Tuesday 10 November 2015

दूरदृष्टीने विचार करायला शिकूया.

कोणत्याही पालकांचे मुलांच्या भाविताव्याबाबत हेतू वाईट नसतात, पण उपाय चुकीचे असतात. आपल्या मुलांनी चांगल्यात चांगले करीयर निवडावे अशीच प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्यासाठी त्यांना उत्तम महाविद्यालयात प्रवेश देण्याचा ते प्रयत्न करतात.मात्र आपली मुले हीच आपल्यासाठी सर्वोत्तम असतात हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे.

यशस्वी होण्यात ज्ञान व निर्णय क्षमतेचा वाटा 20% तर चिकाटी,आशावाद,टीमवर्क आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता यावरच मुलांचे 80% यश अवलंबून असते.शाळा महाविद्यालयात ज्ञान मिळते. उर्वरीत गुण मुलांच्या अंगी बाणवावे लागतात व त्यासाठी पालकांनी सजगपणे प्रयत्न करणे आवश्यक असते. म्हणून पालकांनी मुलांचा उपहास, अपमान करू नये.तसेच त्यांची इतरांशी तुलानाही करू नये. सर्वात महत्वाचे म्हणजे इमोशनल ब्लँकमेलींग करणे टाळावे.कठोर नियमित कष्ट हाच शाश्वत यश मिळवण्याचा मार्ग असून अल्प प्रयत्नांनी मिळालेले यश फार काळ टिकत नाही, हे समजून घेतले पाहीजे. त्यामुळे मुलांनी निवडलेल्या विषयाचा एकाचित्ताने अभ्यास करण्याचा विचार पालकांनी मुलांत रुजवाला पाहीजे.

निवडलेल्या ध्येयाकडे वाटचाल करतांना अनेकदा ठेच लागेल,पडायला होईल. ते स्वाभाविकच आहे. मात्र पडल्यानंतर तुम्ही किती चटकन स्वत:ला सवारता त्यावर तुमची यशस्वीता अवलंबून असते.कोणत्याही परिस्थितीत हार मानू नाका. चिकाटी आणि चिवटपणाने प्रतिकुलतेवर मात करता येते.भूत आणि भविष्यापेक्षा हाती असणार्या वर्तमानाचा जास्त विचार करा.कारण कोणत्याही चांगल्या कामासाठी आज व आत्तासाराखा उत्तम मुहूर्त नाही,अशी शिकवण पालकांनी मुलांना द्यायला हवी.

मी इंग्रजी भाषेविरूध्द नाही. पण शिक्षक म्हणून मला असे वाटते की, मातृभाषेतून शालेय शिक्षण घेतल्याने मुलांची आकलनशक्ती चांगली वाढते. मातृभाषेतून विषय चांगला समजल्यामुळे पाया पक्का होतो. इंगजी माध्यमातून शिकतांना आधी मुले मातृभाषेतून विचार करतात आणि मग इंग्रजीतून. त्यामुळे भारतीय मुलांच्या मेंदूवर अतिरीक्त ताण येतो. आणि अभ्यास फक्त गुणांसाठी केला जातो. हा माझा अनुभव आहे. कारण मी गेली कित्येक वर्षे इंगजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकवतो आहे. तेव्हा हे प्रकर्षाने जाणवते.मी मातृभाषेचा वृथा अभिमान बाळगणारा नाही; तर मुलांच्या दीर्घकालीन घडण्याचा त्या मागे विचार आहे.

आणि दुसरे म्हणजे परकी कोणतीही भाषा नंतर स्वप्रयत्नाने आत्मसात करता येते. त्यासाठी इंग्रजी माध्यमातच शिकायला हवे असे नाही.हा माझा स्वानुभव आहे. कारण मी मुळचा मराठी माध्यमातील असूनही गेली 35 वर्ष मात्र मी कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिकवतो आहे. मला कुठेही भाषेची अडचण आली नाही.मुळात मातृभाषा पक्की असेल तर मग इतर कुठलीही भाषा शिकणे अवघड नसते.ती आपल्या मेंदूची क्षमता आहे. कारण आकलनशक्तीचा पाया पक्का झलेला असतो.

आपण दूरदृष्टीने विचार न केल्यामुळेच आज मुलांची वैचारीक क्षमता कमी झालेली दिसते.परिणामस्वरूप त्यांना read between lines करता नाही.शब्दाचा फक्त कोशातील अर्थ कळतो पण शब्दामागील भावना कळत नाहीत.आणि पदवी घेतल्यानेच चांगली नोकरी मिळते हाही एक भ्रम आहे. ज्याच्याकडे मेहनतीची तयारी आहे, नवनव्या कल्पना अंमलात आणायची धमक आहे, अपयशातून यशाकडे जाण्याचे जीद्द आहे, अशा लोकांना sky is the limit असते. त्यांना कोणीही अडवू शकत नाही. लहानपणीच असे विचार मुलांमध्ये निर्माण केले तर तो फ्क्त परिक्षार्थी न होता खरा विद्यार्थी होईल. त्यासाठी लागणारी आकलनशक्ती, विश्लेषक विचार करण्याची कुवत मातृभाषेतूनच चांगल्या प्रकारे वाढू शकते. म्हणून मातृभाषेतून शिक्षण घ्यायला हवे.

शिक्षण हे फक्त नोकरी साठी म्हणून न घेता ज्ञानासाठी घेतले तर माणसाच्या बुध्दीची झेप त्याला जगाच्या पाठीवर कोठेही नोकरी मिळवून जगण्यास समर्थ करील. म्हणूनच विचार करायला शिकणे जितके मातृभाषेतून सहजसाध्य होईल तितके इंग्रजी माध्यमातून नाही. आपण मुलांना फक्त साक्षर बनवायचे की सुशिक्षीत हे ठरवायची आता वेळ आली आहे. म्हणून आपण र्‍हस्व दृष्टी टाकून देवून दूरदृष्टीने विचार करायला शिकूया.

No comments:

Post a Comment