Sunday 29 November 2015

संडे मूड - मंगेश तेंडुलकरांचं

मंगेश तेंडुलकरांचं 'संडे मूड' हे पुस्तक..त्यातील एक प्रेरणादायी वर्णन.

पुण्यातला तेव्हाचा लाकडी पूल आणि जोंधळे चौक या दरम्यान (१९४१-४२) माझ्या वडिलांचे पुस्तकाचे दुकान होतं. घरी माझा व्रात्यपणा नियंत्रणाबाहेर जात असल्याकारणानं वडील मला दुकानात न्यायचे.

संध्याकाळचा साडेपाचचा सुमार. समोर दुकानात आणि रस्त्यावर तुरळक वर्दळ होती.
"ते समोरच्या दुकानात पाहिलेस? ते आपले धोंडो केशव कर्वे आहेत!" वडिलांनी सांगताच माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं. डोक्यावर टोपी, कृश, पाठीत पोक असलेले शांत गृहस्थ. त्यांनी तिथं धान्य खरेदी केलं. जवळपास अर्धं पोतं भरेल इतकं. दुकानाच्या कट्ट्याच्या चार पायऱ्या उतरून रस्त्यावर आले. कट्ट्यावरचं धान्याचं पोतं पाठीवर घेतलं आणि रस्त्याकड बघत पुलाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. कुणी आपल्याकडे बघेल, मदत करील ही अपेक्षाच त्यांच्या चेहऱ्यावर नव्हती. हे माझं काम आहे आणि मीच ते करायचं, इतक्या सहजतेने ते पोत्याचा ओझं पाठीवर घेऊन चालत होते- कर्मभूमी हिंगण्याच्या दिशेनं. त्यांची पावलं सावकाश चालत अंतर कपात होती.

जो तेव्हा पुण्यातला सर्वाधिक उद्धट, उर्मट समजला जायचा, असा टांगेवाला धोंडो केशवांच्या दिशेने पुढे गेला आणि त्यानं वळून पाहिलं. धोंडो केशवांना त्यानं ओळखलं. टांगा उभा करून तो खाली उतरला. धोंडो केशव त्याला हातांनीच पुढं जायला सांगत होते. धोंडो केशव यांच्या पायाला स्पर्श करून तो म्हणाला, "माझ्या बापा, तुझ्या पाठीवरचं ओझं बघून मी पुढे गेलो तर देव मला नरकात पाठवेल रे. आण ते पोतं इकडं." पाठीवरचं पोतं घेऊन टांगेवाल्यानं ते त्याच्या टांग्यात टाकलं. धोडो केशव यांना हाताला धरून टांग्यात बसवलं आणि तो टांगा हिंगण्याच्या दिशेने निघाला.

हा प्रसंग - आज ७० वर्ष झाली त्याला - जसाच्या तसा स्मरणात राहिला. जे काम माझं म्हणून स्वीकारलं, ते मीच करायचं. कौतुकाची, मदतीची अपेक्षा नं ठेवता ते करायचं. ज्यांच्यासाठी करायचं, त्यांच्यावर उपकार केल्याची भावना ठेवायची नाही.. प्रसंगी कृतघ्नपणासुद्धा मुकाट स्वीकारायचा. नाउमेद व्हायचं नाही. करतो आहे ते चांगल काम आहे, करत राहीन. माझ्या निर्णयाचा मान माझ्या वयाला आणि प्रकृतीला राखावाच लागेल...यातल एक अक्षर ही न बोलता, धोंडे केशव कर्वे हे सांगून गेले. नुसते सांगून गेले, असं नाही, तर पाहणाऱ्याच्या आयुष्यभर लक्षात राहील, असा परिणाम साधून गेले.

No comments:

Post a Comment