सपूर उजाळाचे ॥६
✏ _संपुर्ण प्रकारे विविध काव्यरचना उत्तम अशी अभिरुची हेच रंगवलेले वस्ञ.ज्यातील शब्द रचनेतील अलंकार शास्ञ हे त्या वस्ञाचे तलम
तजेलदार,भरगच्च पोत आहे._
🌸देखा काव्यनाटका । जे निर्धारिता सकौतुका ।त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनी ॥७॥
✏ असे पहा की,काव्य नाटकाच्या विषयी विचार केला तर ती गणपतीच्या पायातील लहान लहान घंटा असुन त्यातील अर्थरुप आवाजाने त्या रुणझुणत आहेत.
🌸नाना प्रमेयांचि परी । निपुणपणे पाहता कुसरी ।दिसती उचित पदे माझारी । रत्नें भली ॥८॥
✏ सर्व एकच पण विविध पद्धतिने प्रतिपादन केलेले तत्व म्हणजे कुशलतेने त्यात वापरलेली उचित शब्दे हीच बहुमुल्य रत्ने,आहेत.असे जाणकार दृष्टिला आढळते.
🌸तेथ व्यासादिकांच्या मति । तेचि मेखळा मिरवती ।चोखाळपणे झळकती ।पल्लवसडका ॥९॥
✏ _याठिकानी व्यास आणि आदि कविच्या प्रज्ञा तेजस्विपणे
झळकतात.त्याच गणेशाच्या कमरेभोवती बांधलेल्या पदरांचे अग्रभाग असुन बिधांस्तपणे मिरवत आहेत._
🌼देखा षड्दर्शने म्हणिपती ।तेचि भुजांची आकृती ॥ म्हणऊनि विसंवादे धरिती ।आयुधे हाती ॥१०॥
✏ असे पहा की ,सहा दर्शने म्हटली जातात(त्यांनीच(गणेशमुर्तिच्या)सहा हाताचा आकार घेतला आहे म्हणुनच त्या परस्पराशी एकसारखे नाहीत. अशी आयुधें धारण केलेली आहेत.
⛳⛳⛳⛳💗⛳⛳⛳⛳
॥जय जय रामकृष्ण हरि॥