Thursday 5 October 2017

अर्जून विषादयोग ओव्या 26 ते 35 सार्थ ज्ञानेश्वरी

 ओव्या
💡॥॥
  🔔🔔
⛳🌺⛳🌺⛳🌺⛳🌺⛳
🌸का तीर्थे जिये त्रिभुवनी । तिये घडती समुद्रावगाहनी ।ना तरी अमृतरसास्वादनीं । रस सकळ ॥२६॥
✏  जगामध्ये जेवढी म्हणून तीर्थक्षेत्रे आहेत. त्या सर्वांची तीर्थस्नाने केवळ एकट्या समुद्रस्नानाने घडतात. किंवा फक्त अमृत सेवन केले असता, सर्व रसांची गोडी त्यामध्ये अंतर्भूत असते.
🌸तैसा पुढतपुढती तोची । मियां अभिवंदिला श्रीगुरूचि ।जे अभिलषित मनोरुची । पुरविता तो ॥२७॥
✏ त्याप्रमाणे एकट्या श्रीगुरुंच्या वंदनात सर्वांना वंदन घडते. म्हणून मी सद्गुरुंना वारंवार वंदन करतो. कारण ते मनात आलेले मनोरथ पूर्ण करतात.
🌸आता अवधारा कथा गहन । जे सकळां कौतुका जन्मस्थान ।की अभिनव उद्यान । विवेकतरूचे ॥२८॥
✏ आता ही कथा लक्षपूर्वक ऐका! जी कलेच्या नवलाईच्या आविर्भावाचे उगमस्थान, किंवा विचाररुपी तरुंचे नवे विशाल अपूर्व उद्यान आहे.
🌸ना तरी सर्व सुखांची आदि । जे प्रमेयमहानिधी ।नाना नवरससुधाब्धि । परिपूर्ण हे ॥२९॥
✏ म्हणून सर्वसुखाचे आश्रयस्थान आहे. अनेक तत्वार्थांचा मोठा साठा किंवा शृंगारादि नऊ रसांनी तुडुंब भरलेला सागरच आहे.
🌸की परमधाम प्रकट । सर्व विद्यांचे मूळपीठ ।शास्त्रजाता वसिष्ठ । अशेषांचे ॥३०॥
✏  सर्वांना उघडपणे दिसणारा सर्वोत्तम ज्ञानप्रकाश, किंवा सर्व विद्यांचे मूलस्थान किंवा सर्व शास्त्र समूहांचे आश्रयस्थान आहे.
🌸ना तरी सकळ धर्मांचे माहेर । सज्जनांचे जिव्हार । लावण्यरत्नभांडार । शारदियेचे ॥ ३१॥
✏ सर्वधर्मांचे माहेर सज्जनांचा जिव्हाळा आहे. किंवा सरस्वतीच्या लावण्यमय रत्नांचा खजिना, अशी आहे.
🌸नाना कथारूपे भारती । प्रकटली असे त्रिजगती ।आविष्करोनी महामती । व्यासाचिये ॥ ३२॥
✏ व्यासांच्या विशाल बुद्धीमध्ये प्रकट होऊन वाग्देवता या आख्यानाच्या रुपाने जगतात अवतरली आहे.
🌸म्हणोनी हा काव्यां रावो । ग्रंथ गुरुवतीचा ठावो ।एथुनि रसां आला आवो । रसाळपणाचा ॥ ३३॥
✏ त्यामुळे हा महाकाव्याचा राजा आहे. ग्रंथाच्या थोरपणाची सीमा आहे. येथूनच रसांना रसाळपणाची प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
🌸तेवींचि आइका आणिक एक । एथुनि शब्दश्री स्वच्छास्त्रिक ।आणि महाबोधि कोवळीक । दुणावली ॥ ३४॥
✏ तसेच आणखी एक ऐका ! या महाभारत ग्रंथामुळे शब्दाच्या संपत्तीला शुद्ध शास्त्रीयता प्राप्त झाली. ब्रह्म ज्ञानाचे निरुपण सुंदर समर्पक शब्दात करता येऊ लागले. उपदेशामध्ये कोमलता आली.
🌸एथ चातुर्य शहाणे झाले । प्रमेय रुचीस आले ।आणि सौभाग्य पोखले । सुखाचे एथ ॥ ३५॥
✏ येथे चातुर्य सुद्धा शहाणे झाले. प्रेमाला अधिकच मधुरता प्राप्त झाली. सुख भाग्यवान ठरले.

No comments:

Post a Comment