Friday 26 May 2017

BOX OFFICE

नाटकाला जाताना आपण प्रथम नाट्यगृहाबाहेर असलेल्या बुकिंग ऑफिसमधून  तिकिट विकत घेतो. पण तशी पद्धत शेक्सपियरच्या काळात नव्हती. त्याकाळी तिकिटाची खिडकीच नसायची. त्याऐवजी नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारापाशी एक 'मेटल बॉक्स' ठेवलेला असायचा. या बॉक्सच्या फटीतून चार पेनीचं नाणं आत टाकलं की प्रेक्षकांना आत प्रवेश मिळायचा. 

हा बॉक्स इतक्या छोट्या आकाराचा असायचा की तो नाण्यांनी लगेच भरून जायचा. नाण्यांनी भरलेला हा छोटा बॉक्स घेऊन थिएटरचा एक माणूस स्टेजच्या मागच्या बाजूला असलेल्या ऑफिसमध्ये जायचा आणि हा बॉक्स तिथे ठेऊन रिकामा बॉक्स घेऊन परत प्रवेशद्वारापाशी यायचा. येताना ऑफिसच्या दाराला कुलूप लावायला तो विसरायचा नाही. हे सर्व होईपर्यंत प्रवेशद्वाराबाहेर खोळंबलेले प्रेक्षक चार पेनीचं नाणं या बॉक्समध्ये टाकून आत शिरायचे.

हे छोटे बॉक्सेस ज्या खोलीत ठेवले जायचे त्या खोलीला 'बॉक्स ऑफिस' म्हणायचे. आजही 'बॉक्स ऑफिस' हा शब्दप्रयोग आपण वापरतो, पण त्याचा उगम शेक्सपियरच्या काळात झाला.

छोटे बॉक्स ठेवण्यापेक्षा आणि ते सतत बदलत बसण्यापेक्षा एक मोठा बॉक्स का ठेवायचे नाहीत, असं कुणाला वाटू शकेल. त्याचं कारण हेच होतं की, हा बॉक्स पळवला जाईल याची भीती असायची. शेक्सपियरचं 'ग्लोब थिएटर' ज्या भागात होतं, तिथे चोर, डाकू, दरोडेखोर, वेश्या यांचा सुळसुळाट होता आणि चोऱ्यामाऱ्यांचं प्रमाण मोठं होतं. नाण्यांनी भरलेला मोठा बॉक्स चोरीला गेला, तर नुकसानही तेवढंच मोठं होणार, हा विचार छोटे बॉक्सेस वापरण्यामागे असायचा...

No comments:

Post a Comment