Friday 6 October 2017

ओव्या३६ ते५० अर्जुनविषादयोग सार्थ ज्ञानेश्वरी


🌼माधुर्यी मधुरता । शृंगारी सुरेखता ।रूढपण उचितां । दिसे भले ॥३६॥
✏  या (ग्रंथात) मधुरतेलाही गोडी प्राप्त झाली. शोभिवंत वस्तूंना अधिक सुरेखता आली.
योग्य वस्तूंना आलेला रुढपणाचा ही सुंदर प्रत्यय आला.
🌼एथ कळाविदपण कळा । पुण्यासी प्रतापु आगळा ।म्हणऊनि जन्मेजयाचे अवलीळा । दोष हरले ।३७|
✏येथे कलेला कुशलता, पुण्याला अधिक बळ प्राप्त झाले. म्हणूनच जनमेजयाचे दोष (भारत श्रवण केल्याने ) सहज नाहीसे झाले.
🌼आणि पाहता नावेक । रंगी सुरंगतेची आगळीक ।गुणां सगुणतेचे बिक । बहुवस एथ ॥३८॥
✏ क्षणभर विचार केला असता, असे दिसते की या रंगामध्ये आणखी विविध रंगांचा सहभाग किंवा सद्गुणांना आणखी चांगल्या गुणांची साथ अधिकतेने या ग्रंथात आढळते.
🌼भानुचेनि तेजें धवळले । जैसे त्रैलोक्य दिसे उजळले ।तैसे व्यासमती कळवलें । मिरवे विश्व ॥३९॥
✏ सूर्याच्या प्रकाशाने उजळलेले त्रैलोक्य तेजोमय दिसते. त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने व्यापिलेले सगळे विश्व शोभिवंत दिसते.
🌼कां सुक्षेत्रीं बीज घातले । ते आपुलेयापरी विस्तारले ।तैसे भारतीं सुरवाडले । अर्थजात ॥४०॥
✏चांगल्या कसदार जमिनीत पेरलेले बी आपल्या अंगच्या जोमाने उगवते त्याप्रमाणे चार पुरुषार्थ प्रफुल्लित झाले.
🌼ना तरी नगरांतरी वसिजे । तरी नागराचि होइजे ।तैसे व्यासोक्तितेजे । धवळित सकळ ॥४१॥
✏ शहरात किंवा नगरात वस्ती करुन राहिलेला मनुष्य सुसंस्कृत होतो. त्याप्रमाणे व्यासवाणीच्या तेजात (न्हाऊन निघाल्याने) सर्व विश्व ज्ञानमय झाले आहे.
🌼कीं प्रथमवयसाकाळीं । लावण्याची नव्हाळी ।प्रकटे जैसी आगळी । अंगनाअंगी ॥४२॥
✏ तारुण्यात प्रवेश करण्याच्या सुरवातीस नवतरुणीच्या अवयवामध्ये लावण्याचा भर अधिक उठावदार दिसतो.
🌼ना तरी उद्यानी माधवी घडे । तेथ वनशोभेचि खाणी उघडे ।आदिलापासोनि अपाडे । जियापरी ॥४३॥
✏ उद्यानात वसंत शोभा आली असता सर्व तरुवेलींवर पूर्वीपेक्षा अधिकच वनवैभव दिसू लागते.
🌼नाना घनीभूत सुवर्ण । जैसे न्याहाळितां साधारण ।मग अळंकारी बरवेपण । निवाडु दावी ॥४४॥
✏ लगडीच्या स्वरुपातील सोने साधारण दिसते. परंतु त्याचे अलंकार बनविल्यावर ते अधिक भूषविते.
🌼तैसे व्यासोक्ती अळंकारिले । आवडे ते बरवेपण पातले ।ते जाणोनि काय आश्रयिले । इतिहासी ॥४५॥
✏ त्याचप्रमाणे व्यासाच्या वाणीने अलंकृत झालेले सौंदर्य अधिक शोभायमान झाले. हे पाहून इतिहासाने त्याचा आश्रय केला.
🌼नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं । सानीव धरुनी आंगी ।पुराणे आख्यानरूपे जगीं । भारता आली ॥४६॥
✏ जगात सन्मान कीर्ती प्राप्त व्हावी म्हणून जणू काही पुराणे नम्रता धरून छोट्या छोट्या आख्यानाच्या रुपाने महाभारतात येऊन प्रसिद्ध झाली.
🌼म्हणऊनि महाभारतीं जे नाही । ते नोहेचि लोकी तिहीं ।येणे कारणे म्हणिपे पाहीं।व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥ ४७॥
✏ म्हणून महाभारतात जे नाही ते तिन्ही लोकात सापडणार नाही, यासाठी हे त्रिभुवन व्यासांचे उष्टे आहे. (व्यासानंतर झालेल्या कथा कल्पना या व्यासांपासूनच घेतल्या आहेत.) 
🌼ऐसी सुरस जगीं कथा । जे जन्मभूमि परमार्था ।मुनि सांगे नृपनाथा । जनमेजया ॥४८॥
✏ अशी ही जगातील अतिशय रसाळ कथा ब्रह्मज्ञानाचे उगमस्थान आहे. ती वैशंपायन मुनींनी श्रेष्ठ राजा जनमेजयास सांगितली.
🌼जे अद्वितीय उत्तम।पवित्रैक निरुपम ।परम मंगलधाम । अवधारिजो ॥४९॥
✏ ही कथा अद्वितीय, उत्कृष्ट, अत्यंत पवित्र, अनुपम, परमकल्याणाचे आश्रयस्थान असल्याने ती समजून घ्या.
🌼आता भारतीं कमळपरागु । गीताख्यु प्रसंगु ।जो संवादिला श्रीरंगु । अर्जुनेसी ॥५०॥
✏ आता भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला संवादरुपाने उपदेश दिला. तो गीता नावाचा विषय भारतरुपी कमळातील जणू पुष्प पराग आहे.

No comments:

Post a Comment